ऋषी…

Subscribe

ऋषी कपूरच्या त्या अनपेक्षित उत्तराने ती नवतारका चांगलीच हडबडली. ऋषी कपूरशी पुढे काय बोलावं हे तिला सुचेना. ऋषी कपूरने तिच्या चेहर्‍यावरचं ते भलंमोठं प्रश्नचिन्ह ओळखलं...आणि तो तिला म्हणाला, ‘मेरा पसंदीदा गाना मैं आपको गा कर सुना दुं तो बेहतर होगा.’ पुढच्याच क्षणी ऋषी कपूर आपल्या खुर्चीवरून उठला. मागे असलेल्या ऑर्केस्ट्राला उद्देशून म्हणाला, ‘मैं जो मेरा पसंदीदी गाना गाऊंगा उसे प्लिज साथ देना...बाकी कुछ फिक्र मत करना, मैं गाने की पहली पंक्ती शुरू करतेही आप वो गाना पहचान पाओगे.’ ...आणि पुढच्याच क्षणी त्याने आपल्या आवडत्या गाण्याची सुरुवात केली त्या गाण्याची पहिली ओळ होती - मैं शायर तो नही.

तो विशी-पंचविशीतला ऋषी कपूर. नौजवान गडी. कपूर खानदानातलं गोरंगोमटं रूप ल्यायलेला. छान चिकणाचोपडा. चारचौघात कसला, चार हजारांत उठून दिसणारा. राजसाहेबांनी आपल्या या मुलासाठी सिनेमा करायचा ठरवला. सिनेमाचं नाव ठरलं बॉबी. सिनेमाची कथाही त्याच्यासारखीच तरणीबांड ठरली. राजसाहेबांना आपल्या मुलाची रूपेरी पडद्यावरची एन्ट्री जरा जोरकस करायची होती. लक्ष्मीकांत-प्यारेलाल या प्रस्थापित संगीतकाराकडे जरी त्या सिनेमाची जबाबदारी सोपवली असली तरी आपल्या मुलासाठी राजसाहेबांना नेहमीचा प्रस्थापित पार्श्वगायक नको होता. त्यांना संपूर्णपणे वेगळा आणि नवतरुण गायक हवा होता. त्यासाठी राजसाहेब तशा आवाजाच्या शोधात होते. आपल्या जवळच्या लोकांना त्यांनी तसं सांगून ठेवलं होतं.

…आणि असा शोध घेत असतानाच एके दिवशी एक तरुण राजसाहेबांच्या स्टुडिओत त्यांच्या ओळखीच्या माणसांसोबत आला. त्याचं नाव होतं शैलेंद्र सिंग. तो पुण्याच्या फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत असला तरी सिनेमासृष्टीला पूर्णपणे नवखा होता. नवखा म्हणजे अगदी नवाकोरा.

- Advertisement -

राजसाहेबांनी त्याला थेट आपल्या रेकॉडिर्ंंग स्टुडिओत नेलं. त्याला तिथल्या माईकवर गाणं म्हणायला लावलं. तो गझलचा शौकिन होता. त्याने राजसाहेबांना एक गझल गाऊन दाखवली. राजसाहेबांनी कान देऊन त्या तरुणाचा आवाज ऐकला. तो नेहमीच्या पठडीतला म्हणजे घिसापिटा नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्याने गायलेल्या त्या गझलमधली त्याची शैलीही प्रति रफी, प्रति किशोर छापाची नसल्याचं त्यांना आढळून आलं. त्यांना त्या आवाजात गोडवाही जाणवला. त्यांना ऋषी कपूरसाठी तो आवाज साजेसा वाटला. त्यांनी मनातल्या मनात जवळ जवळ तो आवाज ‘बॉबी’साठी निश्चित करून टाकला.

पुढे त्यांनी शैलेंद्र सिंगला लक्ष्मीकांत-प्यारेलालकडे नेलं. लक्ष्मीकांत-प्यारेलालनी त्याला गाणं गाऊन रेकॉर्ड करून आणायला सांगितलं त्या गाण्याचे शब्द होते – मैं शायर तो नही!

- Advertisement -

या दरम्यान एक गोष्ट अशी घडली होती की राजसाहेबांच्या स्टुडिओत शैलेंद्र सिंग जेव्हा पहिल्याच वेळी आपल्या आवाजाची चाचणी द्यायला आला होता आणि त्याने जेव्हा आपली गझल गाऊन दाखवली होती तेव्हा तिथेच बाहेर ती गझल ऐकत होता त्याचं नाव होतं ऋषी कपूर.

पुढे ‘बॉबी’ भन्नाट चालला. त्यातलं संगीत हिट झालं आणि त्याचबरोबर त्यातलं ‘मैं शायर तो नही’ हे गाणंही सर्वदूर पोहोचलं. शैलेंद्र सिंगची गायक म्हणून ओळख बनलं. मुकेश जसे राजसाहेबांचा आवाज बनले होते तसं पुढे शैलेंद्र सिंग ऋषी कपूरचा आवाज बनला. त्या काळात शैलेंद्र सिंग जेव्हा जेव्हा ऋषी कपूरला भेटायचा तेव्हा तेव्हा ऋषी कपूर त्याला ‘क्या शायर, कैसे हो शायर’ असं गमतीने शायरच म्हणायचा. शैलेंद्र सिंगने त्याच्यासाठी गायलेलं ते गाणं ऋषी कपूरच्या अंतर्मनात इतकं रूतून बसलं होतं, रुजलं होतं त्याचा तो पुरावा होता.

अलीकडेच म्हणजे सिनेमासृष्टीत नवनवे लोक येऊन त्यांनी रूपेरी पडदा इतका अडवला की ऋषी कपूर वगैरे नावं मागे पडली. या अशाच काळात एका स्टेज शोमध्ये ऋषी कपूर पाहुणा म्हणून गेला. त्या शोमध्ये एक अशीच नवतारका त्याची मुलाखत घेऊ लागली. तिने सहज बोलता बोलता ऋषी कपूरला एक प्रश्न छेडला, ‘ऋषीजी, आज यहाँ आपने इतने सारे गाने सुने, पर आप का पसंदीदा गीत कौन सा बताओगे?’

ऋषी कपूर त्या संध्याकाळी खूप मुडमध्ये होता. त्या मुडमध्ये त्याने त्या नवतारकेला म्हटलं, ‘मेरा पसंदीदा गाना मै आपको ऐसे ही बोल दूं तो उस गाने को दुख होगा…’

ऋषी कपूरच्या त्या अनपेक्षित उत्तराने ती नवतारका चांगलीच हडबडली. ऋषी कपूरशी पुढे काय बोलावं हे तिला सुचेना. ऋषी कपूरने तिच्या चेहर्‍यावरचं ते भलंमोठं प्रश्नचिन्ह ओळखलं…आणि तो तिला म्हणाला, ‘मेरा पसंदीदा गाना मैं आप को गा कर सुना दुं तो बेहतर होगा.’

पुढच्याच क्षणी ऋषी कपूर आपल्या खुर्चीवरून उठला. मागे असलेल्या ऑर्केस्ट्राला उद्देशून म्हणाला, ‘मैं जो मेरा पसंदीदी गाना गाऊंगा उसे प्लिज साथ देना…बाकी कुछ फिक्र मत करना, मैं गाने की पहली पंक्ती शुरू करतेही आप वो गाना पहचान पाओगे.’

…आणि पुढच्याच क्षणी त्याने आपल्या आवडत्या गाण्याची सुरुवात केली त्या गाण्याची पहिली ओळ होती – मै शायर तो नही.

ते गाणं त्याने छान तालासुरात पेश केलं. जमलेल्या पब्लिकने ऋषी कपूर आणि त्याचं ‘मैं शायर तो नही’ डोक्यावर घेतलं.
आज ऋषी कपूरने या जगातून एक्झिट घेतल्यानंतर त्याचा हा किस्सा परवा सहज आठवला…आणि या माणसातल्या जिंदादिलीची जाणीव घट्ट झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -