किसी आसमां पे तो साहिल मिलेगा…

किसी आसमां पे तो साहिल मिलेगा चित्रपटातला नायक आपल्या मनाच्या विदग्ध अवस्थेतून जातोय. त्याच्या आयुष्यात घडलेल्या दु:खद, नकारात्मक घटना, घडामोडींची परिणती म्हणजे हे गाणं. जीवनाला वैतागलेला, पिचलेला नायक खिन्न मनाने आपल्या स्वत:च्या आयुष्यातून दूर अज्ञात ठिकाणी जायला निघाला आहे. त्याला हवा असलेला किनारा कुठल्या तरी आकाशात गवसेल अशी आशा लावून तो त्या दिशेने जात आहे. जिथं आकाश नि धरतीचं मिलन होताना दिसतं अशा क्षितिजावर पोहचण्याची त्याची धडपड आहे. त्याच ठिकाणी आणि तिथंच त्याचं मन धाव घेत आहे.

निर्माते महिपतराय शाह आणि दिग्दर्शक नरेंद्र सुरी यांचा ‘पूर्णिमा’ हा चित्रपट १९६५ मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये मीना कुमारी, धर्मेंद्र, मेहमूद, अनिता गुहा, नसीर हुसेन व दुर्गा खोटे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यात अजब खेल किस्मत का… (मोहम्मद रफी), गोरी नैन तुम्हारे क्या कहने… (मुकेश), हमसफर मेरे हमसफर… (लता-मुकेश), लोरी सुना सुना के… (मेहमूद ), ओ इस देश के राखवालो… (लता), फुफाजी जरा सच सच कहो… (कमल बारोट, कृष्णा कल्ले, मेहमूद), राधा तोरे कान्हा ने मुरली बजाई… (सुमन कल्याणपूर) आणि तुम्हे जिंदगी के उजाले मुबारक… (मुकेश) अशी गाणी होती. यापैकी हमसफर मेरे हमसफर… आणि तुम्हे जिंदगी के उजाले… ही दोन गाणी गुलजार यांच्या लेखणीतून उतरली असून उर्वरित गाणी भरत व्यास, गुलशन बावरा व प्रकाश मेहरा यांनी लिहिली आहेत. या चित्रपटाला संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी यांनी संगीतबद्ध केलं आहे. लता-मुकेश यांच्या लोकप्रिय युगल गीतांमध्ये ‘हमसफर मेरे हमसफर’ या गाण्याचा समावेश होतो. तुम्हे ‘जिंदगी के उजाले’ हे गाणं मात्र फारसं लोकप्रिय झालं नाही. याच गाण्यावर एक नजर…

तुम्हे जिंदगी के उजाले मुबारक, अंधेरे हमे आज रास आ गए है
तुम्हे पा के हम खुद से दूर हो गए थे, तुम्हे छोड कर अपने पास आ गए है

तुम्हारी वफा से शिकायत नही है, निभाना तो कोई रवायत नही है
जहां तक कदम आ सके आ गए है, अंधेरे हमे आज रास आ गए है
चमन से चले है ये इल्जाम लेकर, बहुत जी लिए हम तेरा नाम लेकर
मुरादो की मंजिल से दूर आ गए है, अंधेरे हमे रास आ गए है…

शब्दाच्या दृष्टीने हे गाणं तसं फार वैशिष्ट्यपूर्ण नाही. हिंदी चित्रपटात आढळून येणारी चिरपरिचित प्रेमभंगाची भावना यात अभिव्यक्त झालेली आहे. प्रेमभंगासाठी आपल्या प्रेयसीला सर्वस्वी जबाबदार धरणार्‍या नायकाची मनोवस्था गुलजारने साध्या, सहज नि सोप्या शब्दांत सांगितली आहे. चित्रपटाच्या कथानकाची मागणी पूर्ण करणारी ही रचना आहे, असं म्हणता येईल. गायक मुकेशला गुलजारची गाणी गायची फारशी संधी मिळाली नाही. या चित्रपटातली दोन गाणी आणि ‘आनंद’ मधलं ‘मैने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने…’ हे लोकप्रिय सोलो गीत अशी मुकेश-गुलजार यांची मोजकीच गाणी सांगता येतात.

या चित्रपटानंतर तब्बल १५ वर्षांनी म्हणजे १९८० मध्ये गुलजार-कल्याणजी आनंदजी यांनी एकत्र काम केलं. निर्माते व दिग्दर्शक अमीन चौधरी यांच्या ‘कशिश’ या चित्रपटासाठी. यात विनोद मेहरा, रीना रॉय आणि नवीन निश्चल हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. यामध्ये साथिया रे… (किशोरकुमार, सुमन कल्याणपूर), किसी आसमान पे… (मोहम्मद रफी), परदेस में जा के… (आशा भोसले) ही गाणी होती. यापैकी दोन गाणी गीतकार अंजान यांनी, तर एक गाणं गुलजार यांनी लिहिलं आहे. याच गाण्यावर हा एक दृष्टिक्षेप…

किसी आसमां पे तो साहिल मिलेगा
मै लाने वही आसमां जा राहा हूँ
जहां पे जमीं आसमां छू रही है
वहीं जा रहा हू, वहां जा रहा हूँ

कई बार देखी है सिंदूरी शामे
उफक से परे जगमगाती हुई
कई बार खामोशियों में सुना है
गुजरती है मुझको बुलाती हुई
जहाँ पे मिले वो जहाँ जा रहा हूँ

बहुत बार सोचा ये सिंदूरी रोगन
जहाँ पे खडा हू वही पे बिछा दू
ये सूरज के जर्रे जमीं पे मिले तो
एक और आसमां मै जमीं पे बिछा दू
जहाँ पे मिले वो जहाँ जा रहा हूं
मै लाने वही आसमां जा रहा हूँ…

चित्रपटातला नायक आपल्या मनाच्या विदग्ध अवस्थेतून जातोय. त्याच्या आयुष्यात घडलेल्या दु:खद, नकारात्मक घटना, घडामोडींची परिणती म्हणजे हे गाणं. जीवनाला वैतागलेला, पिचलेला नायक खिन्न मनाने आपल्या स्वत:च्या आयुष्यातून दूर अज्ञात ठिकाणी जायला निघाला आहे. त्याला हवा असलेला किनारा कुठल्या तरी आकाशात गवसेल अशी आशा लावून तो त्या दिशेने जात आहे. जिथं आकाश नि धरतीचं मिलन होताना दिसतं अशा क्षितिजावर पोहचण्याची त्याची धडपड आहे. त्याच ठिकाणी आणि तिथंच त्याचं मन धाव घेत आहे. क्षितिजापासून लांब अंतरावरच्या तांबूस संध्याकाळी कित्येकदा त्याने पाहिल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत.

अनेकदा तर त्याला सभोवताली नीरव शांतता असतानाही एक निराळे गुंजन ऐकायला आलं आहे. जणू काय ही सामसूम जाता जाता त्याला निमंत्रण देऊन पुढे जातेय असा भास होतोय. जिथं तिची नि त्याची गाठ पडेल तिथं त्याला जायचं आहे. खूपदा त्याच्या मनात असा विचार आला की हे नजरेस पडणारे तांबूस मिश्रण तो जिथं उभा आहे त्याच ठिकाणी त्याला अंथरावंसं वाटतं. सूर्यकिरणांचे कण गवसलेत तर अजून एका आकाशाचं आच्छादन त्याला जमिनीवर घालयचंय. हे सगळं जिथं त्याला मिळू शकेल अशा ठिकाणी तो जात आहे. असं आकाश घेऊन यायला त्याचं मार्गक्रमण सुरू झालेलं आहे.

अभिनेता नवीन निश्चल यांच्यावर चित्रित झालेलं हे अर्थपूर्ण गाणं आवाजाचा बादशहा मोहम्मद रफीने अतिशय समरस होऊन गायलं आहे. त्या काळात आघाडीचे संगीतकार असलेल्या कल्याणजी-आनंदजी या दोन भावांच्या संगीतकार जोडीला गुलजार यांच्या गाण्यांना संगीत देण्याची अजून संधी मिळायला हवी होती असं वाटतं. या जोडीने आनंद बक्षी, गुलशन बावरा, अंजान, इंदीव अशा सर्वच प्रमुख गीतकारांच्या रचना संगीतबद्ध केल्या, मात्र गीतकार इंदीवर यांच्यासमवेत त्यांची विशेष जोडी जमली. त्यांनी अनेक भावमधुर गाणी श्रोत्यांना दिली आहेत. रफीलादेखील गुलजारची फारशी गाणी गायची संधी मिळाली नाही. ‘मौसम’ चित्रपटातलं ‘छडी रे छडी कैसे गले में पडी…’ हे मदन मोहनने संगीत दिलेलं लतासोबतचं युगल गीत रफी गुलजार यांचं एकमेव लोकप्रिय गाणं सांगता येतं. गुलजार-कल्याणजी आनंदजी यांची एक उल्लेखनीय रचना म्हणून या गाण्याकडे पाहता येईल.

–प्रवीण घोडेस्वार