घरफिचर्ससारांशभारतीय संस्कृतीतील कृषिनिष्ठा...

भारतीय संस्कृतीतील कृषिनिष्ठा…

Subscribe

ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे कृषिजीवन होय. कृषीसंस्कृतीमध्ये निसर्गातील विविध घटकांचा नित्याचाच सहबंध असतो. त्यामुळे पशू, पक्षी, झाडे, पाऊस, पाणी, शेती-भाती आणि यावर आधारित रूढी परंपरांची रेलचेल या संस्कृतीत दिसते. आपल्या सर्व सण-उत्सवांवर एक नजर टाकली तरी त्यातील कृषिजीवनाचा प्रभाव लक्षात येतो. या सर्व घटकांचे चित्रण संत साहित्यातून झाले आहे. विशेष म्हणजे हे साहित्य निर्माण करणारे सकळ संत कवी हे ग्रामीण जीवनातून आलेले होते, म्हणूनच ग्रामीण जीवनाचा, ग्रामीण मातीचा गंध या कवितेतून दरवळत राहतो. शाश्वत विचाराच्या प्रतिपादनासाठीसुद्धा कृषी संस्कृतीतील अनेक दाखले संतांनी दिले आहेत.

-डॉ. अशोक लिंबेकर

मानवी उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांमध्ये शेतीचा शोध हा अखिल मानवजातीला स्थिरीभूत करणारा शोध आहे. माणसाच्या प्रगमनशिलतेचा हा इतिहास आहे. मानवी संस्कृतीच्या प्रगतीच्या इतिहासाचा हा प्रारंभ मानावा लागेल. या घटनेने माणसाची नित्याची जंगलातील भटकंती थांबून तो नदीच्या काठावर, पाणवठ्याशेजारी स्थिर झाला आणि यातूनच मानवी वसाहती निर्माण झाल्या. पुढे याच शेतीवर आधारित पशुपालन आणि उत्पादित मालाची विक्री करण्यासाठी हाट निर्माण झाले.

- Advertisement -

शेतीसाठी विविध अवजारे निर्माण झाली. विविध धान्य आणि फळ भाजीपाला शेती सुरू झाली. बी-बियाणे पारंपरिक पद्धतीने साठवून त्याचे जतन होऊ लागले व यातूनच कृषिनिष्ठ समाजरचना उदयास येऊ लागली. आपल्या रीतीभातीवर या संस्कृतीचा प्रभाव पडला. अनेक रूढी, परंपरा व सण उत्सव या संस्कृतीच्या प्रभावातून आणि तिच्या संवर्धनासाठी निर्माण झाल्या. नागपंचमी असो की बैलपोळा हे सण या संस्कृतीतील कृतज्ञतेचे प्रतीक आहेत.

सारांशाने सांगायचे झाले तर आपल्या मानवी जीवनावर आणि त्यातील विविध धर्म, कला, साहित्य, राजकारण, तत्त्वज्ञान यावर या संस्कृतीचा प्रभाव पडला. साहित्य आणि विविध कलेच्या माध्यमातून कृषिजीवनाचे आविष्करण होऊ लागले. मानवी संस्कृतीच्या केंद्रस्थानी कृषिजीवन आले, पण असा अग्रक्रम असूनही या संस्कृतीची नेहमीच हेळसांड झाली, उपेक्षा झाली हे युगानुयुगाचे जीवन वास्तव आहे.

- Advertisement -

भारत हा कृषिप्रधान देश आहे असे आपण अभिमानाने छाती फुगवून सांगत असतो, पण प्राचीन भारतीय परंपरेचा, ज्ञानभांडाराचा वारसा म्हणून आपण ज्या महत्त्वपूर्ण ग्रंथाचा उल्लेख करतो त्यात कृषीवर आधारित किती ग्रंथ आहेत? असे ग्रंथ का निर्माण होऊ नयेत? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण नेहमीच याबाबत बेगडी प्रेम दाखवून या जीवनाची उपेक्षा करत आलो आहोत, पण संत साहित्य यास अपवाद आहे. कारण हे साहित्य निर्माण करणारे संत हे कृषीसंस्कृतीचे अविभाज्य घटक होते.

या जीवनाचे चटके त्यांनाही बसलेच ना? बरे झाले देवा निघाले दिवाळे। बरे या दुष्काळे पिडा गेली। असा सुटकेचा निश्वास जेव्हा संत तुकाराम टाकतात तेव्हा त्यांच्या मनात काय होते? अखिल मानवतेचे कल्याण चिंतणार्‍या या संवेदनशील कवीला आपल्या बायका -पोरांचा एवढा कंटाळा आला होता का? तर याचे उत्तर नाही असेच आहे. सोळाव्या शतकातील दुष्काळाचे चटके आणि त्यातून उपासमारीने तडफडून मारणारी माणसे संत तुकारामांनी पाहिली आणि या कृषिजीवनाच्या अनिश्चिततेच्या जाणिवेतून व प्रचंड जीवघेण्या व्याकूळतेतून हे निर्वाणीचे उद्गार त्यांनी काढले.

या जीवघेण्या दुष्काळाचे चित्र संत तुकोबांनी जवळून पहिले आणि या अनुभवांना शब्दरूप देऊन कृषिजीवनातील हे दाहक वास्तव अधोरेखित केले. या उग्र भीषण रूपाचे चित्र त्यांच्या पुढील अभंगातून उमटलेले दिसते. ‘भेणे मंद झाल्या मेघवृष्टी। आकातली कांपे सृष्टी। देव रिगाले कपाटी। आटाआटी प्रवर्तली। अपीक धान्ये दिवसे दिवसे। गाई म्हैसी चेवल्या गोरसे। नगरे दिसती उध्वंसे।’ दुष्काळाने उद्ध्वस्त झालेले कृषिजीवन येथे अभिव्यक्त होते.

ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे कृषिजीवन होय. कृषीसंस्कृतीमध्ये निसर्गातील विविध घटकांचा नित्याचाच सहबंध असतो. त्यामुळे पशू, पक्षी, झाडे, पाऊस, पाणी, शेती-भाती आणि यावर आधारित रूढी परंपरांची रेलचेल या संस्कृतीत दिसते. आपल्या सर्व सण-उत्सवांवर एक नजर टाकली तरी त्यातील कृषिजीवनाचा प्रभाव लक्षात येतो. या सर्व घटकांचे चित्रण संत साहित्यातून झाले आहे. विशेष म्हणजे हे साहित्य निर्माण करणारे सकळ संत कवी हे ग्रामीण जीवनातून आलेले होते, म्हणूनच ग्रामीण जीवनाचा, ग्रामीण मातीचा गंध या कवितेतून दरवळत राहतो.

शाश्वत विचाराच्या प्रतिपादनासाठीसुद्धा कृषी संस्कृतीतील अनेक दाखले संतांनी दिले आहेत. संत तुकाराम म्हणतात ‘पिकलिये सेंदे कडूपण गेले। तैसे आम्हा केले पांडुरंगे। काम क्रोध निमाले ठायीची। सर्व आनंदाची सृष्टी जाली।’ परिपक्व झाल्यावर कडू शेंदाड ही मधुर, गोड लागते तसेच माणसाचे आहे. माऊलींच्या भाषेत सांगायचे झाले तर जेव्हा खळांची व्यंकटी सांडून जाते तेव्हा निखळ, निरलस मन आणि प्रगल्भता यामुळे माणसास परिपक्वता येते हाच भाव संत तुकाराम कृषिजीवनातील समर्पक संदर्भातून व्यक्त करतात. मानवी भावभावना स्पष्ट करण्यासाठी संतांनी असे अनेक दाखले दिले आहेत.

उस डोंगा परी रस नव्हे डोंगा। काय भुललासी वरलिया रंगा। असं जेव्हा चोखोबा म्हणतात तेव्हा त्यांनाही मानवी मनातील आंतरिक सौंदर्यच व्यक्त करायचे होते. संत सावता माळी तर आपल्या शेतातच विठ्ठलभक्तीचा मळा फुलवतात. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, असे म्हणून त्यांनी आपल्या कृषी कर्मालाच भक्तीचे अधिष्ठान दिले. आपल्या नित्याच्याच कृषी व्यवहाराला असे पारमार्थिक अधिष्ठान देणारे मराठी संत हे या विश्वात खरे भक्ती कर्मयोगी आहेत. अठरा पगड जातीतून आलेले हे मराठी संत शेती-भातीशी संबंधित आहेत. त्यामुळे संपूर्ण गावरहाटीचे दर्शन त्यांच्या अभंगातून घडते.

शेती आणि शेतीशी संबंधित अनेक घटना, व्यवहाराचे आणि अनुभवाचे प्रतिबिंब या काव्यात दिसते. पेरणी, मळणी, माती, पाणी, उजेड, वारा, सुगी, गुरेढोरे यांचा अन्वय रेखाटत हे साहित्य आविष्कृत झाले. मध्ययुगीन कालखंडात माणसाचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन हे शेती हेच होते. त्यामुळे साहजिकच या कालखंडातील साहित्यातून कृषिजीवनातील संदर्भ आले आहेत. महानुभावांच्या लीळाचरित्रामध्येही अशा काही लीळा शेतकर्‍यांच्या जीवनावर आहेत.

म्हणजेच संत साहित्याचा आणि कृषिजीवनाचा संबंध हा प्रारंभापासूनच आलेला आहे. संत ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेली ही परंपरा निळोबापर्यंत अखंडपणे चालत आली आहे. संत ज्ञानदेवही आपल्या अनेक अभंगांतून आणि ग्रंथांतून कृषिजीवन रेखाटतात. मातीचा गुण चांगला असेल तर येणारे पीक, वृक्ष, लता वेलीचा दर्जाही तसाच सकस असतो हे सांगताना ते म्हणतात ‘का भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव ।’ असे जेव्हा ज्ञानदेव म्हणतात तेव्हा ते मातीचा सकसपणाच अधोरेखित करतात.

कृषिजीवनात बीज, माती, पाणी, उजेड, वारा याला किती महत्त्व आहे हे संतांच्या अभंगांतून विविध अनुषंगाने व्यक्त होते. संत तुकाराम तर आपल्या अभंगातून असे अनेक दाखले देतात. ते खूपच मार्मिक आणि समर्पक आहेत. उदा. बिजाचे महत्त्व सांगताना ते म्हणतात ‘तुका म्हणे बीज पोटी। फळ तैसेची शेवटी। पेरिल्या बीजाचे। फळ घेई शेवटी’ किंवा ‘पर्जन्य पडावे आपुल्या स्वभावे। आपुल्या दैवे पिके भूमी। बीज तेची फळ येईल

शेवटी। लाभहानी तुटी ज्यांची त्या।’ पाऊसकाळाच्या पूर्वीची अवस्था सांगताना ते ‘तृष्णकाळी उदके भेटी। पडे मिठी आवडीची।’ मातीचा गुणधर्म पाहून आपण पीक घ्यावे असे तुकाराम या अभंगातून सांगतात. असे वाटते ते म्हणतात ‘भूमी पाहता नाही वेगळी। माळ बरड एक काळी। उत्तम निराळी मध्यम कनिष्ठा।’ मातीचा विनिमय वेगवेगळ्या प्रयोजनासाठी होत असला तरी मातीचे मातीपण शेवटी एकच असते तसेच सर्व भूतमात्राचे आहे.

आपल्या कर्माप्रमाणेच आपणास फळ लाभते हे सांगण्यासाठी संत काळ्या आईच्या कुशीतील अनेक दाखले देतात. हा काळ्या आईबद्दलचा जिव्हाळा, आत्मीयता, प्रेम, एकनिष्ठा सर्वच मराठी संतांच्या अभंगातून एकमुखाने आविष्कृत झाली आहे. संतकाव्याचा हा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -