घरफिचर्सप्रबोधिनीची सखी हरवली

प्रबोधिनीची सखी हरवली

Subscribe

रोहिणी आचवल यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्र हळहळले

प्रबोधिनी विद्यामंदिरात प्रदीर्घकाळ मानसशास्त्रज्ञ म्हणून सेवा देणार्‍या रोहिणी आचवल (वय ५८) यांचे सोमवारी (दि. २४) कोरोनाने निधन झाले. रोहिणीताईंच्या जाण्याने सामाजिक क्षेत्रात मोठीच हळहळ व्यक्त होत आहे. मानसिकरित्या अपंग मुलांच्या जडणघडणीत रोहिणीताईंचे योगदान बहुमूल्य होते.

१९९९-२००० साल असेल. नाशकातील प्रबोधिनी शिक्षक प्रशिक्षण केंद्र येथे आम्ही नुकताच विशेष शिक्षणातील पदविकेच्या (मानसिक दिव्यांग ) अभ्यासक्रमास प्रवेश घेतला होता. तेथे भेटल्या मानसशास्त्र विभाग प्रमुख तथा प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ रोहिणीताई आचवल. १९८६ पासून रोहिणीताई आचवल प्रबोधिनीत मानसशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होत्या.मानसिक दिव्यांग मुलांच्या शिक्षणात येणार्‍या अडचणींचा त्यांचा मोठा अभ्यास होता. त्याकाळात( १९८०-८६)नाशिकमध्ये मानसिक दिव्यांग मुलांच्या निदान करण्याच्या,मानसशास्त्रीय चाचण्या करण्याच्या, पालकांचे समुपदेशन करण्याच्या, सेवा विशेषकरुन उपलब्ध नव्हत्या. या सर्व गोष्टींसाठी पालकांना आपल्या पाल्यांना घेऊन मुंबई किंवा पुण्याला जावे लागत असे. प्रबोधिनीसाठी मानसशास्त्रज्ञाची उणिव रोहिणीताईंनी भरुन काढली होती. प्रबोधिनीरूपी कमलपुष्पात रजनी ( लिमये बाई) च्या प्रभावाने रोहिणीताईंसारखा भ्रमर सेवा करण्यासाठी कायमचा बंदिस्त झाला होता. तो आजपर्यंत सेवारतच होता. तो आज दिव्यांगांची सेवा करून दिव्यज्योत घेऊन दिव्यतेजात विलीन झाला. दोन तिन महिन्यापूर्वीच त्या संस्थेतून निवृत्त झाल्या होत्या.पण सेवेतून निवृत्त झाल्या नव्हत्या. त्यांच्या तरूण वयात अत्यंत संवेदनशील मनावर विचारांची योग्य शिंपण करणार्‍या प्रबोधिनीच्या संस्थापिका कै. रजनीताई लिमये आदर्श लाभल्या. प्रबोधिनी त्यांच्या आयुष्याची सखी होती. प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांबरोबरच संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील मानसिक दिव्यांगमुलांचे बुध्यांक काढण्याचे,पालकांच्या समुपदेशनाचे काम त्यांनी केले.

- Advertisement -

ग्रामीण भागातील दिव्यांग बालकांच्या पालकांशी त्यांनी सुसंवाद साधला. या विषयातील जनजागृती केली. अनेक तालुक्यातील सर्वेक्षणात त्यांचा सहभाग होता. प्रबोधिनीतील पायलट प्रोजेक्टमध्ये काम केले. शासकीय पातळीवरील मानसिक विद्यार्थ्यांसाठीच्या अनेक समित्यांमध्ये त्यांनी काम केले. विशेष शिक्षक प्रशिक्षण घेताना माझ्या सौ.अर्चना व मला त्यांनी नेहमी मार्गदर्शन केले. केस स्टडी, वर्तन समस्या सुधारकार्य (बिहेविअर मॉडिफिकेशन) यात त्यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. मी प्रबोधिनी वसतीगृहात जेव्हा दोन वर्षांसाठी वसतिगृहप्रमुख झालो तेंव्हा त्या मला म्हणाल्या महेशसर, वसतिगृहात काम करताना या दिव्यांग मुलांचे तुम्ही स्वतःच पालक आहात या भूमिकेतून काम केले तर तुम्ही यशस्वी व्हाल. आज नाशिक जिल्हा परिषदेतील समावेशित शिक्षण विभागातील समन्वयक आणि माझ्या सहप्रशिक्षणार्थी चौथवे -पाबळकर मॅडमचा फोन आला. त्या म्हणाल्या ,नाशिक जिल्ह्यातील समावेशीत शिक्षण उपक्रमासाठी (बुध्यांक काढणे, निदान ,समुपदेशन,प्रशिक्षण ) रोहिणीताईंचा मार्गदर्शनाचा मोठा आधार होता. तो गेल्याने आम्ही पोरके झालोय. आमच्या सहप्रशिक्षणार्थींच्या गटावर त्यांनी कै.रोहिणीताईंना श्रध्दांजली वाहिली. प्रबोधिनीतील अनेक कार्यक्रमांना सूत्रसंचालन रोहिणीताई करायच्या. पालक सभांमधून विषयमांडणी कशी करायची याचे प्रशिक्षण त्यांनी प्रबोधिनीतील सर्व प्रशिक्षणार्थींना दिले आहे. प्रबोधिनी त्यांची सखी होती आणि त्या प्रबोधिनीच्या सखी होत्या. आज प्रबोधिनीची सखी हरवलीय.

– श्री. महेश जरंडकर, माजी प्रशिक्षणार्थी ’प्रबोधिनी शिक्षक प्रशिक्षण केंद्र. नाशिक

- Advertisement -

प्रिय रोहिणी कशी सुरवात करु समजत नाहीये. तू नाहीस हे स्वीकारायला करायला मन धजावत नाही. तुझा हसरा चेहरा रात्री सारखा डोळ्यासमोर येत होता. नाही झोपू शकले काल. आईनी तुला लेक मानली होती. म्हणजे माझी धाकटी बहीण होतीस. किती हुशार, आत्मविश्वास ओथंबून भरलेला, प्रबोधिनीवर मनापासून प्रेम करणारी, संस्थेच्या मोठं होण्यामागे तुझा फार मोठा वाटा होता… आज आमचा खूप मोठा आधार अचानक निखळून पडलाय. रोहिणी नाशिक जिल्ह्यातील मानसिक अपंग मुलांचा आयक्यू काढायच काम तुझ्यावर सरकारने सोपविले होते. त्याचे मानधन एक लाख रुपये तू संस्थेला दिलेस, हे मला सांगतांना आईच्या डोळ्यात तरळलेल पाणी आणि तुझ्या विषयी वाटलेला अभिमान आणि कौतुक माझ्या डोळ्यासमोर अजूनही जसाच्या तसा आहे. तुझ्या सगळ्या कुटुंबा विषयी तिला फार कौतुक होत. तुला विवेकची मिळालेली समंजस साथ तिला फार सुखावून जायची. आत्ता अस वाटतंय. बरं झालं हे सगळं बघायला आई नाही. हा धक्का आम्हीच पचवू शकत नाहीये. तिची काय अवस्था झाली असती. फेब्रुवारी मध्ये तुझ्या घरी येऊन आईची एक छान साडी तुला तिच्या तुझ्या निवृत्तीनंतरच्या शुभेच्छा म्हणून देऊन गेले होते. ती साडी नेसायची संधी सुद्धा देवाने तुला दिली नाही. रोहिणी मलींची खूप मोठी जबाबदारी तू विवेक वर टाकून निघून गेली आहेस. त्यांच्या इतकीच प्रबोधिनीही पोरकी झालीय हे नक्की. कदाचित आईची आणि तुझी भेट झालीही असेल. असेल तिथून प्रबोधिनीची काळजी घेशीलच इतकेच म्हणू शकते.

– तुझी,
– गीतांजली हतंगडी, उपाध्यक्षा, प्रबोधिनी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -