विळखा व्यसनांचा…

पाठीमागच्या आठवड्यात भारतीय इलेक्ट्रॉनिक मीडियाला सगळ्यात मोठी बातमी हाताला लागली. ती बातमी म्हणजे बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीच्या पथकाने अमली पदार्थांसह रंगेहाथ पकडले. आपल्या मीडियाने ती बातमी एवढी रंगवून सांगितली की त्यावेळी असे वाटत होते, जसे देशात इतर समस्याच नाहीत. तिकडे लखीमपूरमध्ये शेतकर्‍यांना चिरडल्याची बातमी आपल्याकडे स्टँड बायवर असते. अर्थातच व्यावसायिकता आली की माणूससुद्धा ‘कमर्शियल गुड’ होऊन जातो. एकूणच सेलिब्रिटिंसह ब्रेकिंग न्यूजद्वारे वाढणारा टीआरपी आणि नको असताना दिली जाणारी प्रसिद्धी ही समाजासाठी किती मारक आहे, यावर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. पण दुरुस्त होईल तो मीडिया कसला. यानिमित्ताने का होईना व्यसनाधीनता आणि अंमली पदार्थांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला.

मागच्या वर्षी टाळेबंदीच्या काळात सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर एनसीबीने अमली पदार्थ सेवन करणारे आणि विकणारे यांच्यावर कारवाई करण्याचा धडाका लावला होता. उद्योगपतींची आणि बॉलीवूडमधील सेलिब्रिटींची मुले-मुली व स्वतः सेलिब्रेटी असणार्‍या दिग्गज लोकांना या कारवाईला सामोरे जावे लागले. अर्थात मीडियाने भरपूर मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर बातम्या दाखवल्या. पण त्यानंतर ते सेलिब्रेटी त्यातून सुरक्षित बाहेर पडले. इथे पुन्हा प्रश्न उपस्थित होतो की यांना कोणी वाचवले….? त्याचे उत्तर आपल्याला मिळत नाही. या सगळ्यांचा परिणाम इतर तरुणांवर झाला हे मात्र नक्की. आजची तरुणाई आणि व्यसनाधीनता यावर बारकाईने अभ्यास करणार्‍या संस्था, तज्ज्ञ डॉक्टर, मानसोपचार तज्ञ कष्ट घेत आहेत. पण योग्य तो रिझल्ट मिळत नाही. आज पाच ते दहा तरुणांचे समुपदेशन करून निर्व्यसनी बनवले जाते. तर उद्या तेवढेच तरुण व्यसनाधीनतेच्या आहारी जातात.

आजघडीला भारतामध्ये पंचवीस ते तीस टक्के लोक धूम्रपान करतात. त्यापैकी 15 टक्के लोक हे व्यसनाधीन आहेत. यामध्ये 20 टक्के तरुण आहेत. यापैकी 15 टक्के लोकांना जर सिगरेट, तंबाखू, बिडी, दारू त्यांना पाहिजे ते मिळाले नाही तर मानसिक रुग्ण होतात. धूम्रपान करणार्‍या व्यक्ती स्वतःच्या आरोग्यावर परिणाम करून घेतात. सोबतच इतरांच्या आरोग्यालासुद्धा जबाबदार असतात. सार्वजनिक ठिकाणी किंवा घरी सिगरेट ओढत असताना आपल्या आजूबाजूला असणार्‍या व्यक्तींवरदेखील त्याचा दुष्परिणाम होतो. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. दंड आकारण्यात येईल. असे लिहिलेले असतानादेखील तिथेच उभे राहून धूम्रपान करणार्‍यांची संख्या कमी नाही. अलीकडच्या काळात चित्रपट सुरू होण्यापूर्वी ‘धूम्रपान करू नये’ अशा जाहिराती दाखविण्यात येतात. चित्रपटात एखादी व्यक्तिरेखा जर धूम्रपान करत असेल तर ‘धूम्रपान करणे शरीरासाठी हानिकारक आहे ’ असे स्पष्ट लिहिले जाते. पण या सगळ्या गोष्टींकडे आमचे दुर्लक्ष असते. आता तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार्‍या चित्रपट आणि वेब मालिकांमध्ये अशा कोणत्याच सूचना येत नाहीत. तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार अशी ऑडिओ आणि व्हिडिओ दृश्य पाहिली की अनुकरण प्रियता जास्त वाढते.

आणि युवक व्यसनाकडे वळतात. मध्यंतरीच्या काळात ‘संजू’ नावाचा चित्रपट आला. त्यामध्ये संजय दत्त कशाप्रकारे अमली पदार्थांचे सेवन करत असे हे दाखवले. त्यानंतर परदेशात जाऊन उपचार घेतल्यानंतर त्याने व्यसन सोडले हेही दाखवले. तरीसुद्धा त्यातून चांगले आजच्या युवकांनी घेतले आहे का, हा प्रश्नच. सोबतच पंजाबसारख्या राज्यात अमली पदार्थ सेवन करणार्‍या युवकांचे वाढते प्रमाण धोक्याची पातळी ओलांडत आहे. हे ‘उडता पंजाब’ या चित्रपटातून आपण पाहिले. इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, त्या चित्रपटातील व्यक्तिरेखा व्यसन करतात तो नायक स्वतः व्यसन करत नाही असे सांगितले जाते. चांगला श्लेष साधून बचावात्मक पवित्रा काय असतो हे इथे दिसते. एखादा सेलिब्रेटी अथवा नायक त्याच्या फॅन्ससाठी धूम्रपान करू नका असा स्वतंत्रपणे सल्ला कधीच देत नाहीत. कारण त्यांना त्याचे पैसे मिळत नाहीत. पण जर एखाद्या मादक द्रव्यांची जाहिरात करायची असेल तर तेवढ्याच ताकतीने त्या जाहिरातीला प्राधान्य देतात. कारण तिथे पैसा मिळतो. आणि याच जाहिरातींचे अनुकरण युवक करताना दिसतात.

व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर आपण पाहतो अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांच्या संसाराची घडी पुन्हा बसली नाही. सामाजिक आरोग्यासाठी आजच्या काळात युवक हा निर्व्यसनी असेल तर आपल्यासह इतरांचे भविष्य घडवू शकतो. ‘द लान्सेट’ हे एक वैद्यकीय जर्नल आहे. यात ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज’ या सर्वेक्षणाअंतर्गत अलीकडेच एक आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, 6.4 दशलक्ष मृत्यूंपैकी 11 टक्के मृत्यू हे फक्त धूम्रपानामुळे होतात. ही आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे.

तसेच अलीकडच्या काळात पुरुषांपेक्षा महिलांमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. सिगारेट ओढण्यासाठी काही ठिकाणी हब तयार करण्यात आले आहेत. मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी पार्टीमध्ये जाणे, आणि अमली पदार्थांचे सेवन करणे. हा रोजच्या जीवनाचा भाग होऊन बसलाय. एकूणच हे वाढते प्रमाण सामाजिक आरोग्य बिघडवू शकते. अशी चिंता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. वेगवेगळ्या गोष्टींसाठी धूम्रपान करत असताना पर्याय शोधले जातात. ई- सिगारेट हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. काही केमिकल्स अल्कोहोल टाकून तयार करण्यात आलेली ही सिगारेट आरोग्यासाठी घातक असतानादेखील मोठ्या प्रमाणात वाढली जाते. हे सर्व थांबवणे एक मोठे आव्हान होऊन बसले आहे.

सिगरेट, दारू, गुटखा, तंबाखू आणि इतर अमली पदार्थ विकण्यास सक्त मनाई आहे. तरीसुद्धा हे पदार्थ सर्रासपणे विकले जातात. तसा कायदा आपल्याकडे आहे. इथे प्रश्न असा आहे की, या सर्व वस्तू विकत मिळतात याचाच अर्थ याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. जर या वस्तूंचे उत्पादन थांबवले तर विक्रीचा प्रश्न येणार नाही. पण उत्पादन थांबवणे हे समोरची कित्येक वर्षे शक्य नाही हेच दिसते. कारण यातून येणारा महसूल देशाचा आणि राज्याचा अर्थसंकल्प ठरवत असतो. त्यामुळे बंधने फक्त विकणार्‍यावर येतात. उत्पादकांवर नाही ही शोकांतिका. ग्राहकांची गोष्ट जर घेतली तर ग्राहक सहज उपलब्ध आहेत. यात आणखी गंमत म्हणजे. सिगरेट आणि तंबाखूच्या पॅकेटवर स्पष्टपणे लिहिलेले असते.

‘धुम्रपान करणे आरोग्यासाठी घातक आहे’ तरीदेखील ती वस्तू विकत घेतली जाते. एका अर्थाने हे विष विकत घेण्यासारखेच आहे. आणखी गमतीचा भाग म्हणजे 1 जानेवारीला आपल्याकडे नवीन वर्ष सुरू होते. त्यादिवशी धूम्रपान करणारे अनेक युवक संकल्प करतात. यावर्षीपासून मी धूम्रपान करणार नाही. एक दोन दिवस गेल्यानंतर केलेला संकल्प लक्षातसुद्धा राहत नाही. पहिले पाढे पंचावन्नप्रमाणे शक्यता हरवून जाते. आणि पुन्हा पाऊले तिकडे वळतात. आजही वेळ निघून गेली नाही. लाखो युवक तंबाखू सेवनामुळे कॅन्सरचा शिकार झालेले आहेत. समोरच्यास ठेच लागली की मागचा शहाणा होतो असे म्हणतात. व्यसनाधीनतेच्या बाबतीतही असेच व्हावे आणि सेलिब्रिटींसारखा सेलिब्रिटीपणा आपल्याला न जडो हाच आशावाद.