घरफिचर्ससारांशबडी सुनी सुनी है

बडी सुनी सुनी है

Subscribe

हृषिकेश मुखर्जींनी सचिनदांकडे ‘मिली’ ह्या सिनेमाचं काम सोपवलं. त्यासाठी योगेशनी त्यांना एक गाणं लिहून दिलं. त्या गाण्याचे शब्द होते - बडी सुनी सुनी हैं, जिंदगी ये जिंदगी. बर्मनदा तेव्हा जो सुनसान काळ, जी एकाकी परिस्थिती जगत होते त्या काळाचा पटच जणू ह्या शब्दांतून योगेशजींनी अजाणतेपणी मांडला होता. सचिनदांनी त्या शब्दांना लावलेली चाल गाता गाता किशोरकुमारचे डोळे भरून आले. सचिनदा दरम्यान आजारी पडले. त्यामुळे ह्या गाण्याचं रेकॉर्डिंग किशोरकुमारनीच केलं.

सचिन देव बर्मनदांचं स्वत:चं आणि त्यांच्या कारकिर्दीचंही वय होत चाललं होतं. वयाच्या आणि कारकिर्दीच्या ह्या उतरणीवर त्यांना काही बोचर्‍या अनुभवांचा सामना करावा लागत होता. थकलेल्या शरीराच्या अवस्थेत अधूनमधून मनावर होणारे हे घावही आपल्याला सोसावे लागतील ह्याची त्यांना कल्पना नव्हती. थोरामोठ्यांना ज्यांनी आपल्या तालावर नाचवलं, ठेक्यावर डोलवलं ती माणसं अशी एकाएकी वागू लागतील, आपण उतरणीला लागताच आपल्याकडे पाठ फिरवतील हे त्यांना अनपेक्षित तर होतंच, पण अनाकलनीयही होतं. आपल्या आयुष्यातला शेवटचा काळ सुरू झाला आहे ह्याची त्यांना जाणीव होतीच, पण आपल्याला हवी तशी आपल्या आयुष्याच्या साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण होत नाहीय हे त्यांना कळू लागलं होतं, कळून चुकलं होतं.

त्यांचा मुलगा आर.डी. आता मोठा झाला होता. त्यांच्या संगीताला साथ करता करताच एक दिवस तो वयाने मोठा होणार, कर्तृत्वाने मोठा होणार, स्वत:च्या संगीताचा दरबार मांडणार हे त्यांच्या मनाने घेतलंच होतं. पण नियती हा डाव वेगळा मांडेल हे त्यांच्या ध्यानीमनीही नव्हतं. आपल्या मुलाच्या संगीताला लोकमान्यता, लोकप्रियता मिळते आहे ह्याचा त्यांना आनंदच होता. पण तरीही त्यांच्या शेवटच्या काळात त्यांच्या मनाला सलणारं, बोचणारं काही घडत होतं हे नक्की.

- Advertisement -

सचिनदांना सकाळी सकाळी घराबाहेर पडून फिरायला जायची सवय होती. एका भल्या सकाळी असंच फिरायला जात असताना काही तरूण मुलांचा घोळका त्यांना दिसला. तारूण्याला आता कुठे सुरूवात झालेले ते तरूण होते. संगीत वगैरे विषयात आता कुठे रूची घेण्याचं त्यांचं वय होतं. त्यांच्या ह्या बहरू लागलेल्या वयात आर.डीचं संगीतही नुकतंच बहरू लागलं होतं, त्यामुळे त्यांच्या मनात आर.डी.उमलू लागला होता.. सचिनदा त्यांच्या जवळून जाऊ लागताच त्या घोळक्यातले तरूण म्हणाले, ‘ए, ते बघ, आर.डी.बर्मनचे वडील कुठेतरी निघाले आहेत.’

सचिनदांच्या कानांपर्यंत तरूणांचं हे बोलणं आलं. सचिनदा एकदम चमकले. त्यांनी आपल्या तरातरा चालीचा वेग थोडा कमी केला. कालपर्यंत आर.डीला तो सचिनदांचा मुलगा असल्याचं ऐकावं लागायचं, आज आपल्याला आपण आर.डीचे वडील असल्याचं ऐकावं लागतं आहे हा बदल त्यांनी मनात नोंदवला. आपला मुलगा त्याच्या संगीतातल्या कारागिरीने मोठा झाला ह्याचा त्यांना आनंद झाला, पण दुसर्‍या बाजूला कणभर का होईना, त्यांच्या ‘इगो’लाही ठेच पोहोचली. लोकांना आपली ओळख होण्यात असा बदल झाला आहे ह्याची ती ठेच होती. एका कलाकाराच्या आयुष्यातल्या सावल्या लांबत असतानाच्या काळाची ती निशाणी होती.

- Advertisement -

तोपर्यंत सचिनदांच्या चाहत्यांमध्ये फार मोठमोठी माणसं होती. संगीतकार कल्याणजी म्हणायचे, ‘त्या काळात संगीताच्या क्षेत्रात सगळीच माणसं दादा होती. पण सगळ्यांचे दादा होते ते सचिनदा.’
अमिताभ बच्चनने त्यांचं संगीत ऐकताना, अनुभवताना म्हटलं होतं, ‘सचिनदांचं संगीत ऐकताना त्या संगीतातून आपल्या मनाला देवत्वाचा स्पर्श होतो आणि तो स्पर्श होताना आपण आपले राहत नाही.’

गीतकार गुलजारचं म्हणणं होतं, ‘ही वॉज प्रिन्स ऑफ इंडियन मेलडी.’
संगीतकार प्यारेलालसारखा कर्तबगार कलाकार म्हणायचा, ‘आर.डी. जर सोनं असेल तर सचिनदा हे भारतीय संगीताच्या क्षेत्रातले लखलखता हिरा होते.’

…आणि सचिनदांचं ‘कांटों से खिंच के ये आँचल’ हे गाणं पडद्यावर काठोकाठ रमरसून जगलेली वहिदा रेहमान म्हणायची, ‘दादांचं गाणं मी पडद्यावर जगले आहे, दादांच्या गाण्याने मला वेळोवेळी जगवलं आहे, आज फिर जीने की तमन्ना हैं, आज फिर मरने की तमन्ना हैं, हे शब्द फक्त दादाच अजरामर करू शकतात, ते माझे अत्यंत लाडके संगीतकार आहेत.’

वय झालेल्या प्रत्येक माणसाच्या शेवटच्या काळात जे पर्व सुरू होतं ते सचिनदांच्या आयुष्यातही सुरू झालं. त्यांचे सखेसवंगडी ह्या जगात राहिले नाहीत. त्यांचा लाडका गीतकार साहिर त्यांना सोडून कधीच निघून गेला होता. गुरूदत्तही ह्या जगात राहिला नव्हता. ते ज्याच्या शब्दांवर प्राणपूर्वक प्रेम करायचे तो शैलेन्द्रही मागे राहिला नव्हता. त्यातच त्यांचा मुलगा, आर.डीने आपला स्वत:चा वेगळा डाव मांडायला सुरूवात केली तसे कालपरवापर्यंत त्यांच्या संगीताला साथ देत आलेले अ‍ॅरेंजर्सही त्यांना सोडून जाऊ लागले. आर.डी. ‘लाखो में एक’ नावाचा सिनेमा मद्रासमध्ये करत होते आणि त्यासाठी त्यांनी बासू मनोहारी आणि बासू चक्रवर्ती या म्युझिक अ‍ॅरेंजर्सना मद्रासला कधी नेलं ह्याची सचिनदांना गंधवार्ताही नव्हती.

अशाच एका काळात हृषिकेश मुखर्जींनी सचिनदांकडे ‘मिली’ ह्या सिनेमाचं काम सोपवलं. त्यासाठी योगेशनी त्यांना एक गाणं लिहून दिलं. त्या गाण्याचे शब्द होते – बडी सुनी सुनी हैं, जिंदगी ये जिंदगी. बर्मनदा तेव्हा जो सुनसान काळ, जी एकाकी परिस्थिती जगत होते त्या काळाचा पटच जणू ह्या शब्दांतून योगेशजींनी अजाणतेपणी मांडला होता. सचिनदांनी त्या शब्दांना लावलेली चाल गाता गाता किशोरकुमारचे डोळे भरून आले. सचिनदा दरम्यान आजारी पडले. त्यामुळे ह्या गाण्याचं रेकॉर्डिंग किशोरकुमारनीच केलं. आधी हे गाणं वरच्या पट्टीत गायल्यामुळे सचिनदा चिडले. त्यांनी ते गाणं किशोरकुमारना पुन्हा रेकॉर्ड करायला लावलं. गाणं मनासारखं झालं तेव्हाच त्यांचं मन तृप्त झालं. नंतरच्या काळात त्यांना पक्षाघाताचा झटका आला. एक वर्ष ते कोमात होते…आणि पुढे 1975 साली त्यांनी जगाचा निरोप घेतला. बडी सुनी सुनी हैं, जिंदगी ये जिंदगी, हे मनात नोंदवत…

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -