घरफिचर्ससारांशपुस्तक खरा मित्र

पुस्तक खरा मित्र

Subscribe

जिथे जिथे अडते तिथे तिथे प्रत्येकाला मार्ग शोधून देणार्‍यांचे काम अजूनही पुस्तकच करीत आहेत. पुस्तकाच्या योग्य मार्गदर्शनामुळे, विश्वासामुळे प्रत्येकाला आजही जीवन जगणे सुसह्य होत आहे. प्रत्येकाच्या मनाचे, बुद्धीचे टॉनिक आणि आदर्श गुरुस्थानी असणारे पुस्तकच आहे.

–आकाश महालपुरे

प्रत्येकाच्या जीवनाची स्वप्ने जर कुणी पूर्ण केली असतील ना तर ती या पुस्तकांनीच!सर्वसाधारण घरात कुणीही जास्त शिकलेले नसल्यामुळे आणि कुटुंबात बापाच्या कामावरच घरातली सात-आठ माणसे जगत असल्यामुळे कधी कधी कुटुंबावर उपासमारीची वेळ यायची. त्यामुळे प्रत्येकाच्या बापाला नेहमी वाटायचे की, मी शिकलो नसल्यामुळे जे दारिद्र्य माझ्या वाट्याला आले ते माझ्या लेकरांच्या वाट्याला येऊ नये. हा विचार सतत प्रत्येकाच्या बापाला विचार करायला भाग पाडायचा. मग त्याने गावात असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आपल्या लेकराचं नाव टाकलं आणि पाटी, लेखणी, पहिलेचे मराठीचे पुस्तक, उजळणी, बाराखडीचे पुस्तक घेऊन आपल्या लेकराला शाळेला पाठवून दिले. बाई, कसंही करा पण माझ्या लेकराला शिकवा. तुम्ही काहीतरी शिकवलं तरच तो पुढं भविष्यात पोटभर खाईल, असं म्हणून प्रत्येकाचा बाप निघून गेला आणि प्रत्येक जण वर्गात आसनपट्टीवर हातात पाटी घेऊन पुस्तकांसोबत धडे गिरवू लागला.

- Advertisement -

तेव्हापासून प्रत्येकानं ठरवून टाकलं की आपल्याला जर दारिद्र्यापासून सुटका करायची असेल तर शिकलंच पाहिजे आणि शिकून सवरून शहाणं व्हायचं असेल तर पुस्तकांशी जवळीकता साधलीच पाहिजे.

मग दिवसामागून जस जसे दिवस जात होते तस तसे पुस्तकांवरचे प्रेम अधिकच वाढत होते. अक्षर ओळख झाल्याने पुस्तकातील धडे, कविता वाचता येऊ लागल्या आणि पुस्तकाच्या सोबतीने पाटीवर उत्कृष्ट पद्धतीने लेखणीने लिहायलाही जमू लागले. तेव्हापासून मग प्रत्येकाच्या जीवनाचं एकचं सूत्र तयार झालं आणि ते म्हणजे पुस्तक. प्रत्येकाने अगदी लहानपणी कुणाशी मैत्री केली नसेल, मात्र या पुस्तकांशी केली.

- Advertisement -

शाळेमधील वाचनालयातील गुरुजींनी वाचण्यासाठी आणि घरी घेऊन जाण्यासाठी पुस्तकांची अनेक रूपे दिली. अनेक कथा, गोष्टी, कविता, कादंबर्‍या हळूहळू वाचायला लावल्या. पुस्तकाला तर हातातून सोडावेसे वाटत नव्हते.
घरी तर नेहमी प्रत्येकाला ओरडायचे की, तुला दुसरं काही काम नाही का?
सतत पुस्तक घेऊन बसतो, पण शेवटी कुणीच काही बोलत नव्हते. मुकाट्याने घरच्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा पुस्तक घेऊन वाचायचे. पुस्तक अगदी प्रत्येकासाठी सखा बनला होता. सर्वांना कळायला लागले की पुस्तक जीवनाला खरी दिशा देण्याचे काम करतेय. पुस्तक जणू शिक्षकाची भूमिका पार पाडतेय.

पुस्तकांनी कधीच कुणाला फसवले नाही. पुस्तक सर्वांसाठी जीवनातील अंध:कार दूर करण्यासाठी सदैव दिव्याप्रमाणे ज्ञानरूपाने तेवत राहिले आणि आजही राहत आहे.

आज जो काही खर्‍या अर्थाने समाज घडला आहे, जी काही चार पैशांची नोकरी मिळाली आहे, जे काही चांगले जीवन जगण्याचे बळ मिळाले आहे, जे काही जगात चालले आहे त्याचे इत्थंभूत ज्ञान जे काही प्रत्येकाला मिळाले आहे ते फक्त आणि फक्त पुस्तकांमुळेच आणि आज प्रत्येकाला समाजासमोर एक आदर्श नागरिक म्हणून जगण्याची प्रेरणा मिळाली ती पुस्तकांमुळेच. कोणी पुस्तकांच्या सहवासात राहिले नसते तर आज प्रत्येकाच्या जीवनात अंधःकाराशिवाय काहीच राहिले नसते. जीवन म्हणजे काय हेच समजले नसते. कुणाचा तरी गुलाम राहून प्रत्येकाला आयुष्यभर गुलामगिरी करावी लागली असती. ह्या सार्‍यातील प्रत्येकाचा कायापालट करणारा जीवनाचा खरा साथीदार, जोडीदार पुस्तकच आहे.

जिथे जिथे अडते तिथे तिथे प्रत्येकाला मार्ग शोधून देणार्‍यांचे काम अजूनही पुस्तकच करीत आहे. पुस्तकाच्या योग्य मार्गदर्शनामुळे, विश्वासामुळे प्रत्येकाला आजही जीवन जगणे सुसह्य होत आहे. प्रत्येकाच्या मनाचे, बुद्धीचे टॉनिक आणि आदर्श गुरुस्थानी असणारे पुस्तकच आहे. म्हणूनच म्हटले आहे की, पुस्तकासारखा मित्र आणि ग्रंथासारखा गुरू अन्य दुसरा नाही. शेवटी एकच अशा सख्याची मैत्री प्रत्येकाच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहिली पाहिजे. कारण जीवनाच्या किनार्‍यावर वाचनाचीच होडी विविध प्रदेश दाखवते.

पुस्तक दिनाच्या सर्व वाचकांना खूप खूप शुभेच्छा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -