घरफिचर्ससारांशनाशिकची संमेलन संस्कृती

नाशिकची संमेलन संस्कृती

Subscribe

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाशिकमध्ये येत्या 3 डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. मराठी सारस्वतांसह साहित्यप्रेमींच्या या आनंदसोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू असली तरी त्यापेक्षा विविध वादांचीच चर्चा अधिक रंगत आहे. खरं तर, मराठी माणसाचे वैशिष्ठ्य बघता तो उग्र आणि वाद-विवादपटू असल्याचे म्हटले जाते. प्रत्येक ठिकाणी मराठी माणूस वाद कौशल्याने तारांकित बनत असतो. नाशिकच्या साहित्य संमेलनात अगदी लहान लहान गोष्टींतून मराठी माणसाचे हे वैशिष्ठ्य दिसून येत आहे. अर्थात, नाशिक आणि साहित्य संमेलन यांचे नाते अभंग आहे. तसेच साहित्य संमेलन आणि वाद हे नाते नवे आहे असेही नाही. नाशिकमध्ये यापूर्वी झालेल्या दोनही संमेलनांना वादाची किनार ही होतीच.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक मानबिंदू असणारा सोहळा असतो. या सोहळ्याकडे प्रत्येक जण वेगवेगळ्या दृष्टीने पाहत असतो. हत्ती आणि सात आंधळ्यांची गोष्ट यातील दृष्टी संमेलनाकडे पाहतानाही दिसून येते. विद्रोही विचाराच्या प्रगतिशील मित्रांचा या संमेलनाला तात्विकदृष्ठ्या विरोध आहे. नागपूरच्या साहित्य संमेलनापासून विद्रोही साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखानांच भरवले जाते. उजव्या विचाराच्या मंडळींना अन्य धर्मीय व्यक्तींचा सहभाग काट्यासारखा सलतो आहे. त्यांनी मराठीतील अव्वल दर्जाचे लेखक फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्माचे आहेत म्हणून त्यांच्या नावाला विरोध केला आणि उस्मानाबादचे संमेलन या परिस्थितीतही पार पडले. 94 व्या मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध हिंदी कवी, गीतकार, संवाद लेखक जावेद अख्तर येणार म्हणूनही काही मंडळींनी रण पेटवायला सुरुवात केली आहे. दुसर्‍या बाजूला माध्यमातील एका गटाचा विश्वास पाटील यांच्या प्रशासकीय कारकिर्दीवर आक्षेप असल्याने त्यांनाही विरोध सुरू झाला आहे. मराठी माणसाचे वैशिष्ठ्य सांगत असताना तो उग्र आणि वाद-विवादपटू असल्याचे सांगितले जाते. प्रत्येक ठिकाणी मराठी माणूस वाद कौशल्याने तारांकित बनत असतो. नाशिकच्या साहित्य संमेलनात अगदी लहान लहान गोष्टीतून मराठी माणसाचे हे वैशिष्ठ्य दिसून येत आहे.

1942 मध्ये नाटककार व अभिनेते वा श्री पुरोहित यांनी चित्रमंदिर थिएटरमध्ये साहित्य संमेलन घेतले होते. त्यावेळी नाटकवाल्या मंडळींनी साहित्य संमेलन घ्यावे का? याविषयी मोठे रण माजले होते. अगदी पुरोहितांना विरोधही झाला होता. तरी ते संमेलन नाशिकमध्ये पार पडले. स्वातंत्र्यपूर्व काळातले हे संमेलन असले तरी त्यावेळीही वाद झडले होते. राजकारण आणि साहित्य हे वेगळे असावे का? असा मुद्दा त्यावेळीही उपस्थित झाला होता. त्याविषयी एक परिचर्चाही झाल्याचे बोलले जाते. संमेलनाध्यक्ष अत्रे यांनी साहित्य आणि राजकारण हे वेगळे असत नाही, करू नये असा विचार व्यक्त केला होता. आजही साहित्य संमेलनात याविषयीची चर्चा होत असते. लेखक राजकीय नेत्यांवर टीका टिपणी करत असतात. तरीसुद्धा साहित्य संमेलनाचा गाडा राजकारण्यांशिवाय कुणालाही पुढे नेता येणार नाही, हे वास्तव स्वीकारले जाते. मराठी साहित्य संमेलनांचा इतिहास पाहिला तर त्यात वादांची वादळे आपल्याला दिसून येतात. कलावाद आणि जीवनवाद हा फडके-खांडेकर यांचा साहित्य विषयक वाद प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र शासनाने साहित्य संमेलनाला सतत बळ दिले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री निधीतून साहित्य संमेलनासाठी निधी दिला जात होता. आता तर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात पन्नास लाख रुपयांची तरतूद करून ठेवली गेली आहे. शासन साहित्य संस्कृतीला मदत करीत असते. ती शासनाची मदत संमेलनाला चालते. मग शासन चालवणारे लोकनेते संमेलनात का असू नये, असा प्रश्न उपस्थित केला जातो. नाशिकच्या संमेलनापर्यंत ही चर्चा चालू आहे आणि तिला कधी विराम मिळेल याची खात्री देता येत नाही. 2005 मध्ये मराठा विद्या प्रसारक समाजाने 78 वे मराठी साहित्य संमेलन घेतले. त्यावेळी कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांनी कौशल्याने साहित्य संमेलनात होणारे वाद टाळले. तरीसुद्धा या संमेलनातील बोकडबळी प्रकरण गाजले आणि त्यावरच चर्चा होत राहिली. ही चर्चा साहित्य-चर्चा होती का, असा प्रश्न आजही विचारला जातो. ते संमेलन मराठा विद्या प्रसारक समाजाने आपली सगळी संसाधने वापरून यशस्वी केले होते, हे विसरून चालणार नाही. नाशिकमध्ये होणारे अखिल भारतीय पातळीवरील हे तिसरे संमेलन आहे. नाशिकला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. नाशिकच्या अनेक लेखकांनी मराठी साहित्यात आपले मोठे स्थान निर्माण केले आहे. दुसरे मराठी भाषेचे ज्ञानपीठ कुसुमाग्रजांना मिळाले. अनेक लेखकांना साहित्य अकादमीची पारितोषिके मिळाली आहेत.

नाशिकमधील युवा प्रतिभावंत साहित्यिक ऐश्वर्य पाटेकर, प्राजक्त देशमुख यांनी युवा साहित्य अकादमी पुरस्कार पटकावला आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे विराजमान झाले आणि त्यांनी ‘लेखकांनी लेखण्या मोडून बंदुका हातात घ्या’ असे आपल्या अध्यक्षीय भाषणात लेखकांना आवाहन केले होते. वीर सावरकर हे क्रांतिकारकांना बळ देणारे साहित्यकार होते. यावेळी संमेलन गीतात मिलिंद गांधी यांनी त्यांना ‘स्वातंत्र्य सूर्य’ संबोधले आणि मराठी माणसांनी आपले वाद-विवाद पटुत्व दाखवून दिले. स्वातंत्र्यवीर हीच उपाधी सावरकरांना शोभते, असे अनेकांना वाटून गेले, याचे स्मरण या निमित्ताने होते. कविवर्य कुसुमाग्रज यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान लाभले आणि त्यांनी मराठी भाषेची होणारी आबाळ सर्वांच्या लक्षात आणून दिली. कुसुमाग्रज यांच्या या भाषणाची दखल त्यावेळी घेतली गेली. कुसुमाग्रज यांचा वाढदिवस आपण ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून का साजरा करतो याचे उत्तर तात्यासाहेब शिरवाडकरांच्या सामाजिक सामिलकीत जसे सापडते तसेच मराठी भाषेविषयी त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेल्या विचारातही दिसून येते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा यासाठी आपण केंद्र शासनाकडे प्रयत्न करत आहोत, हे लक्षात घेतले तर कुसुमाग्रजांनी आपल्याला वेळीच सावध केले होते हे लक्षात घेतले पाहिजे.

- Advertisement -

वसंत कानेटकर आणि उत्तम कांबळे यांनी ठाणे येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भुषविले आहे. आनंद यादव यांना अध्यक्ष करत असाल तरच आम्ही लोणी येथे साहित्य संमेलन घेऊ असे त्यावेळी आयोजकांनी स्पष्ट केले होते. मात्र साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत वसंत कानेटकर निवडून आले आणि ठाणेकरांना ऐनवेळी संमेलनाच्या तयारीला लागावे लागले. कानेटकरांनी आपल्या भाषणात आपला साहित्य विचार व्यक्त केला होता. त्यानंतर ठाणे येथेच नियोजित संमेलनाचे अध्यक्ष म्हणून पत्रकार उत्तम कांबळे निवडून आले आणि या संमेलनात पुन्हा एकदा नाशिकचा झेंडा फडकला. (उत्तम कांबळे हे मूळचे कर्नाटकातले आहेत. पहिल्यांदा कानडी माणसाला अध्यक्षपद लाभल्याचे कानडी मुलखातील मराठी माणसांना वाटते. वाट तुडवत तुडवत कोल्हापूर, सांगली मार्गे ते नाशिकमध्ये स्थिरावले.) नाशिकच्या लोकांना ते सतत आपले वाटत आले आहेत. ठाण्याच्या साहित्य संमेलनात नथुराम प्रकरणाने हवा भरली गेली आणि ते संमेलन तारांकित झाले. नाशिक आणि साहित्य संमेलन यांचे नाते अभंग आहे.

नाशिक जिल्ह्यातील कवी किशोर पाठक, प्रकाश होळकर, संजय चौधरी, रवींद्र मालुंजकर अशा अनेक कवींनी निमंत्रित कवी म्हणून संमेलनात हजेरी लावली आहे. डॉ. यशवंत पाठक, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, डॉ.रमेश वरखेडे, डॉ. एकनाथ पगार यांनी संमेलनातील साहित्य-चर्चात वेळोवेळी सहभाग घेतला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आणि नाशिकचे नाते दृढ आहे. 94 वे संमेलन यशस्वी व्हायचे असेल तर छगन भुजबळ यांच्याशिवाय पर्याय नाही हे नाशिककरांच्या लक्षात आले होते. साहित्य, कला, संस्कृती याबाबत भुजबळ हे सजग आहेत. रसिकाग्रणी असणार्‍या भुजबळांच्या नेतृत्वाखाली हे संमेलन संपन्न होत आहे. मुंबई एज्युकेशन ट्रस्ट भुजबळ नॉलेज सिटी या संस्थेचे संपूर्ण बळ पाठीशी असल्याने संमेलनाला रंग भरणार आहेत. या संमेलनाला अनेक मान्यवर उपस्थित राहतील, असा प्रतिसाद मिळतो आहे.

कोरोना काळातून बाहेर पडताना लोकांना आनंद मिळावा असा प्रयत्न भुजबळांचा आहे. प्रथमत:च एका विज्ञान लेखकाला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला आहे. या साहित्य संमेलनाचे हे एक वैशिष्ठ्य आहे. साहित्याचे सर्वश्रेष्ठ प्रयोजन आनंद हे मानले गेले आहे. संमेलनातून हे प्रयोजन साधले जावे, असा प्रयत्न आहे. 94 व्या साहित्य संमेलनात साहित्य आणि समाज याची विविधांगी चर्चा होणार आहे. कोरोनानंतरचे अर्थकारण, शेतकर्‍यांची दुस्थिती आणि लेखक कलावंतांचे मौन असे समकालीन विषय या संमेलनात चर्चिले जाणार आहेत. साहित्याबरोबरच अन्य कला कौशल्यांचे दर्शन या संमेलनातून रसिकांना घडेल यासाठी आयोजक संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. हे संमेलन ऐतिहासिक ठरेल आणि साहित्य-संस्कृतीच्या इतिहासात महत्वाचे पर्व निर्माण होईल, असा विश्वास वाटतो.

–प्रा. डॉ. शंकर बोर्‍हाडे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -