घरफिचर्ससारांशमराठी शाळा आपणच टिकवल्या पाहिजेत!

मराठी शाळा आपणच टिकवल्या पाहिजेत!

Subscribe

आपल्याकडे कुणाचेही सरकार आले तरी विविध नगरपालिका, राज्य सरकारे यांची भूमिका ही आपल्याच राज्य शिक्षण मंडळ मराठी शाळांच्या विरोधात का असते? सीबीएसई, आयसीएसई व अन्य बोर्डांच्या इंग्रजी शाळांना का पायघड्या पसरल्या जातात? यामागे कुणाचे राजकीय, आर्थिक हितसंबंध जोपासले जातात का? या सर्व गोष्टी जनतेसमोर येणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आईचे दूध हे बाळासाठी सर्वोत्तम अशा वैज्ञानिक सत्याचा प्रचार सरकारी पातळीवरून केला जातो त्याचप्रमाणे मातृभाषेतून शालेय शिक्षण हे लहान मुलांसाठी सकस, नैसर्गिक व सहज असते, या मूलभूत सूत्राचा प्रचार व प्रसार सरकारी पातळीवरून झाला पाहिजे.

-प्रसाद गोखले

बोरिवली पूर्व, मुंबई येथे मी राहतो. २०१४ साली अगदी ठरवून माझ्या मुलाला बोरिवलीतीलच एका अनुदानित मराठी शाळेत बालवर्गात प्रवेश घेतला. लहान मुलांचे शालेय शिक्षण हे मातृभाषेतून झाले पाहिजे याबद्दल आमच्या मनात कसलीही शंका नव्हती, पण गेल्या काही वर्षांतील खासकरून शहरी व निमशहरी भागात वाढत चाललेले इंग्लिश माध्यमाचे प्रस्थ तसेच लोक काय म्हणतील, मुलाचे नुकसान होईल का, पुढे मुलगाच आपल्याला विचारेल की मला मराठी शाळेत का घातले, अशा काल्पनिक गोष्टीचे थोडेफार दडपण नक्कीच जाणवले, पण आता मुलगा सातवीत आहे व एक इंग्रजी विषय तसेच बाकीचे विषय मराठी माध्यमातून उत्तमरीत्या शिकतोय. अन्य उपक्रमांतूनही त्याला मराठी शाळेतर्फे चांगली संधी मिळत आहे.

- Advertisement -

माझ्यापासून सुरुवात करत मुलाला मराठी शाळेत प्रवेश घेतल्यावर आम्ही मातृभाषेतून शालेय शिक्षणाचे महत्त्व व इंग्रजी माध्यमात होणारी लहान मुलांची ओढाताण, घुसमट तसेच पालकांची तिथे होणारी पिळवणूक, लूट तसेच या विषयातील सर्व बारीकसारीक मुद्दे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवून त्यांना त्याची जाणीव करून देण्यासाठी फेसबुकवर ‘मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत’ या साध्या सरळ नावाने एक समूह सुरू केला. शून्यातून उभा राहिलेला हा समूह सर्वांच्या सहकार्याने आज खूप विस्तारला आहे. त्याची सदस्यसंख्या एक लाख १५ हजार झाली आहे. विशेष म्हणजे दररोज नव्याने सदस्य जोडले जात आहेत.

मातृभाषेतून शालेय शिक्षण लहान मुलांसाठी सर्वोत्तम हे सर्व जगाने मान्य केलेले सूत्र आपल्याकडे मात्र दुर्लक्षित केले जातेय. जगातील बहुतेक सर्व विकसित देश त्यांच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण हे मातृभाषेतूनच देतात. इंग्रजी हा एक विषय सर्व मराठी शाळांमध्ये पहिलीपासून असतोच. इंग्रजी हा एक विषय म्हणून अधिकाधिक उत्तम रीतीने शिकण्यास कुणाचाही विरोध नाही. सवाल आहे तो मुलांच्या सर्वांगीण विकासाचा. इंग्रजीच्या अतिरिक्त सरावासाठी आता अनेक साधने उपलब्ध आहेत. त्यासाठी इंग्रजी माध्यमात जाण्याचीच गरज नसते. बाकीचे विषय हे मुलांना त्यांच्या मातृभाषेतून लवकर व नीट समजतात. अभ्यासाचा ताण येत नाही. असे विविध मुद्दे सतत लोकांसमोर नेण्याचा आमचा प्रयत्न असतो.

- Advertisement -

समूहाची सुरुवातीची वाटचाल अजिबात सोपी नव्हती. खासगी इंग्लिश शाळांमध्ये खासकरून सीबीएसई, आयसीएसई व अन्य बोर्डाच्या शाळांमध्ये लहान मुलांना व पालकांना होणार त्रास, त्यांची होणारी आर्थिक लूट याविषयी कुणी उघडपणे बोलायला तयार नव्हते. अनेक वेळा टिंगलटवाळी, टोमणे व टीका सहन करून हा समूह आता मराठी शाळांचा विषय सतत मांडणारा सोशल मीडियावरील सर्वात मोठा समूह ठरला आहे. पूर्ण राज्यातून अनेक जिल्हा परिषद व इतर अनुदानित मराठी शाळा, शिक्षक, पालक व विविध क्षेत्रांतील मान्यवर समूहाशी जोडले गेले आहेत. अनेक मराठी शाळांचे उपक्रम, पालकांचे अनुभव, शंका व इतर बाबी कायम समूहावर येत असतात व त्यांना आता सदस्यच उत्तरे देतात.

छत्तीसगढ, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश अशा अन्य काही राज्यांतील या विषयावर काम करणारे लोक, संस्थासुद्धा या समूहाशी जोडल्या गेल्या आहेत. राजकारण, धर्म, जातपात व इतर अनावश्यक गोष्टींना अजिबात थारा न देता मातृभाषेतून शालेय शिक्षणाचा विषय अधिकाधिक पालकांपर्यंत पोहचवण्याचे काम समूह यापुढेही करत राहील. अनेक तरुण पालक आज या विषयावर सकारात्मक विचार करून मुलांना मराठी शाळेत प्रवेश घेत आहेत ही समाधानाची बाब आहे. तरीही हे पुरेसे नाही. शासकीय, राजकीय व सामाजिक अशा सर्व पातळ्यांवर आपण मराठी शाळांच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे.

आपापले राजकीय विचार वेगळे असू शकतात, पण गेल्या काही वर्षांत दिल्ली व पंजाबमध्ये राज्य सरकारने खासगी इंग्रजी शाळांच्या अरेरावी कारभारावर कडक नियंत्रण आणले आहे तसेच तेथील शासकीय शाळांच्या मागे ठामपणे उभे राहून त्याच्यात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. हजारो पालकांनी आपल्या मुलांना महागड्या खासगी शाळांतून काढून सरकारी शाळांमध्ये दाखल केले आहे. या राज्यांत जर हे होऊ शकते तर आपल्या महाराष्ट्रात का नाही? आपल्याकडे कुणाचेही सरकार आले.

तरी विविध नगरपालिका, राज्य सरकार यांची भूमिका ही आपल्याच राज्य शिक्षण मंडळ मराठी शाळांच्या विरोधात का असते? सीबीएसई, आयसीएसई व अन्य बोर्डाच्या इंग्रजी शाळांना का पायघड्या पसरल्या जातात? यामागे कुणाचे राजकीय, आर्थिक हितसंबंध जोपासले जातात? या सर्व गोष्टी जनतेसमोर येणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आईचे दूध हे बाळासाठी सर्वोत्तम अशा वैज्ञानिक सत्याचा प्रचार सरकारी पातळीवरून केला जातो त्याचप्रमाणे मातृभाषेतून शालेय शिक्षण हे लहान मुलांसाठी सकस, नैसर्गिक व सहज असते या मूलभूत सूत्राचा प्रचार व प्रसार सरकारी पातळीवरून झाला पाहिजे.

हा आपला अभिमान, अस्मिता यांचा विषय नसून लहान मुलांसाठी काय सोपे, नैसर्गिक आहे त्याचा मुद्दा आहे. पालक म्हणून फसव्या सामाजिक वजनाच्या संकल्पनेला बळी न पडता लहान मुलांचा विचार आपण केला पाहिजे. तेच सुजाण पालकत्वाचे प्रमुख लक्षण आहे. या सर्व विषयासंदर्भात आपण खालील मुद्यांची परत एकदा उजळणी करूया.

१) मातृभाषेतून शालेय शिक्षण म्हणजे इंग्रजी हा एक विषय शिकण्यास अजिबात विरोध नाही.

२) मुलांच्या घरी व परिसरात जी भाषा बोलली, वापरली जाते ती त्याची/तिची मातृभाषा व परिसर भाषा बनते. त्याच भाषेतून सर्व विषय शिकवले गेल्यास अभ्यासाचा ताण येत नाही. लवकर व सहजपणे आकलन होते. मुले नैसर्गिकरित्या व्यक्त होऊ शकतात.

३) मराठी शाळांमधून शिक्षण घेऊन उत्तम इंग्रजी शिकून असंख्य मुले आज देश-विदेशात विविध क्ष्रेत्रांत उत्तम कामगिरी करत आहेत.

४) सर्व विकसित देश मुलांना मातृभाषेतून शालेय शिक्षण देतात.

५) मराठी भाषा, संस्कृती, साहित्य, नाटके, चित्रपट, संगीत व इतर संस्कार मुलांमध्ये रुजवायचे असतील तर मराठी शाळांना पर्याय नाही. कसल्याही सामाजिक दडपणाला बळी पडू नका.

६) इंग्रजीचे भूत दाखवून खासगी इंग्रजी शाळा समाजाची दिशाभूल करत आहेत. दुर्दैवाने शासनही त्याबद्दल कडक भूमिका घेताना दिसत नाही. त्या सापळ्यात अडकू नका. मुलांना मराठी शाळेत सहज व नैसर्गिकरित्या शिक्षणाची संधी द्या. सर्व सरकारी उपक्रमांचा लाभ त्यांना मिळू द्या.

-(लेखक रेल्वेत अभियंता असून मराठी शाळा प्रचारक आहेत)

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -