घरफिचर्ससारांशभटक्या विमुक्तांची प्रथामुक्ती !

भटक्या विमुक्तांची प्रथामुक्ती !

Subscribe

भारतासारख्या बहुसांस्कृतिक विविधता असणार्‍या देशांमध्ये वेगवेगळ्या संकृती, प्रथा-परंपरा, चालीरीती आढळतात. काही प्रथा व परंपरा मानवी कल्याणासाठी, विकासासाठी आहेत तर बर्‍याच प्रथा व रूढी मानवतेला काळीमा फासणार्‍या आहे. मानवी मूल्यांचा अंत करणार्‍या अशा प्रथांचे विवेचन वाचल्यानंतर मानवी मनाचा थरकाप उडतो. अशा घटनांमध्ये संविधानिक अधिकार व मूल्यांची पायमल्ली झाल्याचे स्पष्ट दिसते.अशाच काही प्रथा भटक्या विमुक्त समाजामध्ये आपल्याला आढळून येतात.

भटक्या विमुक्तांचा मागोवा घेताना असे लक्षात येते की, 1871 The Criminal Tribes Act, 1871 मध्ये इंग्रजांनी चोर कायद्याअंतर्गत भारतातील 80 जमातींना चोर जमाती म्हणून घोषित केले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातील 14 जमातींचा समावेश होतो. छप्परबंद, माकडवाले, जोशी, कंदील वाले, कांजर भाट इ. समुदायांचा समावेश होतो. या समुदायांवर अनेक वर्ष अन्याय-अत्याचार होत राहिला. काही ठिकाणी इंग्रज प्रशासनाने तारांचे कुंपण बांधून त्यामध्ये या समुदायाला ठेवण्याचा प्रयत्न केला. स्वस्तातले मजूर म्हणून त्यांचा उपयोग करण्यात आला, काही ठिकाणी शिक्षण, आरोग्यासारख्या सुविधाही दिल्या. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1951 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोलापूर येथे तीन तारेचे कुंपण प्रतीकात्मकरित्या कापून या जमातींना चोर कायद्यातून मुक्त केले. त्यांनाच विमुक्त जमाती असे म्हणतात.

यामधील कांजर भाट नावाची जमात तिचे मूळ स्थान राज्यस्थानमधील असून सध्या गुजरात, महाराष्ट्र या राज्यांमध्ये अस्तित्व दिसते. महाराष्ट्र मुख्यत्वेकरून पिंपरी-चिंचवड, अंबरनाथ, कोल्हापूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निवासी आहे. कंजर भाट या जमातीतील कौमार्य चाचणी या रूढी बाबत प्रामुख्याने या लेखात संदर्भ घेतला आहे.

- Advertisement -

अत्यंत गरीब व उपेक्षित असलेला हा समुदाय मुख्य प्रवाहापासून लांब होता. यामध्ये कौमार्य चाचणी नावाची प्रथा अत्यंत क्रूर पद्धतीने राबविताना आपल्याला आधुनिक काळातही बघावयास मिळते. समाजातील वयोवृद्धांच्या मते ही परंपरा चारशे वर्षे जुनी आहे. ही चाचणी केली नाही तर समाजामध्ये वाळीत टाकले जाते. विवाह प्रसंगी. मृत्यु प्रसंगी या कुटुंबास कोणी बोलवत नाही किंवा त्यांच्या संपर्कात कोणी जात नाही. ह्या चाचणीचे विश्लेषण करताना असे लक्षात येते नवविवाहित जोडपे एखाद्या विशिष्ट खोलीमध्ये किंवा लॉजमध्ये नेले जाते त्या ठिकाणी व्यवस्थित तपासणी करून कोणतीही टोकदार वस्तू नसल्याची खात्री केली जाते. शारीरिक संबंधांमधून चादरीवर पडलेल्या रक्ताच्या डागा वरून महिलेची पवित्रता तपासणी जाते. पतीला तुला दिलेला माल कसा होता. खरा होता की खोटा आहे. चांगला होता की वाईट असे विचारले जाते व मुलाला तीन वेळेस खरा, खरा, खरा किंवा खोटा, खोटा, खोटा असे सांगावे लागते. या चाचणीमध्ये जर या जोडपे यशस्वी झाले तर आनंदाने नांदताना दिसतात.मात्र जर ही पद्धत अपयशी झाली तर त्या महिलेची आयुष्यभर अवहेलना होते व कमी दर्जाचे समजले जाते.

भारतासारख्या लोकशाही देशांमध्ये संविधानाने प्रत्येक व्यक्तीला समान संधी व दर्जाची हमी दिलेली आहे. तसेच मूलभूत अधिकार संरक्षण यंत्रणा विस्तृतपणे दिली आहे. तरीही या पद्धतीचा अन्याय,अत्याचार आपणास बघावयास मिळतो. प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रतिष्ठेसह जगण्याचा अधिकार एकविसाव्या कलमांमध्ये दिलेला आहे. स्वातंत्र्य, समता बंधुता, शिक्षण तसेच स्वतःला कोणत्या रुढी परंपरा व धार्मिक सामाजिक बंधने घालावयाची याबाबतही अधिकार देण्यात आलेला आहे. तसेच या संविधानात वैज्ञानिक दृष्टिकोन कसा निर्माण व्हायला पाहिजे व त्या माध्यमातून मानवी जीवन अधिक चांगले नैतिक व मूल्य संवर्धन कसे होईल याबाबत स्पष्टता आहे. तरीही भारतात उपेक्षित, वंचित, महिला, वृद्ध, बालके ज्यांची या प्रकारच्या घातक रूढी, परंपरांच्या माध्यमातून मानवी मूल्यांची अवहेलना होताना स्पष्ट दिसते. या समाजातील काही शिकलेल्या व संविधानिक मूल्य मानणार्‍या अनेकांनी या प्रथेविरुद्ध आवाज उठविलेला आहे.

- Advertisement -

अरुणा आणि कृष्णा इंद्रेकर यांच्या विचारावर महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा होता.त्यामुळे त्यांनी या प्रथेला 1996 मध्ये विरोध केला व कोर्ट मॅरेज केले. नंतरच्या काळात विवेक तमाइचेकर, सिद्धांत इंद्रेकर, प्रियंका तमाइचेकर या तरुणांनी इंटरनेट, फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून या प्रथेविरुद्ध काम करायला सुरुवात केलेली आहे. या मोहिमेला त्यांनी ‘Stop the V-ritual’, असे नामकरण केलेले आहे. यासाठी या तरुणांनी भारतीय संविधानातील मानवी मूलभूत अधिकार कलम 14, 15, 21 यांचा आधार घेत या प्रथेला विरोध केलेला आहे. सुरुवातीला कमी असणारा या तरुणांचा गट आता 50 पेक्षा जास्त झाला आहे. हेच तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करत आहे. समाजातील काही वृद्ध त्यांना मदत करतात तर काही त्यांना धमक्या देतात, हे तरुण आता वेगवेगळ्या संस्थांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, वेगवेगळ्या गटांमध्ये जाऊन या प्रथेविरुद्ध जनमत तयार करण्याचे काम करत आहेत. या मोहिमेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचाही पाठिंबा आहे.

भारतीयांना जुन्या प्रथा व परंपरांची आवड व अभिमान वाटतो. त्याच कशा जपता येतील यामध्ये भारतीयांना अभिमान वाटतो. मात्र हे बघत असताना या प्रथा-परंपरा खरंच वैज्ञानिक दृष्टिकोन अनुसरून, मानवतेच्या हिताच्या व संविधानिक चौकटीत बसणार्‍या आहेत की नाही हे बर्‍याचदा बघितल्या जात नाही. त्यामुळे या प्रथा मोठ्या प्रमाणावर समाजव्यवस्थेत चालू असताना आपल्याला दिसतात, तसेच या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे प्राबल्य कसे वाढेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न व साहित्य निर्माण होणे आवश्यक आहे. त्यामुळे समाजव्यवस्थेत विषमता कमी होईल, मानवी अधिकारांची पायमल्ली न होणारा समाज निर्माण होणे आवश्यक आहे.

–प्रा. डॉ. घनश्याम जगताप

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -