घरफिचर्ससारांशबिझनेस प्लॅन नसेल, तर व्यवसाय बुडेल!

बिझनेस प्लॅन नसेल, तर व्यवसाय बुडेल!

Subscribe

जे लोक नवीन व्यवसाय सुरू करतात त्यांच्यासाठी बिझनेस प्लॅन फार महत्त्वाचा आहे. कारण बिझनेस प्लॅन बघूनच बँक तुम्हाला कर्ज देते, तुम्हाला जर व्यवसायासाठी पार्टनर हवा असेल तर तो मिळतो. तुमच्या व्यवसायासाठी सुरुवातीची जी गुंतवणूक लागते ती मिळण्यासाठी बिझनेस प्लॅन फार महत्त्वाचा आहे. अनेक नवउद्योजकांना बिझनेस प्लॅनमध्ये काय माहिती हवी याची कल्पना नसते. बरेच नवउद्योजक प्रोजेक्ट रिपोर्टलाच बिझनेस प्लॅन असे म्हणतात, परंतु प्रोजेक्ट रिपोर्ट आणि बिझनेस प्लॅन यामध्ये फरक आहे.

-राम डावरे

अनेक तरुणांना असे वाटते की, मला तर छोटासा व्यवसाय करायचा आहे मग मला बिझनेस प्लॅनची काय गरज आहे. व्यवसाय सुरू करण्याचा जोश आणि उत्साह एवढा असतो की आधी व्यवसाय सुरू करतात आणि बिझनेस प्लॅन बनवायचे राहूनच जाते. बिझनेस मोठा करण्यासाठी त्यामध्ये भांडवल आणावे लागते आणि ते आणण्यासाठी गुंतवणूकदारांना बिझनेस प्लॅन दाखवावा लागतो. यापेक्षाही महत्त्वाचे की हा बिझनेस प्लॅन तुम्हाला एक दिशादर्शक म्हणून काम करत असतो. मला काय मिळवायचं आहे हे जर तुम्ही आधी ठरवलं नाही तर बिझनेसची दिशा हरवून जाते. बिझनेस प्लॅनमध्ये कुठल्या गोष्टी असाव्या याबाबत आज आपण या लेखामध्ये जाणून घेऊया.

- Advertisement -

बिझनेस प्लॅन हा चार डब्ल्यूची (W) उत्तरे देतो का हे पाहणे फार महत्त्वाचे आहे. ते चार डब्ल्यू काय आहेत ते आपण थोडक्यात पाहूया.

१) पहिला जो डब्ल्यू आहे तो म्हणजे व्हाय (Why) : म्हणजे तुम्हाला बिझनेस का सुरू करायचा आहे. अनेकांना व्यवसाय सुरू करायचा असतो, परंतु निश्चित असे काहीही धोरण त्यांच्यासमोर नसते. आपले पालक सांगतात म्हणून, नातेवाईक सांगतात म्हणून किंवा आपल्या मित्राने एखादा व्यवसाय सुरू केला आहे म्हणून मलासुद्धा व्यवसाय सुरू करायचा आहे असे बर्‍याच तरुणांचे असते, परंतु का हा प्रश्न स्वतःला विचारणे हे खूप महत्त्वाचे असते. कारण केवळ पालक, नातेवाईक, मित्र सांगतात म्हणून आपण अमुक अमुक व्यवसाय करावा हे चुकीचे आहे. तुमच्या स्वतःला कशामध्ये आवड आहे, तुमची मानसिकता कशी आहे, तुमची विचार करण्याची पद्धत कशी आहे या सर्वांचा विचार करून बिझनेस का करायचा आहे हे ठरवावे लागते.

- Advertisement -

अनेक नवउद्योजक जेव्हा व्यवसाय सुरू करायचा विचार करतात तेव्हा कुठलेही निश्चित धोरण नसते. माझी मानसिकता बिझनेस किंवा व्यवसाय करण्याची आहे की नाही की मला नोकरीच योग्य असेल, कारण व्यवसाय हा पुढे चालेल की नाही त्यामध्ये अनेक अडचणी आल्यानंतर तुम्ही त्याला कसे तोंड देणार हे सर्व तुमच्या मानसिकतेवर व विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. अमुक एका मित्राने किंवा नातेवाईकांनी व्यवसाय सुरू केला आहे आणि तो बरा चालत आहे म्हणून माझासुद्धा बरा चालेल असे कधी होत नाही. मला व्यवसाय का करायचा आहे याचे सोपे उत्तर म्हणजे मला पैसे मिळवायचे आहेत हे होय, परंतु हे उत्तरसुद्धा फार अवघड आहे. व्यवसायीतील अनेक आव्हानांना सामोरे जाण्याची प्रत्येक व्यक्तीची कार्यक्षमता वेगवेगळी असते.

२) दुसरा जो डब्ल्यू आहे तो म्हणजे व्हॉट (what) : म्हणजे तुम्ही कोणता बिझनेस करणार आहात. मित्रांनो जेव्हा नवउद्योजक स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा ठरवतो, त्यावेळेस त्याच्यापुढे अनेक पर्याय असतात, परंतु नेमका कोणता व्यवसाय निवडायचा हेसुद्धा फार महत्त्वाचे आहे आणि त्या व्यवसायामध्ये काय काय अडचणी येतात हेसुद्धा माहिती असणे जरूरी आहे. बरेच उद्योजक डायरेक्ट सुरुवातीलाच एखाद्या प्रोडक्टची निर्मिती करण्याचा विचार करतात, परंतु त्यांना माझा सल्ला नेहमी असतो की, तुम्ही एखाद्या प्रॉडक्टची निर्मिती किंवा मॅन्युफॅक्चरिंग करायचा विचार करत असाल तर अगोदर त्या प्रॉडक्टमध्ये तुम्ही ट्रेडिंग सुरू करा.

ट्रेडिंग सुरू केल्यानंतर तुम्हाला त्या प्रॉडक्टच्या उत्पादनापासून तर त्याच्या उपभोक्त्यांपर्यंत (ग्राहक) तो कसा पोहचतो या साखळीचा अभ्यास करणे आवश्यक आहे आणि मग तुम्हाला ठरवता येईल की त्याचे उत्पादन करायचे की ट्रेडिंग करायचे. आज ट्रेडिंगमध्ये जे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत त्यांचे स्वतःचे कुठेही मॅन्युफॅक्चर युनिट नाही तरीही ते पैसे कमावत आहेत. अलीकडे असे प्लॅटफॉर्म व्यवसाय उदयास आले आहेत. त्यामुळे कोणता व्यवसाय करायचा हा निर्णय घेताना फार काळजीपूर्वक विचार करणे गरजेचे आहे. आज अनेक नवउद्योजक स्टार्टअपकडे आकर्षित होत आहेत.

एखादे स्टार्टअप सुरू केले म्हणजे त्यात कोट्यवधी रुपये लोक गुंतवणूक करतील असे होत नाही. स्टार्टअपमध्ये नावीन्य, ग्राहकांचे प्रश्न सोडविण्याची नवीन पद्धत, प्रोसेसमधील नावीन्यपूर्ण बदल ह्या सर्व गोष्टी विचारात घेतल्या जातात. तुम्ही जे उत्पादन आणि सेवा विकणार आहात त्या नक्की कुणाला विकणार आहात, तुमचे उत्पादन हे लोकांची गरज आहे की फक्त इच्छा आहे यावरच तो यशस्वी होईल की नाही ते ठरत असते.

३) नंतरचा जो डब्ल्यू आहे तो म्हणजे हू (Who) म्हणजे बिझनेस कोण करणार आहे ः बिझनेस करताना अनेक फर्मचे पर्याय उपलब्ध आहेत. जसे की स्वत:ची प्रोप्रायटरी फर्म, पार्टनरशिप फर्म, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, लिमिटेड कंपनी असे अनेक पर्याय नवउद्योजकांसमोर असतात. त्या फर्ममधून नेमकी कोणती निवड करायची हेही फार महत्त्वाचे असते. एखादा प्रोप्रायटरी फर्म सुरू करत असेल तर त्याला भांडवल गोळा करणे, व्यवसायाच्या कामाची विभागणी करणे यामध्ये अनेक मर्यादा येतात. भागीदारी फर्ममध्येसुद्धा काही फायदे-तोटे आहेत.

प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा लिमिटेड कंपनी या सर्वांचेसुद्धा फायदे-तोटे आहेत. तर या सर्वांचा विचार करून व्यवसाय नक्की कोण करणार आहे, व्यवसायात किती लोक मालक आहेत, त्यांची विचारसरणी कशी आहे, त्यांचे विचार एकमेकांशी जुळतात का, काही मुद्यांवर जर मतभेद असतील तर त्या मतभेदाला सर्वांची मान्यता आहे का, असे अनेक प्रश्न नवीन व्यवसाय सुरू करताना विचारात घेणे आवश्यक आहेत. दुसरे महत्त्वाचे म्हणजे तुमच्यासोबत काम करणारी टीम कशी आहे, त्या टीममध्ये कोण लोक आहेत, त्यांचा अनुभव काय आहे, व्यवसाय हे टीमवर्क आहे.

एकटा माणूस काहीही करू शकत नाही. स्टार्टअप किंवा नवीन व्यवसाय सुरू केल्यानंतर पहिल्या एक-दोन वर्षात बंद का पडतात यावर एक सर्व्हे करण्यात आला आहे. त्या सर्व्हेनुसार काही कारणे निश्चित केली गेली आहेत. त्यानुसार ३२ टक्के कारण हे तुमचे उत्पादन मार्केटमध्ये नावीन्यपूर्ण नसते हे आहे. २२ टक्के कारण तुमच्याकडे मार्केटिंग व्यवस्थित नाही हे आहे. १८ टक्के कारण ही तुमची टीम योग्य नाही हे आहे व १६ टक्के कारण ही तुमच्याकडे पुरेसे भांडवल नाही हे आहे व उरलेली १० टक्के ही इतर कारणे असतात. या सर्वांची उत्तरे तुमच्या बिझनेस प्लॅनमध्ये असावी लागतात.

४) नंतरचा जो डब्ल्यू आहे तो आहे व्हेन (When) : बिझनेस प्लॅनमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या व्यवसायात कोणकोणत्या मार्गाने पैसे येणार आहेत आणि ते केव्हा येणार आहेत. व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला नफा कधी मिळणार आहे. तुम्ही व्यवसाय सुरू केल्यानंतर तुमच्या उत्पन्नातून अनेक खर्च करावे लागतात. लगेचच तुम्हाला त्यात नफा मिळेल असे कधी होत नाही. तुम्हाला एक ना नफा ना तोटा पॉईंट हा अगोदरच काढावा लागतो, त्याला इंग्रजीमध्ये बीईपी असे म्हणतात (ब्रेक इव्हन पॉईंट).

हा पॉईंट म्हणजे ज्या पॉईंटला तुमच्या व्यवसायातून येणारे उत्पन्न आणि त्यासाठी होणारा खर्च हा मिळताजुळता होतो. ह्या पॉईंटनंतरच तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये नफा मिळणार आहे आणि त्या नफ्यातून तुम्हाला सर्व गुंतवणूकदारांचे पैसे जे तुम्ही घेतलेले आहेत त्यावरती परतावा द्यायचा आहे. व्यवसायातील उत्पन्नाचे मार्ग, त्यासाठी लागणारे खर्च याची माहिती देणे आवश्यक आहे. कोणतीही विक्री झाली नाही तरीही असे काही खर्च असतात जे तुम्हाला करावेच लागतात, ते तुम्ही कुठून करणार आहे? येणारे उत्पन्न कसे वाढत जाईल (स्केलिंग) त्या अनुषंगाने खर्च कसे असतील याचा अंदाजसुद्धा बिझनेस प्लॅनमध्ये हवा.

तर मित्रांनो हे जे चार प्रश्न आहेत, त्या चार प्रश्नांची उत्तरे तुमचा बिझनेस प्लॅन देत आहे का हे तो तयार करताना फार महत्त्वाचे आहे. तुम्हाला व्यवसायासाठी कर्ज देणार्‍या फायनान्शियल संस्था किंवा बँका किंवा तुमच्या व्यवसायात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार किंवा तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी शोधत असणारे भागीदार या सर्वांना ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाली तरच तुमच्या व्यवसायात भांडवल येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -