जातवास्तवाची पोलखोल !

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे धडाडीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांनी त्यांच्या प्रत्यक्ष कृतिशील अनुभवावर आधारित, जात पंचायतींना मूठमाती’ या बहुमोल पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच संघटनेच्या, ‘विवेक जागर ’ प्रकाशनातर्फे करण्यात आले. वाचकांना समजण्यास सुटसुटीत व्हावे म्हणून पुस्तकातील आशयाचे चार भाग करण्यात आलेले आहेत. ‘जात’ हा तसा अतिसंवेदनशील,स्फोटक विषय आहे. कोणत्याही जाती,पोटजातीतील अनिष्ट रूढी, प्रथापरंपरा यांच्याबाबत केवळ बोलणे, उच्चार करणे एवढेसुद्धा सामाजिक वादाला कारण ठरते, हे आपण जाणतो. मग त्या त्या जाती पोटजातीमधील परंपरेने रूढ झालेल्या प्रथा, परंपरांची चिकित्सा करणे, हे तर महाभयंकर काम !!

आपल्याकडील अनेक जाती, उपजातींमध्ये जात पंचायती पिढ्यापिढ्या कार्यरत आहेत. जातीच्या अंतर्गत व्यवस्थापनासाठी त्यांची त्या त्या काळात निकड भासत असावी. त्या जातीच्या सामाजिक आणि एकूणच लहान मोठ्या गरजा भागवण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी या जात पंचायती पुढाकार घेत असत. लोकही संरक्षक म्हणून सगळ्यात विश्वासाचा, कमी खर्चाचा, सहज उपलब्ध होणारा आणि समस्येचा लवकर निपटारा करणारा मार्ग म्हणून त्यांच्याकडे जात असत. जातीअंतर्गत निर्माण झालेले पेचप्रसंग, तंटेबखेडे सोडविण्यासाठी जातपंच बिचारे इमानेइतबारे न्यायदान करण्याचे काम करीत. मात्र कालांतराने जातपंचांनी आपल्या बांधवांची नाडी ओळखली आणि मनमानी सुरू केली. जात बांधवांच्या दररोजच्या व्यवहारातील जवळजवळ प्रत्येक बाबीवर जात पंचायतीने प्रचंड बंधने लावायला सुरुवात केली. जबरी आर्थिक दंड ठोकणे, दंड न भरल्यास अनन्वित शारीरिक-मानसिक छळाचा अवलंब करणे, जातीतून बहिष्कृत करणे किंवा तशी सातत्याने धमकी देणे असे अन्यायकारक न्यायनिवाडे करणे सुरू झाले. अत्यंत क्रूर, अमानवी आणि अमानुष प्रकार जात पंचायती सर्रास करू लागल्या.

देश स्वतंत्र झाला. आधुनिक लोकशाही आपण स्वीकारली. पण जात पंचायतींची मनमानी जशीच्या तशी राहिली. त्याचे कारण त्या त्या जातबांधवांवर जातपंचांनी एवढी दहशत निर्माण केलेली असते की ते निमूटपणे सर्व सहन करतात किंवा परागंदा होतात, जीवन संपवतात. दुसर्‍या बाजूला प्रचलित न्याय व्यवस्थेकडे दाद मागण्यासाठी पीडितांची हिंमत होत नाही किंवा ते रूढीग्रस्त असल्याने प्रचलित न्यायव्यवस्थेकडे दाद मागण्यासाठी जाण्याचे त्यांना ठाऊक नसते. तसे मार्गदर्शन आणि आधार कोणी देत नाही. मात्र महाराष्ट्र अंनिसने अशा पीडितांच्या वेदनांना वाट मोकळी करून देण्याचे महत्वाचे काम मागील आठ वर्षांपूर्वीच केले.

नाशिकमध्ये आंतरजातीय विवाह केलेल्या एका गरोदर मुलीचा गळा आवळून खून करणार्‍या तिच्या पित्याला जातीच्या जात पंचांनी जगणे मुश्कील करून टाकले होते. त्याचा जाच असह्य होऊन त्याने ही वेदनादायी हत्त्या केल्याचे कबूल केले. ह्या क्रूर प्रकारामागे जात पंचायतीचा हात असल्याचे, अंनिसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या हिमतीने समाजापुढे उघड केले. त्यानंतर अशा पीडितांना समोर येण्याचे आवाहन केले आणि अनेक जात पंचायतीने पिडलेल्या, जगणे असह्य केलेल्या पीडितांची जणू रांगच अंनिसकडे लागली. संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर अविनाश पाटील व इतर मान्यवर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी सुरुवातीला महाराष्ट्रभर पाठपुरावा केला, परिषदांचे आयोजन केले. याची प्रमुख धुरा सांभाळली ती या पुस्तकाचे लेखक कृष्णा चांदगुडे यांनी!!

सलग तीन वर्षे कुटुंबापासून दूर राहून, स्वतःचा वेळ, श्रम, पैसा खर्च करून त्यांनी, पीडितांच्या वेदनांना आवाज दिला, शब्द दिला, त्यांना बोलते केले. त्याचाच परिपाक म्हणजे हे पुस्तक !!! संघटनेच्या पाठपुराव्यातून जातपंचायतींच्या मनमानीला कायदेशीर लगाम घालण्यासाठी सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा 2017 मध्ये लागू झाला. जात पंचायतीच्या विरोधात आतापर्यंत दीडशेच्या आसपास गुन्हे दाखल झालेले आहेत. जातीची उतरंड असलेल्या भारतीय समाजात अनेक जात पंचायती ह्या जातींच्या निर्मितीनंतर पुढील काही काळात निर्माण झाल्या. त्या त्या जाती, उपजातींवर त्यांनी हर प्रकारे वर्चस्व निर्माण केले. ते टिकून राहील यासाठी कोणालाही न जुमानता, अन्यायकारक न्यायनिवाडे करण्याचे काम सुरूच ठेवले. ज्या व्यक्तीने त्यांच्या आदेशांचे उल्लंघन केले, त्याला बहिष्कृत करणे, दंड आकारणे, बंधने लादणे सुरूच राहिले. यातून समाजातील महान व्यक्तीसुद्धा त्या काळात सुटल्या नाहीत. त्याचा इतिहास हा पहिल्या भागातील बहिष्कृतांचा इतिहास या प्रकरणात वाचकांना वाचायला मिळेल.

गावगाडा ह्या दुसर्‍या प्रकरणात राजेशाहीपासून तर गावाची व्यवस्था चालवणारे, ती व्यवस्था कशी, कशी होती, येथील समाजाप्रती इंग्रजांनी कशाप्रकारे अनास्था दाखवली आणि त्याचे दुष्परिणाम वंचित-भटक्यांना आजही कसे भोगावे लागतात, याची माहिती या प्रकरणात आहे. जात पंचायतीने केलेल्या जाचाला कंटाळून, नाशिकमध्ये 2013 मध्ये पित्यानेच आपल्या गरोदर मुलीची हत्त्या केली. ह्या लांच्छनास्पद, वेदनादायी हत्त्येनंतर प्रथमतःच जात पंचायतींच्या काळ्या कारनाम्यांचा अमानुष प्रकार महाराष्ट्र अंनिसने समाजासमोर उघड केला आणि तिथून ही मोहीम सुरू झाली. तिची वाटचाल पुढे कशी कशी होत गेली, त्याचा आढावा या तिसर्‍या प्रकरणात घेतलेला आहे. मुळात जात पंचायतीची रचना का झाली, कशी झाली, आज ती कशाप्रकारे आहे, त्यात स्त्रियांचे नगण्य स्थान, याचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करण्याचा प्रयत्न लेखकाने या प्रकरणात केलेला आहे.

चंगळवादी आणि दहशतवादी मानसिकता बनलेल्या जात पंचायती केवळ प्रबोधनाने, सुसंवादाने, त्यांची मनमानी बंद करणार नाहीत, हे लक्षात आल्यावर, याकामी कठोर कायद्याची गरज संघटनेला भासली. त्याचा पाठपुरावा करण्यासोबतच संपर्कात आलेल्या पीडितांना मानसिक आधार देणे, त्यांना धीर देणे, त्यांना बोलते करणे, शक्य ती सर्व मदत मिळवून देणे, जात पंचायतींशी सुसंवाद करून, त्यांना जातपंचायती बरखास्त करण्यास प्रवृत्त करणे असा संघर्षमय प्रयत्न अंनिसने केला. या संघर्षाची वाटचाल पहिल्या विभागाच्या या प्रकरणात वाचायला मिळेल. हे पुस्तक लिहिण्यामागचा लेखकाचा तसेच संघटनेचा मुख्य उद्देश म्हणजे जातपंचांनी अतिशय क्रूरपणे, अमानुषपणे पिडलेल्या, जीव आणि जीवन नकोसे झालेल्या विविध जातीउपजातींच्या पीडितांचे दाहक वास्तव समाजासमोर आले पाहिजे आणि हे पीडित केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या विविध राज्यांमध्ये, भागांमध्ये आजही जिवंतपणी मरणयातना भोगत आहेत. त्याची वस्तुनिष्ठ माहिती पीडितांच्या व्यथा, या दुसर्‍या भागात घेतलेल्या आहेत. पुस्तकाची मर्यादित पृष्ठसंख्या लक्षात घेऊन लेखकाने केवळ अठरा पीडितांच्या संक्षिप्त स्वरूपातल्या कथा, व्यथा, वेदना येथे नमूद केलेल्या आहेत. त्या वाचल्यानंतर वाचकांच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. दुसर्‍या बाजूला जात पंचायतीच्या क्रूरतेबाबत तीव्र संताप निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.

या सामाजिक समस्येची मुळात जाण असलेले, त्यांच्यामध्ये राहिलेले, त्यांच्यासाठी काम केलेले आणि यापुढेही त्यासाठी काय काय करता येईल, याचा शास्त्रशुद्ध विचार, उपाय याचा उहापोह करणारे मान्यवरांचे लेख पुस्तकाच्या तिसर्‍या भागात समाविष्ट केलेले आहेत. त्यामध्ये संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर , ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक उत्तम कांबळे यांचे चिंतन, मनन आणि हा प्रश्न धसास लावण्यासाठी पुढे याबाबत करावयाची वाटचाल असे अभ्यासपूर्ण लेख आहेतच.

शिवाय या कामात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आजही असलेले संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या लेखांचाही समावेश यामध्ये आहे. पुस्तकाच्या शेवटच्या भागात महत्त्वाची परिशिष्टे जोडलेली आहेत. त्यात संक्षिप्त रूपात मोहीमेची वाटचाल, अंनिसच्या प्रयत्नातून बरखास्त झालेल्या जात पंचायती, कायद्याच्या सूची आणि संदर्भसूची लेखकाने जोडलेली आहे. पुस्तकाचे लेखक कृष्णा चांदगुडे यांच्यासोबत अनेकवेळा प्रत्यक्ष कामात सहभागी असलेले अंनिसचे कार्यकर्ते डॉ. गोराणे यांची प्रस्तावना या विषयाचे महत्त्व स्पष्ट करते. कृष्णा चांदगुडे यांचे मनोगत मनाला भिडणारे आहे. काम करण्याची प्रेरणा, त्यांच्या भावना, कामासाठी त्यांना मिळालेली इतरांची मदत, सहकार्य, कुटुंबाचा त्याग याबाबत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. आपल्या देशातील सर्व प्रकारच्या विषमतेचे आणि आजच्या राजकारणाचे मूळ म्हणजे आपल्या समाजातील जातवास्तव हेच आहे.

ते संपवायचे असेल तर जात निर्मूलन होणे आवश्यक आहे. मात्र आजतरी त्यावर उपाययोजना करण्यासाठी ठोस मार्ग असला तरी कुणीही त्याचा अवलंब करण्यासाठी हिंमत दाखवणार नाही, दाखवत नाही. मात्र ते अग्रक्रमाने करायचे काम आहे. ती साधी गोष्ट नाही, महाकठीण गोष्ट आहे. जातीचे अग्रटोक असलेल्या जात पंचायतीच्या मनमानीला मूठमाती देण्याचे ऐतिहासिक काम कृष्णा चांदगुडे यांच्या त्यागातून सुरू झालेले आहे. महाराष्ट्रापुरतीच मर्यादित ही बाब नाही तर, देशाच्या लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आणि गरजेची बाब म्हणून या पुस्तकाकडे वाचकांनी पाहायला हवे, असे सुचवावेसे वाटते. एका अतिसंवेदनशील विषयाला हात घालून, प्रचंड धाडस दाखवले. सर्व अनुभव स्वतःच्या शब्दात लिहिण्यासाठी कृष्णा चांदगुडे यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे,आटोकाट प्रयत्न केला आहे, याचे आम्ही साक्षीदार आहोत..त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..