घरफिचर्ससारांशजातपंचायतींच्या मनमानीचा असह्य जाच

जातपंचायतींच्या मनमानीचा असह्य जाच

Subscribe

जातीची उतरंड असलेल्या आपल्या भारतीय समाजात जाती-पोटजातीत शोषण, भेदभाव, फसवणूक अशा मानवतेला काळीमा फासणार्‍या अनेक गोष्टी घडतात. मात्र अशा क्रूरतेचाही छुप्यापद्धतीने धंदा करणारी काही धूर्त मंडळी त्या त्या जाती-पोटजातीत कार्यरत असते. आपल्याच जातीच्या बांधवांवर अत्यंत अन्यायकारक न्यायनिवाडे करणारी, मानवी स्वातंत्र्याची, हक्कांचा गळा घोटणारी ही मानवी टोळी असते. आपल्या समाजातील अनेक तथाकथित उच्च समजल्या जाणार्‍या जातींपासून तर अगदी खालच्या समजल्या जाणार्‍या जाती-पोटजातींमध्ये ‘जातपंचायत’ नावाने ही व्यवस्था कार्यरत असते.

‘जात ही निखालस अंधश्रद्धाच आहे, असं तुम्ही तुमच्या भाषणात म्हणालात. पण जात कशी काय अंधश्रद्धा असू शकते ?’ अंधश्रद्धा निर्मूलनाच्या एका प्रबोधनपर कार्यक्रमानंतर अनौपचारिक बोलणे चालू असताना, शैक्षणिक क्षेत्रातील एका उच्चपदस्थ अधिकारी व्यक्तीने तिरकसपणे विचारलेला हा प्रश्न होता. एखाद्या सामान्य, अडाणी, अज्ञानी माणसाने असा प्रश्न विचारला असता तर, वैषम्य वाटले नसते. मात्र एका शिक्षित अधिकारी व्यक्तीने असा विषमता समर्थक प्रश्न विचारावा, याचा खेद वाटला. मात्र तरीही संघटनेच्या कामाची शिस्त म्हणून अतिशय संयमाने त्यांच्या या प्रश्नाचे यथोचित स्पष्टीकरणासह उत्तर देण्याचा प्रयत्न केला. हे स्पष्टीकरण त्यांना फारसे पटत होते, असे मात्र प्रत्यक्षात जाणवत नव्हते. ज्यांची मतं एखाद्या विशिष्ट बाबींबाबत पक्की व ठाम झालेली असतात, पूर्वग्रहदूषित झालेली असतात, त्यांच्या मतांमध्ये बदल, परिवर्तन घडवून आणणे, बरेच अवघड असते.

ज्या घटनेमागील कार्यकारणभाव अगदी स्पष्ट आहे, त्याला आपण वैज्ञानिक दृष्टिकोनयुक्त घटना म्हणतो. तिच्याशी संबंधित सर्व प्रकारच्या वैज्ञानिक कसोट्यांवर अशी घटना सिद्ध झालेली असते. तेव्हा ती सार्वजनिक नियम म्हणून स्वीकारली जाते. कारण ती कुणालाही, कुठेही पडताळता येते. तेथे अंधश्रद्धेला मुळीच थारा नसतो. नैसर्गिकदृष्ठ्या सर्व माणसांची शरीररचना जवळजवळ सारखीच आहे. जगातील यच्चयावत मानवांचा जिनोम पॅटर्न हा 99.97 टक्के एवढा जवळजवळ सारखाच आहे. तरीही आपल्या देशात मागील शतकापर्यंत, एका जातीच्या माणसाची सावली दुसर्‍या जातीच्या माणसासाठी अपवित्र समजली जात होती असे का? एखाद्या माणसाच्या स्पर्शाने दुसरा माणूस अशुद्ध होई आणि त्याच्या अंगावर गोमूत्र शिंपडले की, तो शुद्ध झाल्याचे समजले जाई. हे कोणत्या शास्त्रीय कसोटीने सिद्ध झाले होते?

- Advertisement -

एखाद्या माणसाने, एखाद्या वस्तूला स्पर्श केला तर ती वस्तू बाटली, अपवित्र झाली, अशुद्ध झाली असे समजून, ती वस्तू, त्या व्यक्तीलाच घासायला, पुसायला, स्वच्छ करायला सांगून, उन्हात किंवा घराबाहेर बराच वेळ ठेवली जाई. पुन्हा शुद्धतेचा तोच खुळा प्रकार केला जात असे. हे कितपत योग्य होते? खरेतर अशा सर्व कृती या पूर्णपणे कार्यकारणभावाचा अभाव असलेल्याच होत्या. म्हणून जात हे अमानवीय, घातक, अनिष्ट सामाजिक मूल्य निखालस अंधश्रद्धाच आहे. आजही ते बर्‍याच अंशी कायम आहे. कारण ही अंधश्रद्धा जाणिवपूर्वक नष्ट करण्याऐवजी, तिचा अनेकवेळा, अनेक व्यक्ती राजकारणासाठी किंवा तत्सम कारणांसाठी धूर्तपणे व्यावहारिक पातळ्यांवर उपयोग करून घेताना दिसतात. परिणामी जात ही अंधश्रद्धा अधिक बळकट होत जाते. निकोप लोकशाहीच्या संवर्धनासाठी हा मोठा अडथळा आणि धोका ठरतो.

‘आम्ही जात मानत नाही, भेदभाव पाळत नाही,’ असे छातीठोकपणे सांगणारे, म्हणणारे, आजही आपापल्या मुलांमुलींचे विवाह, त्यांच्या मर्जीप्रमाणे न होऊ देता, त्यांच्या जाती-पोटजातीतच का ठरवतात? आंतरजातीय तसेच आंतरधर्मीय विवाहांना कडाडून विरोध का केला जातो? तरुणाईला हव्या त्या जोडीदाराची विवेकी निवड करायला आपण अजूनही का स्वातंत्र्य देत नाहीत ? जात ह्या अंधश्रद्धायुक्त अनिष्ट सामाजिक मूल्यांचा पगडा आपण अजून किती काळ जतन करणार आहोत, जोपासणार आहोत ?

- Advertisement -

जातीच्या गुलामीवर कोणताही समाज किंवा कोणताही देश उभा राहू शकत नाही. कारण,‘जातिसंस्था ज्यावर उभी आहे त्या धार्मिक जाणिवांचा समूळ विनाश केल्याशिवाय जाती निर्मूलन शक्य नाही ,’असा नवा सिद्धांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला आहे. ‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन’ या पुस्तकात त्याचे सविस्तर विवरण आपल्याला वाचायला मिळेल.

आपल्याकडे ‘विवाह’ ही एक धार्मिक बाब समजली जाते. कारण धार्मिक जाणिवांवर ती उभी आहे. आपल्या मुलामुलींचा विवाह हा आपल्याच जाती-पोटजातीत झाला पाहिजे, केला पाहिजे ही एक प्रखर धार्मिक जाणीव त्यामागे भक्कमपणे उभी असते. समाजमनात ती पक्की रूजलेली असते. त्या त्या जाती-पोटजातीचे विवाह सोहळे बघितले तर त्यात अनेक निरर्थक, खर्चिक, कालबाह्य धार्मिक कर्मकांडे, जाणिवा अट्टाहासाने त्या अशा सोहळ्यात पाळल्या जातात, जोपासल्या जातात, असे दिसून येते. आपली जात-पोटजात कशी श्रेष्ठ आहे, वेगळी आहे, उच्च व भिन्न आहे हे दाखवण्याचा तो एक केविलवाणा प्रयत्न असतो. मात्र जाती-पोटजातीच्या धार्मिक चालीरीती, रूढी, परंपरा जोपासण्याच्या नावाने चाललेला हा प्रकार अनेकांना पटत आणि परवडत नसला तरी, सामाजिक दबाव व भीतीपोटी ते सर्व करावेच लागते. त्यातून पुन्हा जात बळकट होत जाते, घट्ट होत जाते. म्हणून जात ही निखालस अंधश्रद्धाच आहे. हे निर्विवाद सत्य आहे.

‘आमच्या पूर्वजांपासून चालत आलेल्या आमच्या जातीच्या चालीरिती, रुढीपरंपरा चुकीच्या कशा असतील आणि असल्यातरी, त्या जोपासल्याने, जतन केल्याने आम्ही एकत्र येतो, भेटीगाठी होतात, आमचे सोयरेसंबंध जमतात, जुळतात. म्हणून आमच्या जातीचा आम्हांला अभिमान वाटतो,’ असे जाताभिमान मिरवणारे अनेकजण असतात. खरं तर यातून त्या जातीचा खुजेपणा दिसून येतो. पुढच्या पिढीला ते अतिशय मारक ठरते. ह्या देशाच्या लोकशाहीच्या निकोप वाढीसाठी जात ही सामाजिक बाब प्रचंड मोठा अडथळा ठरत आली आहे, ही बाब आपल्याकडे लक्षात घेतली जात नाही. जाणिवपूर्वक हा अडथळा दूर करण्यासाठी जी सर्वप्रकारची कणखरता लागते ती फार कमी लोकांमध्ये असल्याचे दिसते.

जातीजातीतील पवित्र-अपवित्रता, उच्चनीचता, भेदभाव यामुळे आपल्या अनेक बांधवांना पिढ्यानपिढ्या पशूपेक्षाही हलाखीचे जीवन जगावे लागले. त्यांच्या अनेक पिढ्या त्यात व्यर्थ खपल्या. तरीही अजून हे ढोंग पूर्णपणे थांबलेले नाही, ते चालूच आहे. एकूणच सर्व समाजाला त्याचे दुष्परिणाम कमी-अधिक प्रमाणात सतत भोगावे लागतात. यामध्ये महिला मोठ्या प्रमाणात भरडल्या जातात. त्यांचे प्रचंड शोषण होत असते. त्या त्या जातीच्या चालीरितींचा पगडा लहानपणापासूनच एवढा हाडीमांसी भिनवला जातो की, त्यांनी, त्यांच्यासाठी वेगळा विचार करणे, हेसुद्धा पाप समजले जाते, मोठा अपराध समजला जातो. मग भलेही त्या मुली, महिला कितीही उच्चशिक्षित असोत.

दुसर्‍या बाजूला त्या त्या जातीतील उपवर मुलांचीही लग्न जमेनाशी झाली आहेत. त्याचे कारण शिक्षण घेतले, पण नोकरी नाही, व्यवसाय करायला लागणारे भांडवल, अनुभव, कौशल्य, धाडस, मेहनत अशा अनेक गोष्टींची कमतरता असते. साहजिकच अनेकजण वैफल्यग्रस्त होऊन, व्यसनाचे बळी ठरण्याची शक्यता वाढते. जातीबाहेरील मुलीशी लग्न करण्याची दोन्ही बाजूंनी तयारी असली तरी, कुटुंबाला जातबहिष्कृत केले जाईल, मानहानी व बदनामी केली जाईल, ही टांगती तलवार सतत डोक्यावर असते. त्यांचे हे जीवनमरणाचे प्रश्न योग्य प्रकारे हाताळण्यासाठी त्यांची जात कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही. उलट चालीरिती, रुढीपरंपरांची बंधने लादल्याने, अशा लग्नाळू मुलामुलींचे आणि त्यांच्या मातापित्यांचे दररोजचे जगणे अधिक चिंताजनक व हेटाळणीयुक्त होत असते.

आपला भारतीय समाज वर्णावर व जातीवर उभा आहे. पुरुषप्रधान संस्कृतीचा तो समर्थक आहे. ही व्यवस्थाच मुळात विषमता निर्माण करणारी आहे. विषमतेचे समर्थन करणारी आणि विषमतेला धर्माची मान्यता देणारी आहे. ही विषमता देवाशी, स्वर्गाशी, नरकाशी पुनर्जन्माशी जोडली गेलेली आहे. स्वाभाविकच तिच्याविरुद्ध बंड होण्यास कितीतरी वर्षे जावी लागली. ज्यांना ह्या विषयाची झळ बसली त्यांनी बंड करणे अगदी स्वाभाविक होते आणि तसे घडलेही. मात्र ज्यांना स्वतःला या विषयाची झळ बसण्याची शक्यता नव्हती, अशांनी बंड करण्याचे कोणतेच कारण नव्हते. मात्र तरीही मानवतेच्या मूल्यांची जपणूक म्हणून महाराष्ट्रात महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, र.धों. कर्वे, वि.रा. शिंदे आदींनी हे बंड केले.

देशपातळीवरही ते प्रेरणादायी ठरले. आपल्या समाजात तथाकथित उच्च जातीत पूर्वी एकदा विवाह झालेल्या मुलींचे, स्त्रियांचे पुनर्विवाह होत नसत. मात्र समाजसुधारकांच्या कठोर कृतिशील प्रबोधनाचा परिणाम म्हणून अनेक जातींमध्ये पुनर्विवाह होऊ लागले. त्यामुळे अनेक महिला, मुलींनाही न्याय मिळाला. मात्र अजूनही महाराष्ट्रातील स्वतःला उच्च समजणार्‍या काही जातीत महिला, मुलींचे पुनर्विवाह केले जात नाहीत. मागास म्हणून गणल्या गेलेल्या काही जातबांधवांनी देखील महिला, मुलींच्या बाबतीतील ही अन्यायकारक क्रूर रूढी अद्यापही कवटाळून धरली आहे, असे अलीकडे घडलेल्या काही कलंकित घटनांवरून दिसून येते. खरं तर, अशा अन्यायकारक घटना कुठेनाकुठे विविध जातीपोटजातीत सतत घडत असतात. पण त्यातील फारंच थोड्या उघडकीस आल्यावर समाज जागा होतो, संताप व्यक्त करतो.

जातीची उतरंड असलेल्या आपल्या भारतीय समाजात जाती-पोटजातीत शोषण, भेदभाव, फसवणूक अशा मानवतेला काळीमा फासणार्‍या अनेक गोष्टी घडतात. मात्र अशा क्रूरतेचाही छुप्यापद्धतीने धंदा करणारी काही धूर्त मंडळी त्या त्या जाती-पोटजातीत कार्यरत असते. आपल्याच जातीच्या बांधवांवर अत्यंत अन्यायकारक न्यायनिवाडे करणारी, मानवी स्वातंत्र्याची, हक्कांचा गळा घोटणारी ही मानवी टोळी असते. आपल्या समाजातील अनेक तथाकथित उच्च समजल्या जाणार्‍या जातींपासून तर अगदी खालच्या समजल्या जाणार्‍या जाती-पोटजातींमध्ये ‘जातपंचायत’ नावाने ही व्यवस्था कार्यरत असते. या जातपंचायतीचा त्या-त्या जात-पोटाजातीतील समाज बांधवांच्या जीवनावर सर्व बाजूंनी जबरदस्त अंकुश असतो. त्यांच्या जाती-पोटजातीच्या सर्व धार्मिक चालीरीती, रूढी, परंपरा, आचार, विचार यावर या जातपंचायतीचा संपूर्ण अधिकार आणि नियंत्रण असते. हुकूमशहाच असतात ते! कुणालाही ते जुमानत नाहीत.

देशातील प्रचलित कायदा-व्यवस्था, न्याय-व्यवस्था ते झुगारून लावतात. जात बांधवांना ते तिथपर्यंत जाऊच देत नाहीत. सर्वच न्यायनिवाडे अतिशय अन्यायकारक पद्धतीने जातबांधवांवर लादून, सर्व मार्गांनी आपल्याच जातीयांची पिळवणूक करतात, विविधप्रकारे शोषण करतात. कुणीही त्यांच्याविरोधात ब्र शब्द उच्चारणार नाही, एवढा धाकदपटशा, दहशत त्यांनी निर्माण केलेली असते. साहजिकच अनेक जाती-पोटजातींतील उच्च पदस्थांपासून ते सामान्य माणूस अशा अनेक व्यक्ती, या क्रूर व्यवस्थेच्या सतत बळी ठरत असतात. यात महिलांचे प्रमाण अधिक असते. ह्या जाचाला कंटाळून अनेक कुटुंबे एकतर गाव, घरदार सोडून परागंदा होतात किंवा जातीबाहेर पडण्याचे धाडस गमावून बसल्याने, मुकाट्याने जातपंचांचा अन्याय, त्रास आयुष्यभर सोसत जगत राहतात. यातून अनेकवेळा आत्महत्यांचे प्रकारही घडतात. अशा अनेक घटना आपल्या देशात, महाराष्ट्र राज्यात वेळोवेळी घडत असतात. मात्र केवळ समाजाच्या भीतीपोटी, जातीतून बहिष्कृत केले जाईल या भीतीपोटी, बदनामी व मानहानीखातर या घटना उघडकीस येत नाहीत.

शिवाय हे सगळे अन्यायकारक न्याय-निवाडे हे महिलांशी संबंधित असल्याने, बेअब्रू होईल ह्या भीतीपोटी ती कुटुंबे अत्यंत दबावाखाली हलाखीचे जीवन जगत असतात. कुचंबणा व अन्याय सहन करीत असतात. जातपंचांच्या आर्थिक आणि तत्सम शोषणाला, कौमार्य चाचणीसारख्या लैंगिकतेशी निगडित किळसवाण्या बाबींना बळी पडत असतात..असह्य जाच सहन करीत असतात.

क्रमशः

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -