घरफिचर्ससारांशट्रेंड झटपट श्रीमंतीचा....पण आभासी...!

ट्रेंड झटपट श्रीमंतीचा….पण आभासी…!

Subscribe

संकट समोर आले की मार्ग सापडतात हे जरी खरे असले तरी आभासी जगामध्ये जगत असताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. मग क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला, आपल्या देशामध्ये त्याची काय परिस्थिती आहे. तसेच त्यातून आपले नुकसान होऊ शकते का..? या सगळ्या गोष्टींचा सूक्ष्म अभ्यास महत्वाचा आहे. तेच शेअर बाजाराच्या बाबतीतदेखील. तूर्तास तरी आपल्याजवळ असणारी थोडीबहुत पुंजी ही एखाद्या चांगल्या म्युच्युअल फंडात किंवा चांगल्या कंपनीच्या शेअरमध्ये तज्ज्ञांचा सल्ला घेऊन गुंतवायला हरकत नाही.

सध्या कोरोनाने आजच्या पिढीसमोर अनेक समस्या निर्माण केल्या आहेत. ओमायक्रॉननंतर आणखी एखादा नवीन व्हेरियंट आला तर त्याचे संभाव्य धोके सांगायलाच नको. पुन्हा लॉकडाऊन लागेल की काय याची चिंता रोज भेडसावत आहे. सर्वात मोठा चिंतेचा विषय हा आहे की, खासगी आणि सरकारी कार्यालयात करार तत्वावर जे कर्मचारी काम करतात त्यांच्यामध्ये पन्नास टक्के उपस्थिती असावी असा सरकारचा नियम आहे. ज्यांचा वशिला तोच पन्नासमध्ये असेल बाकीचे घरी बसतील ही वस्तुस्थिती या दोन वर्षांत दिसून आली. इथेही अनेकांच्या वाट्याला दुजाभाव येतोय. हजार प्रश्नांचं गाठोड डोक्यात घेऊन युवकांनी कुठे जायचं.. हा देखील प्रश्न आहे…

दोन दिवसांपूर्वी एक मित्र भेटला, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर थोडं आर्थिक विषयांवर बोललो. त्यावेळी त्यानं विचारलं की, अरे क्रिप्टो करंसी घेतली की नाही…? मी नाही बोलल्यावर त्याने एक कटाक्ष असा टाकला की, मी जसा काही गुन्हा केला. तो बोलला अरे शंभर रुपये गुंतवणूक करुन आपण ती करन्सी विकत घेऊ शकतो. भविष्यात याचे फायदे खूप आहेत. एक काम कर मी तुला रेफरन्स कोड पाठवतो तू लगेच जॉईन हो… आज या डिजिटल कॉइनची किंमत खूप कमी आहे, भविष्यात यामध्ये हजारो रुपयांनी वाढ होणार आहे… त्यामुळे तू आजच्या आज याच्यात गुंतवणूक कर..म्हणजे भविष्यात तुला मोठा फायदा होईल. अरे माझे काही मित्र आहेत जे रोज हजार दोन हजार रुपये कमावतात.. जरी ब्लॉकचेन असलं तरी आपण टाकलेले पैसे सेफ राहतात. जगभरात सध्या खूप लोक याकडे वळत आहेत.

- Advertisement -

आपण कोणत्याही गोष्टीला खूप उशीर करतो रे… पण काही हरकत नाही तू आतासुद्धा घेऊ शकतो….. आता क्रिप्टो करंसीबद्दल बर्‍यापैकी मी माहिती काढली होती, तरीसुद्धा त्याबद्दल आणखी थोडी माहिती विचारली. तो सेमिनार अटेंड करण्याबद्दल बोलत होता. सध्या देशभरात विविध कंपन्या एकत्र येऊन इथेरियम ब्लॉकचेनद्वारे स्वतःचा एक प्लॅटफॉर्म तयार करत आहेत. त्याद्वारे आज हजारो लोक यामध्ये गुंतवणूक करताना दिसतात. बिटकॉइन आणि इतर खासगी क्रिप्टो करन्सीद्वारे गुंतवणूक केल्यानंतर परतावादेखील चांगला मिळतो. विशेष म्हणजे हे एक आभासी चलन आहे. आपण ते डॉलरमध्ये विकत घेऊन त्याचा विनिमय करू शकतो. असे बरेच काही तो सांगत होता. अर्थात पैसे कमावण्याचा हा एक मार्ग त्यांनी निवडला आणि मलादेखील सांगितला.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भाने ‘क्रिप्टोकरन्सी अ‍ॅण्ड रेगुलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल, 2021’ यावर पुरेशी चर्चा न झाल्यामुळे तूर्तास तरी याबद्दल संभ्रमावस्था आहे. अर्थमंत्र्यांनी दिलेल्या सूतोवाचाप्रमाणे भारतीय रिझर्व बँकसुद्धा डिजिटल करन्सी आणण्याच्या विचारात आहे. सध्यातरी बिटकॉइन आणि क्रिप्टो करन्सीवर सेबीचे लक्ष असेल असे संकेत आहेत. दोन्ही बाजूंनी या बिलावर चर्चा होणे गरजेचे आहे. काही तज्ज्ञांच्या मते हे आभासी चलन असल्यामुळे याचा दहशतवादी कारवाया करण्यासाठी आणि पैसा मिळवण्यासाठी वापर होऊ शकतो. काही देशांमध्ये यावर पूर्णपणे बंदी आणण्यात आली आहे. देशाची अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरची अर्थव्यवस्था धोक्यात येऊ नये. यासाठी क्रिप्टो करन्सी वर योग्य ते निर्बंध आणून कारवाई करावी लागणार असे काहींचे मत आहे.

- Advertisement -

या काही गोष्टींचा विचार केल्यानंतर असे लक्षात येते की, हे आभासी चलन आपण विकत घेतो त्यावेळी सर्व व्यवहार ऑनलाइन होत असतात. अनेक खासगी कंपन्या यामध्ये उतरल्यामुळे नेमका याचा मुख्य मालक कोण..? हे आपल्या लक्षात येत नाही. इथेरियम ब्लॉकचेन असल्यामुळे विनिमय करताना किंवा मध्येच जर काही झाले तर लोकांचे पैसे कोण देणार…? हादेखील प्रश्न आहे. एकूणच काय तर विश्वासार्हता यामध्ये किती प्रमाणात आहे हे युवकांनी तरी गुंतवणूक करताना तपासावे लागणार आहे. तसे केले नाही तर तोटा ठरलेला आहे. काही मित्र तर वेगवेगळ्या जाहिराती पाहून यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात आहे ते गमावून बसू नये म्हणजे झाले.. More risk more profit हे वाचायला सोपे असते, पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते हे लक्षात घ्यावे लागेल.

असे म्हणतात की रोजगार गेल्यानंतर इतर मार्ग शोधले जातात. अगदी त्याचप्रमाणे अनेक तरुण असे आहेत जे सध्या शेअर बाजाराकडेदेखील वळले आहेत. ज्यांच्याकडे थोडेथोडके बँकबॅलन्स आहे. ते शेअर मार्केटची वाट धरत आहेत. अर्थात इथेही झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग आहे. पण पुरेसा अभ्यास नसेल तर नुकसान त्यापेक्षा जास्त होऊ शकते. युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम तसेच इतर समाज माध्यमांचा आधार घेऊन आज हजारो जाहिराती करणारे व्यावसायिक आपल्या समोर दिसतात. शेअर मार्केटचे क्लास, सेमिनार देणारे स्वयंघोषित अर्थशास्त्रज्ञ असा फुगा फुगवतात की युवकांनी त्याकडे वळले पाहिजे.

‘रिस्क है, तो इश्क है’ असा एखाद्या वेब सिरीज आणि चित्रपटातला डायलॉग मारत काही लोक आपोआप तिकडे जातात हेही तितकेच खरे. पण असे डायलॉग मारून चालत नाही. आपण पाहतो की, काही महिन्यांपासून सेन्सेक्स हा कधी एक हजाराने झेप घेतो तर कधी त्यापेक्षा जास्त पटीने खाली येतो. अनेक अर्थतज्ज्ञांचे अंदाजदेखील मागच्या काही महिन्यांमध्ये चुकले आहेत. तिथे आपल्यासारखा नवखा गेल्यानंतर नुकसान अटळ आहे. आज आपण काही हजार रुपये गुंतवणूक केली की उद्या लगेच आपल्याला त्याचा परतावा मिळावा असे स्वप्न पाहणारे अनेक असतात. पण त्या स्वप्नांच्या बाहेरची दुनिया नुकसान झाल्यावरच दिसते.

संकट समोर आले की मार्ग सापडतात हे जरी खरे असले तरी आभासी जगामध्ये जगत असताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. मग क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला, आपल्या देशामध्ये त्याची काय परिस्थिती आहे. तसेच त्यातून आपले नुकसान होऊ शकते का..? या सगळ्या गोष्टींचा सूक्ष्म अभ्यास महत्वाचा आहे. तेच शेअर बाजाराच्या बाबतीतदेखील. तूर्तास तरी आपल्याजवळ असणारी थोडीबहुत पुंजी ही एखाद्या चांगल्या म्युच्युअल फंडात किंवा चांगल्या कंपनीच्या शेअरमध्ये तज्ज्ञांचा सल्ला घेऊन गुंतवायला हरकत नाही. कारण भारतीय भांडवली बाजारावर सेबीचे नियंत्रण असल्याकारणाने आपला पैसा सुरक्षित आहे याची खात्री मिळते.

अन्यथा नियंत्रण नसणार्‍या खासगी संस्था आपला पैसा कधी घेऊन जातील हे सांगता येत नाही. याचे जिवंत उदाहरण द्यायचे झाले तर आठ महिन्यांपूर्वी ऑसमॉस नावाची एक कंपनी आली होती. ब्लॉकचेनमार्फत गुंतवणूक करून पैसे मिळवून देणार होती, यात अनेक तरुणांनी गुंतवणूक केली. काही लोकांना फायदा झाला पण नंतर ज्यांनी ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना लाखो रुपयांचा तोटा झाला. त्यामुळे पर्याय अनेक उपलब्ध असतात फक्त खात्रीशीर आणि पूरक गोष्टींचा अभ्यास करून त्यामध्ये उतरले पाहिजे. अन्यथा नुकसान सहन करावे लागते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -