घरफिचर्सकाकडेकाका - प्रायोगिक चळवळीचा ‘ताठ कणा ’ !!

काकडेकाका – प्रायोगिक चळवळीचा ‘ताठ कणा ’ !!

Subscribe

रंगायनची वाटचाल आणि त्यातून आविष्कार संस्थेचा जन्म याबाबत माहिती अनेकांच्या पुस्तकांतून मिळते. पण आमच्या पिढीने पाहिली ती उगवत असलेली -उगवलेली आविष्कार संस्था -त्यांची एकापेक्षा अनेक अशी सरस प्रायोगिक नाटके आणि अख्खी छबिलदास चळवळ. जी उभी करण्यात काकडेकाका नामक तपस्व्याच्या मोठा हातभार होता. जे आम्ही दुरून पाहिले, प्रेक्षकांतून पाहिले, त्यातून प्रायोगिकपणा समजत गेला आणि चळवळीचा ‘ताठ कणा ’ पाहण्याचे त्यांचे कार्य अनुभवण्याचे भाग्य लाभले.

स्वातंत्र्यपूर्व काळातील लोक अभिमानाने म्हणायचे की, आम्ही गांधींना पाहिले आहे, विनोबांचे विचार ऐकले आहेत. तेव्हा आमच्या पिढीला वाटायचे की, आम्ही स्वातंत्र्यपश्चात जन्माला आलो ते काय फक्त रेशनचे अन्न -अमेरिकेचा गहू खाऊन जगण्यासाठी की, वाहत्या गर्दीत मॉबमधला ‘एक’ होण्यासाठी ? की रस्त्यावर उतरून दंगे-धोपे करण्यासाठी? की घरच्यांना मदत म्हणून नोकरी करून स्थिर आयुष्य जगण्यासाठी? भरकटण्यासाठी अनेक मार्ग होते, पण वाचन-संस्कृती हाताशी असल्याने संवेदनशील मनाची मशागत होत होती. अशातच कॉलेज-दिवसात ‘एकांकिका’ नावाचे जादूमय माध्यम हाताशी आले, त्याकडे डोळे किलकिले करून पाहता जाणवले की, तिची पायवाट प्रायोगिक रंगभूमीकडे जात आहे. छबिलदास चळवळ उगवत होती आणि तिथेच ‘काकडेकाका ’ भेटले आणि पुढील आयुष्यात वारंवार भेटत राहिले. त्यांच्या शब्दांतून, उत्साहातून अनेकांच्या मनात ‘प्रायोगिकतेची ऊर्जा जिवंत ठेवण्याचे काम अव्याहतपणे करत राहिले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व देणारी माणसे, महात्मे आमच्या वडील, आजोबा पिढीने पहिली. आम्ही कमनशिबी म्हणता म्हणता बाबा आमटे आणि काकडेकाका यांच्यासारखे तपस्वी पाहू शकलो. त्यांचे विचार-सहवास घेण्याचे भाग्य लाभले. अशा व्रतस्थ काकडेकाकांच्या काही आठवणी, त्यांच्या जीवनातील ठळक प्रसंगांची उजळणी.

काकडेकाका पूर्वायुष्यातील आठवणी, बोलताना ते आपल्याला थेट कॉलेजच्या दिवसांत घेऊन जातात. त्यावेळचे कॉलेज, वाङ्मय मंडळाचे नाटक आणि नंतर झालेली भालबा केळकरांशी झालेला परिचय आणि नाटकात प्रवेश कसा केला हे अगदी सहजपणे जणू अलीकडेच घडलेय अशा पद्धतीने सांगत जातात. संदर्भ – दिग्दर्शन अनुभव- फजितवाडा, अभिनय अनुभव, खडाष्टक. एका संस्थेची दारे बंद झाली म्हणून त्यांनी स्वत:ची संस्था काढूया म्हणून रंगमंचची स्थापना आणि तेव्हा नाटक केले. चिमणीचे घर मेणाचे अर्थात त्यांना तेव्हा ! तेंडूलकर -ग.वा.बेहेरे यांचा जबरदस्त पाठिंबा होता. नंतर राज्य नाट्य-स्पर्धेत सर्व बक्षिसे मिळाली असे अभिमानाने सांगतात. ग.वा. बेहेरेनी लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि लग्न झाले अशी वैयक्तिक माहितीदेखील ते आपल्याला देतात. पुढे ‘रंगायन’ हे नाव कवी पु.शि.रेगे यांनी सुचवले. त्यानंतर पहिले नाटक ‘ससा आणि कासव’ आणि बळी /मादी -मार्सेल शो -खुर्च्या /अजगर-गंधर्व असे टप्पे आपल्याला कळतात. रंगमंच संस्थेत हिशेब ठेवणे आणि ऑडिट असा मोलाचा अनुभव त्यांना मिळाला. पण विजयाबाईंच्या – तुला काय पांगे व्हायचे आहे का? या एका प्रश्नाने त्यांच्या जीवन प्रवाहाची दिशाच बदलली.

- Advertisement -

रंगायनची वाटचाल आणि त्यातून आविष्कार संस्थेचा जन्म याबाबत माहिती अनेकांच्या पुस्तकांतून मिळते. पण आमच्या पिढीने पाहिली ती उगवत असलेली -उगवलेली आविष्कार संस्था -त्यांची एकापेक्षा अनेक अशी सरस प्रायोगिक नाटके आणि अख्खी छबिलदास चळवळ. जी उभी करण्यात काकडेकाका नामक तपस्व्याच्या मोठा हातभार होता. जे आम्ही दुरून पाहिले, प्रेक्षकांतून पाहिले, त्यातून प्रायोगिकपणा समजत गेला आणि चळवळीचा ‘ताठ कणा ’ पाहण्याचे त्यांचे कार्य अनुभवण्याचे भाग्य लाभले.

आविष्कार युग – रंगायनमधून बाहेर पडल्यावर नवे आणि आपल्याला हवे ते प्रायोगिक करायचे हे देशपांडे -काकडे यांचे निश्चित होते. अरविंद देशपांडे अभिनेते तितकेच कल्पक -प्रगल्भ दिग्दर्शक होते. काकडे तसे ऑल राऊंडर, पार्ल्यात राहायला आलेले. तेंडुलकर नाटककार -असा तिहेरी कलात्मक संगम -म्हणजेच आविष्कार प्लस सुलभाताई -अभिनेत्री व दिग्दर्शिका यातून प्रायोगिकवर इतिहास घडवणारे ‘शांतता, कोर्ट चालू आहे’ ची निर्मिती झाली. नाट्य-लेखन आणि बसवण्याच्या प्रोसेसबद्दल काकडेकाका भरभरून बोलायचे. ‘तुघलक’ ही तेव्हा केलेली व आजही भव्य-दिव्य निर्मिती. सत्तर -ऐशी कलाकारांची टीम-त्याकाळी व्यावसायिकवर व्यस्त असलेले अरुण सरनाईक, देखणे नेपथ्य -प्रभावी सादरीकरण ज्याचे जास्त प्रयोग होऊ शकले नाहीत, ही खंत होती. पण ‘शांतता’ने आविष्कारला प्रस्थापित केले. ‘शांतता’च्या शतक महोत्सवी प्रयोगाला मतभेद झाले आणि आविष्कार जन्माला आली. नंतर मात्र तिघांनी मागे वळून बघितले नाही. आरती प्रभू म्हणजेच चि.त्र्यं. खानोलकर यांचे प्रतिमा हे अद्भुत नाटक रंगमंचावर आणले. दिगदर्शन होते सुलभा देशपांडे यांचे. त्याआधी सुहासिनी मुळगावकर यांनी -‘बाई एके वाई’ हे नाटक लिहिले व बसवले होते. नंतर एनएसडी प्रशिक्षित जयदेव हट्टंगडी -रोहिणी ओक आविष्कार परिवारात सामील झाली. ‘चांगुणा’ उभे राहिले, ज्यात सतीश पुळेकर मुख्य भूमिकेत आले. पाहिजे जातीचे नाटकात नाना पाटेकर- विहंग नायक यांची धम्माल कामगिरी प्लस सुषमा तेंडुलकर-तेंडुलकरी लेखणीचे विनोदी शैलीतील रसायन आणि पप्पा -अरविंद देशपांडे यांचे गतिमान दिग्दर्शन. हेच छबिलदासचे नाटक पुढे शिवाजी मंदिरला झाले.

- Advertisement -

अनेक नाटकांची निर्मिती-कुशल व्यवस्थापन- 1971 ते 2019 इतका प्रदीर्घ कालावधी त्यातून निर्माण झालेली सव्वाशेहून अधिक नाटके-ज्यांचे वैविध्य आपल्याला जाणवते. उदा -व्यंकटेश माडगूळकर, गौराई, अबू हसन -बादल सरकार यांचे नाटक काकडेंनी मराठीत आणले. मोहन राकेश हा हिंदीतील नाटककार मराठीत आणला छत्रिया, मग डॉ. शंकर शेष हा नाटककार लाभला. त्यांची पोस्टर, रक्तबीज, आधी रात के बाद, उष:काल होता होता ही नाटके केली. वृंदावन दंडवते, वसंत देव, खानोलकर, मकरंद साठे, दिलीप चित्रे, सदानंद रेगे, राजीव नाईक, श्याम मनोहर, वसंत पोतदार, चं. प्र. देशपांडे अशा अनेक नाटककारांची प्रायोगिक नाटके जी आशयदृष्टीने वेगळी होती ती यथार्थपणे सादर केली. जयदेवप्रमाणे विहंग नायक, दिलीप कोल्हटकर, अजित भगत, रामनाथ थरवल, शिवदास घोडके, चेतन दातार, दीपक राजाध्यक्ष, गिरीश पतके, विश्वास सोहोनी अशी दिग्दर्शकीय फळी निर्माण केली. अच्युत वझेप्रमाणे राजीव नाईक, शरद सावंत, श्रीराम खांडेकर, मकरंद साठे, विक्रम वाटवे, भाग्यश्री जाधव, इरावती कर्णिक, सतीश तांबे, विवेक साठे, हिमांशू स्मार्त अशी तरुण प्रायोगिक लेखकांची फौज घडवली.

लक्षणीय निर्मिती – काकडेकाकांचे निर्मिती कौशल्य सर्वच नाटकात दिसत होते, तरी त्यांनी काही महत्वाकांक्षी प्रोडक्शन्स केली- ज्यांनी मराठीच नव्हे तर भारतीय रंगभूमीवर वेगळेपणाचा ठसा प्रस्थापित केला. भारतीय रंगमंचावरील पहिले त्रिनाट्य-वाडा चिरेबंदी 1994, दुर्गा झाली गौरी -1982 अलीकडचे अरण्य-किरण, संगीत बया दार उघड, आषाढ-बार अशी वेगळी नाटके केली. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, यशवंत देव, नारायण सुर्वे, अशोक नायगावकर यांच्या कवितांवरील नाट्य-प्रयोग, सुप्रसिद्ध चित्रकार सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांवरील -चित्रगोष्टी हे सादरीकरण आविष्कार काकडेकाकाच करू शकले. चंद्रशाला-रंगमंचावरील एक सुंदर स्वप्न-सुलभाताई, माधव साखरदांडे, विजय तेंडुलकर, गुरु पार्वतीकुमार, रामनाथ थरवल, विद्या पटवर्धन यांनी आपला हात जगन्नाथ, आला अडाण्याचा गाडा, दुर्गा झाली गौरी, वृक्षवल्ली आम्हा, गोष्टी श्यामच्या आईच्या अशी वेगळ्या ढंगाची बहारदार बालनाट्ये साकार केली व बालप्रेक्षकांना दर्जेदार बालनाटके दिली. बालकलाकार व तरुण रंगकर्मींचा मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला.

150 हून अधिक नाट्य-शिबिरे,पुस्तक प्रकाशन, रंगनायक, ते आणि आम्ही, शिवाय चेतन दातारची सावल्या-राधा वजा रानडे, चं. प्र. देशपांडे-ढोलताशे, बुद्धिबळ, रामदास भटकळ-जगदंबा, सुषमा देशपांडे-संगीत बया दार उघड अशी नाटके आविष्कारतर्फे प्रकाशित केली आहेत. आविष्कार, तिशी आणि चाळीशी हे दोन विशेषांक अभिनय /दिग्दर्शन/निर्मिती सूत्रधार /निर्माता,संघटक काकडेकाकांनी अनेक स्थित्यंतरे पाहिली, पचवली आणि खंबीरपणे उभे राहिले. पप्पा देशपांडे, तेंडुलकर आणि नंतर सुलभाताई गेल्याचे घाव त्यांनी पचवले. आपल्या आंतरिक भावना कधी लोकांसमोर प्रगट नाही केल्या. चेतन दातारचे अवचित जाणे त्यांना लागून राहिले, कधीही त्याच्याबद्दल ते म्हणायचे, चेतन म्हणजे कम्प्लिट थिएटर पर्सन ! मोस्ट प्रॉमिसिंग !! त्याने चंद्रपूरच्या जंगलात, राधावजा रानडे, सावल्या, इंदू काळे, सरला भोळे, एक माधवबाग असे अनेक आशयगर्भ प्रयोग केले. रवी-रसिक, गिरीश पतके, दीपक राजाध्यक्ष व विश्वास सोहोनी, सुषमा देशपांडे, इरावती कर्णिक आणि सीताराम कुंभार ही तर काकडेकाकांची मोठी बॅक अप फळी. प्रत्येक नवं-निर्मितीला यांचा सक्रिय सहभाग असायचा.

व्यक्तिगत आठवणींचे मोहोळ कधी भेटले आपल्याला ? असे विचार करताना आठवले की, 1980 च्या काळात छबिलदासला प्रयोग करण्याची उर्मी होती. पप्पा देशपांडे यांचे पाठबळ होते, तारखांबद्दल तू काकडेना भेट !! तोच पहिल्या भेटीचा क्षण. पुढे ते भेटत राहिले, त्यांच्या व छबिलदासला होणार्‍या नाटकाच्यावेळी. त्यांचा उत्साह आणि करत रहा !! हे सांगणे हे आम्हा नोकरी करणार्‍या तरुणांना प्रेरक होते. पुढे पत्रकार म्हणून मुलाखत घेताना, नोकरी करिअर सांभाळून झेपेल तशी प्रायोगिक नाटके व स्पर्धा करताना काकडेकाका कळत राहिले. त्यांनी व रवी सावंत, रसिक राणे, सीताराम कुंभार आणि सहकारी यांनी ज्या पद्धतीने संस्थेच्या फोटोंचा-परीक्षणाचा -माहितीचा मोठा दस्तावेज निर्माण केला आहे, त्याला तोड नाही. त्यांचा हा चळवळीचा संचय कुठेतरी सुरक्षित राहावा व भविष्यात संदर्भासाठी उपलब्ध झाला पाहिजे म्हणून पुढाकार घेतला पाहिजे.संस्था, चळवळ आणि मराठी प्रायोगिक नाटक यांचा ज्यांनी आयुष्यभर ध्यास घेतला त्या काकडेकाकांनी सतत नाविन्यपूर्ण संहितांचा शोध घेतला व कुशल व्यवस्थापन -बॅकस्टेज-सादरीकरण यांचा व्यावसायिकपेक्षा अधिक परफेक्शनने वापर केला. क्रिएटिव्हिटी, संघटन कौशल्य, प्रभावी जनसंपर्क, निस्वार्थीपणा असे एकाच व्यक्तिमत्वात एकत्रित झालेले काकडेकाका त्यांचे कार्य आमच्या पिढीला साक्षात पहायला मिळाले. हेच आमचे भाग्य. ज्यांनी त्यांच्या बरोबरीने काम केले, निर्मिती क्षणात सहभागी झाले होते, ते तर किती भाग्यवान. त्यांची आत्मीयता, शिस्त, तरुण पिढीशी जवळीक साधण्याची हातोटी आणि चोवीस तास जगताना, नाटक, प्रायोगिक मूल्यांचा ध्यास घेणारा एक महान तपस्वी, योद्धा, रंगकर्मी आणि सहृदय माणूस आपण गमावलेला आहे. आविष्कारची आजच्या प्रायोगिकची पालखी पुढे नेणारे तरुण ध्येयासक्त कार्यकर्ते नक्कीच पुढे येतील कारण काकडेकाका नेहमी ‘शो मस्ट गो ऑन’ तत्व मानणारे होते. पण पुन्हा असे काकडेकाका होणे नाही, त्यांची नाटके करण्याची तळमळ, ऊर्जा आपल्यात निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हीच त्या महान ऊर्जाशक्तीला, प्रचंड प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला आदरांजली. प्रायोगिकतेची ‘अखंड ज्योत’तेवत ठेवणे हेच त्यांचे खरेखुरे स्मारक !!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -