घरफिचर्ससारांशएक ब्राह्मण नेक ब्राह्मण...आरक्षण नको, आर्थिक विकास महामंडळ हवे

एक ब्राह्मण नेक ब्राह्मण…आरक्षण नको, आर्थिक विकास महामंडळ हवे

Subscribe

मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर आता ब्राह्मण समाजाच्या काही मागण्यांनी जोर धरलेला आहे. जालना इथेच या मागणीसंदर्भात दीपक रणनवरे यांचे आमरण उपोषण सुरू झाले आहे. विशेष म्हणजे एक आठवडा होत आला तरी शासन आणि प्रसारमाध्यमांतून याची फारशी चर्चा अजूनही झालेली नाही. याची कारणे अनेक आहेत. मुळात हा समाज अजूनही संघटित नाही. बौद्धिक अभिनिवेश आणि वर्गव्यवस्थेत अडकलेला हा समाज आपल्याच समाजातील खालच्या, आर्थिकदृष्ठ्या दुर्बल समाजाकडे पाहण्यास तयार नाही. राज्यातील अन्य जातींचे लोक आरक्षणासाठी आंदोलने करत असताना ब्राह्मण समाजानेही काही मागण्या शासनाकडे केल्या आहेत. विशेषत: यातील आर्थिक विकास महामंडळाची मागणी रास्त आहे. आरक्षणाऐवजी ही मागणी प्रमुख आहे.

-डॉ. अशोक लिंबेकर

सर्व ब्राह्मण समाज हा आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ठ्या विकसित आहे हा भ्रम आहे. कारण इतर अनेक समाजासारखेच अनेक अर्धवटराव या समाजातही आहेत आणि ते अतिशय सरंजामी, जातीय, धार्मिक, उच्चनीचतेची बेगडी झूल मिरवत आपल्या जातीय अहंतेचे गुणगान करत असलेले दिसतात. गढ्या जमीनदोस्त झाल्या तरी अजूनही ते आपल्या गढीवरून खाली उतरलेले दिसत नाहीत. असे असले तरी मराठा समाजाच्या आंदोलनाच्या निमित्ताने ब्राह्मण समाजानेही काही मागण्या शासनाकडे केल्या आहेत. विशेषतः यातील आर्थिक विकास महामंडळाची मागणी रास्त आहे. आरक्षणाऐवजी ही मागणी प्रमुख आहे. ही मागणी मराठवाड्यातून होतेय हेही महत्त्वाचे आहे.

- Advertisement -

मराठा समाजाच्या धर्तीवर या समाजाची एक घोषणाही पुढे आलीय. ती माझ्या नुकतीच वाचण्यात आली, ‘एक ब्राह्मण नेक ब्राह्मण’ अर्थात ही वृत्तीवाचक घोषणा सर्वांनाच पचेल अशी नाही. ‘एक मराठा लाख मराठा’ यातील ‘मराठा’ हा शब्द महाराष्ट्रात राहणारा, मराठी बोलणारा तो मराठा असा भाषावाचक न राहता आता त्याला जातीय रंग आलेला आपण पाहिलेच आहे. आता त्याच धर्तीवर ब्राह्मणांची ही घोषणा. एक मात्र बरे ‘एक ब्राह्मण लाख ब्राह्मण’ अशी संख्यावाचक घोषणा झाली नाही. याचे कारण काय बरे असेल? कारण घोषणाकर्त्यालाही हे माहीत आहे की आपला समाज इतका स्वमग्न आहे की तो कधीही जातीसाठी माती खाणार नाही. त्यामुळेच जालना येथील आंदोलनात महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज एकवटलेला नाही. याचा अर्थ ब्राह्मण समाज जातीपातीच्या पुढे गेलाय का?… हेही शोधावे लागेल.

मराठा समाजात जसे शहाण्णव कुळी मराठे आणि पाटील, देशमुख असे भेद आहेत तसे ब्राह्मण समाजातही अनेक शाखाभेद आहेत. ऋग्वेदी, यजुर्वेदी, कायस्थ, कोकणस्थ, कायस्थ, कर्‍हाडे या प्रकारचे अनेक भेद इथेही आहेत. हे शाखाभेद वेदाचा अभ्यास आणि त्यांना प्रमाण मानण्यातून झाले असले तरी यातही नंतर रोटी-बेटी व्यवहाराचे नियम अमलात आले. आता ते सैल झाले असले तरी या शाखा अजूनही आहेत. एकाच वेदाच्या अनेक शाखाही अस्तित्वात आहेत. उदा. शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखा, कृष्ण यजुर्वेद वगैरे. यातच सारस्वत आणि कोकणस्थ हे ब्राह्मण इतर ब्राह्मण समाजाच्या तुलनेत अधिक पुढारलेले सर्वात आधी शहरात स्थिरावलेले दिसतात. कारण राजकारण आणि प्रशासन यांच्याशी त्यांचा संबंध शिवशाहीनंतर पेशवाईत अधिक आलेला दिसतो. त्या तुलनेत इतर ब्राह्मण समाज हा शेती आणि पौरोहित्य यातच अडकलेला दिसतो. ब्राह्मणांच्या सर्व शाखेत त्यांचे वेगळे पुरोहित दिसतात. त्यांना उपाध्ये असेही म्हटले जाते.

- Advertisement -

विशेषत: तीर्थ पुरोहितांना ‘उपाध्ये’ याच नावाने ओळखले जाते. या तीर्थक्षेत्रातील पुरोहितांकडे परंपरेने चालत आलेले धार्मिक क्रियाकर्म करण्याचा अधिकार असल्याने त्यांच्याकडून तीर्थक्षेत्री मरणोत्तर क्रियाकर्म केली जातात. ते अजूनही सुरू आहे. नाशिक, त्रिंबक, राक्षसभुवन ही गोदा काठावरील तीर्थे यासाठी प्रसिद्ध आहेत. या क्षेत्रातील ब्राह्मणांचा व्यवसाय हा प्रामुख्याने पूजापाठ, पौरोहित्य हाच राहिला आहे. मरणोत्तर क्रियाकर्म करणार्‍या ब्राह्मणांसंदर्भात जे ‘किरवंत’ नाटक आले ते मात्र यासंदर्भात फार प्रस्तुत वाटत नाही. कारण जरी हे लोक क्रियाकर्म करत असले तरी त्यांना ब्राह्मणातील दलित असे समजले गेलेले नाही हे लक्षात घेतले पाहिजे. यासंदर्भात गृहस्थ आणि भिक्षुक असे भेद ब्राह्मण समाजात मानले गेलेले दिसतात. गृहस्थ म्हणजे वतनदार. यामध्ये देशपांडे, देशमुख, इनामदार यांचा समावेश होतो.

बारा बलुतेदारांतील ग्रामजोशीकडे त्या गावाच्या धार्मिक कार्याची म्हणजेच पौरोहित्याची जबाबदारी असे. गावगाडा समजून घेताना आपण इतर सर्व बलुतेदारांचे दुखणे, त्यांची समस्या, त्यांचे विस्थापन समजून घेतले, परंतु ग्रामजोशी मात्र उपेक्षितच राहिला. आटपाट नगरात एक गरीब, दरिद्री ब्राह्मण राहत होता, असे भलेही त्याच्या पोट भरण्याच्या शिताफीने लिहिले गेले असेल, पण त्याकडे शोषणाच्या दृष्टीने पाहिले गेले. महात्मा फुले यांच्या तृतीयरत्न, ब्राह्मणांचे कसब या ग्रंथानंतर तर तो बहुजन समाजाच्या रडारवरच आला. त्याला स्वकियांनी नाकारले आणि बहुजनांनीही. बारा बलुतेदारांमध्ये जर ब्राह्मण येत असेल तर तो बहुजनात का नाही? मुळात आपल्याकडे व्यवसायानुसार जातीव्यवस्था आली. एकाच कुटुंबातील कुलकर्णी आणि जोशी अशी आडनावे असलेली अनेक ब्राह्मण कुटुंबे महाराष्ट्रात आहेत. एवढेच नाही तर अनेक ब्राह्मण कुटुंबांकडे पाटीलकीही आहे. त्यावरून त्यांचीही आडनावे पाटील अशी आहेत. वतनदारही आहेत. त्यात देशपांडे, देशमुख, इनामदार आहेत.

महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाचा व्यवसाय हा शेती हाच राहिलेला आहे. ग्रामजोशी सोडून सर्व ब्राह्मण समाज हा शेती याच व्यवसायात गुंतलेला होता. ग्रामजोशीकडेही शेती होती. त्याचा हा पूरक व्यवसाय होता. शेती नाही असा ब्राह्मण सापडणे त्या काळात दुर्मीळच होते. मराठवाड्यासारख्या भागात एकाच गावात हजारो एकर शेती ही ब्राह्मण समाजाची होती. ही शेती त्यांना इनामी, वतनातून जशी मिळालेली होती तशीच ती इतर शोषणाच्या मार्गानेही त्यांनी ती मिळवलेली होती. कारण काही असले तरी गावातील किमान शिकलेला आणि ओळख असलेला समाज म्हणून त्यांची ओळख होती. पुढे कुळ कायदा आला. कसेल त्याची जमीन या कायद्याने आणि ब्राह्मणाच्या विलासी वृत्तीने अनेक ब्राह्मणांच्या जमिनी यात गेल्या.

पुढे कालचक्रानुसार ‘सावध ऐका पुढल्या हाका’, या उक्तीप्रमाणे पुढील बदलांची जाणीव होऊन ब्राह्मण समाज खेड्याकडून शहराकडे वळला. खेड्याकडून शहराकडे धाव घेतली ती सर्वप्रथम दलित आणि ब्राह्मण समाजाने हेही ध्यानात घेतले पाहिजे. दोघांचेही प्रश्न वेगळे असले तरी हे स्थलांतर लक्षात घेण्यासारखे आहे. पुढे जे ब्राह्मण शहरात जाऊन स्थिरावले ते तिकडचेच झाले. त्यांनी गावाकडे कायमची पाठ फिरवली. यातून एकाच समाजात पुन्हा नवी वर्गव्यवस्था निर्माण झाली. जे गावी राहिले ते तसेच राहिले. ब्राह्मण समाजातही देशस्थ ब्राह्मणांनी ऐंशीच्या दशकात स्थलांतर करण्यास सुरुवात केली. त्यांच्यापूर्वीच कोकणस्थ मात्र भारतातील सर्व भागात पोहचले होते. या नव्या परिवर्तनाची जाग त्यांना सर्वप्रथम आली.

मुळात कोकणस्थ हे सर्वात जास्त हिशोबी आणि धोरणी. देशस्थ मात्र सर्व समाजात मिसळून राहणारे. सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे असे. कृषीनिष्ठ असल्याने हा अनुषंग त्यांच्यात होताच, पण पुढे सर्वच बाबतीत अडला गेल्यानंतर नोकरी हाच एकमेव पर्याय या समाजासमोर राहिला. सुरुवातीच्या काळात कमी शिक्षण असतानाही सहज नोकरी उपलब्ध होत असे. त्यामुळे शिक्षकी आणि कारकुनी व्यवसायातून हाच समाज पुढे आला, परंतु नंतरच्या काळात नोकरी मिळणे दुरापास्त झाल्याने इतर व्यवसायाची क्षेत्रेही त्यांनी काबीज केली. बदलत्या परिस्थितीशी पहिले समायोजन केले ते ब्राह्मण समाजाने हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. याबाबत तो सर्वच पातळीवर लवचिक राहिला.

सामाजिक सुधारणेच्या बाबतीत जसा ब्राह्मण वर्ग आपणास अग्रेसर दिसतो तसाच काही अंशी प्रतिगामित्वाच्या बाबतीतही. अर्थात हे जुनाट प्रतिगामित्व सर्वास मान्य होणारे नाही. त्यामुळेच हा समाज एकसंध नाही. तसेच कुणाच्या सांगण्यावरून तो बहकणारा नसल्याने तो कुणाच्याही मागे सांगोवांगीने जात नाही. कुणाचे मोठेपण मान्य करत नाही. ही अहंमान्यता हा या समाजातील सर्वात मोठा दोष म्हणावा लागेल. त्यामुळे सारेच शहाणे अशी परिस्थिती. त्यामुळेच कोणतेही नेतृत्व या समाजाला मान्य होत नाही. लोकमान्य टिळक आणि स्वा. सावरकर यांच्यानंतर कोणतेच नेतृत्व या समाजात सर्वमान्य झाले नाही. जे निर्माण झाले ते इतर समाजाने निर्माण केलेले.

आज ब्राह्मण समाजाच्या काही मागण्या आंदोलनाच्या रूपाने पुढे आल्या आहेत. आज गावखेड्यात राहणार्‍या या समाजाचे प्रमाण खूप कमी झाले आहे. म्हणजे ते नगण्यच आहे. हातची शेती गेल्याने हा समाज विस्थापित झाला आहे. मराठवाड्यातील हा समाज पुणे, मुंबईसारख्या शहरात येऊन स्थिरावला आहे. सर्वांनाच नोकर्‍या आहेत असेही नाही. आज जगाच्या पाठीवर सर्व देशात हा समाज विखुरलेला दिसत असला तरी स्थानिक प्रश्न सुटलेले नाहीत. गुणवत्ता असूनही संधी मिळत नाही हा प्रश्न तर आहेच, परंतु मागील पिढीने केलेल्या शोषणाचे खापर अजूनही नव्या पिढीच्या डोक्यावर फोडले जात असल्याने तो तुटला गेलाय. संभ्रमित, असुरक्षित आहे. अजूनही सामाजिक टीकेचा धनी होताना म्हणजेच आजच्या भाषेत ट्रोल होताना अधिक दिसतो. तो बहुसंख्य नसल्याने त्यांना टार्गेट करणे सहज शक्य आहे. असे असले तरी पुढची कोणत्याच जातीची पिढी या जातीय दलदलीत अडकून पडणार नाही हेही आशावादी चित्र समोर दिसत आहे. कारण आता नव्या पिढीतील समंजस तरुणांना विस्तारण्यासाठी वैश्विक क्षितिजांची आस लागलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -