घरफिचर्ससारांशउद्योजकांचे काल्पनिक कार्यकारी मंडळ

उद्योजकांचे काल्पनिक कार्यकारी मंडळ

Subscribe

कोरोना महामारीमुळे सण 2020 आणि सण 2021 हे उद्योजकांसाठी फार कठीण गेलेले आहे. माझ्या व्यवसायाच्या निमित्त रोजच अनेक उद्योजकांशी व व्यावसायिकांशी संबंध येत असतो विशेषतः छोटे उद्योजक, ज्यांनी कोरोना येण्यापूर्वी नुकतीच व्यवसायाची सुरुवात केलेली होती, त्यांना ह्या महामारीचा मोठा फटका बसला आहे. नुकताच रिझर्व्ह बँकेच्या अहवालातसुद्धा कोरोना महामारीचा भारतीय अर्थव्यवस्थेला इतका मोठा फटका बसला आहे की, त्यातून पूर्णपणे बाहेर यायला 2033 साल उजाडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो ही केंद्र शासनाच्या गृह खात्याची एक शाखा आहे. तिचा अहवाल नुकताच माझ्या वाचण्यात आला. 2020 ह्या वर्षांमध्ये 12000 छोटे व्यावसायिक व उद्योजक यांनी आत्महत्या केलेल्या आहे.

त्याच अहवालात असे सुद्धा म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे अनेक छोटे उद्योग कायमस्वरूपी बंद झाले, काही तात्पुरते बंद झाले आहेत, परंतु याची राष्ट्रीय आकडेवारी उपलब्ध नाही. वरील माहिती ही फक्त छोटे उद्योग व व्यावसायिक यांनी केलेल्या आत्महत्येची आहे. त्याच अहवालात एक भयानक वास्तवता दिलेले आहे की, ह्याच कोरोनाच्या 2020 वर्षात देशभरात एकूण 1,53,000 नागरिकांनी आत्महत्या केलेल्या आहे. याच अहवालात त्याची कारणेसुद्धा दिलेली आहेत, त्यात वेगवेगळी कारणे आहेत, जसे की, कौंटुंबिक वाद, आजारपण, अमली पदार्थाची व्यसनाधीनता, वेळेत लग्न न होणे, प्रेमसंबंध, बेरोजगारी, कर्जबाजारीपणा, परीक्षेत आलेले अपयश, गरिबी. आपल्याकडे शेतकरी आत्महत्या हा सुद्धा एका गंभीर विषय आहेच आणि शेतीसुद्धा एका उद्योग आहे ज्यावर भारताची 70 टक्के अर्थव्यववस्था अवलंबून आहे.

- Advertisement -

प्रश्न असा आहे की, लोक आत्महत्या करण्यासारखी टोकाची भूमिका का घेतात. मी विशेष करून उद्योजक आणि व्यावसायिक यांचे संबधी हा लेख लिहीत आहे. उद्योजक किंवा कुठलाही व्यावसायिक म्हटला की मग तो छोटा असो किंवा मोठा असो, त्याच्या जीवनात रोजच्या समस्या ह्या असतातच, परंतु समस्यांवर मात करून जो पुढे जातो तो यशस्वी उद्योजक होतो. मोठे उद्योजक किंवा मोठ्या कंपन्या ह्या कार्यकारी मंडळाची नेमणूक करतात ( बोर्ड ऑफ डायरेक्टर्स) त्यात तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करतात, कारण योग्य मार्गदर्शन त्यांच्याकडून नेहमी कंपनीला मिळत असते. कुठलीही समस्या आली तरी व्यवसायात किंवा उद्योगात तो कुणाची तरी मदत घेतो आणि त्या मदतीसाठी त्याला काही पैसे पण द्यावे लागतात, परंतु विचार करा की तुमचे एखादे काल्पनिक कार्यकारी मंडळ (बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ) जर तुम्ही निर्माण केले आणि त्यांनी तुम्हला विनामूल्य सल्ला दिला तर काय होऊ शकते. मला नेहमी काही समस्या आली तर मी माझे स्वतःचे एक काल्पनिक कार्यकारी मंडळ तयार केलेलं आहे.

त्या कार्यकारी मंडळासमोर मी माझी समस्या ठेवतो. ह्या माझ्या काल्पनिक कार्यकारी मंडळात अनेक लोकांची टीम आहे बरं का. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन बुवा काल्पनिक कार्यकारी मंडळ. तुमच्या जीवनातही कुठली एखादी समस्या असेल तर तुम्हाला ती समस्या एका कागदाच्या पानावर लिहायची आहे आणि त्या कार्यकारी मंडळाच्या एखाद्या सदस्याला तुम्हाला विचारायची आहे. की जर ही समस्या जर तुला आली असती तर तू कसा त्याला सामोरा गेला असता. आणि बघा मित्रांनो तुम्हाला त्याचे उत्तर पटापट मिळायला लागेल फक्त तुम्हाला तुमच्या काल्पनिक कार्यकारी मंडळात कोणकोणत्या व्यक्ती हव्या आहेत, याची जाणीवपूर्वक चोखंदळपणे निवड करायची आहे. कारण त्या व्यक्तींची निवड करताना त्या व्यक्तींनी कुठल्या समस्येवर कशा प्रकारे मात केली आहे, याचे ज्ञान व माहितीसुद्धा तुम्हाला असणे आवश्यक आहे. चला तर मित्रांनो आपण अशा काही काल्पनिक कार्यकारी मंडळाची निवड करू.
उद्योजकांच्या काल्पनिक बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये खालील व्यक्तींचा समावेश असावा असे मी सुचवू इच्छितो, पण लक्षात

- Advertisement -

घ्या, हे माझे काल्पनिक कार्यकारी मंडळ आहे, यात तुम्ही तुमच्या सोयीनुसार, आवडीनुसार तुमचा जीवनात ज्या कुणी व्यक्तीचा प्रभाव असेल त्या व्यक्तींची नेमणूक करू शकता.

1. छत्रपती शिवाजी महाराज : छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहे. त्यांनी अतिशय कठीण परिस्थितीत स्वराज्याची स्थापना केली. शून्यातून विश्व निर्मिती, कामाचे नियोजन, आहे त्या परिस्थितीत लोकांच्या क्षमता ओळखून त्यांना प्रशिक्षण देऊन जबाबदारी सोपवणे, अन्याय करणार्‍या विरुद्ध कडक कारवाई, गनिमीकावा, स्त्रियांचा आदर, संयम, वेळ प्रसंगी अनेक तह केले. उद्योजकाला सुद्धा वेळोवेळी अनेक तह करावे लागतात, बदल करावे लागतात, बदलाला सामोरे जावे लागते. कर्मकांडाला फार महत्व दिले नाही, राजेंच्या मोठ्या लढाया ह्या अमावश्या च्या दिवशी झाल्या व त्यांनी त्या जिंकल्यासुद्धा आहेत.

2)भगवद्गीता : मनाचे नियंत्रण, मनाचे सामर्थ्य यासाठी भगवद्गीता खूप महत्वाची आहे. सर्व युद्धकलेत पारंगत असा धनुर्धारी अर्जुनाचे गांडीव धनुष्यसुद्धा खाली गळून पडले जेव्हा रणांगणावर त्याच्यासमोर भाऊ, काका आणि नातेवाईक होते व त्यांच्याशी युद्ध करायचे होते. उद्योग व्यवसायातील सर्व स्किल तुमच्याकडे आहे, तुम्ही खूप ज्ञानी हुशार आहात, तरी पण तुमच्या मनाचा ताबा जर भावनिक गोष्टींनी घेतला तर तुमचा उद्योग व्यवसाय यशस्वी होणार नाही. तुमच्या मनावर जर तुमचे नियंत्रण नसेल तर कुठलेही युद्ध तुम्हाला जिंकता येणार नाही. उद्योजकता एक युद्धच आहे ते जर जिंकायचे असेल तर तुम्हाला तुमच्या मनावर नियंत्रण हवेच. जेव्हा कधी तुम्ही भावनिक झाले असाल तेव्हा तुम्हाला अर्जुनाला आठवावे लागेल आणि भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला मनावर नियंत्रण कसे ठेवायचे हे शिकवले व युद्ध जिकंलेही.

हरिपाठातील अठराव्या अभंगात सुद्धा ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मनोमार्गे गेला तो तेथेचि मुकला हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य, चंचल मनाला काबूत करून त्याची स्थिरता करणे हे महत्वाचे काम तुम्ही तुमच्या उद्योग व्यवसायात करायचे आहे. भगवान श्री कृष्णाने कर्मयोगाला फार महत्व दिलेले आहे. जरी अर्जुनाला त्यांनी योग्य मार्गदर्शन केले तरी प्रत्यक्ष कर्म हे अर्जुनाला करायला लावले. स्वतः करणे आणि अनुभव घेणे याला फार महत्व आहे. क्रांतिकारी विचारवंत भैयुजी महाराज हे युवकांना अध्यात्मिक मार्ग सांगायचे, परंतु जेव्हा स्वतःवर वेळ आली तेव्हा तेसुद्धा मनाला काबूत ठेऊ शकले नाहीत आणि त्यांनी आत्महत्या केली. म्हणून मनाची स्थिरता ठेवणे ही उद्योजकाच्या जीवनातील फार महत्वाची गोष्ट आहे.

3. अब्राहम लिंकन : चिकाटी आणि धैर्य हे उद्योग व्यवसायात फार महत्वाचे असतात. 1835 मध्ये लग्न ठरवून साखरपुडा झाला, परंतु लग्नाआधीच प्रेयसीचा अकाली मृत्यू झाला. आठ वेळेस अमेरिकेतील सिनेटची निवडणूक हरले, नैराश्याचा तीव्र झटका आला त्यामुळे सहा महिने अंथरुणाला खिळून होते, व्यवसायात अनेकदा नुकसान झाले, परंतु चिकाटी आणि धैर्य ह्या गोष्टींच्या जोरावर 1860 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष झाले. नवीन व्यवसाय उद्योग सुरू केला तर लगेच यश येत नाही, त्यासाठी चिकाटी आणि धैर्य हे असणे जरुरी आहे. उद्योजकांच्या जीवनातसुद्धा अनेक समस्या ह्या येतच असतात, फक्त अब्राहम लिंकन यांच्यासारखी चिकाटी अंगी बाळगणे महत्वाचे आहे.

4. महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला : नेतृत्व कसे करायचे याचे उत्तम उदाहरण म्हणजे ह्या दोन व्यक्ती. साधी राहणी आणि उच्च विचार हे दोघांचे मूलतत्त्व. उद्योग व्यवसायातसुद्धा तुम्हांला लोकांचे नेतृत्व करायचे असते. लोक जोडायचे असतात, संघटन करायचे असते. उद्योग व्यवसायात तुम्हाला नेतृत्व गुण अंगी बाळगणे फार महत्वाचे आहे.

5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : ज्ञानाचा अथांग महासागर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. कुठलीही समस्या असो तिचे निराकरण करायचे असेल तर आधी ती नीट समजून घ्यावी लागते. जोपर्यंत त्या समस्यांच्या मुळाशी आपण जात नाही तोपर्यंत त्या सुटू शकत नाहीत. वाचन, अभ्यास, विषय समजून घेणे व त्यांनतर त्यावर भाष्य करणे, विषयाची दोन्ही अंगे समजून घेऊन निर्णय घेणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार उद्योजकाला फार मार्गदर्शक आहेत. तुमच्या कर्मचार्‍यांना समानतेची वागणूक देणे हे तुमचे महत्वाचे काम असते. तुमच्या व्यवसायातील स्पर्धकांचा सखोल अभ्यास करणे, तुमच्या उत्पादनात नाविन्यता आणणे, व्यवसायिक बदलांना अगोदर ओळखणे व त्याला सामोरे जाणे हे केवळ अभ्यासातून शक्य आहे.

6. स्वामी विवेकानंद : स्वामी विवेकानंद तरुणांना नेहमी सांगतात की, तुमच्या जीवनात दोन दिवस हे फार महत्वाचे असतात. पहिला दिवस ज्या दिवशी तुमचा जन्म झाला आहे तो दिवस व दुसरा दिवस म्हणजे तो दिवस ज्या दिवशी तुम्हाला साक्षात्कार होईल की, माझा जन्म कशासाठी झाला आहे? मला उद्योजक किंवा व्यावसायिक होऊन नेमके काय साध्य करायचे आहे हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायचा आहे. स्वतःचे एक मूलभूत लक्ष असले की, ते प्राप्त करण्यावर आपले लक्ष केंद्रित करायचे आहे. समस्या कुठलीही आली तरी आपले अंतिम ध्येय काय आहे हे नेहमी लक्षात ठेवायचे आहे.

7. मेल्वीन जोन्स : अमेरिकेत मेल्वीन जोन्स नावाचा एक विमा व्यावसायिक होता. तो व्यवसाय करत असताना नेहमी आजूबाजूला जे कुणी गरीब, गरजू, वंचित आहेत त्यांना मदत करायचा. अनेक लोकांना मदतीची गरज आहे आणि मी एकटा ती पूर्ण करू शकत नाही म्हणून त्याने समव्यावसायिक व इतर व्यवसायाचे लोक एकत्र करून 1917 साली लायन्स क्लब इंटरनॅशनल ह्या संस्थेची स्थापन केली. ह्या संस्थेला शंभर वर्षं पूर्ण झाली आहेत आणि आज 220 देशामध्ये ह्या संस्थेचे जाळे पसरले आहे. जगातील एक नंबरची सेवाभावी संस्था म्हणून लायन्स क्लब ही गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मी ही ह्या संस्थेत 2010 सालापासून काम करत आहे. ह्या संस्थेत मी दाखल होण्याचे एकमेव कारण म्हणजे ह्या संस्थेसोबत जर तुम्हाला काम करायचे असेल तर इथं तुमचा धर्म, जात, पंथ, संप्रदाय, लिंग हे विचारले जात नाही, तुम्हला फक्त सामाजिक कार्याची आवड असेल तर तुम्ही ह्या संस्थेशी जोडले जाऊ शकता.

जरी 220 देशात ही संस्था पसरली असेल तरी कुठल्याही कार्यक्रमाची सुरवात त्या देशाचे ध्वज वंदन करून केली जाते. तुमच्या आजूबाजूला जे कुणी गरजू आहेत, त्यांना मदत करायचे काम ही संस्था करते. आपल्या भारतातसुद्धा अनेक समाजसेवक होऊन गेले आहेत आणि आतासुद्धा अनेक जण काम करत आहेत, परंतु त्याचा विस्तार फक्त काही राज्यांमध्ये आहे. परंतु एखाद्या मोठ्या जागतिक दर्जाच्या कंपनीची जशी कॉर्पोरेट यंत्रणा असते तशी लायन्स क्लब संस्थेची यंत्रणा आहे आणि म्हणून तिचे जाळे 220 देशात पसरले आहे. सर्व्हिस आणि लीडरशिप व इतर अनेक गोष्टीचे प्रशिक्षण यामुळे माझ्या अनेक समस्या सोडविण्याचे काम ही संस्था करत आहे आणि आज जगभरातील 14 लाख लायन्स सदस्यांशी मी जोडला गेलो आहे. जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात माझ्या भारतीय नागरिकांना काही मदत, समस्या आली तर त्यांना मदत करण्याचे नेटवर्क मला उपलब्ध झाले आहे. इंडिया आणि भारत यातील फरकसुद्धा मला ह्या संस्थेमुळे समजला. अजूनसुद्धा ग्रामीण आदिवासी भाग हा मूलभूत गरजांपासून किती वंचित आहे याचे भान ह्या संस्थेमुळे मला मिळत आहे.

8. गुगल आणि इंटरनेट : आता तुम्ही म्हणाल गुगल आणि इंटरनेटचा तुमच्या कार्यकारी मंडळात समावेश का करायचा. गुगल आणि इंटरनेट म्हणजे माहितीचा खजिना तुम्ही त्याचा वापर इष्ट गोष्टी करता करता की, अनिष्ट गोष्टीसाठी करता हे तुम्ही ठरवायचे आहे. कारण थोर विचारवंत वामनराव पै सांगून गेले आहेत, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. गेल्या 25 वर्षात इंटरनेटवर जेवढी माहिती उपलब्ध झाली आहे ती मागील 2000 वर्षात उपलब्ध नव्हती, असा एक सर्वे आहे. म्हणजे 25/30 वर्षांपूर्वी माहिती मिळवायची तर त्याला खूप कष्ट घ्यावे लागायचे, परंतु आता एका क्लिकवर तुम्हाला माहिती उपलब्ध आहे. मला तरी काही समस्या आली तर मी लगेच गुगलवर टाकतो आणि मला त्याची जवळजवळ 80 टक्के माहिती मिळून जाते की, ज्यामुळे सर्वांगीण विचार करून मी योग्य निर्णय घेऊ शकतो.

ही अशी काही मंडळी माझ्या वैयक्तिक कार्यकारी मंडळामध्ये आहे. मला नेहमी काही समस्या आली की, मी लगेच विचारतो की, ही समस्या वरील व्यक्तींनी कशी सोडविली असती आणि गंमत बघा मला माझ्या समस्यांची उत्तरे पटापट मिळत जातात. तर उद्योजक मित्रांनो आपण कधी आपल्या वैयक्तिक कार्यकारी मंडळाची नेमणूक करत आहात ??? आणि त्या कार्यकारी मंडळात कुणाला घ्यावे हा निर्णय मी तुमच्यावर सोडत आहे. लेखाचा उद्देश हाच आहे की, कुठलीही समस्या सोडविण्याचे सामर्थ्य आपल्या प्रत्येकामध्ये आहे. आणि ह्या जगात तुम्ही एकमेव व्यक्ती नाही की, फक्त तुम्हाला समस्या आहे, तुमच्यासारख्या समस्या अनेकांना होत्या आणि त्यावर त्यांनी यशस्वी मात केलेली आहे. जे कुणीही महापुरुष होऊन गेले ज्यांची इतिहासात नोंद आहे, मग ते कुठल्याही क्षेत्रातील असो त्यांचे आयुष्य हे आरामात गेलेले नाही. त्यांच्या आयुष्याची महत्वाची वर्षे ही संघर्ष करण्यात, समस्यांना सामोरे जाण्यात गेली आहेत, म्हणूनच इतिहास त्याची नोंद घेत आहे आणि घेत राहणार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -