घरफिचर्ससारांशपर्यावरणस्नेहाचा स्वागतार्ह श्रीगणेशा !

पर्यावरणस्नेहाचा स्वागतार्ह श्रीगणेशा !

Subscribe

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती आणि रासायनिक रंगांचा वर्षांनुवर्षे होत असलेला वापर, त्यामुळे होणारं भरमसाठ जलप्रदूषण आणि भग्नमूर्तींचं विदारक दर्शन हे चित्रं अलीकडे काही प्रमाणात बदलायला सुरुवात झालीय. सरकारी पातळीवरून लादण्यात आलेले निर्बंध, व्यापक प्रबोधन यामुळे शाडूमातीच्या गणेशमूर्तींसोबतच मूर्तीदान आणि निर्माल्य संकलनाच्या उपक्रमांमुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची चळवळ मूळ धरू लागलीय. अर्थात, त्याआड येणार्‍या प्लास्टिकच्या विघ्नाला दूर करण्यासाठी सरकारी पातळीवरुन प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे.

लाडक्या गणपती बाप्पांची मूर्ती दान देण्याची संकल्पनाही कधीकाळी पचनी पडत नव्हती. विसर्जनाऐवजी मूर्ती दान देणं हे पाप मानलं जात होतं. गणरायाची मूर्ती दान देणं हे पाप मानून मूर्ती संकलनासाठी पुढे येणार्‍यांवर धावून जाण्यापर्यंतची मजल गाठली जात होती. आज मात्र बुद्धिदाता गणेशाच्याच कृपेने ही परिस्थिती पूर्णपणे पालटल्याचं चित्रं आहे.
गेल्या काही वर्षांत गणेशोत्सव साजरा करण्यामागील मूळ हेतू विस्मरणात जाऊन त्याला एखाद्या सोहळ्याचं स्वरुप आलंय. रोषणाई, आवाजाचा दणका हे सारं त्यात ओघाने आलंच. अर्थात, अनेक मंडळं आजही गणेशोत्सवादरम्यान समाजप्रबोधन, राजकारण, महागाई, रोगराईसारख्या समस्यांचं वास्तव नावीन्यपूर्ण देखाव्यांमधून सादर करत असतात. गणेशोत्सव आला की लाखो भक्त स्थापनेसाठी आकर्षक मूर्ती विकत घेण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यातून ही मूर्ती कशाची यापेक्षा ती किती देखणी आहे, याकडेच अधिक कल असल्यानं पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस)च्या मूर्तींना आजही मागणी असते. एका साच्यात पीओपी ओतायचं, मूर्ती तयार झाली की त्याला रासायनिक रंगांचा आकर्षक मुलामा चढवायचा एवढंच व्यावसायिकांचं काम असतं. त्यामुळे या मूर्ती शाडूमातीच्या मूर्तींपेक्षा स्वस्त आणि मस्त असतात. दुसरीकडे शाडूमूर्तींच्या बाबतीत मात्र मूर्तीकाराला प्रत्येक मूर्तीसाठी स्वतंत्रपणे काम करावं लागतं. त्यासाठी त्याची कला पणाला लागले. त्यामुळे साहजिकच मूर्तीसाठी किंमतही अधिक मोजावी लागते. म्हणूनच बहुतांश भाविक पीओपीच्या मूर्ती खरेदीला पसंती देत असतात.

गणेशोत्सव दहा दिवस धुमधडाक्यात साजरा होतो, मात्र त्यानंतर खरा प्रश्न उद्भवतो तो, गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा. घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या लाखो मूर्ती दरवर्षी नदी, नाले, समुद्र किंवा तलावांमध्ये विसर्जित केल्या जातात. मोठ्या शहरांतमधला हा विसर्जनसोहळा डोळ्यांचं पारणे फेडणारा असतो. लाडक्या गणरायाला वाजतगाजत निरोप दिला जातो. या सोहळ्यानंतर काही दिवसांत जेव्हा पाणी ओसरतं तेव्हा मनोभावे पूजन केलेल्या त्याच मूर्ती विसर्जनानंतर भग्नावस्थेत पडल्याचं दिसतं. मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर अशी मोठी शहरं असो की लहान गावं, प्रत्येक ठिकाणी ही मन हेलावून सोडणारी परिस्थिती असते. विसर्जनाची दुसरी बाजू म्हणजे अनेक शहरांत मूर्ती विसर्जित केल्यानंतर प्रचंड प्रमाणात जलप्रदूषण होऊन जलसृष्टीचं अस्तित्व आणि या पाण्यावर अवलंबून गावांवर संकट ओढावल्याचीही उदाहरणं आहेत. पीओपी पाण्यात विघटित होत नसलं तरीही मूर्तीवरचे रंग पाण्यात मिसळतात आणि त्यातून जलप्रदूषण होतं. याशिवाय देवाला आरतीवेळी दाखवला जाणारा नैवेद्य आणि मूर्तीपुढील निर्माल्यदेखील पाण्यात टाकले जाते. या वस्तू सडून जलप्रदूषणाचा प्रश्न अधिक गंभीर बनतो. या प्रदूषणामुळे पाण्यातील ऑक्सिजनची पातळी खालावून जलचरांचा जीव धोक्यात येतो.

- Advertisement -

नाशिकमध्ये इतर शहरांप्रमाणेच गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. त्यामुळे जलप्रदूषणाचा मुद्दाही नेहमीच कळीचा ठरलेला असतो. अशा परिस्थितीत मूर्ती आणि निर्माल्यदानासाठी महापालिकेने सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पुढाकार घेतल्यानं दरवर्षी हजारो टन निर्माल्य आणि लाखो मूर्ती संकलित होत असतात. 2015 सालात नाशिककरांनी 2 लाख 71 हजार गणेशमूर्ती दान केल्या होत्या. 2019 सालात 3 लाख 69 हजार मूर्ती जमा झाल्या होत्या. याशिवाय 131 टन निर्माल्य संकलित झालं होतं. मूर्तीदानाची संख्या प्रत्येक वर्षाला वाढत चाललीय.

जलप्रदूषणाचा हा गंभीर बनत चाललेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेल्या दहा वर्षांत पर्यावरणक्षेत्रात कार्यरत संस्था आणि व्यक्तींनी व्यापक प्रबोधन केलं. त्यातूनच शाडूमाती गणेशमूर्ती आणि मूर्तीदानाच्या संकल्पनेला बळ मिळालं. शैक्षणिक, राजकीय, सामाजिक आणि खासगी संस्थांनी पुढाकार घेत शाडूमातीच्या गणेशमूर्ती बनवण्याच्या कार्यशाळा घेतल्या. त्यामुळेच लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रतिसाद लाभतो आहे. याच सक्रिय सहभागामुळे शाडूमातीच्या मूर्तींना प्रचंड प्रतिसाद मिळतोय. गेल्या महिनाभरापासून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सुरू असलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळा म्हणजे एक प्रकारचा जागरच ठरला. याचाच परिणाम म्हणून यंदाही नागरिकांचा कल हा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींपेक्षा शाडू मातीच्या मूर्तींकडे अधिक असल्याचे चित्र शहरभरातल्या बाजारपेठेत दिसून आलं. यावरून भाविक पर्यावरणाबाबत किती सजग होत आहेत हे दिसून आलं. केवळ पर्याय नाही म्हणून आजवर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती प्रतिष्ठापित करून गणेशोत्सव साजरा करायचा आणि पर्यावरण संवर्धनासाठी या मूर्ती स्वतःहून महापालिकेला दान द्यायच्या अशी वास्तववादी भूमिका नाशिककरांनी घेतली आहे. शाडूमातीच्या बाप्प्पांच्या निर्मितीतून पर्यावरण संवर्धनाचा हा संदेश थेट पुढील पिढीच्या मनात रुजतो आहे आणि नेमकी हीच बाब पर्यावरण संवर्धनासाठी भविष्यात अत्यंत महत्वाची ठरणार आहे. म्हणूनच बुद्धीदात्या गणरायाचा हा उत्सव खरोखरच पर्यावरणावरचं विघ्न दूर करण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय, ही बाब सर्वार्थाने महत्वाची ठरावी!

- Advertisement -

-प्रशांत सूर्यवंशी

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -