घरफिचर्ससारांशदिवस दिवाळीचे...

दिवस दिवाळीचे…

Subscribe

सगळं गाव जेव्हा दिवाळीच्या स्वागताच्या तयारीत गजबजलेलं असायचं तेव्हा आमचं घर मात्र अगदी संध्याकाळचा अंधार पडेस्तोवर शांत शांतच असायचं. सगळे मळ्यातून यायचे मग चूल पेटायची. दिवसभराचे काम करुन स्वयंपाकपाणी उरकून मग रात्री उशिरापर्यंत आई घरातल्या भिंती पोचारायची. पहाटे उठून ओट्यावर धोपटणे घेऊन धोपटत असायची. त्या आवाजानेच मला जाग यायची. पुढचे काही दिवस असेच शेतातील कामे सांभाळून रात्रीच्या वेळी एकेक फराळाचे जिन्नस होत राहायचे.

पावसाचा परतीचा प्रवास सुरू झालेला असतो. वातावरणातील गारवा हळूहळू वाढायला सुरुवात होते. रान अजून हिरवंगारच असतंय. सकाळी हलकं हलकं धुकं शिवारभर पसरत जातं. गवताच्या पात्यावर दवबिंदू थबकलेले असतात. सकाळच्या कोवळ्या उन्हासोबत हवेत एक गंध पसरलेला असतो. आपल्या चहुबाजुंनी आपण त्या गंधाने वेढलेलो असतो. कितीही श्वास भरुन हा गंध घेतला तरी मन भरत नाही. दसर्‍याच्या मागचा पुढचा हा काळ असतो. दिवाळी आता अवघ्या पंधरा दिवसांवर आलीय त्याचा संकेत हे वातावरणच देत असतंय.

दिवाळीच्या सणाचा आनंद असला तरी या काळात शेतीच्या कामांची एवढी धांदल उडालेली असते की हा आनंद मनसोक्त उपभोगायला शेतकर्‍याला मिळत नाही. आई, वडील, भाऊ भावजया सगळे कामात गुंतलेले असतात. भाताची सोंगणी, टोमॅटोची खुडणी, हरभरा, गहू पेरणीसाठी रानाची बांधणी अशी कितीतरी कामे एकाच वेळी आलेली असतात. ही कामे उरकता उरकत नाहीत म्हणून प्रत्येक जण नुस्ता धावपळीत असतो. शाळेला सुट्ट्या लागलेल्या असतात. मनात दिवाळीचे इमले बांधायचे काम सुरू झालेले असते. आपण मामाच्या घरी कधी जायचे! असा रप लावित मी आईच्या मागे लागलेलो असतो. वडील फारसं लक्ष देत नाहीत. भाऊ ‘आधी मळ्यातलं काम करायला मदत कर‘ म्हणून दटावत असतात.

- Advertisement -

मी ही भाताच्या पेंढ्या बांधायचे अन ते सडकायचे काम करु लागतो. ते काम नीट जमत नाही म्हणून वडील अन भाऊ अधिकच कावत असतात. मी जमेल तसे करीत असतो. लक्ष मात्र गावातल्या मित्रांकडे लागलेलं असतं. सुट्टीच्या दिवसात मित्रांनी क्रिकेटचे सामने भरवलेले असतात. मला तिकडे जायचं असतं, पण जाता येत नाही म्हणून मनातून हिरमुसलेलो असतो. अधुन मधून आई जवळ घेते. पदरानं तोंड डोके पुसते अन कधी कधी गावांत जायला परवानगीही देते. त्यावरुनही भाऊ भावजया आम्हा मायलेकांना बरेच बोल लावत असतात. कामापासून सुटका झाल्यावर मी शेताजवळच्या पायवाटेने गावाकडे धावत सुटतो.

गावाला चहुबाजुंनी दिवाळीचे वेध लागलेले असतात. ओटे खणणे, त्यावर पाणी टाकणे, चिखल सपाट करणे, धोपटणीचे धोपटणे, भिंती पोचारणे ही धांदल उडालेली असते. शेजारच्या गुरुजींच्या सिमेंट क्राँक्रीटच्या घराला रंग देणे, खिडक्या दरवाजांना ऑईल पेंटचा रंग देणे सुरू झालेलं असतंय. त्या रंगाचाही गंध ही कायम लक्षात राहील असाच असतो. शाळेतल्या माझ्या जवळच्या मित्रांमध्ये मीच शेतीची पार्श्वभूमी असलेला. बाकी सगळ्यांचे वडील शिक्षक, खाटीक, दुकानदार, तलाठी, किराणा दुकानदार, चांभार, न्हावी असे नोकरदार आणि व्यवसाय करणारे. त्यामुळे त्यांच्या आयांची दिवाळीची तयारी खूप आधीपासूनच सुरू झालेली. त्यांच्या घरात गेले की रव्याचा लाडू, चिवडा, शेवया, करंज्या, अनारसे या सगळ्यांचा घमघमाट येत असायचा. मी गेलो की मलाही या फराळाचा आस्वाद घेण्याचा आग्रह व्हायचा.

- Advertisement -

सगळं गाव जेव्हा दिवाळीच्या स्वागताच्या तयारीत गजबजलेलं असायचं तेव्हा आमचं घर मात्र अगदी संध्याकाळचा अंधार पडेस्तोवर शांत शांतच असायचं. सगळे मळ्यातून यायचे मग चूल पेटायची. दिवसभराचे काम करुन स्वयंपाकपाणी उरकून मग रात्री उशिरापर्यंत आई घरातल्या भिंती पोचारायची. पहाटे उठून ओट्यावर धोपटणे घेऊन धोपटत असायची. त्या आवाजानेच मला जाग यायची. पुढचे काही दिवस असेच शेतातील कामे सांभाळून रात्रीच्या वेळी एकेक फराळाचे जिन्नस होत राहायचे.

दिवाळी अशी सालोसाल येत राहिली. लक्ष्मीपूजनाच्या वेळी ताटात घरातील सर्व धन ठेवायची पध्दत आहे. ते ताट फारसं कधीच भरलं नाही. सालोसाल काबाडकष्ट करणार्‍यांवर लक्ष्मी तशी मनापासून कधीच प्रसन्न झाली नाही. दिवाळीचं काम करता करता आई ओव्या सांगत राहायची..

दिवाळीबाई तुझं दिवाळं काढील
चोळी अंजिरी फाडील
गाय खुट्याची सोडील

मिळेल त्या उत्पन्नात जमेल तसा सण साजरा करणं आणि अभावाचं दु:ख उगाळीत न बसता आहे त्यात आनंदानं जगणं हा धडा शेतकरी बाया कायमच शिकत आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -