घरफिचर्ससारांशसोनेखरेदीत भारत लयभारी !

सोनेखरेदीत भारत लयभारी !

Subscribe

सोन्याच्या किमतीचा विचार केल्यास भारतावर असलेल्या कर्जाच्या रकमेपेक्षाही अधिक रक्कम होऊ शकते. अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स, रशिया, चीन, सिंगापूर या सात देशांच्या सोन्याची साठ्याची आकडेवारी एकत्र केली तरी, भारतात असलेल्या सोन्याच्या साठ्याच्या आकडेवारीपेक्षा ती कमीच आहे. त्यामुळे सोन्याच्या बाबतीत भारत जगातील श्रीमंत देशांपैकी एक आहे. जगात वर्षाकाठी होणार्‍या सोने खरेदीमध्ये भारत आणि चीन हे दोन देश आघाडीवर आहेत. या दोन्ही देशांतर्फे एकूण जागतिक सोने खरेदीच्या ५७ टक्के खरेदी केली जाते. २०२१ च्या आर्थिक वर्षात भारतात अडीच ट्रिलियन डॉलर सोन्याची आयात केली. तर २०२० या वर्षामध्ये भारतात एकूण ४४६.४० मेट्रिक टन इतक्या सोन्याची खरेदी केली.

भारत हा चीननंतर सर्वाधिक सोने आयात करणारा देश. जागतिक बाजारपेठेत भारताची सोन्याची बाजारपेठ दुसर्‍या क्रमांकाची आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या एका अहवालानुसार जगातील एकूण सोन्यापैकी सुमारे २१ हजार ७३३ टन सोने हे एकट्या भारताकडे आहे. अमेरिका, चीन, जर्मनी, फ्रान्स, रशिया, सिंगापूर, इटली याप्रमुख सात देशांमध्ये असलेल्या सोन्याची आकडेवारी एकत्र जरी केली तरी, भारतापेक्षा ती कमीच आहे. याचे कारण म्हणजे सणासुदीला शुभमुहूर्तावर सोने खरेदी करण्याची भारतीय संस्कृतीतील एक पूर्वापार चालत आलेली परंपरा. याच परंपरेनुसार कोरोनानंतर प्रथमच निर्बंधमुक्त वातावरणात झालेल्या दसरा, दिवाळीला ग्राहकांकडून सोन्याची लयलुट झाल्याचे बाजारपेठेतील उलाढालीवरून दिसून येते. ऐन दिवाळीत सोन्याचे दर घसरल्याने मोठ्या प्रमाणावर सोने चांदीची खरेदी केली गेली. विशेष म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीचे वातावरण असताना भारतात मात्र सोने खरेदीचा उत्साह दिसून आला.

यंदा ऑक्टोबर महिन्यात दसरा सणाच्या तुलनेत दिवाळीला सोन्याचे दर घसरल्याने यात आणखीनच भर पडली. त्यामुळे दिवाळीत सराफ व्यावसायिकांसाठी अच्छे दिन आले. एकीकडे रशिया आणि युक्रेन प्रश्न अद्याप सुटलेला नाही, तर दुसरीकडे चीन आणि अमेरिका देशांमध्ये तैवानमुळे तणाव आहे. याशिवाय जागतिक अर्थव्यवस्थेत चलनवाढ आणि सुस्ती कायम आहे. सोन्यासाठी हे सकारात्मक संकेत आहे. महागाई वाढल्याने लोकांचा जादा पैसा अन्नधान्यावर खर्च होत आहे. ही परिस्थिती चिघळत गेल्यास सोन्याचे भाव पुन्हा वाढतील. सध्या डॉलरचा इंडेक्स वाढला आहे तसेच अमेरिकेने बँकेचे व्याजदर वाढवले, जागतिक स्तरावरील घडामोडींचा परिणाम यामुळे सोन्याचे भाव कमी झाले आहेत. त्यातच भारताला सोन्याचा पुरवठा करणार्‍या प्रमुख बँकांनी तो कमी केल्याने यातच दरवाढीची बिजे रोवली गेली आहेत. त्यामुळे सध्या तरी भारतात सुवर्णकाळ अनुभवायला मिळत आहे.

- Advertisement -

जगभरात सध्या मंदीचे वातावरण आहे. तर महागाईने सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे. मंदीची भीती जगभर पसरत आहे. परंतु भारतीयांवर याचा कोणताही परिणाम दिसून येत नसल्याचे सणावाराला होत असलेल्या खरेदीवरून दिसून येते. यंदाच्यावर्षी दसरा आणि दिवाळीला ग्राहकांनी अक्षरशः सोन्याची लयलुट केल्याचे दिसून आले. दरवर्षी दसरा-दिवाळी नेहमीप्रमाणे सोनेखरेदी वाढतेच, यंदाही हाच ट्रेंड राहिलेला दिसला. दिवाळीत नोकरदार वर्गाला बोनस मिळतो, त्यातून ग्राहक मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करतात. यंदा दसर्‍याच्या दिवशी गेल्यावर्षीच्या ३० टक्क्यांनी अधिक सोने खरेदी झाली. दसर्‍याच्या मुर्हूतावर सोन्याचा भाव ५३ हजार तर चांदीचा दर ६१ ते ६२ हजारांपर्यंत पोहचला होता. सन २०२० मध्ये सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅमला ५१ हजार रूपये नोंदवला गेला.

तर चांदीचा भाव ६४ हजार रूपये नोंदवला गेला. यंदा मात्र सोन्याचा भाव ५० हजार रूपये प्रती १० ग्रॅमसाठी तर चांदीचा दर ६० हजार रूपये किलोपर्यंत पोहचला. अर्थात, शहरांनुसार सोने चांदीचे भाव बदलत असतात. यात जीएसटी, दागिने घडविण्यासाठी लागणारे मजुरीचे दर वेगळे आकारले जातात. हौसेपेक्षा एक सुरक्षित आणि शाश्वत गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करण्याकडे कल वाढू लागला आहे. कोरोनानंतर तर यात अधिक वाढ झाल्याचेही दिसून येते. गेल्या वर्षी दिवाळीवर कोरोना संकट गंभीर असल्याने सोन्याच्या बाजारपेठेत फार उत्साह नव्हता. तेव्हा सोन्याचे दरही वधारले होते. यंदा मात्र कोरोनाचे संकटही कमी झाले आहे, तसेच सोन्याचे दरही मागील वर्षीच्या तुलनेत कमी झाले आहेत. त्यामुळे या दिवाळीत सोन्याच्या मागणीत वाढ दिसून आली. विश्लेषकांच्या मते, पुढील दिवाळीपर्यंत सोन्याच्या किमती प्रति १० ग्रॅमसाठी ५४ हजारांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

- Advertisement -

एका अहवालानुसार भारताने सप्टेंबरपर्यंत ७४० टन सोने आयात केले आहे. भारताची सोन्याची मागणी जुलै-सप्टेंबर या कालावधीत १३९.१ टन होती, सकारात्मक वातावरणामुळे २०२० च्या तुलनेत त्यात ४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोन्याच्या दागिन्यांची मागणी ५८ टक्क्यांनी वाढून ९६.२ टन झाली, तर नाण्यांच्या गुंतवणुकीची मागणी देखील १८ टक्क्यांनी वाढली. पावसाळा आणि पितृ-पक्षाचा कालावधीत खरेदीत घट झाली, मात्र सोन्याच्या कमी झालेल्या किमतींनी मागणीत चांगली वाढ नोंदवली आहे. जागतिक बाजारपेठेतील वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार भारतीयांकडे जगातील एकूण सोन्यापैकी २१ हजार ७३३ टन सोने आहे.

या सोन्याच्या किमतीचा विचार केल्यास भारतावर असलेल्या कर्जाच्या रकमेपेक्षाही अधिक रक्कम होऊ शकते. अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स, रशिया, चीन, सिंगापूर या सात देशांच्या सोन्याची साठ्याची आकडेवारी एकत्र केली तरी, भारतात असलेल्या सोन्याच्या साठ्याच्या आकडेवारीपेक्षा ती कमीच आहे. त्यामुळे सोन्याच्या बाबतीत भारत जगातील श्रीमंत देशांपैकी एक आहे. जगात वर्षाकाठी होणार्‍या सोने खरेदीमध्ये भारत आणि चीन हे दोन देश आघाडीवर आहेत. या दोन्ही देशांतर्फे एकूण जागतिक सोने खरेदीच्या ५७ टक्के खरेदी केली जाते. २०२१ च्या आर्थिक वर्षात भारतात अडीच ट्रिलियन डॉलर सोन्याची आयात केली. तर २०२० या वर्षामध्ये भारतात एकूण ४४६.४० मेट्रिक टन इतक्या सोन्याची खरेदी केली.

भारतात सोन्याचा सर्वाधिक पुरवठा ICBC स्टँडर्ड बँक, जेपी मॉर्गन आणि स्टँडर्ड चार्टर्डकडून केला जातो. सोन्याचा पुरवठा करणार्‍या बँकांनी चीन, तुर्कस्तान आणि इतर बाजारपेठांमध्ये त्यांची शिपमेंट वाढवली आहे. त्यांना तिथे चांगली किंमत मिळते. परिणामी सोन्याच्या वहनात घट झाल्यामुळे भारतीय बाजारातील किमती झपाट्याने वाढू शकतात.आता स्टॉकमध्ये १० टक्क्यांहून कमी सोने शिल्लक आहे. भारतात दिवाळीनंतर लग्नसराई सुरू होेते याकाळात सोन्याच्या दरात वाढ होऊ शकते, असा अंंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या काळातही सोन्याचा खप जास्त असतो. यामुळे खरेदीदारांना सोने खरेदीसाठी जास्त किंमत मोजावी लागू शकते. दर स्थिर असल्याने यंदा सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणवर केली गेल्याचे दिसून आले, मात्र जर पुढील काळात भारताला सोन्याचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होऊ शकला नाही तर किमतीत वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तविला जात आहे.

असा आहे ट्रेंड
सोने खरेदीचा ट्रेंड जर लक्षात घेतला तर, टिअर १ आणि टिअर २ शहरांमध्ये सोन्याची मागणी अधिक वाढलेली दिसून येते. या श्रेणीतील शहरांमध्ये सोन्याची मागणी ४४ टक्क्यांनी तर चांदीची मागणी ३४ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्यावर्षीच्या धनत्रयोदशीच्या खरेदीच्या तुलनेत यंदा ही वाढ तिपटीने झाली आहे. सोन्याच्या दागिन्यांना असलेल्या मागणीवर पहिल्या श्रेणीतील शहरांपैकी मुंबई, हैदराबाद, दिल्ली आणि बेंगळुरू यांचे वर्चस्व आहे. दुसर्‍या श्रेणीतील शहरांपैकी कोईम्बतूर आघाडीवर असून त्यानंतर चंदीगढ व लखनौचा क्रमांक लागतो. सोन्याच्या बिस्कीट बाबतीत जयपूर आघाडीवर असून त्यानंतर कोईम्बतूर व लखनौ आहे. सोन्याच्या नाण्यांना असलेल्या मागणीत दुसर्‍या श्रेणीतील शहरांपैकी जयपूर आघाडीवर असून त्यानंतर कोईम्बतूर आणि लखनौ अनुक्रमे दुसर्‍या व तिसर्‍या स्थानावर आहे.

Manish Katariahttps://www.mymahanagar.com/author/kmanish/
गेल्या १७ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, प्रशासकीय मुद्यांवर वृत्तांकन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -