घरफिचर्ससारांशमरावे परी देहरूपी उरावे!

मरावे परी देहरूपी उरावे!

Subscribe

मरणोत्तर देहदानाची इच्छा असणार्‍यांनी जिवंतपणी आपला फॉर्म जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयात भरावा लागतो. त्यासाठी घरातील अथवा नात्यातील दोन व्यक्तींची संमती असल्याची सही आवश्यक असते. दोन फोटो व आधारकार्ड सोबत द्यावे लागते. महाविद्यालयाकडून त्या व्यक्तीस ओळखपत्र दिले जाते. त्यावर असलेल्या संपर्क क्रमांकावर मृत्यूनंतर जवळच्या व्यक्तीने संपर्क करावा लागतो. रुग्णालयाची रुग्णवाहिका त्या ठिकाणी पोहचते. डॉक्टरांकडून मिळालेला मृत्यूचा दाखला त्यांना द्यावा लागतो. त्यानंतर ते मृत शरीर घेऊन जातात.

— कृष्णा चांदगुडे

सध्या देहदान किंवा अवयवदानाबद्दल लोकांना शास्त्रीय माहिती नसल्याचे जाणवले. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे दागदागिने किंवा मौल्यवान वस्तू अंगावरून काढून घेतल्या जातात व मृत शरीराचे दहन अथवा दफन केले जाते, परंतु मृत शरीराचे अनेक भाग अधिक मौल्यवान असूनही त्याची आपण विल्हेवाट लावतो. ते टाळण्यासाठी देहदान किंवा अवयवदान महत्त्वाचे आहे. भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायात ‘देशेकालेचपात्रय’ असे संबोधून दानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. महर्षी दधीचीने आपल्या शरीराचा त्याग यामुळे केला होता की त्याच्या शरीराच्या हाडापासून धनुष्य बनवून दैत्यांचा नाश होईल. राजकुमार सत्व याने आपल्या सहकार्‍यांना भुकेपासून वाचविण्यासाठी आपल्या देहाचा त्याग केला होता. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मन की बातमध्ये अयवयदानाचे महत्त्व सांगितले आहे.हे दाखले बघितले तर आज देहदान किंवा अवयवदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साधारणपणे भारतात दरवर्षी पाच लाख मृत्यू हे अवयव न मिळाल्यामुळे होतात.

- Advertisement -

खरेतर देहदान व अवयवदान यात खूप फरक आहे. सध्या भारतात वैद्यकीय अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना ५० विद्यार्थ्यांमागे एक मृतदेह अभ्यासासाठी मिळतो. साधारणपणे १० विद्यार्थ्यांमागे एक मृतदेह मिळाला तर चांगल्या पद्धतीने अभ्यास व संशोधन होईल. युरोपमध्ये पाच विद्यार्थ्यांमागे एक मृतदेह मिळतो. मृत्यू झाल्यानंतर साधारण सहा तासांच्या आत मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयात सुपूर्द करावा लागतो. अपघात, काविळ वगैरे संसर्गजन्य रोग यात देहदान होत नाही. मरणोत्तर देहदानाची इच्छा असणार्‍यांनी जिवंतपणी आपला फॉर्म जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयात भरावा लागतो. त्यासाठी घरातील अथवा नात्यातील दोन व्यक्तींची संमती असल्याची सही आवश्यक असते. दोन फोटो व आधारकार्ड सोबत द्यावे लागते. महाविद्यालयाकडून त्या व्यक्तीस ओळखपत्र दिले जाते. त्यावर असलेल्या संपर्क क्रमांकावर मृत्यूनंतर जवळच्या व्यक्तीने संपर्क करावा लागतो. रुग्णालयाची रुग्णवाहिका त्या ठिकाणी पोहचते. डॉक्टरांकडून मिळालेला मृत्यूचा दाखला त्यांना द्यावा लागतो. त्यानंतर ते मृत शरीर घेऊन जातात.

अवयवदान प्रत्यारोपण ही आधुनिक विज्ञानाची मोठी देणगी आहे. निकामी झालेले अवयव दुरुस्त करणे किंवा सदृढ व्यक्तीचे शरीर प्रत्यारोपित करणे ही किमया मानवाने हस्तगत केली आहे. व्यक्ती जर मेंदूमृत झाली तर तिचे अवयवदान करता येते. रक्तदाब वाढल्यामुळे किंवा रक्तवाहिनी फुटल्यामुळे मेंदूत रक्तस्त्राव होणे व त्यामुळे मेंदूचा रक्तपुरवठा थांबणे, मेंदूत कॅन्सरची गाठ तयार होणे, अपघातामध्ये मेंदूला मार लागणे यामुळे रुग्ण मेंदूमृत होतो. मेंदूमृत अवस्थेमध्ये मेंदू शरीराला प्रतिसाद देत नाही, ज्यात शरीराची, डोळ्यांची व बुबुळांची हालचाल थांबते. हृदय, यकृत, मूत्रपिंड वगैरे अवयवांचे काम चालूच असते. म्हणजेच रुग्णाचे शरीर जिवंत असते, मात्र त्याला संवेदना जाणवत नाहीत. श्वसनासाठी रुग्णाला कृत्रिम श्वासयंत्र लावावे लागते.

- Advertisement -

अशी व्यक्ती काही तास अथवा काही दिवसच जिवंत राहू शकते. अशा व्यक्तीचे अवयवदान होऊ शकते. अशा वेळी अवयवदात्याच्या विविध तपासण्या होतात. काविळ, कर्करोगासारखे आजार नाही याची खात्री करून घेतली जाते. अवयवदात्याच्या शरीराचे विविध भाग विविध गरजू रुग्णांना देता येतात. शासनाचा यावर अंकुश असतो. अवयव प्रत्यारोपण समितीकडे यादीत असलेल्या नंबरप्रमाणे ते गरजूंना प्रत्यारोपित केले जातात. अवयवदान प्रत्यारोपण ही पारदर्शक प्रक्रिया आहे. गैरव्यवहार अथवा पैशांची देवाणघेवाण त्यात चालत नाही. अवयवदानाची गोपनीयता राखली जाते. कुणाचे अवयव कुणाला दिले हे सांगितले जात नाही. अवयवदान करायला खर्च येत नाही, मात्र घेणार्‍याला खर्च येतो. त्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत.

मृत झाल्यानंतर जसे नेत्रदान किंवा त्वचादान करता येते तसेच जिवंतपणी एक मूत्राशय, फुप्फुस, स्वादुपिंड, यकृताचा काही भाग, आतडे हे दान करता येते. यकृत हा मजेशीर अवयव आहे. एकाच्या शरीरातील अर्धे यकृत दुसर्‍याला प्रत्यारोपित केले तर दोघांचेही यकृत काही काळानंतर पहिल्यासारखे वाढते. फुप्फुसाचा काही भाग दान केला तरी काही काळानंतर तो पहिल्यासारखा होतो. व्यक्ती हातसुद्धा दान करू शकतो. तो दुसर्‍याला बसविला जातो. कायद्यानुसार जिवंत व्यक्ती जवळच्या नातेवाईकास अवयवदान करू शकते. १८ वर्षांच्या पुढील कुणीही असे अवयवदान करू शकते. त्याखालील बालकांना पालकांची परवानगी आवश्यक असते. रक्तदान हेसुद्धा एक अवयवदान आहे. जेव्हा रुग्णाचे मूत्राशय कमजोर होते तेव्हा त्याला डायलिसीस अथवा प्रत्यारोपणाची गरज भासते, परंतु डायलिसीससाठी वेळोवेळी रुग्णालयात जावे लागते. म्हणून अशा रुग्णांना मूत्राशय प्रत्यारोपण हा उत्तम पर्याय असतो.

सर्वाधिक यशस्वी प्रत्यारोपण हे मूत्राशयाचे आहे. भारतात दरवर्षी दोन लाखांपर्यंत लोकांना मूत्राशय प्रत्यारोपणाची गरज भासते. त्यापैकी फक्त पाच हजार व्यक्तींचे मूत्राशय प्रत्यारोपण होते. शक्यतो रुग्णाच्या घरातील व्यक्तींनी मूत्राशय दान केल्यास त्यात मूत्राशय अधिक चालण्याची शक्यता असते. जिवंत आजी, आजोबा, नातवंडं, आई, वडील, पती, पत्नी, भाऊ, बहीण हे मूत्राशय आपल्या परिवारातील रुग्णाला दान करू शकतात. त्यासाठी रक्तगट व टिश्यू जुळणे गरजेचे असते. ते न झाल्यास कायद्यामध्ये मूत्राशय अदलाबदली करण्याची सोय आहे. आपुलकी असलेली व्यक्तीसुद्धा मूत्राशय दान करू शकते. तेव्हा संबंधित रुग्णालय व अधिकृतता समिती कागदपत्रांची तपासणी करते. मूत्राशय प्रत्यारोपण केलेला रुग्ण व दाता दोघेही सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगू शकतात. एड्स किंवा कर्करोग यांसारखे आजार असल्यास मूत्राशय दान करता येत नाही. १८ ते ५५ वय असलेले दाते मूत्राशय दान करू शकतात.

श्रीलंकेत मानवी अवयव ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून ग्राह्य धरली जाते. तिथे व्यक्ती मृत झाल्यानंतर त्याचे शरीर सरकारजमा होते. श्रीलंका हा देश स्वत:च्या रुग्णांची गरज भागवून डोळ्यांची निर्यात करतो. जगात स्पेन हा देश अवयवदानात एक नंबरवर आहे. भारतात अवयवदानाचा संकल्प करून प्रतिज्ञापत्रक भरण्याचे प्रमाण लोकसंख्येच्या ०.०१ टक्के इतके अत्यल्प आहे. प्रत्यक्ष अवयवदानाचे प्रमाण त्यापेक्षाही कमी आहे. कारण आपल्या देशात याबाबत फार अंधश्रद्धा आहेत. त्या अंधश्रद्धा दूर झाल्या पाहिजेत. काही शंका असल्यास कृष्णा चांदगुडे ९८२२६३०३७८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

–(लेखक देहदान, अवयवदान चळवळीचे कार्यकर्ते आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -