घरफिचर्ससारांशआंतरलेल्या वाटेवर...

आंतरलेल्या वाटेवर…

Subscribe

माणूस अस्वस्थ होतो ते काहीतरी हरवण्यातून, काहीतरी तुटण्यातून. असे तुटणे तर लेखकांसाठी महत्त्वाचेच असते ना. अशा वियोगाच्या, तुटण्याच्या, उपेक्षेच्या गर्भातूनच अस्वस्थता निपजत असते आणि ही मनोभूमीच निर्मितीची बीजभूमी असते. सर्जनाची ओल सापडते ती इथेच. गावात गेलो की जुने मित्र भेटतात. सगळीकडे जाणे शक्य होत नाही. या माझ्या जन्मगावी वयाची १८ वर्षे व्यतीत केल्यावर १९९२ साली गाव सोडले. तेव्हापासून मधली काही वर्षे गावी घर होते तोपर्यंत राहणे व्हायचे. आता गावात एका दिवसाचा पाहुणा झालेलो, तरी जुन्या आठवणी साथ सोडत नाहीत.

-डॉ. अशोक लिंबेकर

खूप दिवसांनी आज माझ्या मराठवाड्यातील अर्धपिंपरी या गावी गेलो. गेवराई तालुक्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या प्रवेशद्वारावरील हे गाव. नदीच्या पलीकडेच शेवगाव तालुका, नगर जिल्हा सुरू होतो. त्यामुळे या जिल्ह्यातील बालमटाकळी, बोधेगाव ही गावे, कृषीविषयक बाजारहाट असलेली गावे, तर यंत्र साधनसामुग्रीसाठी शेवंगावी जावे लागायचे. गावात तेव्हा दोन इंजिने होती.

- Advertisement -

त्यातील एक आमच्याकडे. त्यामुळे वडिलांना नेहमी शेवंगावी जावे लागायचे. बोधेगावचा आठवडी बाजार तर खूपच प्रसिद्ध. इथला बैलांचा बाजार आणि बन्नोमाची जत्रा तर पंचक्रोशीत नव्हे तर महाराष्ट्रभर प्रसिद्ध. ९०च्या दशकात इथे सर्व तमाशांचे फड रंगायचे. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून या जत्रेकडे बघावे लागते. कारण इथे सर्व जातीधर्मातील लोक अत्यंत श्रद्धेने एकत्र येतात.

या गावाला लाभलेला हा सांस्कृतिक व सामाजिक अभिसरणाचा वारसा खूप महत्त्वाचा. अशा प्रादेशिक वैविध्याने नटलेल्या परिसरात माझे बालपण गेले. गोदावरी नदी इथून २०-२५ किमी वरून वाहते. संत एकनाथांचे पैठणही जवळच. त्यामुळे पैठणची वारी आणि नाथशष्टीचा उत्सव बर्‍याचदा कानावर यायचा. भगवान गडाला तेव्हा धुमेगड असेही म्हणायचे. आमच्या गावात वीज नव्हती. तेव्हा गावातून पश्चिम वायव्य क्षितिजावरील उंचावर काही लाईट चमकायचे. गावातून दिसायचे ते गडावरील लाईट.

- Advertisement -

गावात भजन, कीर्तन, नाटक, गावजत्रा, यात्रा उत्सव, कुस्त्या, वनभोजन, हुर्डा पार्ट्या, जत्रेतील छबिना, दत्ताचा भंडारा, सुगीच्या दिवसातील रानातील खळे, तिथले तेव्हाचे माझे मुक्काम, सिझनल रानमेवा, पारंपरिक सण, उत्सव अशा ग्रामीण मुशीत मी घडत होतो, पण माझ्या आधी गाव सोडलेल्या काही लोकांप्रमाणे माझ्याही आयुष्यात ऐन तारुण्यात ते अवघड वळण आले आणि हे हिरवे वळण ओलांडून मला नागरी कृतक, भगभगीत सिमेंटच्या झगमगाटात येऊन स्थिरावे लागले.

हा सांधाबदल खूपच अवघड होता. मनाला उसवून टाकणारा असाच. हा बदल केवळ माझ्यापुरता नव्हता तर तो मागील काही शतकांचा सांधा निखळून टाकणारा असाच होता. ८०-९०च्या दशकात जन्मलेल्या पिढीने हा बदल अनुभवला म्हणून तो त्यांना जोखता येतो. माझ्या पिढीतील आणि काही आधीचे स्मरण रंजनात अडकतात ते यामुळेच. कारण खाऊजाच्या आधीचा आणि नंतरच्या काळातील गतिमानता त्यांनी प्रत्यक्ष पाहिली, अनुभवलीय. आजची पिढी खूप तटस्थ आणि प्रॅक्टिकल अ‍ॅप्रोच असलेली. त्यामुळे असे भूतकाळात हरवणे, जे हातातून निसटले त्यासाठी तुटणे त्यांना खूप भाबडेपणाचे वाटते. नव्हे प्रत्यही ते हसतीलही.

पण असो, माणूस अस्वस्थ होतो ते काहीतरी हरवण्यातून, काहीतरी तुटण्यातून. असे तुटणे तर लेखकांसाठी महत्त्वाचेच असते ना. अशा वियोगाच्या, तुटण्याच्या, उपेक्षेच्या गर्भातूनच अस्वस्थता निपजत असते आणि ही मनोभूमीच निर्मितीची बीजभूमी असते. सर्जनाची ओल सापडते ती इथेच. गावात गेलो की जुने मित्र भेटतात. सगळीकडे जाणे शक्य होत नाही. या माझ्या जन्मगावी वयाची १८ वर्षे व्यतीत केल्यावर १९९२ साली गाव सोडले. तेव्हापासून मधली काही वर्षे गावी घर होते तोपर्यंत राहणे व्हायचे. आता गावात एका दिवसाचा पाहुणा झालेलो, तरी जुन्या आठवणी साथ सोडत नाहीत. बरंच काही विसरता येतं, पण काही गोष्टी गोंदणासारख्या अमीट असतात. तशाच या माझ्या मनातील न पुसता येणार्‍या गोष्टी.

हा आमच्या गावाजवळचा म्हणजे अगदी नदीच्या पल्याड, म्हणजे घरापासून अर्धा किमी असलेला मळा. मी सहा-सात वर्षांचा असताना माझा पहिला आणि एकट्याने केलेला पहिला प्रवास इथेच झाला. आपण एकटे मळ्यात येऊ शकतो याचे मला तेव्हा मनातून काय भारी वाटलेले. आज मी कारने एकटाच औरंगाबादहून गावी आलो, पण काहीच वाटले नाही. फार वर्षांपूर्वीं म्हणजे ८६-८७ साली मी शाळेत असताना आमच्या गावातील रामराव गाडे यांनी मला औरंगाबादला ते ज्यांची शेती बटाईने करतात त्यांच्याकडे घेऊन गेले होते.

कारण त्यांचे घर त्यांना एकट्याला सापडणार नाही हे त्यांना माहीत होते. मी जरा शिकलेलो म्हणून शहाणा असे समजून नेलेले. तेव्हा फुकटात हे शहर बघायला मिळतेय म्हणून मला खूपच आनंद झालेला. इतका की मी तेव्हा ड्रायव्हरच्या मागे असलेल्या सहा सीटरवर गुडघ्यावर उभा राहून अख्खा रोड डोळ्यांत साठवलेला. आज या मार्गाने येताना ते सर्व आठवले आणि हसायला आले. रस्ता, उजेड, हवा, झाडे सर्व काही तेच पण मी आणि माझी परिस्थिती मात्र बदललेली, पण आनंद ही भावना तर तीच आहे ना…? पण तेव्हा झाला होता तसा आनंद?

अशाच मळ्यात व्यतीत केलेल्या त्या सोनेरी दिवसांच्या असंख्य आठवणी मनात आहेत. आज काही क्षण इथे रेंगाळताना मनाच्या आभाळात त्या गच्च भरून आलेल्या. असा एकही दिवस तेव्हा जात नसे की मी इथे आलो नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, पहाट असे सर्व प्रहर इथे घालवलेले. त्या श्रीमंत आठवणींची सर कशालाच नाही. आज इथे आलो आणि समोर पाहिले तर गहू काढून पडलेला, हे पाहून किती वर्षे मागे गेले माझे मन.

अगदी असाच सीन. हेच लिंबाचे झाड (तेव्हा थोडे छोटे होते) आणि याच उन्हाळी दिवसात आम्ही सर्व बच्चे कंपनीने तेव्हा गव्हाचा सरवा वेचलेला. दुपारी इथेच सर्वांनी जेवण केलेले आणि तेव्हा मी उन्हाळी सुट्टीत मामाच्या गावी आलेल्या माझ्या मावस भावंडासमोर हातात दगडाचा टाळ करून पाहता श्रीमुख सुखावले सुख! डोळीयांची भूक नवचे माझ्या! हा संत तुकारामांचा अभंग घेऊन कीर्तनात महाराज जसे निरूपण करतात तसे काहीसे केलेले. कारण तेव्हा गावात आणि पंचक्रोशीत हरिनाम सप्ताहांचा घाऊक दणका सुरू झालेला.

यात महाराजांना मिळणारा मान, सन्मान पाहून मलाही कीर्तनकार व्हावे असे वाटू लागलेले, पण ते घडले नाही. कारण वय वाढत होते तशी माझी स्वप्नेही बदलत होती. माझ्या स्वप्नांशीही मला कधी प्रामाणिक राहता आले नाही. या मळ्यात घर करून राहायचे, इथेच सकाळची कोवळी उन्हे अंगावर घेत उठायचे आणि नदीकाठच्या त्या आदिम संगीताच्या लयीत आकाशातील सप्तर्षिकडे पाहून निजायचे, पण ते नेहमीसाठी शक्य झाले नाही तरी या फोटोत दिसतोय त्या माझ्या बालमित्राला नेहमीसारखे मी पुन्हा येईन, असे आश्वासन देऊन मात्र आलो.

या सुट्टीत आता तीन-चार दिवस काढून येतो, मला पुन्हा ते सारे गावशिवार, त्या रानवाटा, ती झाडे, ते ओढे, ते ओहळ, कितीतरी दिवसात न पाहिलेले ते चेहरे आता कसे दिसतात ते बघायचेत.

गाव सोडल्यावर मागे काय काय घडत असते ते सारेच नाही कळत आपल्याला. असेच आमच्या शेतात त्याकाळी काम करणारे साहेबराव रोकडे भेटले. मी त्यांना साहेबा मामा असेच म्हणायचो. माझं आजोळ आणि गाव एकच असल्याने इथे अनेकांना मामा म्हणून संबोधन. आज खूप वर्षांनी ते मारुतीच्या मंदिरात भेटले. तेव्हा त्यांची विचारपूस केली. त्यांच्या मुलांबद्दल विचारले… काय करतो अंकुश! त्यांनी निर्विकारपणे सांगितले तो जाऊन आता आठ-दहा वर्षे झाली. काय बोलावे मला सुचेना. मी गप्पगार झालो.

तसाच पुढे निघालो तर झुलतच मच्छिंद्र रोकडे पुढ्यात शालूमाईचा अशोक करत हात हवेत नाचवतच तो पुढे आला. याला कसे टाळणार?. त्याला ५०-१०० हवे असतात. पन्नास-पन्नास करत हाताचा अंगठा आणि तर्जनीचा चाळा करतच तो जवळ येतो. तसा हा रागीट चर्येचा, पण पिल्यावर मात्र भलता विनोदी दिसतो. मला जेव्हापासून कळतेय तेव्हापासून हा पितो, पण याचे काहीच डॅमेज झालेले नाही. हे एक माझ्यासाठी आठवे आश्चर्यच.

गावात जशी गावगुंडी असते तशाच ग्राम संस्कृतीने आपल्या पदरात टाकलेल्या चांगल्या गोष्टीही कितीतरी सांगता येतील. त्रिंबक नारायण अत्रे यांचा गावगाडा वाचला म्हणजे याची प्रचिती येईल. ग्रामजीवनातील स्वंयपूर्णता ही काही वर्षांपूर्वी आपली ठळक विशेष होती. बारा बलुतेदार, अलुतेदार पद्धती असल्याने ९९ पर्यंत तरी लोक एकमेकांवर विसंबून होते.

यातूनच ग्रामसंस्कृतीतील समूहभान विकसित झाले. इर्जीक, सांगड, यावसारखे प्रकार याची बोलकी उदाहरणे. सहकाराची बिजे यातच दडलेली. एकमेका साह्य करू, या दृढ भावनेने हे जीवन फुलत होते, बहरत होते. गावजत्रेला सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन आपल्या ग्रामदेवतेचा उत्सव साजरा करीत होते. सुगीच्या दिवसात भरल्या शिवाराप्रमाणे सर्वांचे मन भरलेले असे. त्यामुळे आपल्यातील वाटा सर्वांना देण्याची प्रथा होती.

लेकीबाळीच्या लग्नाला सर्वच जण सर्व वाद विसरून एकत्र यायचे. तिला सासरी धाडताना सर्व गावाचेच डोळे पाणवायचे. पंचमीच्या सणाला गावातील मुलींचे डोळे झाडाच्या फांदीवर हिंदोळू लागायचे. याच दिवसात माहेरवासिनी आपल्या माहेरी यायच्या. श्रावण महिना तर सर्व सणांचे आगरच जणू. या महिन्यातील धार्मिक उत्सव, मंदिरात वाचली जाणारी पंडित श्रीधर कवीची हरिविजय, भक्ती विजय हे ग्रंथ, या ग्रंथांनी तेव्हा गावातील लोकांच्या कथा श्रवणाची भूक भागवलेली. रंजन आणि प्रबोधन यातून साधलेले. ग्राम संस्कृतीतील या सार्‍या परंपरांनी समृद्ध झालेले मन समष्टीच्या अंगाने विचार करू लागले तर त्यात नवल काय? ग्रामीण संस्कृतीबद्दल हे माझे स्वगतचिंतन सुरू असतानाच मी गावात फिरत होतो.

मनात हा विचार सुरू असतानाच त्याच्या हातावर काही रुपये ठेवून मी पुढे गेलो. काही वेळाने पुन्हा त्याच रस्त्याने परत येताना त्याला शाळेच्या कोपर्‍यावर पाहिले तर त्याची ब्रह्मानंदी टाळी लागलेली. तो पुढे हेच करणार हे मला माहीत असूनही मी त्याला टाळू शकलो नाही. काही माणसं, काही आठवणी, तशाच काही गोष्टी नाही टाळता येत आपल्याला. त्या इतक्या मनात ठसलेल्या असतात, अगदी हिरव्या गोंदणासारख्याच!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -