घरफिचर्सगुरुची विद्या...

गुरुची विद्या…

Subscribe

शेठ : आम्हाला सगळीकडे संरक्षण असतं; पण संसदेत असतं का? तिथे जो हल्ला होतो त्याचं काय... वजीर : संसदेत? पण, तिथे तुम्ही जाता कधी? (जीभ चावून) म्हणजे, कधी गेला होतात? तुम्ही तिथेही गेलात तर दीड-दोन तास ‘मन की बात’ ऐकवूनच बाहेर पडता. तिथे कसा कोण हल्ला चढवणार?

(शेठसाहेबांचा दिवाण-ए-खास. शेठ बादशहाच्या ऐटीत सिंहासनावर बसलेले, शेजारी वजीर-ए-पार्टी. शेठ अतिशय अस्वस्थ.)

शेठ : मला वाटतं पुन्हा एकदा रात्री आठ वाजता देशाला संबोधित करण्याची वेळ आली आहे…
(वजीर झीट येऊन पडण्याच्या बेतात असतात, प्रसंगावधान राखून आपलीच चप्पल आपल्या नाकाला लावतात, त्यांचे डोळे खोबणीत गरगरा फिरतात…)

- Advertisement -

वजीर : साहेब, फारच जबरदस्त कल्पना!… (शेठ पुरेसे खूश झाले आहेत, याची खात्री झाल्यावर) पण, गेल्यावेळी तुम्ही राष्ट्राला उद्देशून रात्री केलेल्या भाषणाचे परिणाम देश अजून भोगतोय आणि खरं सांगायचं तर आपणही भोगतोय… त्यामुळे, ते एक जरा पाहून घ्यायला हवं… पण, म्हणजे, असं तुम्हाला अचानक वाटण्यासारखं काय घडलंय?… किंवा काय घडवायचंय…?

शेठ : कमाल झाली, तुम्ही हा प्रश्न विचारताय! या देशात पंतप्रधान सुरक्षित नाही. कुठूनही कधीही सर्जिकल स्ट्राइक होऊ शकतो. विरोधक बेसावध गाठून हल्ला चढवतात आणि तुम्ही हा प्रश्न विचारता?
(सगळे गोंधळलेले.)

- Advertisement -

वजीर : साहेब, पण, तुम्हाला तर देशातली सगळ्यात कडक सुरक्षा देण्यात आली आहे. साध्या चिमण्या आणि कावळेही तुमच्या बंगल्याच्या परिसरात यायला घाबरतात, असा बंदोबस्त आहे. आता तर मंत्र्यांचीही अंगझडती घेण्याची व्यवस्था केली आहे. त्यांचं अमेरिका स्टाइल फुल कपडे काढून स्क्रीनिंग करायला लावायचंय का? तेही करून टाकू. ते कशालाही नाही म्हणणार नाहीत. त्यांची तशी हिंमतच नाहीये.

शेठ : ते मला माहिती आहे. त्याशिवाय का मंत्री बनवलंय त्यांना!

वजीर : शिवाय तुम्ही कधी पत्रकारांना सामोरे जात नाही. सगळं स्क्रिप्ट रेडी असल्याशिवाय मुलाखत देत नाही. कधी कुणाचं ऐकून घेण्याची वेळच तुमच्यावर आलेली नाही, त्यामुळे तीही सवय नाही. मग तुमच्यावर हल्ला चढवणार कोण आणि कधी? कोणी केली ही हिंमत ते सांगा, झटक्यात त्याचा बंदोबस्त करून टाकू!

शेठ : हल्ला होऊन गेल्यानंतर काय बंदोबस्त करणार?

वजीर : हल्ला झाला? होऊन गेला? कधी? तुमचं संरक्षण भेदण्याची हिंमत कोणी केली? आम्हाला कसं कळलं नाही?

शेठ : तुमचं लक्ष असेल तर ना? आम्हाला सगळीकडे संरक्षण असतं, पण संसदेत असतं का? तिथे जो हल्ला होतो त्याचं काय…

वजीर : संसदेत? पण, तिथे तुम्ही जाता कधी? (जीभ चावून) म्हणजे, कधी गेला होतात? तुम्ही तिथेही गेलात तर दीड-दोन तास ‘मन की बात’ ऐकवूनच बाहेर पडता. तिथे कसा कोण हल्ला चढवणार?

शेठ : एकदा तुम्हाला करकचून मिठी मारतो, म्हणजे कळेल…

वजीर : (एकदम उलगडा होऊन) : ओ हो हो, तो हल्ला होय… छ्या, त्या कालच्या पोराच्या मिठीचं काय एवढं मनाला लावून घेताय? सगळीकडे त्याचं हसं झालंय…

शेठ : सगळीकडे म्हणजे तुम्ही ज्यांची शिकवणी घेता आणि मी ज्यांना भक्तिभावाने फॉलो करतो, त्या ट्रोलांमध्येच ना? त्यांना हसावंच लागेल, पैसे मिळतात त्यांना त्याचे! बाकी लोकांमध्ये काय प्रतिक्रिया आहे, याची काही कल्पना आहे का?

वजीर : चिंता नको साहेब. तो कालचा पोर म्हणजे अकार्यक्षम घराणेशाहीचं प्रतीक आणि आपल्या दोघांच्याच हातात सगळी सत्ता एकवटली असली तरी आपण म्हणजे ‘पार्टी विथ डिफरन्स’ आहोत, हे आपण लोकांच्या मनावर बिंबवलंय. ‘तुम्ही देशाच्या हितासाठी दिवसाचे ३६ तास काम करता’, हे आपण लोकांच्या मनावर असं ठसवलंय की आपण दोघे कलर कोऑर्डिनेशन केलेले परफेक्ट फिटिंगचे कुर्ते आणि जाकीटं दर प्रसंगानुरूप कसे घालतो, त्यात किती वेळ जातो, हा प्रश्नही त्यांना पडत नाही. दिवसाला १७ परीटघडीचे जोडही आपण देशासाठी आणि विकासासाठीच बदलतो, हे सगळ्यांना माहिती आहे… त्यामुळे तो कालचा पोर जे काही करील, त्याने त्याचं हसंच होईल याची खात्री बाळगा.

शेठ : ते ठीक आहे. पण, आजवर मी धक्कासम्राट होतो. सगळ्यांना धक्के देत होतो. याने चक्क मला धक्का दिला. बुचकळ्यात पाडलं. माझी पंचाईत केली. आजवर कधी माझा असा चेहरा लोकांसमोर गेला नव्हता. माझा मलाच पाहवत नाही तो फोटो. शिवाय एवढा मोठा मुलगा मिठ्या कसल्या मारतो? या वयात काय-काय करता येतं ते आमच्या ट्रोलांकडून, गोगुंडांकडून शिकून घे म्हणावं. जिकडे तिकडे द्वेषाच्या होळ्या पेटवून आपल्या पोळ्या भाजून घ्यायच्या तर म्हणे हा झप्प्या देऊन द्वेषाला प्रेमाने जिंकायला निघालाय. मी काय म्हणतो, जरा माहिती काढा याने कोणता नवा गुरू केलाय त्याची!

वजीर : (गालातल्या गालात हसत) : ते मी आज दुपारीच विचारून घेतलं त्याला.

शेठ : (संशयाने) : मला बोलला नाहीत ते.

वजीर : साहेब, ते ऐकून तुम्हाला फारसं बरं वाटणार नाही…

शेठ : तरीपण मला ऐकायचंय ते… जे काही असेल ते स्पष्टपणे सांगा.

वजीर : ठीक आहे. तो म्हणतो, धक्का देण्याच्या बाबतीत माझे गुरू तुमचे शेठच आहेत… आणि समोरच्याला बेसावध

गाठून बळेबळे गळ्यात पडण्याच्या बाबतीतही माझ्यापुढे त्यांचाच आदर्श आहे!!!


-लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -