घरफिचर्ससारांशराम भरोसे...

राम भरोसे…

Subscribe

शितावरून भाताची परीक्षा...याप्रमाणे पाच राज्यांतील निकालांच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील निकालाचे ठोकताळे मांडले जात आहेत. पाच वर्षांचा वनवास संपून राज्यात रामराज्य स्थापन होईल अशी चिन्हे आहेत. तशी कल्पना केली तर एका अर्थाने आज लक्ष्मणाच्या भूमिकेत असलेले निकालानंतर राम होतील. आज भरताच्या भूमिकेत असलेले लक्ष्मण होतील आणि आजचे रामाच्या भूमिकेतील...भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे तर जिथे जातील तिथे भाजपच्या पदाधिकार्‍यांकडून तसे वदवूनच घेत आहेत.

देशातील पाच राज्यांचा निकाल अपेक्षित-अनपेक्षित असा लागला. अपेक्षित भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांसाठी होता, तर अनपेक्षित काँग्रेससह अन्य विरोधकांसाठी होता. काहीही असो, भाजपचा विजय झाला हे मान्य केले पाहिजे. सेमी फायनल भाजपने जिंकली आहे. आता लक्ष फायनलकडे अर्थात लोकसभा निवडणुकांकडे. त्यानंतर लगेच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजेल. प्रचाराची रणधुमाळी उडेल. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतील. दावे-प्रतिदावे केले जातील. मतदारराजा दीनवाणा होऊन आणखी संभ्रमित होईल आणि त्याच संभ्रमात तो राज्यघटनेने दिलेला मतदानाचा हक्क बजावेल आणि निवडणुकीचे सोपस्कार पार पडतील.

शितावरून भाताची परीक्षा…याप्रमाणे पाच राज्यांतील निकालांच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील निकालाचे ठोकताळे मांडले जात आहेत. पाच वर्षांचा वनवास संपून राज्यात रामराज्य स्थापन होईल अशी चिन्हे आहेत. तशी कल्पना केली तर एका अर्थाने आज लक्ष्मणाच्या भूमिकेत असलेले निकालानंतर राम होतील. आज भरताच्या भूमिकेत असलेले लक्ष्मण होतील आणि आजचे रामाच्या भूमिकेतील…भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे तर जिथे जातील तिथे भाजपच्या पदाधिकार्‍यांकडून तसे वदवूनच घेत आहेत.

- Advertisement -

कोण काय होईल, हा प्रश्न सर्वसामान्यांसाठी गौण आहे, पण पुढील वर्षी सरकार स्थापन झाल्यानंतर डिसेंबरपासून आपल्या सर्वांना अयोध्येला जायचे आहे. त्यासाठी सर्वांनी आतापासूनच तयारीला लागले पाहिजे. नाहीतर मध्य प्रदेश आणि राजस्थान येथील नागरिकांसारखी आपली हालत व्हायची. या दोन्ही राज्यांमध्ये प्रचार टिपेला पोहचलेला असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अयोध्येत मोफत रामलल्लाचे दर्शन घडविण्याचा शब्द दिला. येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणारच आहे. त्यामुळे हा अमृतकाळ पूर्णपणे राममय होईल आणि आपण सर्वच भक्तिरसात न्हाऊन निघू.

अयोध्येला जाण्याची संधी अमृतकाळात मिळत आहे हे अहोभाग्यच म्हणावे लागेल. महाराष्ट्रातील शेतकरीराजा प्रभू रामाच्या चरणी लीन होऊन कृषिमालाला योग्य भाव मिळावा, निसर्गाची अवकृपा होऊ नये, दरवर्षी पुरेसे पाऊसपाणी असावे, पुरेशी बी-बियाणांची उपलब्धता आणि त्यांचे दरही आवाक्यात असावेत, अशी विनंती करेल. मुले-मुली, तरुण-तरुणीही अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतील. या मुलांची फारशी अडवणूक न करण्याची काळजी सरकार आधीपासूनच घेत आहे. त्यांना प्रत्येक वर्षी उत्तीर्ण करण्याचा अलिखित आदेशच प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांनी आपापल्या शिक्षक, प्राध्यापकांना दिला आहे. त्यामुळे आता फक्त प्रश्न आहे तो पदवी मिळविल्यानंतर नोकरीचाच! त्याचेच साकडे ते रामलल्लाकडे घालतील.

- Advertisement -

महिलाही अगदी उत्साहात अयोध्येला जातील. एकपत्नीव्रत प्रभू श्रीरामच त्यांना चिंतामुक्त करू शकतो. कौटुंबिक हिंसाचार ते समाजातील नराधम यापासून वाचविण्यासाठी त्यांना प्रभू श्रीरामाचाच आधार असेल, तर नोकरदार कायम तणावात असतात. विशेषत: शहरातील अनेक नोकरदार ईएमआयवर जगतात. खासगी नोकरी म्हणजे मान मोडेस्तोवर काम, शिवाय नोकरीवर कधी गदा येईल हे सांगता येत नाही. त्याचा परिणाम कौटुंबिक स्वास्थ्यावरही होतो. म्हणूनच मन:शांतीसाठी प्रभू रामाच्या चरणी लीन होणे हाच एकमेव मार्ग.

अशा रीतीने रामराज्यात सर्व काही ‘राम भरोसे’च राहील. शेतकरी, विद्यार्थी, महिला, नोकरदार यांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी प्रभू रामाची असेल आणि त्याचसाठी या सर्वांना अयोध्येत नेण्याची जबाबदारी मात्र सरकारची राहील.
जय श्रीराम!

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -