घरफिचर्ससारांशमानवी भाव जीवनाचा कलात्मक कोलाज!

मानवी भाव जीवनाचा कलात्मक कोलाज!

Subscribe

कलावंत हा समाजातील एक संवेदनशील घटक आहे. तो समाजात वावरत असताना आपल्या परिसरातील घटनांचे चित्रण त्याच्या कलाकृतीतून घडवत असतो. दुःख, यातना, आक्रोश, हर्ष अशा विविध संवेदनांतून व्यक्त होताना रंग, रेषाच्या आकार आशयातून विषयाला मूर्त-अमूर्त रूप देऊन ती कलाकृती प्रेक्षकांसमोर मांडतो. सामाजिक घडामोडी त्याला नेहमी अस्वस्थ करतात. ते कॅनव्हास, कागद, रंग, शाई व इतर माध्यमे, मुक्ताविष्कारातून पाहावयास मिळते. तो विषयांची व्याप्ती कॅनव्हासच्या चौकटीत अलगद बसवितो. कालांतराने विषय माध्यमात नवनवीन प्रयोगाने बदलते रूप घेऊन स्वत:ची वेगळी शैली विकसित करतो. त्यातून आपल्या कला जीवनाचे पैलू तो शोधतो. ही चित्रनिर्मिती एका सृजन दृष्टीतून होते. सुप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील जितेंद्र साळुंके, विरेंद्र सोनवणे, धनराज पाटील, लक्ष्मीकांत सोनवणे या युवा चित्रकारांचे चित्र प्रदर्शन ४ ते १० डिसेंबर या कालावधीत भरविण्यात येत आहे. त्यानिमित्ताने...

-निरंजन सोनवणे

कष्टकरी माणसांचं जगणं कॅनव्हासवर
जितेंद्र साळुंके यांची चित्रे सामाजिक आशयाची आहेत. सभोवताली घडणार्‍या घटना जेव्हा मानवी मनाला सुन्न करतात तेव्हा त्या घटनांविषयीची प्रतिक्रिया व्यक्त होत असताना माध्यमांची आवश्यकता असते. तसा चित्रकारही आपल्या भावना चित्रांद्वारे व्यक्त करतो. समाजातील अन्याय-अत्याचार, दारिद्य्रता, अस्वस्थता, व्यवस्थेने पिंजर्‍यात अडकून पडलेली, गावकुसाबाहेर निपचित पडलेली, चेहरा हरवलेली, नेहमीच संघर्षाचं जगणं वाट्याला आलेल्या, अशा माणसांची चित्रणे कागद, कॅनव्हासवर सृजन रूपात मांडतात.

- Advertisement -

जगताना नेहमीच भाकरी मिळविण्यासाठीचा संघर्ष अटळ आहे. त्यासाठी परिस्थितीशी झगडत तो आपला हक्क मिळविण्यासाठी मोर्चा, उपोषण, आंदोलने, संघर्ष करीत जगतो. त्यांच्या चित्रांत लोकल ट्रेनमधील जीवघेणी गर्दी, फुटपाथवरील जगणं अशा विषयांची चित्र मालिका बघावयास मिळते. त्यांच्या लोकल ट्रेन या चित्रामधील जीवघेण्या गर्दीचे चित्रण काळ्या शाईतून पेपरवर रेखाटलेले आहे. या चित्रात लोकल ट्रेनच्या दरवाज्यात माणसांची दाटलेली गर्दी, त्यांचे दाबलेले श्वासउच्छवास, त्यातील काही मानवाकृती ह्या विरुपीकरण केलेल्या साकारलेल्या आहेत.

त्यांच्या चित्रांतील गर्दीतील माणसे चेहरा हरवलेली, काही जगण्याची उमेद हरवून बसलेली, तर काही आशावादी जगणं जगणारी असं संघर्षाचं चित्रण येथे परिणामकारकतेने बघावयास मिळते. साळुंके यांच्या चित्रात दुःख, कारुण्य, व्यथा, वेदना, केविलवाण्या नजरा, आक्रोश, कोलाहल, भयावह शांतता, निरागसता, विचलता, विफलता आणि हतबलता अशा विविध तीव्र संवेदना आल्या आहेत. ती रसिकांना विचार करायला भाग पाडते. जगण्यातील विषमता टिंब, तुटक रेषांतून सुन्न करून सोडते.

- Advertisement -

जितेंद्र साळुंके यांची आतापर्यंत असंख्य सृजनशील रेखाटने हंस, मौज, अनुष्टुभ, कवितारती, वाघूर इ. मराठीसह इतर भाषांतील नियतकालिकांतून प्रकाशित झाली आहेत. तसेच नामवंत लेखक-कवींच्या पुस्तकांच्या मुखपृष्ठांनी आणि रेखाटनांनी सजली आहेत. त्यांची मुंबई, पुणे, जळगाव येथे चित्र प्रदर्शने झाली आहेत.

निसर्ग घटकांची आशयसंपन्न चित्रं
निसर्गातील प्राणी, पक्षी, झाडे, वेली यांची जीवनशैली काहीशी माणसांच्या जीवन जगण्याच्या शैलीशी निगडित असल्याने प्राणी, पक्षी यांच्यातील हिंसकता, भित्रेपणा, लढाऊवृती या स्वभाववृती माणसांच्या जगण्यातील तसं वागण्याच्या समान आहेत. माणूस जगताना आतला अन् बाहेरचा मुखवटा घालून वावरतो. हेच विरेंद्र सोनवणे यांनी माणसांच्या याच वृत्तीचा आशय घेऊन पक्षी, वेली, फुलं या घटक मांडणीतून चित्रे साकारलेली आहेत. वंश वृद्धीसाठीचा नरांचा संघर्ष, आईचे मुलावरील प्रेम, जीवनाला कंटाळून यातनांच्या अंधार गुहेत हरवलेली माणसं तसेच माणसा-माणसातील ओढाताण, हिंसाचार, प्रेम अशा विषयांची मांडणी करीत असताना पक्षी हा प्रतीक म्हणून वापरला आहे.

आपल्या वाट्याला आलेलं वेदनादायी जगणं अशाच वेगळ्या विषयांना अनुसरून काळ्या शाईतील चित्र रेखाटलेली आहेत. कॅनव्हास चित्र माध्यमातून उजळ रंगांनी यांसारख्या सामान्य जीवनावरची रेषांतून आशयघन चित्र चितारली आहेत. माणसांनी माणसाशी प्रेमाने वागावे. विफलता, नैराश्य, दुःख यांना जगताना थारा न देता आनंदमयी जीवनाचा मार्ग सुकर करावा अशा भावनांना स्थान देऊन जीवन व्यतीत करावे. प्राणी ज्याप्रमाणे वागतात, जगतात तसे माणसंही जगतात. त्यांची जगण्यासाठीची धडपड, संघर्ष असे विषय सोनवणे यांच्या चित्रांचे आहेत. त्यांची मुंबई, ठाणे इ. ठिकाणी चित्र प्रदर्शने झालेली आहेत.

धनराज पाटील यांची चित्रं
निसर्गाशी मानवाचे नाते अतूट आहे. निसर्गातील गर्द हिरवी झाडी मानवी मनाला आल्हाददायक स्पर्श करते. निसर्गातील पाने, फुले, डोंगर, नद्या, नागमोडी पायवाट, डोंगराच्या कडा-कपारी, उंचावरून वाहणारा धबधबा, झाडाझुडपात डोंगरात हरवलेला वळणा वळणाचा घाटरस्ता, झाडांची अवाढव्य मुळं मातीत नात्यासारखी घट्ट रूतलेली या सार्‍या गोष्टी माणसाला आकर्षित करतात. या नैसर्गिक घटकांचा वापर करून चित्रे साकारलेली आहेत. त्यांच्या एका चित्रात सुकलेल्या, जीर्ण झालेल्या पानांचे तुकडे, त्यांच्या शिरांच्या बारकाव्यातील सूक्ष्मता मनाला विचाराधीन करते.

चित्रातील चौकटीतून आत बाहेर येणारे पानांतील आकार, पांढर्‍या, लाल रंगातील पिंपळपाने आकर्षित करतात. पिवळ्या, काळ्या, लाल रंगातील पार्श्वभूमीवरील आहेत. कापसाच्या बोंडासारखे झाडांचे आकार, पायथ्यापासून उगवत जाणारी बांबूच्या आकारासारखी उंच झाडांची चित्रे आकर्षक आहेत. चित्रात वास्तव रूप काही प्रमाणात जाणवते. बहुतेक चित्रात पाने, झाडे या घटकांना आत बाहेर नेणारी चौकट ही पांढर्‍या रंगातील आहे. त्यांच्या चित्रात अतिशय सूक्ष्म बारकावे, टेक्चरचा वापर सर्वदूर केलेला बघावयास मिळतो.

प्रज्ञा-शील-करुणेचा संदेश देणार्‍या बोधीसत्त्वाच्या बोधी वृक्षाचे पिंपळपान त्यांच्या एका चित्राचा विषय बनून येते. एका चित्रात गर्भाशयातल्या अर्भक आणि त्याच्याभोवती असलेली नाळ जीवन रस पुरवत जगण्यातली गुंतागुंत आणि जटिलता प्रकट करते. अशी काही विषयानुरूप चित्रे त्यांनी रेखाटली आहेत. त्यांच्या चित्रांत रेषेची विविधता दिसते. यासह ती आपल्याशी संवाद साधतेय की काय असा भास उत्पन्न करते. धनराज पाटील यांची मुंबई, पुणे, जळगाव या शहरात चित्र प्रदर्शने झाली असून आजवर त्यांचा कला प्रवास अखंड सुरू आहे.

लक्ष्मीकांत सोनवणे यांची चित्रं
मनुष्य जीवन जगत असताना सुख, दुःख, आनंद, वेदना अशा संवेदना उराशी बाळगून आणि यातनांचे असंख्य मोहोळ कवेत घेऊन जगतो. या संवेदनांतून मनुष्य अस्वस्थ जगणं स्वीकारतो. भवतालातील घटना अस्वस्थ करतात. स्त्री यातना, तिचे बंदिस्त जगणं, तिच्या इच्छा-आकांक्षांचे दमण, तिचं पुरुषातल्या रानवट नजरेतून सावरत जगणं तसेच आनंद, हर्ष अशा संवेदना त्या मनाला आल्हाददायक स्पर्श करतात. यातून समाधान व्यक्त करतो. निसर्गातील विविध घटक त्याला मोहित करतात.

सोनवणे यांची चित्रे ग्रामीण भागातील पाड्यावरील दारिद्य्राने कण्हत जगणार्‍या माणसांच्या जगण्याच्या व्यथा प्रतीत करणारी वाटतात. चित्रकार हा मुळात ग्रामीण परिसरातील असल्याने तेथील जीवन त्याने अनुभवले, जगले आहे. तेथील कष्टमय जीवन अगदी जवळून अनुभवले आहे. भुकेने व्याकूळ असलेले कुटुंब, दारिद्य्र, संघर्ष, जीवनाचा अर्थ यांसह असंख्य विषय सोनवणे यांच्या चित्रांत आहेत. विषय आणि माध्यमांतून विषयाची परिणामकारकता आणि प्रेक्षकांच्या मनात वेदनेची असंख्य वादळे निर्माण करतात. लक्ष्मीकांत सोनवणे यांची चित्रे कॅनव्हासवरील सामाजिक आहेत. चित्रांत लाल, पिवळसर, केसरी रंगांचा वापर अधिक दिसतो. पेपरवरची काळ्या शाईतील रेखाटने अमाप वेदनेतून समाजातील विषयांवर आघात करतात.

पेन इंक माध्यमातून चित्रात मांडत असलेला विषय अधिक गडदपणे मांडतात. सोनवणे यांची मुंबई, दोंडाईचा, सेंधवा इ. ठिकाणी चित्र प्रदर्शने झालेली आहेत. राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील कला प्रदर्शनात त्यांनी सहभाग घेतलेला आहे. सोनवणे यांना शंभराहून अधिक विविध संस्थांनी उपक्रमशील कलाशिक्षक म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. हे चारही चित्रकार ग्रामीण जीवन अनुभवलेले कलाशिक्षक असून त्यांच्या चित्र रेखाटनांच्या सादरीकरणात विविधता आहे, मात्र सामाजिक आशय एकजिनशीच आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -