घरफिचर्ससारांशभवतालाचे बहुस्वरीय काव्यरचित

भवतालाचे बहुस्वरीय काव्यरचित

Subscribe

नव्वदोत्तर काळात एका बाजूला नवभांडवलीकरण निर्मित शोषणव्यवस्था तर दुसर्‍या बाजूला पूर्वापार चालत आलेल्या परंपरागत वर्णरचनेतून निर्माण झालेली जात, धर्म, वर्ग, लिंगाधारित शोषण संस्कृती अधिक टोकदार झाली. जग ‘वैश्विक’तेकडे जात असताना भारत मात्र सनातनी-प्रतिगामी विचार चौकटीतून मुक्त होत नाही. हे वास्तव या काळाने अधोरेखित केले आहे. या परंपरागत शोषक व्यवस्थेने घडवलेल्या वर्तमान भवतालाचा आलेखपट या कवितेतून उजागर झाला आहे. कृषी-आदिवासी संस्कृतीचे बदलते वास्तव आणि या समूहांच्या शोषणाचा अन्वयार्थ या कवितेने लावलेला आहे.

नव्वदोत्तर काळात महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून विपुल कविता लिहिली गेली आहे. प्रदेशविशिष्टतेसह समकालीन जीवनातील अनेकविध आवाज या कवितेतून व्यक्त झाले आहेत. समकालीन भवतालाचा विविध कोनातून अन्वयार्थ या कवितेना लावलेला आहे. समाजाच्या भौतिक-अभौतिक जगण्यातून आणि भू-जैविकतेच्या परिणामातून भवतालाला आकार प्राप्त होत असतो. त्याचा अन्वयार्थ कवी आपल्या लेखनातून लावत असतो. या अन्वयार्थातून विशिष्ट प्रकारची मूल्यव्यवस्था, वैचारिक भूमिका, जीवनभाष्ये, काळाचे रचित आणि कालस्वराची बहुस्तरीय वीण आविष्कृत होत असते. कवी हा आपल्या सोबतच्या काळाचा भाष्यकार असतो. तो सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, पर्यावरणिक अशा अनेकविध कारणांनी निर्मित भवतालाचे आणि त्यात दडलेल्या वास्तवाचे वाचन करत असतो. याचे सजग भान नव्वदोत्तर कवींना असल्याचे या कवितेतून दिसते.

नव्वदोत्तर भवतालाला आकार देण्यात नवभांडवलशाहीचा उदय-विस्तार आणि परंपरागत शोषक व्यवस्था या दोन बाबी कारणीभूत ठरलेल्या दिसतात. या दोन्ही प्रवृत्तींच्या चांगल्या-वाईट परिणामप्रभावातून या काळातील भवतालचित्र तयार झालेले आहे. यातून नवे वास्तव आणि काही नवे प्रश्न उग्र स्वरूपात समोर आलेले दिसतात. या प्रश्नांनी मानवी जीवनाचा संकोच करत अस्तित्त्वविषयक संघर्ष वाढवला. समाजजीवनात टोकाची विषमता निर्माण केली. एका बाजूला न-नैतिक चंगळ आणि दुसर्‍या बाजूला पूर्वापार शोषक व्यवस्थेचा फास अशा विचित्र कोंडित भारतीय समाज सापडला. या कोंडीत माणसाचे माणूस म्हणून असणारे अस्तित्त्व धोक्यात आले. अर्थपूर्ण व्यवस्थेने घडवलेला अनर्थ आणि शोषक समाजरचनेने सर्वहारांचे केलेले दमण या दोन्ही प्रवृत्तींचे काव्यसंवेदन नव्वदोत्तर कवितेतून प्रकट होते.

- Advertisement -

1980 नंतर क्रमाक्रमाने आलेल्या खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या नव्या अर्थनीतीने भारतीय समाजवादी अर्थव्यवस्थेचे रूपांतर 1990 नंतर नवभांडवली अर्थव्यवस्थेत झाले. त्यातून नवी बाजारवादी, भोगवादी आणि चंगळवादी संस्कृती भारतीय समाजावर लादली गेली. या नवभांडवलीकरणाने मूल्यविहीन, न-नैतिक आणि व्यापारकेंद्री सत्तास्पर्धा प्रारंभित केली. सार्वजनिक समाजहितापेक्षा व्यक्तिकेंद्रितता, स्वार्थलोलुपता आणि भौतिक जगण्याला महत्त्व प्राप्त झाले. माध्यमक्रांती आणि माहिती तंत्रज्ञानाच्या उदय-विस्ताराने बाजारव्यवस्थेला अधिक गती दिली. संगणक, इंटरनेट, दूरचित्रवाणीच्या शेकडो वाहिन्या, सायबर कॅफे, मल्टिमिडिया मोबाईल यांनी ज्ञान आणि माहितीत संभ्रम निर्माण केला. या नव्या व्यवस्थेने माणसांचे ‘वस्तुकरण’केले आहे. या नवभांडवलशाहीने आकाराला आलेल्या भवताला नव्वदोत्तर कवींनी वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे. नवभांडवलशाहीचा संभ्रमित नि सहमतीसूचक आविष्कार म्हणून श्रीधर तीळवे, मंगेश नारायण काळे, मन्या जोशी, हेमंत दिवटे, संजीव खांडेकर, सलील वाघ, सचिन केतकर आदींची कविता महत्त्वाची आहे. या कवींनी नवभांडवलीकरणाला सहमती दर्शवत तीमधून निर्माण झालेल्या संभ्रमित जगण्याला आविष्कृत केले आहे.

नवभांडवलशाहीला विरोध दर्शविणारी माणूसकेंद्री अभिव्यक्तीही नव्वदोत्तर कवितेत दिसते. वर्जेश सोळंकी, अरूण काळे, महेंद्र भवरे, नीरजा, प्रज्ञा पवार, उत्तम कांबळे, नितीन वाघ, गणेश वसईकर इत्यादी कवींनी जागतिकीकरणाला विरोध करत माणसाच्या अस्तित्त्वाला प्राधान्य दिलेले आहे. तीमधून मानवतावादाची वैश्विक जाणीव व्यक्त होते. नवभांडवलशाहीचे भारतीय समाजावर अनेकविध भले-बुरे परिणाम झालेले आहेत. या दृष्य परिणामांचे कोलाजी रेखाटन या काळातील कवींनी केलेले आहे. दासू वैद्य, अरूणचंद्र गवळी, गणेश विसपुते, प्रफुल्ल शिलेदार, प्रकाश किनगावकर,अजीम नवाज राही, लहू कानडे, अविनाश गायकवाड, एकनाथ पाटील, अशोक कोतवाल, दिनकर मनवर, बालाजी मदन इंगळे, विनायक येवले अशा वेगवेगळ्या शैलीच्या कवींनी हा दृष्यात्मक भवताल रेखाटला आहे.

- Advertisement -

त्यासोबतच समाजजीवनावर खोलवर झालेल्या परिणामाचेही संवेदन या कवितेने उजागर केली आहे. नव्वदोत्तर काळात फार मोठे सांस्कृतिक संक्रमण घडून आलेले आहे. त्यातून अनेक नवे पेच निर्माण झालेले आहेत. श्रीकांत देशमुख, प्रवीण बांदेकर, अजय कांडर, विरधवल परब, रमेश इंगळे उत्रादकर, रविंद्र इंगळे चावरेकर, नितीन रिंढे, नितीन कुलकर्णी, अविनाश साळापुरीकर, अभय दाणी आदी कवींच्या कवितेतून सांस्कृतिक संक्रमण आणि र्‍हासशील समुहाच्या पेचाचे चित्रण आलेले आहे. सोबतच हे कवी त्याविषयी स्वत:ची अशी नवता नि परंपरेच्या समुच्चयातून घडलेली भूमिकाही विशद करतात. ही भूमिका भारतीयतेला महत्त्व देणारी आहे.

नव्वदोत्तर काळात एका बाजूला नवभांडवलीकरण निर्मित शोषणव्यवस्था तर दुसर्‍या बाजूला पूर्वापार चालत आलेल्या परंपरागत वर्णरचनेतून निर्माण झालेली जात, धर्म, वर्ग, लिंगाधारित शोषण संस्कृती अधिक टोकदार झाली. जग ‘वैश्विक’तेकडे जात असताना भारत मात्र सनातनी-प्रतिगामी विचार चौकटीतून मुक्त होत नाही. हे वास्तव या काळाने अधोरेखित केले आहे. या परंपरागत शोषक व्यवस्थेने घडवलेल्या वर्तमान भवतालाचा आलेखपट या कवितेतून उजागर झाला आहे. कृषी-आदिवासी संस्कृतीचे बदलते वास्तव आणि या समूहांच्या शोषणाचा अन्वयार्थ या कवितेने लावलेला आहे. इंद्रजित भालेराव, प्रकाश होळकर, लक्ष्मण महाडिक, संतोष पद्माकर पवार, प्रकाश किनगावकर, कल्पना दुधाळ, केशव खटिंग, ऐश्वर्य पाटेकर, रवी कोरडे, नामदेव कोळी, संदिप जगदाळे, बालाजी सुतार, रावसाहेब कुँवर हे कृषी तर भुजंग मेश्राम, वाहरू सोनवणे, प्रभु राजगडकर, तुकाराम धांडे, उषाकिरण आत्राम, विनोद कुमरे हे आदिवासी जगण्याचा वेध घेताना दिसतात.

जात-धर्माधारित विष हे भारतीय समाजाच्या रक्तात भिनलेले आहे. जातीच्या आधारावर होणारे वर्तमानातील तंटे, आरक्षणातून निर्माण झालेला जातीय तणाव, महापुरूषांच्या नावाने चाललेला जात संगर, राजकारणाच्या माध्यमातून जात-धर्मांधतेला घातले जाणारे खतपाणी, समाजात वाढत जाणारा मूलतत्त्ववाद आणि त्यातून आकारलेल्या भवतालाचा अन्वय दलित-मुस्लिम कवितेने लावलेला आहे. लोकनाथ यशवंत, अरूण काळे, प्रकाश खरात, आनंद गायकवाड, नागराज मंजुळे, प्रज्ञा दया पवार, भूषण रामटेके, अक्षय घोरपडे, रफिक सूरज, जावेद कुरेशी, डी.के.शेख, एहतेशाम देशमुख यांनी जात-धर्म संघर्षाचे स्वरूप कवितेतून विशद केले आहे. दलित कवितेने आंबेडकरवादी तत्त्वज्ञानाच्या संस्कारातून आपली अभिव्यक्ती ठळक केली आहे.

पुरूषसत्ताक व्यवस्थेच्या बळी ठरलेल्या संबंध भारतीय स्रीया माणूसपणाच्या प्रतिक्षेत आहेत. स्रीचे होणारे वस्तूकरण आणि भोगवस्तू म्हणून तिचे केले जाणारे प्रतिमासंवर्धन हे नव्वद नंतरच्या पुरूषप्रधान समाजरचनेच्या मानसिकतेची दिशा अधोरेखित करणारे आहे. कविता महाजन, मलिका अमर शेख, प्रज्ञा दया पवार, निरजा, योजना यादव, शर्मिष्ठा भोसले, वंदना महाजन, बालिका ज्ञानदेव, मीनाक्षी पाटील, अंजली कुलकर्णी, सारिका उबाळे, सुचिता खल्लाळ, अनुजा जोशी, शरयू असोलकर आदी कवयित्रींनी स्री-पुरूष भेदनीतीचा स्रीकेंद्री काव्यबंध घडविली आहे. या कवितेने स्रीत्त्वाची संकल्पना, परंपरेशी असणारा संघर्ष, स्रीजातीविषयीचा भगिनीभाव आणि वर्तमान पुरूषरचिताचे मनसुबे उघड केले आहे.

विशेष म्हणजे या कवितेच्या तळाशी भारतीय संविधानेने दिलेली मूल्ये आहेत. त्या मूल्यांच्या उजेडात ही कविता भवतालाचा वेध घेते. तृतीय पंथीयांना अजूनही आपण माणूस म्हणून स्वीकारलेले नाही. त्यांच्या प्रश्नांना सहानुभूतीने समजून घेतले नाही. दिशा शेख यांच्या कवितेतून ही जाणीव अत्यंत उत्कटपणे व्यक्त होते. वंचित-पीडित सर्वहारा वर्गाच्या व्यथा-वेदनेचे-शोषणाचे सार्वत्रिक भान व्यक्त करणारी कविताही या काळात लिहिली गेली. यातून गरीब, कष्टकरी, श्रमिक-कामगारांचे विश्व उजागर होते. धम्मपाल रत्नाकर, राम दोतोंडे, आनंद विंगकर, सुदाम राठोड, जावेद पाशा, सुनील अभिमान अवचार असे अनेक कवी वंचितांच्या शोषणाची जाणीव व्यक्त करत सर्वहारांचा व्यथांकीत भवताल रेखाटताना दिसतात. लोकप्रिय मंचीय कवितेचा एक प्रवाह या काळात दिसतो. रामदास फुटाणे, फ.मु.शिंदे, प्रकाश घोडके, नारायण सुमंत, नारायण पुरी आदी कवींनी उपरोधिक शैलीत समकालीन भवतालाचा समाचार घेतलेला दिसतो.

नव्वदोत्तर काळात मराठी साहित्याच्या केंद्रस्थानी कविता हाच वाङ्मयप्रकार आहे. वेगवेगळ्या कारणांनी या कवितेची चर्चाही झाली आणि दखलपात्र अशा कवींची संख्याही या काळात वाढली आहे. परंतु साठोत्तरी कवींच्या प्रभावातून ही कविता मुक्त होऊ शकली नाही. चौथी नवता कवितेत आणल्याचे दावेही महानगरीय कवींनी केले; पण ते कवितिक विधानातून त्यांना सिध्द करता आले नाही. तसेच उत्तर आधुनिक संवेदन या कवितेतून व्यक्त होते असेही बोलले गेले. परंतु तेही अर्धसत्यच असल्याचे या काळातील समीक्षेने स्पष्ट केले आहे. या काळात महानगरीय कवितेचा प्रामुख्याने अधिक गाजावाजा झाला. हीच कविता मध्यवर्ती असल्याचे भासवले गेले. पण या काळात सर्वच स्तरसमूहातून मोठ्या प्रमाणात कविता लिहिली गेली, हे वास्तव नाकारून चालणार नाही.

या काळातील कविता केंद्रविहीन आहे. मुख्यत: वर्तमानातील पेच, जगण्यातील प्रश्न आणि गुंतागुंतीला-व्यामिश्रतेला व्यक्त करणारी कविता या काळात मोठ्या प्रमाणात लिहिली गेली. त्यामुळेच ती दीर्घत्त्व आणि गद्यात्मकतेकडे झुकलेली दिसते. म्हणूनच दीर्घकवितांचे सर्वाधिक संग्रह याच काळात आलेले दिसतात.तपशिलांचे प्रमाणही या कवितेत वाढलेले दिसते.विधानात्मकता हा या कवितेचा प्रमुख विशेष आहे. इतिहास निर्मित प्रश्नांचे वर्तमानिक वाचन करत ही कविता अस्तित्त्वाचे प्रश्नही अधोरेखित करते. काही भाषिक प्रयोग कवींनी केले पण त्यात कृत्रिमता अधिक असल्याचे जाणवते. सुमार दर्जाच्या बेसुमार कवितेचे पीक या काळात समाजमाध्यमांवरून आलेले दिसते. या कवितेने नव्वदोत्तर कवितेला बदनाम केले, हेही येथे नमूद करावे लागेल.

उपरोक्त विवेचनात कवींचा केलेला निर्देश काव्यप्रवृत्तींच्या अनुषंगाने प्रातिनिधिक स्वरूपात केलेला आहे. भुजंग मेश्राम, अरूण काळे, कविता महाजन यांची कविता ही नव्वदोत्तर कवितेतली महत्त्वाची उपलब्धी आहे. नव्वदोत्तर कविता ही आपल्या काळाला कवेत घेत भवतालाचा सजगपणे अन्वयार्थ लावू पाहणारी कविता आहे. शिवाय या कवितेला सर्वप्रकारचे राजकीय भान आहे. हे तिचे महत्त्वाचे वेगळेपण आहे. या काळात विविध समाजस्तरांतील कवींनी वेगवेगळ्या भाषिक बाजाची आणि शैलीची कविता लिहिलेली आहे. वैयक्तिक भावजाणिवेच्या आविष्काराऐवजी आपल्या आजूबाजूच्या भवतालाचे संदर्भ उजागर करत सामाजिक चरित्र या कवितेने मांडलेले आहे. भवतालातील अकांत-कल्लोळाचा बहुस्तरीय आविष्कार आणि सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक ताण्याबाण्याचे काळचित्र या कवितेतून साकारले आहे. भवतालातील संभ्रम नि पडझडीचा मूल्यात्म आलेखपट या कवितेने मांडलेला आहे. ‘भवतालाचे बहुस्वरीय काव्यरचित’म्हणून ही कविता एकूण मराठी कवितेत वेगळी ठरणारी आहे.

–केदार काळवणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -