घरफिचर्ससारांशकष्टकरी स्त्रियांच्या प्रेरक कहाण्या

कष्टकरी स्त्रियांच्या प्रेरक कहाण्या

Subscribe

लेखिका नीती बडवे यांचं ‘बिकट वाट...’ या शीर्षकाचं (आणि ‘सहा महिलांचा जीवनसंघर्ष’ या उपशीर्षकाचं) पुस्तक पुण्याच्या साधना प्रकाशनने २०१५ मध्ये पहिल्यांदा प्रकाशित केलं असून याची २०१६ मध्ये दुसरी, तर २०१९ मध्ये तिसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जर्मन भाषेचं अध्यापन करणार्‍या बडवे यांच्या एका अभ्यास प्रकल्पाची निष्पत्ती म्हणजे हे पुस्तक.

–प्रवीण घोडेस्वार

अभ्यास प्रकल्पाची पार्श्वभूमी सांगताना लेखिका नीती बडवे म्हणतात, ‘जर्मन पुस्तकं आणि प्रसारमाध्यमांमधून भारताविषयी काही गोष्टी किंवा प्रसंग ऐकायला-वाचायला मिळतात, पण ते मांडलेले असतात जर्मन लेखक-पत्रकारांच्या नजरेतून. मग एकदा असं वाटलं की जर्मन भाषकांना आपण आपल्या नजरेतून आपल्या सभोवतालचा परिचय का करून देऊ नये. म्हणून सर्वसामान्य बायकांच्या असामान्य मानसिक बळाच्या आणि आंतरिक शक्तीच्या ह्या गोष्टी जर्मन भाषेत सादर करण्याचा प्रकल्प हाती घेतला.’ या प्रकल्पासाठी भौगोलिकदृष्ठ्या दोन भिन्न मराठी भाषक प्रांत लेखिकेने निवडले. समुद्र किनार्‍यालगतचे ठाणे व रायगड जिल्हे, येथे ठाकर, कातकरी, महादेव कोळी जमातींच्या वस्त्या आहेत. दुसरे जिल्हे म्हणजे सोलापूर आणि उस्मानाबाद. या चारही जिल्ह्यांमध्ये कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने वाड्या-वस्त्यांना भेटी देऊन लेखिकेने या स्त्रियांच्या मुलाखती घेतल्या.

- Advertisement -

पुस्तकाच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनेत प्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील म्हणतात, ‘या सामाजिक गोष्टी असल्या तरी या कहाण्यांची खरी ताकद आहे ती म्हणजे त्या घडवीत असणारे स्त्रीरूप-दर्शन. स्त्रीचे खरे रूप काय आहे याचे सुस्पष्ट दर्शन आपल्याला या गोष्टींमधून होते. ते आदिम, सद्य:कालीन आणि भविष्यातलेही आहे. मुख्य म्हणजे ते वाचकाला स्तिमित करून टाकणारे आहे. कुटुंबाचा भार वाहणारी, दिवसरात्र कष्ट उपसणारी, गरिबीतही हिंमत न हारलेली, रुढींच्या बंधनांनी पिचलेली आणि जागृत झाल्यावर तीच बंधने भिरकावणारी, उद्यमशील, स्वावलंबी, स्वत:चे जगणे जगता जगताच व्यापक करुणेने ओथंबलेली आणि वेगळ्या जिद्दीने भविष्यकाळ घडवू इच्छिणारी स्त्री या कहाण्यांमधून उभी राहते. हे दर्शन स्वप्निल, आदर्शात्मक किंवा भासमान नाही, तर ते खरे आहे. ही अशी स्त्री आपल्याभोवती खरोखरंच राहत आहे. तिने आपले कष्ट आणि कर्तृत्वाने हा समाज तोलून धरला आहे.’ सहा स्त्रियांच्या या कथा आत्मचरित्रात्मक म्हणतात येतील अशा.

मुळातच आपल्याकडे साहित्यात अभावानेच बायकांच्या आत्मकथनपर कहाण्या आढळतात. माध्यमांमधून अभिजन वर्गातल्या यशस्वी बायकांच्या स्टोरीज प्रसिद्ध करून त्यांना समाजापुढे आदर्श म्हणून सादर केलं जातं. या स्त्रिया रुढार्थाने यशस्वी नाहीत. त्या कार्यकर्त्या आहेत, मात्र मध्यमवर्गीय नाहीत. त्या आहेत ग्रामीण, कष्टकरी महिला. आपलं आयुष्य जगता जगता भोवतालच्या लोकांसाठी त्या काम करताहेत. यातल्या नीरा, कमल व शांताबाई आदिवासी समाजातल्या, तर सुभद्राबाई व नागिणी गरीब शेतकरी कुटुंबातल्या आणि राजश्रीताई भटक्या-विमुक्त समाजातली. कमालीच्या अभावग्रस्त परिस्थितीला सामोरं जात अतोनात कष्ट करून आपलं जगणं दखलपात्र केलं हा त्यांच्या जीवनातला समान धागा. त्यांचं जगणं सार्थ ठरवणारा हा प्रेरक संघर्ष आहे.

- Advertisement -

आपल्या समाजातली पितृसत्ता बायकांवर काय नि कशी परिणाम करते याचा प्रत्यय यातली कोणतीही कहाणी वाचून येतो. यातली आदिवासी ठाकर समाजाची नीरा वगळता उर्वरित स्त्रियांची बालवयातच त्यांच्या पालकांनी लग्ने लावून दिली आहेत. कलम हिलम या कातकरी स्त्रीने मात्र स्वत:च्या मर्जीने विवाह केलाय. सुभद्राबाईला वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षी पाच अपत्ये असलेल्या वडिलांच्या वयाच्या विधुराशी लग्न करावं लागलं. अक्षर ओळखही नसलेल्या सुभद्राबाईने अपार मेहनतीच्या बळावर लहान उद्योजिका म्हणून नाव कमावलं. शेवया विकणे, घाण्याचे तेल विकणे, पिठाची गिरणी चालवणे, तिखट कुटणे, दूध विक्री याद्वारे त्यांनी आर्थिक स्थैर्य मिळवलं.

बचत गट आणि डॉ. शशिकांत अहंकारींच्या हेलो फाऊंडेशनच्या सहकार्याने त्यांना हे करता आलं. शांत डोकं, गोड बोलणं आणि चालण्याची ताकद असलेल्या नागिणीची कहाणीदेखील विलक्षण आहे. जेमतेम सतराव्या वर्षी लग्न झालेल्या नागिणीने आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांना धैर्याने तोंड दिलंय. एड्सने नवरा दगावल्यावर एकटीने आपली वाटचाल सुरू ठेवली. तिच्या या संघर्षात हेलो फाऊंडेशन संस्थेच्या भारत वैद्य’ या तीन आठवड्यांच्या प्रथमोपचार व आरोग्यविषयक प्रशिक्षणाची तिला खूप मदत झाली. प्रशिक्षणात मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे गावातल्या अनेकांवर तिने वेळेवर उपचार करून त्यांचे जीव वाचवले.

‘वडार’ ह्या भटक्या जमातीच्या राजश्रीताई ‘डोअर स्टेप स्कूल’च्या उपसंचालिका आहेत. त्या पुण्यातल्या व पुण्याबाहेरील २०० पेक्षा जास्त शाळांमध्ये ‘वाचन संस्कार’ प्रकल्पाची जबाबदारी सांभाळतात. त्यांना वाचनाची प्रचंड आवड आहे. विशेष म्हणजे त्यांचे वडील साक्षर होते. समाजातल्या लोकांचा विरोध झुगारून त्यांनी मुलांना शिकवलं. इतकंच नाही तर ते त्या काळच्या खूप लोकप्रिय मासिक ‘चांदोबा’चे वर्गणीदारही होते. शिवाय त्यांच्या घरी रोज ‘सकाळ’ वृत्तपत्र यायचं. राजश्रीताईंच्या चार बहिणी आणि एक भाऊ, सगळे पदवीधर आहेत. त्यांची आईसुद्धा चौथ्या इयत्तेपर्यंत शिकली होती.

ही वडार समाजात अशक्य कोटीतली वाटणारी आणि अचंबित करणारी गोष्ट होय. त्यांच्या भावाने इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलं. पेण परिसरातल्या कातकरी आदिवासी समूहाच्या प्रश्नावर ‘अंकुर’ ही स्वयंसेवी संस्था कार्यरत आहे. इथंच नीरा मधुकर मधे ही ठाकर आदिवासी कार्यकर्ती काम करते. तिने समाजकार्याचं प्रशिक्षण घेतलंय. रेशनकार्ड, ओळखपत्र, घरठाण जागेवरचा हक्क, जन्म-मृत्यूचे दाखले, वीज जोडणी, जमिनीचे हक्क, दळी जमीन (आदिवासी भाषेत डोंगर उतारावरची जमीन कसणे याला दळी लावणे म्हणतात.) इत्यादी प्रश्नांवर नीराने प्रशासनाशी संघर्ष केला. आदिवासी समूहासाठी आजही ती काम करतेय.

कातकरी आदिवासी समाजातल्या कमलचं समाजकार्य ‘श्रमिक क्रांती संघटने’मार्फत सुरू झालं. बालविवाह थांबवणे, अंधश्रद्धा निर्मूलन, दारूबंदी, जमिनीचा कस वाढवणे यासाठी कमल झटत आहे. तिचे वडील रेल्वेत होते. बारावी झालेल्या कमलला वडिलांप्रमाणे रेल्वेत नक्कीच नोकरी मिळाली असती, मात्र तिने नोकरी न करता सामाजिक कार्य करावं, ही तिच्या वडिलांची इच्छा होती. तिलाही समाजकार्याची आवड होतीच. सरपंच म्हणून निवडून आल्यावर कमलने अनेक समाजोपयोगी कामे केलीत. दलालांचा हस्तक्षेप थांबवला. आता ती श्रमिक क्रांती संघटनेसोबत काम न करता स्वतंत्रपणे आदिवासींना मदत करते. रायगड जिल्ह्यातल्या रोहा गावात ‘सर्वहारा जनांदोलन’ या संस्थेसमवेत शांताबाई स्थानिकांचे हक्क-अधिकार, कौटुंबिक, वस्ती पातळीवरचे प्रश्न, जमिनीशी संबंधित भांडण तंटे यावर काम करतात. या स्त्रियांच्या जीवन संघर्षात स्वयंसेवी संस्थांचंही महत्त्वपूर्ण योगदान आहे. हे पुस्तक उपेक्षित, वंचित, कष्टकरी स्त्रियांच्या कहाण्यांचा प्रेरक दस्तऐवज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -