घरफिचर्ससारांशकोरोनाच्या भीतीला बुवाबाजीचा विळखा!

कोरोनाच्या भीतीला बुवाबाजीचा विळखा!

Subscribe

खरंतर, आता वर्षभरानंतरसुद्धा कोरोना नष्ट होत नाहीये. मग आता आपल्या अंगी असलेल्या दैवी शक्तीच्या सहाय्याने, विविध दैविक, धार्मिक कर्मकांडे करून कोरोना घालविण्याचा दावा करणार्‍या बुवा, गुरूंना, आता भारतीय जनतेने हा प्रश्न विचारला पाहिजे की, वर्षभरानंतरही कोरोना का गेला नाही? उलट त्याची पकड दिवसेंदिवस घट्ट होत आहे,मग आता तुमची दैवी शक्ती कुठे गेली? तुम्ही कोरोनाला का आवर घालू शकला नाहीत? अजूनही शिष्यगण त्यांच्या ह्या गुरुंना अशी गळ का घालत नसावा? भक्तगणांना, सेवकांना, अनुयायांना असे प्रश्न का बरे सुचत नसावेत? अजूनही अनुयायी, सेवेकरी यांनी आपल्या या तारणहारांना अशी विचारणा करून बघायला काय हरकत आहे?

कोरोना या महाभयंकर विषाणूने मानवी जीवनाच्या आणि जगण्याच्या सर्व मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट केल्या आहेत. मुळात माणूस हा निसर्गातील सर्वात दुबळा प्राणी आहे. पण आपल्या चिकित्सक, उत्क्रांत होत जाणार्‍या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याने निसर्गावर मात करण्याचा वेळोवेळी प्रयत्न केल्याचे दिसून येते. निसर्ग नियमांशी साधर्म्य साधून, निसर्गाशी अनुरुप असे वर्तन करून, सुखी-आनंदी जीवन जगता येते, हे माणसालाही माहीत आहे.

तथापि, प्रत्येक बाबतीत जीवघेणी स्पर्धा, चढाओढ, लोभ, हव्यास अशा अनेक इर्षायुक्त गुणांमुळे, अनेक वेळा माणसानेच माणसाला संकटात ओढले आहे. त्याच्यापुढे बिकट समस्या निर्माण केल्या आहेत, असेही दिसून येते. त्यातून, केवळ माणसालाच नव्हे तर, इतर सजीव सृष्टीलाही धोका निर्माण झालेला आहे. अनेकदा चुकीचे वर्तन आणि कर्तृत्व यामुळे माणूस अनेक वेळा जीवघेण्या संकटात सापडला. त्यातून नेहमीच त्याच्या मनात असुरक्षितता,चिंता,अस्थिरता,अस्वस्थता निर्माण होत राहिली. त्यामुळे माणसाच्या मनाचा दुबळेपणा सतत वाढत गेला.

- Advertisement -

यावर उपाय म्हणून तो दैववादाचा व दैवी शक्तींचा आधार शोधू लागला. कोणीतरी बलदंड दैवी शक्ती उत्पन्न होईल, अवतार घेईल, तिला काहीबाही देऊन खूश केले की, ती आपल्यावर प्रसन्न होईल, चमत्कार करील आणि चुटकीसरशी आपली सर्व संकटांतून, समस्यांमधून सुटका करेल, मुक्तता करेल, अशी भाबडी आशा माणसाच्या दुबळ्या मनात वारंवार निर्माण होत राहिली. त्यासाठी तो पुन्हा पुन्हा दैववाद, प्राक्तन, नशीब अशा संकल्पनांच्या आहारी जात राहिला. अनेक अवैज्ञानिक, निरर्थक दैवी कर्मकांडे करू लागला. देवाला, अल्लाला लालूच दाखवू लागला. वारंवार दैववादाला बळी पडत राहिला. त्या, त्या व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या प्राप्त परिस्थितीनुसार, आपण अशा माणसांची मानसिकता समजावून घेऊन, त्यालाही समजून घेऊ शकतो. वस्तुस्थिती समजावून सांगू शकतो. काही बाबतीत त्याला क्षम्यही करावे लागते. यातच त्याचे व आपले माणूसपण उन्नत होत राहते. हाच मानवतेसाठी आपुलकीचा, करूणेचा मार्ग आहे. विवेकी जीवनाचा मार्ग आहे.

असे असले तरी समाजातील काही लबाड लोक, एखाद्या पीडित व्यक्तीचे किंवा पीडित समाजाचे अज्ञान, अंधश्रद्धा, असुरक्षितता, अगतिकता, अस्वस्थता, दारिद्य्र यांचा गैरफायदा घेऊन, त्यांच्या देवा-धर्माबाबतच्या श्रद्धांचा, भोळेपणाचा गैरफायदा घेऊन, वेगवेगळ्या प्रकारचा लाभ उठवतात. त्यांचे विविध प्रकारे शोषण करतात. देवाधर्माच्या नावाखाली भलतेच प्रकार करून, समाजाचे सामुदायिक पातळीवर शोषण, फसवणूक आणि दिशाभूल करतात. खरंतर, अशा लबाड, भोंदूगिरी व ढोंगबाजी करणार्‍यांचे पितळही कोरोनाने मागील वर्षभरात पुरते उघडे पाडलेले आहे. कोरोनाने त्यांनाही सोडलेले नाही. हे त्यांच्या भक्तगणांनी लक्षात घ्यायला हवे. चमत्कार, मंत्र तंत्र, गंडेदोरे करून, अंगात आणून असाध्य रोग बरे करण्याचा भंपक दावा करणारे अनेक तथाकथित अवतारी बुवा, पादरी, मौलवी समाजात आहेत.

- Advertisement -

मागील वर्षी जेव्हा कोरोनाचे संकट प्रथमच भारतात आले तेव्हा ही भोंदू मंडळी खडबडून जागी झाली. सुरुवातीच्या दोन,तीन महिन्यांच्या काळात मंत्रतंत्र, स्तोत्र, सामुदायिक प्रार्थना, जपजाप्य, मंतरलेले पाणी, काढे, तीर्थ, होमहवन, यज्ञयाग असे अनेक अशास्त्रीय प्रकार, दैवी तोडगे, कर्मकांडे करण्यापर्यंत यांची मजल गेली. घाऊक पद्धतीने असे प्रकार केले तर कोरोना लवकर त्याचा गाशा गुंडाळेल,असे वाटून, ह्या तथाकथित बुवामंडळीने त्यांचा मोर्चा काही शाळा-महाविद्यालयांकडेही वळविला होता. मात्र अंनिससारख्या काही विवेकी संघटनांनी वेळीच जेथेतेथे हस्तक्षेप केला, म्हणून तेथे त्यांची डाळ शिजली नाही.

आपले अनेक राजकीय नेते अशा संकटसमयी मागे कसे राहतील? कृतज्ञतेपोटी कोविडयोद्यांचा सन्मान-सोहळा सामुदायिकपणे साजरा करण्यात यावा, अशी चांगली कल्पना त्यांना सुचली. म्हणून सर्व भारतीय जनतेला एकाच वेळी टाळ्या, थाळ्या वाजविण्याचे आवाहन आपल्या नेत्यांनी केले. विद्युत दिवे मालवून, अंधार करून, तेलाचे दिवे, टॉर्च, मेणबत्ती लावण्यास सांगितले. खरं तर ही कृती किती संवैधानिक होती, हा मोठा चिंतनाचा विषय आहे. आपल्या देशातील नागरिकांमध्ये संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन हे महत्वाचे मूल्य न रुजण्याची जी अनेक कारणे आहेत, त्यात अशा राजकीय आवाहनांचा समावेश होऊ शकतो का, याचा सुज्ञ, संविधानप्रेमी नागरिकांनी जरुर विचार करावा.

स्वतःचा जीव संकटात घालून, आपल्या नागरिकांचा जीव वाचविणे,हे अतुलनीय धाडसाचे व शौर्याचे काम आपल्या सर्व कोविडयोद्ध्यांनी केले आहे. त्यांच्या प्रती सदैव कृतज्ञ राहणे, हे आपले सर्वांचे कर्तव्यच आहे. ह्या चांगल्या उद्देशाने कदाचित आपल्या नेत्याने जनतेला आवाहन केले असावे, असे आपण समजू या. मात्र त्यांच्या अनुयायांनी याचा भलताच दैववादी अर्थ काढून, ह्या वेळेतील आकाशातल्या ग्रह, तारे, लहरी यांच्याशी या घटनेचा संबंध लावला. गल्ली बोळातून मिरवणुका काढून घोषणाबाजी करत, फटाक्यांची आतषबाजी केली. हे सर्व अवैज्ञानिक कर्मकांड सामुदायिकपणे जनतेकडून करून घेतले. बिचारी भारतीय जनता बिनदिक्कत करत राहिली. कारण त्यांचे तथाकथित अध्यात्मिक बुवा, गुरु, राजकीय नेते हे असे काहीतरी अचाट, चमत्कारीक घडवून, कोरोनाला पळवून लावतील,एवढी खात्री,विश्वास जनतेला त्यांच्याबद्दल असावा कदाचित.. ..

खरंतर, आता वर्षभरानंतरसुद्धा कोरोना नष्ट होत नाहीये. मग आता आपल्या अंगी असलेल्या दैवी शक्तीच्या सहाय्याने, विविध दैविक, धार्मिक कर्मकांडे करून कोरोना घालविण्याचा दावा करणार्‍या बुवा, गुरूंना, आता भारतीय जनतेने हा प्रश्न विचारला पाहिजे की, वर्षभरानंतरही कोरोना का गेला नाही? उलट त्याची पकड दिवसेंदिवस घट्ट होत आहे,मग आता तुमची दैवी शक्ती कुठे गेली? तुम्ही कोरोनाला का आवर घालू शकला नाहीत? अजूनही शिष्यगण त्यांच्या ह्या गुरुंना अशी गळ का घालत नसावा? भक्तगणांना, सेवकांना, अनुयायांना असे प्रश्न का बरे सुचत नसावेत? अजूनही अनुयायी, सेवेकरी यांनी आपल्या या तारणहारांना अशी विचारणा करून बघायला काय हरकत आहे?

आपला शिष्यगण आपणास असे अडचणीत टाकणारे प्रश्न आपणास कदापि विचारणार नाही, याची दक्षता त्या त्या गुरुने, बुवाने, महाराजांनी अगोदरच घेतलेली असते. शिष्यांच्या मेंदूची अशी उत्तम मशागत बुवा, जाणीवपूर्वक व सातत्याने करीत असतात.

आखिल मानव जातीच्या जीवावर बेतण्याची वेळ आली तरी सर्व सरकारी आदेश, नियम, शिस्त, कायदे डावलून, आपापल्या धर्माच्या नावाने मोठमोठ्या धार्मिक मिरवणुका काढायच्या. पोलिसांनी कायदा पालनाचा आग्रह केला, बेशिस्तीला अटकाव केला म्हणून, पोलीस यंत्रणेवरच दगडफेक करायची? याला खरं अध्यात्म म्हणायचं का? धर्म असं सांगतो का ? खरं तर कोणताही धर्म हिंसेला मान्यता देत नाही. हिंसेचे समर्थही करीत नाही. तरीही, ही माणसं असं का वागतात ? असं वागण्यासाठी, करण्यासाठी त्यांना कोण चिथावणी देतं ? कोण आदेश देतं?

अनेक जत्रा-यात्रा, विविध धर्मियांच्या धार्मिक मिरवणुका, धार्मिक कार्यक्रम, लग्न समारंभ, सण-उत्सव, धार्मिक विधी यामध्ये ही माणसं धोका पत्करून, का सहभागी होत असतात ? प्रत्येक बाबतीत आपण कालसुसंगत, विधायक बदल केला पाहिजे,असं ह्या मंडळींना का वाटत नाही? स्वतःच्या व इतरांच्या जीवापेक्षा असले बेगडी वर्तन अनुयायांना अधिक मोलाचं का वाटतं ? तो त्यांच्या धर्माचा आदेश असेल तर, असा अमानवीय आदेश देणार्‍या धर्माला, धर्म तरी का म्हणायचं ? म्हणून, आपल्या अशा अविवेकी वर्तनाचा गैरफायदा घेण्यासाठी टपून बसलेल्या लबाड, ढोंगी,भोंदूंची शिकार होऊ नये, असे जर वाटत असेल तर, आपली प्रत्येक कृती ही, विवेकाने करण्याचा प्रयत्न आपण प्रत्येकाने केला पाहिजे.

या संकटाबाबतचा पुढील संभाव्य धोका असा वाटतो की, जेव्हा केव्हा कोरोना संपुष्टात येईल, तेव्हा देवाधर्माच्या आणि दैवीशक्तीच्या, अवताराच्या नावाने भोंदूगिरी करणारी ही पिलावळ पुन्हा तत्काळ जागी होईल. माझ्यातील दैवी शक्तीने मीच कोरोना घालवला, असा छातीठोक दावा ते करतील. कोरोनाबाबत आम्ही अगोदरच भविष्य वर्तविले होते, त्याप्रमाणे तसेच तंतोतंत घडले, असे सांगत सुटतील. लोकांना आपले महत्व पटविण्याचा प्रयत्न करतील. आमच्या धार्मिक ग्रंथांमध्ये, पुस्तकांमध्ये कोरोनाबाबत अगोदरच सांगितलेले आहे, लिहून ठेवलेले आहे, असाही दावा करतील. यानंतरच्या पुढील काळात एखादी व्यक्ती किंवा तिचे कुटुंब यांना कोरोना सारख्या संकटाने घेरू नये, घेरलेच तर काही नुकसान होऊ नये, वेगळी काही बाधा, त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक धर्मातील तथाकथित अध्यात्मिक व्यक्ती,पुजारी, बाबाजी, भोंदू, पादरी, मुल्लामौलवी हे पुन्हा आपली दैववादयुक्त, अवैज्ञानिक कर्मकांडांची दुकाने भरभराटीला आणण्याचा प्रयत्न करतील.

होमहवन,पूजापाठ,उपास-तापास, जपजाप्य, मंत्रपठण, यज्ञ, शांती, सामुदायिक प्रार्थना, धार्मिक जत्रायात्रा, विश्वशांती सोहळे असे विविध अशास्त्रीय कर्मकांडे करण्यासाठी समाजमनाला भुरळ घालण्याचा आटापिटा सुरु करतील.

खरं तर, अशा जीवघेण्या संकटकाळात खरी धार्मिकता,अध्यात्मिकता जपण्याची, प्रत्यक्ष कृतीतून दाखवण्याची फार मोठी संधी कोरोनामुळे सर्वांना उपलब्ध झाली आहे. स्वतःची, कुटुंबाची संपूर्ण काळजी घेऊन, आपल्या शेजारी, परिसरातील अन्य कुणी कोरोनामुळे बाधित झाले असतील तर अशा बांधवांना फोनवरून विचारपूस करणे, धीर देणे किंवा पुरेसे भौतिक अंतर ठेवून, गरजूंना आवश्यक आणि शक्य तेवढी जास्तीत जास्त मदत, सहकार्य आपण करू शकतो. हेच आजचे खरे आध्यात्मिक वर्तन ठरेल. अशानेच संकटाला सामूहिकपणे तोंड देण्यासाठी माणसं नेटाने उभे राहतील, पुढे येतील. सामाजिक एकोपा, सामंजस वाढीस लागेल. असे अनेक फायदे होतील.

–डॉ. ठकसेन गोराणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -