घरफिचर्ससारांशसहकारातून सुखानंद!

सहकारातून सुखानंद!

Subscribe

सहकार क्षेत्रामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याची एक आगळी आणि वेगळी अशी ओळख आहे. आपल्या देशामध्ये आपले महाराष्ट्र राज्य अधिकाधिक समृद्ध होण्यामागे जी अनेक कारणे आहेत त्यामध्ये या सहकार क्षेत्राचा एक अग्रगण्य क्षेत्र म्हणून आपल्याला उल्लेख करावा लागेल. सहकार क्षेत्रामध्ये आपली ही अमोघ प्रगती होण्यामागे आपली वैचारिक समृद्धी व एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती कारणीभूत आहे. एकमेकांना सहाय्य केल्यास अधिकाधिक उन्नती साधता येते हा प्रांजळ विचार आपण स्वीकारला आहे. त्यामुळे सहकारातून उद्धार शक्य झाला आहे.

-अमोल पाटील

कुठलीही गोष्ट प्रत्यक्ष कृतीत उतरण्यापूर्वी ती अगोदर विचाररूपाने स्फुरणे महत्त्वाचे असते हे आपण सर्वजण जाणतोच. सहकार क्षेत्रामध्ये ज्या अनेक बाबींचा समावेश होतो त्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या व ज्याबद्दल प्रकर्षाने विचार करण्याची व विचार मांडण्याची गरज आहे ते क्षेत्र म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्थांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. केवळ आपल्या राज्यापुरताच हा विषय मर्यादित नाही तर संबंध देशामध्ये अलीकडे झपाट्याने वाढत चाललेले हे क्षेत्र आहे हे आपल्यापैकी कुणीही अगदी सहज मान्य करेल. विशेषतः शहरी भागामध्ये जेवढ्या वेगाने हे क्षेत्र वाढत चालले आहे तेवढ्याच वेगाने किंचित अधिक पण कमी नाही अशी आव्हाने या क्षेत्राबाबत निर्माण होताना पाहायला मिळते.

- Advertisement -

मुळात हा घटक मूळ सहकार तत्त्वाच्या नावाखाली आकाराला आला आहे ही मूळ संकल्पना जर अशा संस्थातील प्रत्येक सहभागी घटकाने नीट समजून घेतली तर यातील अनेक आव्हानांना ते यशस्वीरित्या तोंड देऊ शकतात व त्यातून मार्ग काढून आपली सामूहिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवू शकतात, पंरतु काही ठिकाणी असे घडत नाही आणि दिवसागणिक वाद वाढत जाऊन अशा संस्था परस्पर विसंवादाचे केंद्र बनण्याकडे वाटचाल करीत आहेत की काय? अशी विचित्र परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसत आहे. ही परिस्थिती वेळीच थांबवण्यासाठी सुजाण आणि सुज्ञांनी याबद्दल विचार आणि त्या दिशेने कृती करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

एखादा विकासक जेव्हा एखादा रहिवासी प्रकल्प विकसित करतो आणि तो प्रकल्प विक्री करण्यात आलेल्या अशा सर्व रहिवाशांना आपआपल्या सदनिकांचा ताबा मिळतो, तद्नंतर विकासकांकडून सदरील रहिवाशांकडे या रहिवासी प्रकल्पाच्या देखरेखीच्या हस्तांतर प्रक्रियेला आरंभ होतो. या सर्व बाबींचा सर्वसाधारणपणे उल्लेख करण्याचा अर्थ एवढाच की वेगवेगळ्या ठिकाणाहून परस्परांशी क्वचितच परिचित असलेले व बहुतांश परिचित नसलेले रहिवासी आता आयुष्यभर एकाच इमारतीत राहण्यासाठी एकत्र आलेले असतात. मुळात सदनिका जरी भिन्न असल्या तरी इमारत समूह हा एकच असतो व या सर्वांचे सर्वांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असे वैचारिक आदानप्रदान होतच असते.

- Advertisement -

नेमकं याच वेळी या सबंध रहिवाशांनी मूलतः असलेल्या सहकार तत्त्वाला सदैव स्मरणात ठेवून त्या दिशेने वाटचाल करण्याची आणि एक सुंदर विचाराची जडणघडण करत परस्परांशी सामोपचाराने वागत पुढे अग्रेसर होण्याची गरज असते. याच रहिवासीजनांमधून याच रहिवाशांमार्फत या रहिवासी संकुलाचे व्यवस्थापन तथा कार्यभार पाहण्यासाठी कार्यकारिणी निवडली जाते आणि मग ती कार्यकारिणी या रहिवासी संकुलातील रहिवाशांचे प्रश्न सोडवण्याचे, रहिवासी संकुलात सामूहिक समोपचार व शांतता प्रस्थापित करण्याचे आणि रहिवासी परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे व भविष्यकालीन वाटचालीसाठी तथा नियमावलीनुसार सर्व कागदपत्रांचे जतन व व्यवस्थापन करण्याचे मोठे काम करीत असते. मुळात या कार्यकारिणीतील प्रत्येक पदाधिकारी तथा कार्यकारिणी सदस्य हे कार्य विनामोबदला सेवा तत्त्वावर करत असतो.

स्वतःचे काम सांभाळून ते आपला वेळ व श्रम या ठिकाणी सर्वांसाठी खर्च करत असतात ही मूळ बाब यातील सहभागी प्रत्येक रहिवासी सदस्यांनी जेवढी लक्षात ठेवली पाहिजे तेवढीच या कार्यकारिणीवरील प्रत्येक कार्यकारिणी सदस्य तथा पदाधिकारी यांनी आपल्याला मिळालेली पदे किंवा जबाबदारी ही या रहिवासी संकुलाची निष्पक्षपणे व पारदर्शीपणे मूलतः सेवाभाव व सहकारी तत्त्वाने पार पाडली पाहिजे. ही जबाबदारी किंवा पदे भूषवण्यासाठी नसून ती आपल्याच रहिवासी संकुलातील आपल्याच माणसांच्या सेवेसाठी मिळालेली एक अमोघ संधी आहे ही बाब सदैव लक्षात ठेवण्याची गरज आहे. या दोन बाबी रहिवासी संकुलातील सदस्य व कार्यकारिणीला समजल्या व त्यांनी त्याचे स्मरण ठेवून परस्परांना समजून घेत वाटचाल सुरू ठेवली तर अशा रहिवासी संकुलात आनंदाचे नंदनवन सदैव सदाबहार पद्धतीने कायम फुलत राहील हे मात्र खरे!

प्रत्येक माणसामध्ये निसर्गाने विशेष गुण दिलेले असतात. याची ओळख कधी आत्मपरीक्षणाच्या व आत्मचिंतनाच्या माध्यमातून स्वत:मार्फत स्वत:ला किंवा एखाद्या सुज्ञ, सुजान, संवेदनशील व परोपकारी मार्गदर्शकाच्या माध्यमातून स्वतःला होत असते. जशी याची जाणीव होते तशी ती जाणीव गच्च उराशी बाळगून त्या गुणाला अधिकाधिक पैलू पाडत त्या अनुषंगाने वाटचाल करीत गेलं की माणसाला अंगभूत गुणकौशल्याधिष्ठित कर्तव्यपरायणतेचे अमूल्य समाधान प्राप्त होते, परंतु गंमत अशी झाली आहे की आपल्याकडे काय विशेषता आहे याचे मूल्यमापन तर दूरच राहिले माणसं आपल्याकडे काय कमतरता आहेत याचाच विचार करून नैराश्याने ग्रस्त झालेले पाहायला मिळतात.

मुळात प्रत्येकाच्या जीवनात काही बाबतीत कमी अधिकपणा असतोच, परंतु आपल्याकडे जे आहे ते न पाहता जे नाही हे पाहिलं जात असल्याने स्वत: दुःखाचा डोंगर उभा करण्याचे अवघड काम माणूस आपल्या निरंतर नकारात्मकतेच्या विचारांनी सहज करून घेत आला आहे. आपल्याकडे असलेल्या गुणाची जाणीव जशी स्वतःला होते तशी ती इतरांनाही होते. एखाद्याकडे असलेली गुणाधिष्ठित जबाबदारी जेव्हा त्याच्यावर पडते तेव्हा तो ती जबाबदारी अधिक आवडीने व अधिक सौंदर्यबुद्धीने पार पाडल्याचे आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. म्हणून एखाद्याचे गुण ओळखून विशेषत: सहकारी तत्त्वावर आधारित संस्थांमध्ये जेव्हा त्याच्यावर तशी जबाबदारी सर्वानुमते सोपवली जाते तेव्हा तो त्या जबाबदारीला अधिकाधिक न्याय देऊ शकतो. त्या सहकारी संस्थेलाही त्याचा फायदा होत असतो.

या न्यायाने अलीकडे जो काही गृहनिर्माण संस्थांमध्ये परस्पर विसंवाद आपल्याला पाहायला मिळतो तो केवळ त्यातील सदस्यांच्या परस्पर समन्वयाचा अभाव आणि अंतिमतः परस्पर सुसंवादाच्या अभावातून आकाराला आल्याचे पाहायला मिळते. एखाद्या नात्यामध्ये निर्मितीपासून ते त्याच्या वृद्धीपर्यंतचा प्रवास हा विश्वास आणि जिव्हाळा या भावनिक अंगाला स्पर्श करत होत असतो. जेव्हा कोणत्याही नात्याचा प्रवास हा या भावनिक अंगाला तडा जाणारा ठरतो तेव्हा त्या नात्याची वेल खुंटताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणून नाते निर्माण करण्याइतके ते विश्वास व जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेल्या अवस्थेत वृद्धिंगत करणे निश्चितच सहज व सोपे नसून ते केवळ प्रयत्न आणि निष्ठेअंती शक्य आहे.

परस्परांना सांभाळून घेत कधी मार्गदर्शन करत तर कधी आधार देत झालेली वाटचाल जगाच्या पाठीवर कुठल्याही संस्थेच्या वाटचालीला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारी ठरते याबाबत तीळमात्र शंका असण्याचे कारण नाही. हे तत्त्व जर प्रत्येक गृहनिर्माण संस्थांमध्ये रूजले तर निश्चितच आदर्श गृहनिर्माण संस्थांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेल्याशिवाय राहणार नाही. विशेषतः शहरी माणूस अशा गृहनिर्माण संस्थांमध्ये आपले जीवन व्यतीत करत असतो. बहुतांश शहरी माणसाचे जीवन हे दगदगीचे आणि धावपळीचे असते. मुंबईसारख्या शहरामध्ये तर या त्याच्या दगदगीमध्ये व धावपळीमध्ये आणखी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते.

दिवसभर राबून संध्याकाळी दोन सुखाचे घास खाऊन डोळाभर झोप घेऊन आराम करून पुन्हा दुसर्‍या दिवशी धावतपळत त्याला आपल्या कामावर पोहचायचे असते. घरची जबाबदारी, कामाचे व्यवस्थापन व स्वतःसह कुटुंबाचे आरोग्य अशा कितीतरी बाबतीत त्याचे विचारचक्र सुरू असते. अशा सार्‍या चक्रव्युहामध्ये त्याच्या देहाला आराम व मनाला समाधान मिळवून देणारे सामूहिक कलह, द्वेष, तंटे, भांडणं यापासून दूर असं निवांत गृहजीवन ही प्रत्येकाची निकड प्रत्येकाने समजून घेत स्वतःसह इतरांनाही त्रास होणार नाही याचे भान ठेवून जीवन जगण्याची रीत मान्य करून ती तात्काळ स्वीकारली गेली पाहिजे. यातच सर्वांचे भले आहे.

परस्परांना समजून घेत, सहकार्य करत, सर्व जण मिळून मिसळून सर्वांगीण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यातच मानव समूहाचा खरा आनंद लपलेला आहे. तो शोधता आला पाहिजे. जसं आपण आपल्या मनाला अधिकाधिक सुंदर विचारांनी सजवू तसं आपल्यासमोर अधिकाधिक सुंदर विचारातून साकार झालेली सुंदर जीवनशैली आकार घेऊन उभी राहते. या नियमाला सदैव स्मरून संस्थात्मक पातळीवर कार्यरत तथा संबंधित व सहभागी घटकाने आपले विचार व कृती समृद्ध केली तर प्रत्येक गृहनिर्माण संस्था समृद्ध व सुंदर व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. त्याचबरोबर शासनानेही या नवीन गृहसंरचनेवर व त्यातून आकाराला येणार्‍या समाजजीवनावर व त्याच्यापुढील नवनव्या समस्या आणि आव्हानांवर अभ्यास करून

यापुढील काळात अशा प्रकल्पांच्या रूपाने प्रचंड प्रमाणात वाढत जाणार्‍या या बाबीचा प्रवास सर्व सुखकर व सर्व हितदायी होण्यासाठी पोषक धोरण आखण्याची आणि राबवण्याची गरज निश्चितच भासणार आहे याचाही विचार केला पाहिजे. शेवटी परस्पर सहकार्यातून सर्वांगीण समृद्धी ही विचारसरणी मनोमन रूजवून केलेली कार्यवाही सर्वांनाच हितकारक ठरणारी असेल हे मात्र खरे.

सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये
सहकार्याचीच गरज खरी
परस्परांच्या निर्मळ आनंदासाठी
प्रयत्न करावे सर्वतोपरी

(लेखक कृषी क्षेत्राचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -