घरताज्या घडामोडीभुतांचा कर्दनकाळ!

भुतांचा कर्दनकाळ!

Subscribe

पॅरानॉर्मल इन्व्हेस्टीगेशन म्हणजे सोप्या मराठीत बोलायचं झालं तर लोकांना झपाटलेली वाटणार्‍या किंवा त्यांची अंधश्रद्धा असलेल्या जागेचं किंवा व्यक्तीचं संशोधन करणं. त्यातून नेमकं जाणून घेणं. त्यात काही चुकीचं असेल तर त्याबद्दल प्रबोधन करणं. परदेशात पॅरानॉर्मल इन्व्हेस्टीगेशन हा करियर पर्याय म्हणून स्वीकारला जातो. भारतातही जय अलानीसारखे काही तरुण आहेत ज्यांनी याला पूर्ण वेळ काम म्हणून स्वीकारलं आहे. ‘मिथबस्टर’ म्हणून ते लोकांच्या मनात रुजलेल्या भूत नावाच्या गैरसमजाला पळवून लावतात. समाजाला आज अशा भुतांच्या कर्दनकाळ ठरणार्‍या साहसवीरांची गरज आहे.

– रोशन चिंचवलकर

भूत! जिवंत मनुष्याच्या दृष्टीने अशी शक्ती जी कधी विचित्र, कधी गूढ, कधी नुकसानकारक असते, तर श्रद्धा ही माणसाला आंतरिक शक्ती आणि जगण्याचे सामर्थ्य देते, अशी बर्‍याच जणांची धारणा असते. ही भीती, धारणा, विश्वास खरा किंवा खोटा हादेखील प्रश्न नसतो. जोपर्यंत हा विश्वास, श्रद्धा एखाद्या व्यक्तीपुरती मर्यादित आहे, त्याचा इतरांना त्रास नाही, तर त्याबद्दल समस्या असण्याचे कारण नसते, परंतु अशा श्रद्धेचा, विश्वासाचा समाजातील इतर घटकांना त्रास सुरू झाला की खरी समस्या तिथे सुरू होते. आपल्या आजूबाजूला जे काही घडत असतं ते वास्तव असतं. खरंच बघायला गेलं तर हे वास्तव सत्य मानून मनुष्याने वाटचाल करीत राहणे अपेक्षित असते, पण आपल्या सोयीनुसार वास्तव बदलणे आणि त्याचा आपल्या फायद्यासाठी वापर समाजात सुरू झाला की समाजाचा एक क्रूर आणि विचित्र चेहरा जो समाजाने बनवलेल्या भुतांच्या चेहर्‍यापेक्षादेखील क्रूर असतो. इथेच सुरू होतो जय अलानीसारख्या पॅरानॉर्मल इन्व्हेस्टीगेटरचा रोल.

पॅरानॉर्मल इन्व्हेस्टीगेशन म्हणजे सोप्या मराठीत बोलायचं झालं तर लोकांना झपाटलेली वाटणार्‍या किंवा त्यांची अंधश्रद्धा असलेल्या जागेचं किंवा व्यक्तीचं संशोधन करणं. त्यातून नेमकं जाणून घेणं. त्यात काही चुकीचं असेल तर त्याबद्दल प्रबोधन करणं. परदेशात पॅरानॉर्मल इन्व्हेस्टीगेशन हा करियर पर्याय म्हणून स्वीकारला जातो. भारतातही जय अलानीसारखे काही तरुण आहेत ज्यांनी याला पूर्ण वेळ काम म्हणून स्वीकारलं आहे. ज्यातून चांगल्या मार्गाने पैसे कमावण्याचे पर्यायदेखील आहेत, पण या सर्वांपेक्षा मी ‘मिथबस्टर’ खोट्या गोष्टींचा नाश करणारा आहे याचा मला अभिमान असल्याचे जय म्हणतो.

- Advertisement -

कॉलेजमध्ये असताना या सर्वांबाबत पहिल्यापासूनच कुतूहल असल्याचं जय सांगतो. त्यानंतर 2013 साली जयचा हा प्रवास खर्‍या अर्थाने सुरू झाला. सुरुवातीला मजेत केलेल्या या कामाचं खरं महत्त्व काही ठिकाणी भेट दिल्यावरच खर्‍या अर्थाने समजलं, असं जय सांगतो. गेल्या 8 ते 9 वर्षांतील हा अनुभव, किस्से, गोष्टी जय अगदी रंजकरित्या सांगतो. त्याचे हे अनुभव मानवी समज, मानवी मानसिक आजार, त्यातून निर्माण होणार्‍या क्रूर समस्या याभोवती फिरतात.

आपल्या देशातील अंधश्रद्धेचे असे एकापेक्षा एक भन्नाट किस्से जय सांगतो. त्यापैकीच एक म्हणजे भुतांची जत्रा. या भुतांच्या जत्रेत तुम्ही भूत खरेदी करू शकता, विकू शकता आणि हद्द म्हणजे भाड्यानेही घेऊ शकता. अशी भाड्याने घेतलेली भुते तुमच्या समस्या दूर करतात, असा दावा केला जातो. याच जत्रांमध्ये तरुणींचा लैंगिक छळ केला जातो. मुलगा होत नाही किंवा मूल होत नाही या नावावर बलात्कारही अशा जत्रांमध्ये होत असल्याचे जय म्हणतो. तसेच या जत्रांमध्ये ताईतसारखी उत्पादनेदेखील विकली जात असल्याचे जय सांगतो. देशातील अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारच्या जत्रा भरतात. अशा राज्यांमधील सरकारांनी आमच्या येथे अशा घटना घडत नाहीत, असं सांगावं, असं थेट आव्हानदेखील जय देतो, पण दुर्दैवाने अशा चुकीच्या गोष्टींबाबत बोलायला कोणी पुढे येत नाही, असं जयला वाटतं. याबाबत अधिक बोलताना जय म्हणतो की, परदेशातही अंधश्रद्धा आहे, पण त्याविरोधात लढणारे लोकही त्यापेक्षा जास्त आहेत. तसेच परदेशातील सरकारदेखील अशा लढ्याला मदत करतं, असं जय सांगतो.

- Advertisement -

मानसिक आजाराबाबत अजूनही आपल्या देशात साक्षरता नसून याला अंधश्रद्धांचे स्वरूप देऊन घडलेल्या घटनांचे अनुभव आल्याचे जय सांगतो. आपल्याकडे आलेल्या एका केसबद्दल सांगताना जय म्हणतो, एके दिवशी हरियाणाच्या यमुनानगर भागातून एका नुकत्याच डेन्टिस्ट झालेल्या एका मुलीचा मला मेसेन्जरवर एक मेसेज आला की ‘मला तुझ्यासोबत बोलायचं आहे आणि हा तिच्या आयुष्यातील किंबहुना शेवटचा दिवस आहे’. मी तिच्यासोबत बोललो. तिला गेल्या 8 महिन्यांपासून ती जाईल तिथे एक पाय नसलेली बाई दिसत होती. ती याबाबत तिच्या कुटुंबीयांशी बोलली, तर त्यांनी तिला एका आश्रमात पाठवलं. तिथे तिला 16 दिवस ठेवलं गेलं. चौथ्या दिवसापासून तेथील सेवक तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करीत होता. त्यांचा असा दावा होता की, या तरुणीत काहीतरी वाईट शक्ती आहे आणि सेवकाच्या विर्याने ती शक्ती निघून जाईल. शेवटी ती तरुणी पळून घरी आली आणि आत्महत्या करण्याच्या मार्गावर होती. तिच्यासोबत काही दिवस बोलल्यानंतर तिच्यासोबत नेमकं काय होत होतं हे कळल्याचं जय सांगतो.

ती एक मानसिक आजाराची केस होती, जी तीन स्तरांमध्ये विभागली गेली होती. पहिली स्टेज पीटीएसडी (पोस्ट ट्रामॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर) लहानपणी मानसिक किंवा शारीरिक लैंगिक शोषण किंवा एखाद्या भयंकर घटनेचा सामना केल्यानंतर ही परिस्थिती उद्भवू शकते. जे त्या मुलीसोबत लहानपणी झालं होतं. त्यामुळे त्या मुलीला मानसिक धक्का बसला होता आणि त्या आजाराच्या दुसर्‍या स्तरावर गेली, ज्याला पॅराडोलिया म्हणतात. पॅराडोलिया म्हणजे कोणत्याही गोष्टीत आकृती दिसणे. हे एक मानवी कौशल्य असतं, असं जय सांगतो. तिसरा स्तर म्हणजे पॅराकॉझम जिथे व्यक्ती स्वत: अशी प्रतिमा तयार करते, जी तिला नुकसान पोहचवतेय. त्या तरुण मुलीसोबत नेमकं हेच घडत होतं. पुढे सांगताना जय म्हणतो की, मी आयुष्यात काही जे कमावलंय ते हेच. मी त्या मुलीला आत्महत्या करण्यापासून वाचवलं. मी तिच्या घरी गेलो. तिच्या पालकांशी बोललो. तिची नीट ट्रिटमेंट झाली. ती आता अगदी व्यवस्थित आहे. अशा घटना सांगताना जय समाजाचा खरा राक्षसी चेहरा पुढे आणत असतो.

दुसर्‍या एका घटनेत एका गावात एका व्यक्तीला नंदीचा अवतार मानल्याचा अनुभव जय कथन करतो. तो म्हणतो की, त्या व्यक्तीची बोनथ्रोपी नावाची मानसिक स्थिती होती, ज्यात व्यक्ती एखाद्या जनावराप्रमाणे वागते. ही स्थिती तासानंतर, एका दिवसानंतर किंवा महिनाभरानंतरदेखील उद्भवू शकते, परंतु तेथील लोकांना ही गोष्ट मान्य नव्हती. कधी कधी लोकांना ही गोष्ट समजावणे कठीण असते, असे जय सांगतो. जय अलानी आतापर्यंत अनेक झपाटलेल्या ठिकाणी गेला आहे. काही किल्ल्यांवर त्याने रात्री काढल्या आहेत. काही गैरसमजुती दूर करण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. एकंदरित आपल्या कामाबद्दल जय एवढंच सांगतो की, भूत आहे किंवा नाही यात मी जातच नाही. भुताच्या नावावर ज्या गोष्टी घडत आहेत, त्या चुकीच्या गोष्टी रोखण्याचा मी प्रयत्न करतो. मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मला चांगलं वाटतं म्हणून मीदेखील रूद्राक्ष घालतो, मी पण अगरबत्ती लावतो, पण धर्माची ढाल करून जे इतरांवर अत्याचार करतात त्यांच्याविरोेधात मी उभा आहे.

आपल्या देशात भूत, डायन यांच्या नावाने अनेक महिलांवर अत्याचार सुरू असल्याचे जय सांगतो. तसेच अनेक छोटी मुलेदेखील या अंधश्रद्धेचे बळी ठरल्याचे तो म्हणतो. वशीकरण, काळी जादू यांच्या संशोधनासाठी त्याने स्वत:वरदेखील प्रयोग करून बघितले आहेत. तसेच प्रेतांवर बलात्कार करणे, अशा मानवी जीवनात कहर ठरणार्‍या घटनांची आणि त्यामागील वेडसर मानवी डोक्याची त्याला माहिती आहे. या सर्व गोष्टीत खरी माहिती लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. गेल्या अनेक वर्षांत अशा अनेक ठिकाणी जाऊन जयने अनेकांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. उद्देश किंवा ध्येय एकच आहे, स्वत:च्या स्वार्थासाठी इतरांवर अत्याचार करणार्‍या क्रूर आणि मानवी भुतांचा कर्दनकाळ ठरणं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -