घरफिचर्ससारांशसदैव बहरलेले झाड!

सदैव बहरलेले झाड!

Subscribe

महाराष्ट्रातील सर्वात अतिसुंदर भाग म्हणजे कोकण! हा भाग निसर्गरम्य व मनोहर दृश्यालंकारांनी नटलेला आहे. या भूप्रदेशाचा कोणताही छोटासा भाग घेतला तरी तो मनाला आपल्या विविधतेने भुरळ घातल्याशिवाय राहत नाही; जसे सौंदर्यपूर्ण विविधतेचा साक्षात्कार म्हणजे ‘वेंगुर्ला’. महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग व राज्य मराठी विकास संस्था यांच्या वतीने वेंगुर्ल्याचे सुपुत्र कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या नावाने त्यांच्याच जन्मगावी (वेंगुर्ला उभादांडा) साकारलेल्या भारतातील पहिल्या कवितेच्या गावाचे उद्घाटन आणि लोकार्पण मंगेश पाडगावकर यांच्या भाचेसून डॉ. अनुपमा निरंजन उजगरे यांच्या अध्यक्षतेखाली व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते १० मार्च रोजी उत्साहात संपन्न झाले.

-नारायण गिरप

चार पिढ्यांना ज्यांनी आपल्या कवितांनी भावविभोर व्हायला लावले त्या मंगेश पाडगावकरांचा जीव कवितेत अडकला होता. आता त्यांच्या जन्मगावी त्यांच्या आवडत्या उभादांडा गावच्या समुद्राच्या सान्निध्यात त्यांच्या नावाने कवितेचं गाव होतंय ही आनंदाची गोष्ट असल्याचे डॉ. अनुपमा उजगरे म्हणाल्या, तर सिंधुदुर्गमधील पोम्बुर्ले येथील पुस्तकांच्या गावानंतर भारतातील पहिले कवितेचे गाव वेंगुर्ला-उभादांडा येथे झाले.

- Advertisement -

त्यामुळे उभादांडा हे गाव जगाच्या नकाशावर येईल, असे उद्गार राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे यांनी काढले. १० मार्च १९२९ हा पाडगावकरांचा जन्मदिवस आणि गेल्या १० मार्चला या संकल्पनेची अधिकृत घोषणा मार्गी लागली. शासनाच्या या निर्णयातून स्वाभाविकपणे पाडगावकरांच्या या जन्मगावावरही मराठी रसिकांचे प्रेम अभिव्यक्त करण्याची संधी प्राप्त होत आहे.

‘सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा’

- Advertisement -

या कवितेतून जीवन कसं जगायचं याची शिकवण देत माझ्या या सुहृदाचा कविवर्य मंगेश पाडगावकरांचा माझ्या आयुष्यावर प्रभाव पडला. र्‍हस्व-दीर्घात कसं बोलायचं हे त्यांनी मला शिकवलं. माझी व त्यांची पहिली भेट झाली ती माझ्या २१व्या वर्षी एमएला असताना. १९ ऑक्टोबर १९८८ साली आकाशवाणी मुंबई केंद्रावर घेतलेल्या मुलाखतीतून. एवढ्या मोठ्या जागतिक कीर्तीच्या कवीची मुलाखत मी घेतोय हेच माझ्यासाठी स्वप्नवत होतं.

मुलाखतीनंतर झालेली चर्चा अर्थात मालवणीतूनच होती. कारण मीही वेंगुर्ल्याचा आणि तेही. त्यानंतर कधी कार्यक्रमांतून, कधी माझ्या दिवाळी अंकासाठी कविता आणायला सायनला त्यांच्या घरी जायचो (त्यानिमित्ताने गप्पागोष्टी व्हायच्या) तर कधी दूरध्वनीवरून त्यांचं नि माझं बोलणं होतच राहिलं. मैत्री अधिकच दृढ होत गेली. आज वेंगुर्ल्यात (उभादांडा) कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या नावाने ‘कवितेचे गाव’ म्हणून जो सन्मान त्यांना मिळतो हा वेंगुर्ल्याला लाभलेला मानाचा तुराच आहे.

निर्मळ, निर्व्याज, काव्यानंदाने ओथंबलेलं ८६ वर्षांचं आयुष्य मुक्तपणे जगून ३०.१२.२०१५ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री आनंदयात्री मी आनंदयात्री, हा भाव आयुष्यभर मनीमानसी जपणार्‍या या मनस्वी कवीला मनःपूर्वक अभिवादन!

बदलत्या काळाचा आपल्या सर्वविध प्रतिभाशक्तीमध्ये नवनवोन्मेषशाली तरीही सहजी आविष्कार करण्याची पाडगावकरांची भूमिका त्यांना आनंद देता देता रसिक मनाला धन्य धन्य करून गेली. शब्दांचं गाणं होणं, पाखरंच शब्द होणं, मनाचा वारा होणं, वार्‍याचं आनंदगान होणं ही जणू त्यांची कवित्वाची सहज लयबद्ध झंकारसाखळी होती. आपल्या कवितांमधून लोकांना जीवन जगण्याची उमेद तसेच जीवनात प्रत्येकाला ध्येयपूर्तीसाठी प्रेरणा मिळावी या अनुषंगाने काव्य करण्याचा पाडगावकरांचा प्रयत्न असायचा. जगताना जीवनावर शतदा प्रेम करायला सांगून जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्याचा लाखमोलाचा दृष्टिकोनही त्यांनी दिला.

‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ हे गाणं ऐकताना मनापासून जाणवते ते ‘हे तो बोलणे प्रचितीचे!’ मंगेश पाडगावकर ही कविता प्रत्यक्षात जगले होते. कविता त्यांच्या रक्तात भिनलेली होती. श्वासात सामावली होती. प्रतिभेचं लेणं लेवून आलेल्या या कवीला लहानपणापासूनच कविता स्फुरू लागली होती. सर्वात प्रथम त्यांनी १४व्या वर्षी कविता रचली. त्यांच्या चुलत भावाकडे कविश्रेष्ठ बा. भ. बोरकर आले असता त्यांना ‘काहीतरी ऐकवा’ अशी फर्माईशी झाली.

तेव्हा ते सहज गुणगुणले, ‘तवचिंतनी मन गुंगुनी, मी हिंडतो रानीवनी’ हे शब्द त्यांच्या मनात घर करून बसले. मध्ये काही दिवस गेले. ‘तवचिंतनी …’ त्यांचा पिच्छा सोडेना. एके दिवशी ते कुठूनसे घरी येताना जिना चढताना, जिना उतरणारी सुस्वरूपा त्यांनी पाहिली मात्र त्यांच्या मनात काव्यवीणेची तार झंकारली आणि ते गुणगुणले, ‘तवचिंतनी मन गुंगूनी, मी हिंडतो रानीवनीं

तुज पाहिले तुज वाहिले नवपुष्प हे हृदयातले…

काव्यानंदात निथळत ते घरात शिरले. आईला आपली पहिलीवहिली कविता त्यांनी ऐकवली. यावर आई म्हणाली, जणू रवींद्रनाथ टागोरच आले आहेत असे वाटले. आईच्या या शाबासकीमुळेच की काय उत्तरोत्तर त्यांच्या कवितांना नवनवीन धुमारे फुटत गेले. ‘ज्यांच्या हातात दंडा, त्याला सलाम’ असे म्हणताना १९७८ सालीच त्यांनी काळाच्या कितीतरी पुढे जात वास्तवात राजकारणात नेमके काय चालते याचे यथार्थ वर्णन केले. सलाम हा १९७८चा काव्यसंग्रह, परंतु यातील कवितेत व्यक्त केलेले वास्तव हे आजही तंतोतंत लागू पडते. याचा अर्थ त्यांचा साहित्याबरोबरच राजकारण नि समाजकारण यांचादेखील किती सखोल अभ्यास होता हे दिसून येते.

शेंदूर फासलेल्या दगडाला सलाम,
लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम,
देवळातल्या देवांच्या धाकाला सलाम,
देवांचे व धर्माचे कंत्राट घेणार्‍यांना सलाम,

कविवर्य मंगेश पाडगावकरांनी स्वतःला काव्यलेखनात झोकून दिले व १९५० साली त्यांचा ‘धारानृत्य’ हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांच्या प्रत्येक कवितेत नाविन्यता व दर्जेदारपणा आहे. त्यामुळे त्यांचे काव्यसंग्रह प्रचंड गाजले. मीरा, बबलगम, अफाटराव, गिरणी, शर्मिष्ठा, वात्रटिका, विदूषक, जिप्सी, छोरी, उत्सव, तुझे गीत गाण्यासाठी, बोलगाणी, भोलानाथ, निंबोणीच्या झाडामागे, मुखवटे आदी गाजलेले तसेच यासारखे सुमारे ४० काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. १९७८ साली प्रकाशित झालेल्या ‘सलाम’ काव्यसंग्रहासाठी १९८० मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला.

ललितलेख, समीक्षा तसेच विल्यम शेक्सपियरच्या टेम्पलेट्स, ज्युलिअस सिझर, रोमिओ आणि ज्युलिएट या जगप्रसिद्ध नाटकांचे मराठीत अनुवाद आदींचे श्रेय कविवर्य मंगेश पाडगावकरांना जाते. महाराष्ट्रभूषण, पद्मभूषण आदी अनेक पुरस्कारांनी गौरविलेल्या या कविश्रेष्ठाने मराठी सिनेमासाठी गाणीही लिहिली. असा बेभान हा वारा, शुक्रतारा मंद वारा, या जन्मावर शतदा प्रेम करावे, भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी आदी पाडगावकरांनी लिहिलेली गाणी प्रचंड गाजली. तुझे गीत गाण्यासाठी, श्रावणात घननिळा, अशी पाखरे येती, कुठे शोधिसी रामेश्वर, लाजून हासणे अन्, दिवस तुझे हे फुलायचे अशा कित्येक भावगीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे.

मंगेश पाडगावकरांचे गावावरचे प्रेम, ओढ
चाफ्याच्या झाडाखाली
लाल तळं व्हायचा!
वेंगुर्ल्याचा पाऊस कसा
माया करीत यायचा,
सरींनी लाड करीत
मला कुशीत घ्यायचा!

या कवितेतून अधिक गहिरी होताना दिसते. त्यांची कविता ही पुस्तकातून व्यासपीठावर आली. त्यांची गाणी आकाशवाणीतून प्रत्येकाच्या वाणीत आली. पाडगावकरांची कविता आणि गाणी यांचा प्रवास समाजमान्यतेच्या दिशेने होता होताच तो राजमान्यतेला स्पर्शून पुन्हा रसिकांच्या मनगाभार्‍यात ‘एकांती’ स्थिरावला हे महत्त्वाचे. अशा सदैव बहरलेल्या झाडाला, प्रफुल्लित, नित्यनूतन तरुण वृत्तीच्या प्रेमस्वरूप कविश्रेष्ठाला आणि त्यांच्या काव्याला आमचा सलाम!

-( लेखक ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -