घरफिचर्ससारांशआम्ही बाप माणसं

आम्ही बाप माणसं

Subscribe

मी अगदी नववीत शिकत असताना आईच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली. महिनाभर आई हॉस्पिटलमध्ये होती. मनात नको ते विचार यायचे. भीतीची एक छटा नेहमी बाबांच्या चेहर्‍यावर दिसायची. बाप म्हणून मुलांमध्ये वावरत असताना आईइतकी जवळीक त्याच्या वाट्याला येत नसते. सिंगल पेरेंट म्हणून वावरत असताना जेवढ्या सहजपणे आई मुलांचा सांभाळ करते, तेवढ्या सहजतेने बाबा नाही करत ही गोष्ट मान्य आहे तरी त्या रिक्षावाल्या भाऊसारखे अनेक बाप ह्या समाजात वावरत असतीलच ना !.

तेव्हा मी असेन बारा तेरा वर्षाचा. एका सकाळी बाबा नाईटशिफ्ट संपवून घरी आले. सोबत आणलेली पिशवी त्यांनी माझ्या हातात देत हे घे तुझ्यासाठी असं म्हणत आत कपडे बदलायला गेले. मी पिशवी उघडली त्यात पुस्तक होतं. रणजीत देसाई यांची ‘स्वामी’ कादंबरी. नवं कोरं माझ्या हक्काचं पहिलं क्रमिक पुस्तकाव्यतिरिक्त हे पुस्तकं. त्या पुस्तकाने कुठेतरी अवांतर वाचनाला सुरुवात झाली. बाबा नाईटशिफ्टवरून येताना त्या काळात ठकठक आणि किशोर आणत होते तेदेखील न चुकता. ठकठक पाक्षिक होते आणि किशोर मासिक होते. विक्रोळी स्टेशनच्या बाहेर असलेला पुस्तकविक्रेता बाबा त्या वाटेने जात असले की, त्यांना पुस्तकं आली आहेत असं आवर्जून सांगायचा. वाचनाची आणि मुळात पुस्तक हातात धरण्याची गोडी लावण्यात आणि पुढच्या काळात पांढर्‍यावर काळ करण्यात ह्या गोष्टी कारणीभूत झाल्या. बाबांनी दिलेली ही देणगी आयुष्यात या ना त्या कारणाने उपयोगी पडली.

आज पुस्तकाच्या दुनियेत वावरताना त्या गोष्टी राहून राहून आठवतात. ‘स्वामी’ ह्या कादंबरीने वाचनप्रवास सुरू झाला. आणि पुढे वाचत गेलो पण नव्याची नव्हाळी संपली नाही याला कारण बाबाच होते. सांस्कृतिक वारसा हा असा विस्तारत असतो. हा वारसा तसा कोणी विचारात घेत नाही. परंतु माझ्या बाबतीत तो घडला. आणि बाबांनी मला वाचू आनंदे केलं.

- Advertisement -

आता बहुतेक दहा वर्ष उलटून गेली असतील या घटनेला. तेव्हा मी ठाण्याच्या राबोडी विभागात शिक्षक म्हणून काम करत होतो. कुठल्यातरी कारणाने तीन दिवसाची जोडून सुट्टी आली होती म्हणून मी कॉलेज संपल्यावर त्यादिवशी रात्री गावी जाण्यासाठी निघणार होतो. कॉलेजमधील कामं संध्याकाळी आटोपली. आता गावी निघण्याचे वेध लागले होते. तेव्हा मोठी मुलगी-श्रेया तीन वर्षाची होती. संध्याकाळी लवकर घरी पोचून तिच्याबरोबर थोडा जास्तीचा वेळ घालवता यावा म्हणून मी कॉलेजवरून थेट रिक्षा करून घरी यायचे ठरवले. कॉलेजच्या बाहेर एक रिक्षा उभी होती. त्याला थेट ऐरोली येणार का विचारलं तर त्याने कळव्यापर्यंत सोडतो म्हणून सांगितलं. एवढे नसे थोडके हा विचार करून कळव्यापर्यंत आलो. कळव्याला येऊन तिथे उभे असलेल्या एका रिक्षावाल्याला ऐरोलीला येणार का म्हणून विचारले तेव्हा त्याने लगेच बसा बसा करून मला रिक्षात घेतले आणि रिक्षा जी दामटली की विचारू नका. रिक्षात बसताना लवकर जायचे आहे असं मी त्याला म्हटलं होतं, पण ती गोष्ट याने इतकी मनावर घेतली की, आपण उगाच याला तसं सांगितलं असं वाटू लागलं.

विटावा कधी आलं हे मला कळलेच नाही. मुकुंद कंपनीच्या इथे रिक्षा आली आणि जोरात खड्ड्यात आपटली, त्याबरोबर मी रिक्षावाल्यांना म्हणालो, अहो भाऊ जरा हळू चालवा. मला घरी जायचे आहे. त्यावर सायेब, तुमच्यापेक्षा मला घाय झाली हाय. ते काय म्हणतात, हे मला कळले नाही. कसं ती चालव आणि मला सुखरूप घरी पोचव म्हणजे झालं. रिक्षा ऐरोली स्टेशनच्या जवळ आली आणि सायेब, मला भाड्याचे पैशे देता का? घरी काय सामान हवं हाय ते मी घीतो…. ह्या शाळेच्या माग माझी खोली हाय. तिकडे देतो नी लगेच येतू. तुमी रिक्षात बसून र्‍हावा. मला त्यात काही वावगं वाटलं नाही. मी लगेच खिशातून पैसे काढून त्या रिक्षावाल्या भाऊंना दिले. मी रिक्षात बसून राहिलो. मी बघत होतो की, हे भाऊ नक्की कुठं जातात, बघितलं तर ते जवळच्या किराणामालाच्या दुकानात गेले. काही दोन वस्तू घेतल्या आणि शाळेच्या मागच्या गल्लीत गेले.

- Advertisement -

मी इकडे रिक्षात बसून राहिलो. जवळपास दहा मिनिटे निघून गेली. एवढ्यात चालत जाऊन घरी पोचलो असतो. एवढी रिक्षा करून आलो कशाला? तर घरी लवकर जायला मिळावं म्हणून. पण ह्या माणसामुळे मला उशीर होतोय. वेळ निघून चालला. लगेच येतो म्हणून गेला पण अजून पत्ता नाही या माणसाचा. दुसर्‍याक्षणी वाटलं. भाड्याचे पैसे दिलेत तर वाट कशाला बघायची. निघून जाऊया. दुसरी रिक्षा बघू. त्यात काय एवढे. असा विचार करून खाली उतरणार एवढ्यात हे साहेब गेलेल्या गल्लीतून बाहेर आले. माझ्या चेहर्‍यावर राग बघून स्वारी हा सायेब, मला जरा उशीर झाला.

….मी आता उतरून दुसरी रिक्षा पकडून घरी जाणार होतो. काय हे किती उशीर ?

काय हाय ना सायेब. मी इथल्या एमआयडीसीत काम करतो. महिन्याचा पगार संपून गेला. घरात अन्नाचा दाणा नव्हता. दोन साला पूर्वी बायको मलेरिया होऊन गेली. घरात दोन पोरी हायत. एक चौदा वर्साची आणि बारकी धा वर्साची. शेवटी आज शुक्रवार. कामाला सुट्टी म्हणून सकाळी मित्राची रिक्षा चालवायला घेतली. सकाळपासून फूडला आठवडा जाईल एवढं सामान घेण्याएवडा धंदा झाला.आत हित आलू तर थोडं धान्य घेऊन मोठ्या मुलीच्या हातात दिलं. सकाळी फकस्त चा-बटर पोरींच्या पोटात असल. आता मोठी पोरगी शिजवलं आणि न्हानीला वाडल.

हे सगळं ऐकून मला धक्का बसला. रिक्षा आणि माझं डोकं दोन्ही चालत होत्या. रिक्षा रस्त्यावर धावत होती. आणि डोकं हा सगळा प्रकार ऐकून धावत होतं. मी माझ्या घराजवळ उतरलो आणि आईविना लेकरांना संभाळणं कठीण हाय सायेब. असं म्हणत रिक्षा त्यांनी पुढे घेतली आणि परतवून पुन्हा बहुतेक घरी निघाले. रिक्षा समोरून गेली आणि मी त्या रिक्षावाल्या भाऊंनी उच्चारलेल्या शेवटच्या वाक्याचा अर्थ लावीत बसलो. आईविना मुलांना सांभाळणे कठीण आहे तरी भाऊ आज बाप म्हणून तुम्ही त्यांना सांभाळता ना. त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेताना, तुम्ही आईं होताय ना!. घरी येऊन मी हात पाय धुवून मुलीशी खेळत असताना आजचा प्रसंग राहून राहून आठवत होता.

मी अगदी नववीत शिकत असताना आईच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली. महिनाभर आई हॉस्पिटलमध्ये होती. मनात नको ते विचार यायचे. भीतीची एक छटा नेहमी बाबांच्या चेहर्‍यावर दिसायची. बाप म्हणून मुलांमध्ये वावरत असताना आईइतकी जवळीक त्याच्या वाट्याला येत नसते. सिंगल पेरेंट म्हणून वावरत असताना जेवढ्या सहजपणे आई मुलांचा सांभाळ करते. तेवढ्या सहजतेने बाबा नाही करत ही गोष्ट मान्य आहे तरी त्या रिक्षावाल्या भाऊसारखे अनेक बाप ह्या समाजात वावरत असतीलच ना !.

त्यादिवशी मला जयवंत दळवींच्या ‘अधांतरी’ मधल्या सावूच्या वडलांची आणि नवर्‍याची आठवण झाली. एका क्षणी सावू आपल्या नवर्‍याला सोडून जाते आणि काही वर्षानंतर जेव्हा ती पुन्हा आपल्या नवर्‍याला भेटायला येते तेव्हा ती बघते तर तिचा मुलगा मोठा झालेला असतो. उच्चभ्रू झालेली सावू जेव्हा मुलाला आपल्याकडे बोलावते तेव्हा तो साफ नाकारतो. बाप आणि आई ह्या दोन्ही भूमिका ज्या माणसाने पार पाडल्या त्या आपल्या बापाकडे रहायचे तो पसंद करतो. मला हा बाप जेवढा भावला तेवढाच भाऊसाहेब खांडेकरांच्या ‘अमृतवेल’मधील आप्पादेखील आवडतात. मुलीला स्वतंत्र विचार करायला देणार बाप त्या काळात म्हणजे साठच्या दशकात किती बंडखोर वाटतो.

त्यादिवशी रात्री मी गावी जाण्यासाठी निघालो. वाटेत वाचायला म्हणून पेपर घेतला. गाडी सुरू झाली. मी पेपर वाचू लागलो. दुसर्‍या पानावर बातमी-आसाममधल्या चार बापांनी आपल्या पोटच्या पोरींना वेश्याव्यवसायासाठी विकले. ही बातमी मी वाचत गेलो आणि ह्या प्रकाराने सुन्न झालो. जगात असेही बाप असतील का ? ….मी डोळे मिटून बसून राहिलो. मला रात्रपाळी करून येताना माझ्यासाठी मासिकं, पुस्तकं घेऊन येणारे माझे बाबा आठवले. त्या एका दिवसात किती बाप माणसं मी पहिली. स्वतःच्या मुली आज उपाशी राहू नयेत म्हणून मित्राची रिक्षा चालवून पैसे मिळवणारे ते रिक्षावाले भाऊ. चार दिवस मुलगी नजरेआड असणार म्हणून आज तिच्याबरोबर जास्तीचा वेळ घालवता यावा म्हणून लवकर घरी पोचण्यासाठी धडपडणारा मी. आणि स्वतःच्या मुलींना नरकात ढकलणारे हे बाप ……बाप ही संकल्पना काय हे त्यांना माहीत तरी असेल का?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -