घरफिचर्सधाव सुवर्ण भविष्याकडे

धाव सुवर्ण भविष्याकडे

Subscribe

हिमा आणि मोहम्मद अनाससारख्या धावपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय प्रदर्शन करत सर्वांनाच आपली दखल घ्यायला लावली आहे. त्यामुळे या दोघांनी पदकांसोबतच भारतीयांची मनंही जिंकली हे निश्चित !

भारतामध्ये खेळ म्हटले की आपल्याला क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल यांसारख्या खेळांची आठवण होते. मात्र, मध्येच एखादा असा खेळाडू येतो जो हे चित्र बदलून टाकतो. तो जणू आपल्या खेळरूपी रुमालाची घडीच विस्कटून टाकतो. तो आपल्याला त्याचा खेळ पाहायला भाग पाडतो. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे धावपटू हिमा दास.
हिमा – जैसा नाम वैसा काम ! तिच्या नावाप्रमाणेच तिने केलेला पराक्रमही मोठा आहे. हल्लीच झालेल्या २० वर्षांखालील जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेच्या ४०० मीटर प्रकारात सुवर्णपदक जिंकत तिने नवा इतिहास घडवला. पण तिचा इथवरचा प्रवास सोपा नव्हता. तिच्यासमोर अनेक अडथळे आले. मात्र, हिमाने त्या अडथळ्यांनाही वेगाने मागे टाकले. तिने दाखवून दिले की, पी. टी. उषा नंतर जर कोणी महिला धावपटू भारताचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकवू शकते, तर ती म्हणजे हिमा दास.

आसामच्या नागाव जिल्ह्यातील ढिंग तालुक्यातील कुंधलिमरी या गावात हिमाचा जन्म झाला. हिमाला सुरुवातीला धावण्याचे फार वेड नव्हते. मात्र, तिला फुटबॉलमध्ये प्रचंड रस होता. तिला सुरुवातीला फुटबॉलपटू व्हायचे होते. परंतु तिला समजले होते की भारतात महिला फुटबॉलला कोणीही प्रोत्साहन देत नाही. मात्र, तिला भारतीय जर्सीचे फार आकर्षण होते. त्यामुळे तिला भारतासाठी काहीतरी खेळायचे होते. त्यातच तिच्या शाळेचे पीटी शिक्षक शमसूल हक यांनी तिला पळायला सांगितले. त्यामुळे ती पळू लागली. वेग ! तो तर जणू जन्मजातच तिच्याकडे होता. एरवी मस्तीखोर ही पोर, ट्रॅकवर उतरताच एकदम शांत, एकदम एकाग्र. तिला फक्त फिनिशिंग लाईन लवकरात लवकर पार करायची असायची. मात्र, फक्त टॅलेंट असून भागत नाही. त्याला जोड योग्य दिशेचीही लागते आणि ती दिशा तिला दाखवली, प्रशिक्षक निपॉन दास यांनी.

- Advertisement -

२०१६ मध्ये ती एका स्पर्धेसाठी गुवाहाटीला आली होती. तिथेच निपॉन दास यांनी हिमाला पहिल्यांदा पाहिले. तेव्हा निपॉन यांना तिच्या खेळात विशेष काही दिसले नाही. मात्र, त्यानंतर तिने आपल्या खेळात सातत्य आणले. पुन्हा गुवाहाटीतच एक शिबीर झाले, ज्यात हिमाने उत्तम प्रदर्शन केले. ते पाहून निपॉन दास थक्क झाले. त्यामुळे त्यांनी हिमाला प्रशिक्षण देण्याचे ठरवले. त्यासाठी तिला गुवाहाटीला आणणे गरजेचे होते. मात्र, त्यासाठी तिचे आई-वडील तयार होतील का हा प्रश्नच होता. हिमा अगदी छोटयाशा गावातील होती. तिचे वडील शेतकरी. त्यामुळे सुरुवातीला ते तिला गुवाहाटीला पाठवायला तयार नव्हते. पण निपॉन आणि हिमाचे दुसरे प्रशिक्षक निबाजीत मालकर यांनी तिच्या आई-वडिलांना यासाठी तयार केले. त्यांनी तिची राहण्यापासून खाण्यापर्यंत सर्व सोय केली. त्यामुळे हिमा गुवाहाटीला प्रशिक्षण घेण्याकरता आली. तिथे निपॉन यांनी तिचा जोरदार सराव करून घेतला. याचे फळ तिला पुढील काही महिन्यांतच मिळाले. तिची खेलो इंडिया साठी निवड झाली. पुढे तिने फेब्रुवारी २०१७ मध्ये नॅशनलला कांस्य पदक मिळवले. तिथेच ती पहिल्यांदा खर्‍या सिंथेटिक रेस ट्रॅकवर धावली. त्यानंतर, हैद्राबाद येथे झालेल्या युथ अ‍ॅथलेटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये तिने १०० मीटरमध्ये कांस्य तर २०० मीटरमध्ये रौप्य पदक मिळवले. त्यामुळे तिची एशियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पिअनशिपसाठी निवड झाली, ज्यात तिला रौप्य पदक मिळाले. परिणामी तिची नैरोबीत होणार्‍या वर्ल्ड चॅम्पिअनशिपसाठी निवड झाली. पुढे तिची २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही निवड झाली, ज्यात ४०० मीटर स्पर्धेत तिला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. मात्र, त्यातून ती खूप काही शिकली आणि त्याचा वापर तिने फिनलंडमध्ये झालेल्या २० वर्षांखालील जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत केला.

हिमाची ४०० मीटर मधील सर्वोत्तम वेळ ५१.१३ सेकंद आहे. मात्र, २० वर्षांखालील जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या पात्रता फेरीत हिमाला ५२ सेकंदांहून अधिक वेळ लागला, त्यामुळे तिचे प्रशिक्षक निपॉन दास काहीसे घाबरले होते. त्यावेळी हिमा त्यांना म्हणाली, “तुम्ही घाबरू नका. मी अंतिम फेरीसाठी माझी एनर्जी वाचवत आहे.” ती अंतिम फेरीसाठी पात्र झाली, पण त्यात तिची सुरुवात चांगली झाली नाही. १५० मीटर बाकी असताना हिमा या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर होती. तेव्हा तिने जो वेग धरला तो पहिला क्रमांक मिळाल्यावरच सोडला. तिने सुवर्णपदकाची कमाई केली. तिला तेव्हा कदाचित माहितही नसेल की तिचा हा पराक्रम किती मोठा होता! पण मेडल सेरेमनीच्या वेळी भारताचे राष्ट्रगीत सुरू होताच हिमाच्या डोळ्यांत पाणी तरळले. छोट्याशा कुंधलिमरी गावातून सुरू झालेला तिचा प्रवास आता आंतरराष्ट्रीय पदकापर्यंत येऊन पोहोचला होता. ही आसामची लेक पूर्ण देशाचा अभिमान ठरली होती.

- Advertisement -

इथे महिलांमध्ये हिमा आपला करिष्मा दाखवत असतानाच पुरुषांमध्ये मोहम्मद अनास या या तरुण धावपटूनेही भारताचे नाव जगात गाजवले. त्यानेही नुकत्याच चेक रिपब्लिक येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ४०० मीटर शर्यतीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. तसेच मोहम्मदने ४५.२४ सेकंदात ही शर्यत पूर्ण करत नवीन राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केला.

मोहम्मदची सुरुवातही काहीशी हिमासारखीच. त्याने आपल्या खेळाच्या कारकिर्दीची सुरुवात लांब उडीपासून केली. मात्र, नंतर त्याने आपले लक्ष धावण्यावर केंद्रित केले. त्याने ४०० मीटर पद्धतीवर खास भर दिला. त्याने २०१४ मध्ये कालिकत येथे झालेल्या स्पर्धेत आपले पहिले पदक मिळवले होते. तो २०१६ मध्ये रिओ डी जानेरो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र झाला होता. आजपर्यंत ४०० मीटर प्रकारात भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरलेल्या तीन धावपटूंपैकी मोहम्मद हा एक. तसेच २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने अप्रतिम प्रदर्शन केले. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्याने ४५.३१ सेकंदात ही रेस पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. त्यामुळे त्याने स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा मोहम्मद हा मिल्खा सिंग यांच्या नंतरचा दुसरा भारतीय धावपटू ठरला होता. अंतिम फेरीत त्याला पदक मिळवता आले नाही. परंतु, चौथा क्रमांक पटकावत त्याने आपणही भविष्यात पदक जिंकण्यास पात्र असल्याचे दाखवून दिले होते.

हिमा आणि मोहम्मद अनाससारख्या धावपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय प्रदर्शन करत सर्वांनाच आपली दखल घ्यायला लावली आहे. त्यामुळे या दोघांनी पदकांसोबतच भारतीयांची मनंही जिंकली हे निश्चित !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -