घरफिचर्ससारांशआदेश हायकमांडचा तर नाही ना ?

आदेश हायकमांडचा तर नाही ना ?

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमध्ये 5 जानेवारी रोजी दौर्‍यावर गेले असताना फिरोजपूरकडे जाणार्‍या उड्डाणपुलावर त्यांचा ताफा वीस मिनिटे एकाच जागी थांबून राहण्याची परिस्थिती उद्भवली, तेव्हा पंजाबचे काँग्रेसचे मुख्यमंत्री नॅाट रिचेबल होते. आता महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रदेशाध्यक्षपदावर बसलेला नेता, मोदींना मारू शकतो, शिव्याही घालू शकतो, अशी उघड धमकी देतो, एवढेच नव्हे तर त्यांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल अवमानास्पद वक्तव्य करतो, याचा अर्थ मोदींच्या विरोधात वाट्टेल ते करण्याची परवानगी किंवा तसे आदेश काँग्रेस हायकमांडने आपल्या प्रदेश नेतृत्वाला दिले आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय रहात नाही.

कोणे एकेकाळी महाराष्ट्रात मोघलांच्या घोड्यांना नदीच्या पाण्यातही संताजी-धनाजी दिसत असत, तसंच काहीसं अलीकडच्या काळात याच महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना ठायी ठायी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसत असल्याचे त्यांच्या सातत्यपूर्ण विवादास्पद वक्तव्यांनी दिसते आहे. त्यावेळी संताजी-धनाजी यांच्या धसक्यामुळे मोगलांचे घोडे बिचकत होते तर आताशा देशात आणि जगातही मोदींच्या वाढत्या प्रभावाच्या धसक्याने नाना पटोलेंची अवस्था मोघलांच्या घोड्यासारखी तर झाली नाही ना? अशी शंका निर्माण व्हावी अशी स्थिती त्यांच्या एकामागून एक विवादास्पद वक्तव्यांनी निर्माण होऊ लागली आहे.

तसं म्हटलं तर नाना पटोलेंची मोदींविषयीची असूया त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली तेव्हापासूनच प्रकर्षाने व्यक्त होताना दिसते. प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली तेव्हाही पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलताना त्यांना फेकू म्हणून संबोधले होते,मात्र आपली चूक लक्षात येताच त्यांनी त्यावेळी सारवासारव केली होती. त्यानंतरही वेळोवेळी त्यांच्या वक्तव्यातून मोदीद्वेष प्रकट होत गेला. आताशा तर नानांच्या जिभेला घसरण्याच्या सर्व मर्यादांचा विसर पडलेला दिसतो म्हणूनच ते मोदींना मारण्याची व त्यांना शिव्या देण्याची भाषा करीत असावेत. नानांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेसची होत असलेली वाताहत रोखण्यात अपयशी ठरलेले नाना कदाचित काँग्रेस हायकमांडला खूश करण्यासाठी आणि पक्षप्रमुखांच्या नजरेत स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी काय वाट्टेल ते करण्याच्या मन:स्थितीत आहेत अशी शंका आता व्यक्त होऊ लागली आहे.

- Advertisement -

वास्तविक कोणत्याही पक्षाचे प्रदेश अध्यक्षपद हे अत्यंत जबाबदारीचे पद आहे. त्या पदाचा मान-सन्मान आणि प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नात्याने नानांच्या खांद्यावर असताना, त्या जबाबदारीचाच विसर नानांना पडल्याचे दिसते आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठे राजा भोज…असंच म्हणण्याची वेळ आली तरी नानांना त्याचे साधे भानही राहिलेले दिसत नाही. विशेष म्हणजे 30 वर्षांच्या राजकारणात केंद्रात खासदार आणि राज्यात विधानसभेचे अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीला, देशाच्या पंतप्रधानाबद्दल आक्षेपार्ह बोलण्याचे काय परिणाम होतील, याची कल्पना नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल. नाना पटोले काँग्रेसमध्ये आल्यापासून मोदी आणि भाजपद्वेषाने त्यांना पछाडले आहे. त्यातूनच ते स्वतःचे काँग्रेसमधील स्थान कायम ठेवण्यासाठी मोदी आणि भाजपच्या विरोधात बेलगाम वक्तव्ये करीत असावेत.

पण त्यांच्या या धडपडीने काँग्रेसला मात्र नको त्या वादात ढकलून दिले आहे. बरं नेहमीप्रमाणे, मी असं बोललोच नाही, असंही ते बोलू शकत नाहीत, कारण ते जे बोलले त्याचे व्हीडिओच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नाना हे आक्रमक बोलतात, त्यांची तशी स्टाईल आहे. पण मोदींवर काय टीका करायची, त्यांच्याविषयी काय बोलायचे, ते काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील नेते बघून घेतील, प्रदेश पातळीवरील नेत्याने राज्यात गावापासून शहरापर्यंत अस्तित्वहीन होऊ पहात असलेल्या आपल्या पक्षाला सावरण्याकडे लक्ष देण्याची गरज असताना देशाच्या पंतप्रधानांविषयी अश्लाघ्य भाषा वापरण्याची किंवा त्यांच्या कौटुंबिक जीवनाचा अनादर करण्याची गरज नव्हती. हा प्रकार म्हणजे, आपल्या चादरीच्या चिंध्या होत असताना दुसर्‍याच्या चादरीची भोकं मोजण्यासारखा आहे.

- Advertisement -

भंडारा जिल्ह्यात बोलताना नानांनी, ‘मी 30 वर्षांपासून राजकारण करतोय, जे राजकारणात आले ते पाच वर्षांत एका पिढीचा उद्धार करतात. शाळा-कॅालेज काढतात, पण माझी एकही शाळा नाही. जो आला त्याला मदत करतोय. म्हणूनच मी मोदीला मारू शकतो, त्याला शिव्याही देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्याविरोधात प्रचाराला आले नाहीत’ अशी मुक्ताफळे उधळली. त्यांच्या या वक्तव्यावर अवघ्या महाराष्ट्रभर राळ उठली.

आपण जे बोललो ते आपल्या अंगावर उलटतंय, हे लक्षात येताच नानांनी, ‘तो मी नव्हेच’ असे सांगण्याचा प्रयत्न करत मी मोदी नावाच्या गावगुंडाविषयी बोलत होतो, त्याच्याविषयी लोकांच्या तक्रारी आहे, असा युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला. पण नानांची देहबोली आणि भाषणाचा सूर बघितला, तर त्यांचा रोख कोणावर होता, हे कोणालाही सहजपणे कळू शकते. (शिवाय एखादा गावगुंड त्याचा सबंध नसताना नानांच्या विरोधात प्रचार करायला कशाला जाईल ?) भंडारा जिल्ह्यात ‘मोदी’ असे टोपण नाव असलेला गावगुंड आहे, त्याच्याविषयी लोकांनी नानांकडे तक्रारी केल्यावर नानांनी त्याला आपण मारू शकतो, असे सांगितले, हा त्यांनी स्वतः व प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केलेला खुलासा हास्यास्पद आहेच, शिवाय त्यानंतर दस्तुरखुद्द पोलिसांनीच मोदी नावाच्या अशा कोणत्याच गुंडा विरोधात कारवाई केली नसल्याचे सांगितले, तर ज्याच्याविषयी नाना बोलले त्या मोदी नामक तथाकथित गावगुंडाने एका वृत्तवाहिनीसमोर स्वतःच खुलासा केल्याने नानांच्या सारवासारवीचा फियास्को झाला.

एवढे सगळे महाभारत घडूनही बुडत्याचा पाय खोलात, तसेच काहीसे नानांच्या बाबतीत घडत असावे की काय, म्हणून पुन्हा एकदा नानांची जीभ घसरली आणि भाजपला काँग्रेसच्या विरोधात पुन्हा एकदा आयतेच कोलीत मिळाले. परिणामी अवघ्या महाराष्ट्रात नाना पटोले आणि काँग्रेस टीकेच्या केंद्रस्थानी राहिले. नानांच्या वक्तव्यावर महाराष्ट्राच्या आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी आघाडी धर्म निभावत त्यांची पाठराखण केली असली तरी नानांची एकामागे एक वक्तव्ये आघाडीच्या घटकांनाही डोईजड वाटू लागली नसतील तर नवलच.

काही दिवसांपूर्वी,केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी काढलेले उद्गार आक्षेपार्ह वाटले म्हणून आघाडी सरकारने राज्याचे सगळे पोलीस दल त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जुंपल्याचे सगळ्या महाराष्ट्राने बघितले होते. मग काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी देशाच्या पंतप्रधानाला मारण्याची धमकी दिली, मोदींना शिव्या घालू असे म्हटले तरी, आघाडी सरकार किंवा पोलीस दल निवांत का आहे? नारायण राणेंच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या गेल्या तशाच नाना पटोलेंच्या विरोधातही विविध पोलीस ठाण्यांवर तक्रारी नोंदवल्या गेल्या, मग राणेंच्या वेळी तत्परता दाखविणारे पोलीस नानांच्या बाबतीत शांत का आहेत? ते कोणाच्या आदेशाची वाट बघत आहेत? राणेंवर कारवाईसाठी सारा फौजफाटा राबवला होता, मग नाना पटोलेंच्या बाबतीत पोलिसांची आणि आघाडी सरकारचीही भूमिका वेगळी का आहे ही गोष्ट जनतेच्या नजरेतूनही सुटलेली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमध्ये 5 जानेवारी रोजी दौर्‍यावर गेले असताना फिरोजपूरकडे जाणार्‍या उड्डाणपुलावर त्यांचा ताफा वीस मिनिटे एकाच जागी थांबून राहण्याची परिस्थिती उद्भवली, तेव्हा पंजाबचे काँग्रेसचे मुख्यमंत्री नॅाट रिचेबल होते. आता महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रदेशाध्यक्षपदावर बसलेला नेता, मोदींना मारू शकतो, शिव्याही घालू शकतो, अशी उघड धमकी देतो, एवढेच नव्हे तर त्यांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल अवमानास्पद वक्तव्य करतो, याचा अर्थ मोदींच्या विरोधात वाट्टेल ते करण्याची परवानगी किंवा तसे आदेश काँग्रेस हायकमांडने आपल्या प्रदेश नेतृत्वाला दिले आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय रहात नाही.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील वातावरण राजकीय नेत्यांच्या बेताल वाक्ताडनाने ढवळून निघाले आहे. राजकारणात एकमेकांवर आरोप करणे ही नेत्यांची सवय बनली आहे का? या सवयीने त्यांची सद्सद्विवेक बुद्धी कुठे गहाण पडलीय का? आपले राजकीय चर्चाविश्व इतके पोकळ झालेय का? नेत्यांचा वाचाळपणा हा त्यांच्या राजकारणाचा भाग आहे की, त्यांचे अज्ञान आहे, या प्रश्नांबरोबरच जबाबदार नेत्यांची जीभ ज्या पद्धतीने घसरताना दिसते आहे ते पाहता सामाजिक आणि राजकीय संकेतांची पायमल्ली तर होत नाही ना ? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

एमेकांवर दोषारोप करताना मोठे नाव असलेल्या नेत्यांनासुद्धा स्वतःवर नियंत्रण ठेवता आलेले नाही. खरा प्रश्न असा आहे की, एवढ्या मोठ्या नेत्यांच्या तोंडून अशी वक्तव्ये कशी बाहेर पडतात ? लोकप्रियता किंवा टाळ्या मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक अशा प्रकारची वक्तव्ये केली जातात का? यापलीकडे जाऊन नेत्यांमधील नैतिकता आणि संवेदना कमी होत चालली आहे का ?

आपण पदांवर आहोत म्हणजे काहीही बोलण्याचा आपल्याला अधिकार आहे, असा समज या लोकप्रतिनिधींचा झाला आहे. मग तो लोकप्रतिनिधी संसदेतला असो वा विधानसभेतला किंवा आणखी खालच्या सभागृहातला. आणि यात सगळ्या प्रमुख आणि छोट्या-मोठ्या पक्षांच्या नेते,लोकप्रतिनिधींचा सहभाग आहे. त्यामुळे प्रश्न आहे तो, आपण समाज म्हणून सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या राजकीय विचारांची नौका कुठल्या दिशेला नेत आहोत याचा.

लोकशाहीमध्ये कोणालाही, कोणावरही टीका करण्याचा अधिकार असला तरी टीका करताना ती कोणत्या पातळीवर करावी, याला काही तळमेळ असायला हवा, किंवा त्यासाठी काही तारतम्य बाळगण्याची आवश्यकता असते. उगाच तोंडात काही येईल ते बोललंच पाहिजे, असं नाही. अशा बोलण्यातून वाद निर्माण होतो आणि त्याचे पुढे दूरगामी परिणाम होत असतात. महत्वाचे म्हणजे वैचारिक व प्रगल्भ राजकारणात अशा गोष्टींना अजिबात स्थान नाही. एखाद्या अशिक्षिताने अशी वक्तव्ये केली तर एकवेळ दुर्लक्ष केलं जाऊ शकतं, पण सुशिक्षित व अनुभवी व्यक्तीने अशी विधाने करताना शंभरवेळा विचार केला पाहिजे. दुर्दैवाने तसं न झाल्याने त्याचे परिणाम पक्षालाही भोगावे लागतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र आजची एकंदरीत स्थिती पाहता राजकीय नेत्यांना,कोणतेही वक्तव्य करताना विधिनिषेध आणि तारतम्य विसरून चालत नाही हे समजावून सांगण्याची वेळ आली आहे,असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही.

खरंतर नारायण राणे, रावसाहेब दानवे असोत किंवा नाना पटोलेंपासून गोपीचंद पडळकर असोत, या सर्वांनी तुम्ही कुठली भाषा वापरता यावरून तुमची वैचारिक पातळी काय आहे किंवा तुमच्या विचारांची दिशा काय आहे याचा अदमास घेतला पाहिजे, कारण तुम्ही काय बोलता, कसे वागता ? याचा परिणाम तसेच तुमच्याविषयी सर्वसामान्य जनता विचार व्यक्त करत असते.

नारायण राणे, नितेश राणे किंवा नाना पटोले यांच्या वाकविस्फोटांपूर्वीही असे विस्फोट गेल्या काही वर्षांमध्ये बरेच वेळा नेत्यांकडून झालेले आपण पाहिलेले आहेत. या लोकांना नैतिकता आणि आपल्या राजकीय नीतीमूल्यांचा विसर कसा काय पडतो हे देखील एक न उलगडणारे कोडे आहे. आपण ज्या व्यक्तीविषयी बोलतोय,त्या व्यक्तीचे काम,त्यांचे समाजमनात असलेले स्थान काय, त्यांचे पद कोणते, आपल्या वक्तव्याने त्यांच्या आणि देशाच्याही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रतिमेला धक्का तर लागणार नाही ना? याचा तरी सारासार विचार होतो का, या प्रश्नाचे उत्तर फक्त आणि फक्त नाही असेच द्यावे लागेल.

बरं हे असं बोलतात,जणू समोरच्या व्यक्तीला जीवनातूनच उठवायचे आहे. हे सभ्यतेच्या कुठल्या संज्ञेत बसतं, हे एकदा यांनी सांगितलं पाहिजे. बरं अशा नेत्यांचे आणि त्यांच्या बोलघेवडेपणाचे समर्थन त्या त्या पक्षाच्या पक्षश्रेष्ठी आणि वरिष्ठ नेते मंडळींकडून केवळ राजकीय इर्षेपोटी केले जात असेल, नेत्यांच्या वायफळ वक्तव्याला चाप बसवण्याऐवजी त्यांची बाजू उघडपणे घेतली जात असेल तर ते या बोलघेवड्या नेत्यांना प्रोत्साहन देत आहेत असाच याचा अर्थ निघतो. त्यामुळे लोकशाही नैतिकतेची लक्तरे टांगली जात असल्याचे कटू वास्तव आज जगासमोर येत आहे.

राजकारणात पूर्वीदेखील अशी विधाने व्हायची, मात्र त्यात आता दिसतो तितका आक्रस्तळेपणा नव्हता. त्यावेळी नीतीमूल्यांची जाण आणि सत्ताधारी व विरोधकांमध्ये परस्परांविषयी मान होता. या सर्व गोष्टी बासनात गुंडाळून ठेवल्याची स्थिती अलीकडच्या राजकारणात निर्माण झाल्याने लोकशाहीची अशी त्रेधा याआधी कधीच उडाली नसावी. पुरोगामीत्वाचे गोडवे गाणार्‍या महाराष्ट्राला राजकारणातला हा घसरलेला स्तर शोभणाराही नाही आणि परवडणाराही नाही. यामुळे टीका करणारा जो कोणी असेल,तो कोणत्याही पक्षाचा असेल, कितीही मोठा नेता असेल तरी त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा काळ सोकावेल हे वेगळे सांगायला नको.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -