घरफिचर्ससारांशप्रेमानुभूती !

प्रेमानुभूती !

Subscribe

प्रेम ही एक शक्ती आहे, अनुभूती आहे. ते सर्वांनाच मिळते असे नाही. प्रेम मिळायला पहिले प्रेम म्हणजे काय हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. ज्याला प्रेमाचा खरा अर्थ कळला तोच खरं प्रेम करू शकतो, मिळवू शकतो. प्रेम म्हणजे एक प्रकारची भक्तीच आहे. फक्त प्रेमाला वासनेचा अलवार स्पर्श आहे एवढंच. प्रेम म्हणजे अपरिपक्व भक्ती आणि भक्ती म्हणजे परिपक्व प्रेम. त्यामुळे उगाच प्रेमाची आणि पैशांची तुलना करून प्रेमाला लांछन लावणं योग्य नाही.

प्रेम आणि पैसा..!
कुणी तरी सांगाल का हे प्रेम म्हणजे नक्की काय असतं?
कशाला म्हणतात प्रेम?
कोणाची तरी सतत आठवण येणं हे प्रेम असतं?
दिवसरात्र तिचा विचार करणं हे प्रेम असतं?
येणार नाही माहीत असूनही तिच्या फोनची वाट पाहणं हे प्रेम असतं?
कीती नाही म्हणून गर्दीतही एकाकी वाटणं हे प्रेम असतं?
फेसबुकवर सारखं तिच्या प्रोफाईलला भेट करणं.
तिचा नंबर डायल करून रिंग वाजण्याआधी फोन कट करणं याला प्रेम म्हणतात?
मी बोलणारच नाही तिच्याशी ठरवूनही
फोन नाही तर नाही पण कमीत कमी एक मिस कॉलची अपेक्षा करणं याला प्रेम म्हणतात?
की तिला गरज नाही तर मी तरी का भाव देऊ असं म्हणूनही
तिच्या एका सॉरीने क्षणात विरघळून जाणं याला प्रेम म्हणतात?
तिच्या एका नजरेसाठी व्याकुळ होणं याला प्रेम म्हणतात?
तिच्यासाठी वाटणार्‍या काळजीला प्रेम म्हणतात?
की त्या खास मैत्रीला प्रेम म्हणतात?
तिच्या जगात आपलं स्थान नाही माहीत असूनही
तिच्या बरोबर स्वप्न रंगवून याला प्रेम म्हणतात?
स्वतःलाही नकळत तिच्यात गुंतत जाणं याला प्रेम म्हणतात?
सात जन्माची सोबत देण्याचे प्रॉमिस करून सात महिन्यांत सोडून जाणं याला प्रेम म्हणतात?
की तिच्या सर्व चुका विसरून तिला माफ करणं याला प्रेम म्हणतात? बिलकुल नाही.
प्रेम करणं खूप सोपं आहे. काय लागतं प्रेम करायला? एकदा आय लव्ह यू बोललं की झालं!
मी तुला आयुष्यात कधीच सोडून जाणार नाही हे प्रॉमिस करायला किती सोपं आहे, पण जेव्हा ते खरं करून दाखवायची वेळ येते तेव्हा मग अचानक विसर पडतो त्या सर्व वचनांचा.

वचन देण्यासाठी काय लागतं हो? काही दिवसांनी तर हा पण विसर पडायला लागतो की कधीतरी कोणाला तरी काही तरी वचन दिलं होतं. मला आजपर्यंत हे समजलंच नाही की जुनी नाती तुटली म्हणून काही नवीन नाती जोडायची आणि पुन्हा जुने लोकं भेटले की नवीन नाती तोडायची. या जोडाजोडी आणि तोडातोडीच्या खेळात कोणाचा तरी जीव जात असतो याचं कोणाला काहीच घेणं देणं राहिलेलं नसतं.

- Advertisement -

सध्या प्रेमाबाबत बोलताना लगेचच प्रेमाची तुलना पैशांशी केली जाते. खरंच किती विचित्र आहे ना हे. प्रेम आणि त्यासोबत पैसा ही अशी गंमत आहे की सर्वांना हवीहवीशी वाटते. पैसा आणि प्रेम मिळण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. म्हणजे त्यासाठी कोणाचा जीवही घेतील किंवा कोणाला जीव लावतील. अनेक जण या दोघांची तुलना करूनच निर्णय घेतात. लग्नाच्या बाबतीत तर हे सर्रास घडतंच, मात्र जरा बारकाईने विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल, ती अशी की तुलना ही दोन समान गोष्टींबद्दल केली जाते. उदा. दोन वेगवेगळ्या कंपनीचे परंतु सारखे फिचर्स असलेले मोबाईल, दोन वेगवेगळ्या कंपनीची एकसारखीच वाहने, अथवा सिमेंट रोड आणि डांबरी रोड इत्यादी, पण जर प्रेम आणि पैशांची तुलना होत असेल तर हा महाविनोदीच असेल. याचं कारणही एकदम सरळ आहे.

प्रेम ही एक भावना आहे आणि पैसा हे एक साधन आहे. प्रेम हे दिसत नाही तर अनुभवता येतं, मात्र पैसा हा दिसतो, तो अनुभवता येत नाही. प्रेमाने आपण माणसे जोडू शकतो. नाते टिकवून ठेवू शकतो, परंतु पैशांनी नाते विकत घेऊ शकत नाही. तरी या युगात पैशाला एवढे महत्त्व का दिले जाते हे मला अजून समजले नाही. प्रेमाचं वास्तव्य खोल अंतर्मनात आहे, परंतु पैसा हा बाह्य जगताची देण आहे. त्याचे अस्तित्व केवळ बाह्य जगतातच आहे.

- Advertisement -

प्रेम हे वाटल्याने (व्यक्त केल्याने) कमी होत नाही, मात्र पैसा वाटल्याने कमी होतो. अशा अनेक परस्परविरोधी गोष्टी या दोघांबद्दल समोर येतात. त्यामुळे या दोघांची तुलनाच मुळी व्यर्थ आहे आणि विशेष म्हणजे प्रेम हे नातेसंबंधांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. कारण नातीच मुळी प्रेमावर आधारलेली आहेत. प्रेम हे आई आपल्या मुलावर, बहीण आपल्या भावावर आणि एक प्रियकर त्याच्या प्रेयसीवर करत असतो आणि ते टिकवून ठेवण्याचे प्रयत्नही करत असतो. लग्न म्हणजेसुद्धा एकप्रकारे मुला-मुलीला पती-पत्नी या नात्यात बांधण्याचा विधी आहे. मग या नात्याबद्दल जर विचार करताना आपण प्रेमाला दुय्यम स्थान देऊन कसं चालेल.

तसं बघायला गेलं तर पैसा आणि प्रेम यामध्ये तर खूप मोठा फरक आहे. असा बोलायला गेलं तर प्रेमाचे दुष्परिणामसुद्धा आहेत. प्रेम ही अशी गोष्ट आहे की ज्याने काही लोक दुसर्‍या व्यक्तीच्या भावनेशी खेळतात. म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या मनाची व प्रेमाची किंमत ठेवत नाही. काही झालं तर मागचा पुढचा विचार न करता एका क्षणामध्ये नाते तोडून टाकतात. नाते तोडणे एवढे सोपे आहे का? हे बघत नाही की त्या व्यक्तीने आपल्यासाठी काय केलं आहे, आपल्यावर किती प्रेम केलं आहे. तेव्हा त्याच्या मनाचा, त्याच्या भावनांचा आपण विचार करत नाही. तेव्हा आपण फक्त आपला विचार करतो.

आपण प्रेमाने नाते जसे जोडू शकतो तसे तोडूही शकतो. म्हणजे एक शब्दही त्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. आपल्या आयुष्यात माझा मते तरी जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही. या जगात एवढे श्रीमंत कोणी नाही की जो स्वःतचे बालपण किंवा तरुणपण विकत घेऊ शकतो, पण प्रेम मित्र रूपात, प्रेयसी रूपात, प्रियकर रूपात, आई रूपात, बहीण रूपात, वडील रूपात, भावा रूपात या गोष्टी तुम्हाला देऊ शकते, तेही विनामूल्य.

प्रेम ही एक शक्ती आहे, अनुभूती आहे. ते सर्वांनाच मिळते असे नाही. प्रेम मिळायला पहिले प्रेम म्हणजे काय हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. ज्याला प्रेमाचा खरा अर्थ कळला तोच खरं प्रेम करू शकतो, मिळवू शकतो. प्रेम म्हणजे एक प्रकारची भक्तीच आहे. फक्त प्रेमाला वासनेचा अलवार स्पर्श आहे एवढंच. प्रेम म्हणजे अपरिपक्व भक्ती आणि भक्ती म्हणजे परिपक्व प्रेम. त्यामुळे उगाच प्रेमाची आणि पैशांची तुलना करून प्रेमाला लांछन लावणं योग्य नाही.

एका नात्यातून बाहेर पडण्यापूर्वी आपण एकत्र का आलो, नात्याचा पाया काय आहे, त्यामागे काय विचार आणि नैतिक आधार होता याचा विचार जरूर व्हावा. नात्यातून बाहेर पडण्याआधी या नात्याने आपल्याला काय दिले आणि आपण त्या नात्याला काय दिले याचा विचार करणे आवश्यक आहे. ओढून-ताणून, रडत-कढत चालू ठेवलेल्या नात्यातून स्वतःला, जोडीदाराला आणि संबंधित लोकांना त्रास आणि त्रासच होत असतो.

–संकेत शिंदे 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -