घरफिचर्ससारांशतो मोगरा असावा...

तो मोगरा असावा…

Subscribe

जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला, केलेत वार ज्याने तो मोगरा असावा! हे भीमराव पांचाळेंच्या आवाजातील इलाही जमादार यांची गझल, तिच्यातील एकतानता ऐकली की, आपल्याही काळजाची जखम उघडी होऊन वाहू लागते. असा कोणता मोगरा असतो, ज्याच्या वाराने आपण पुरते घायाळ होतो? हे नितांत सुंदर गाणे नेहमीच वास्तवाचे भान देते. ही गझल ऐकल्यावर चेहरा हरवलेली अन मुखवटे धारण करून वावरणारी माणसे दिसू लागतात. किती खोटे हसतात, बोलतात, पहातात माणसं?

गाण्याचा सहवास आणि शब्द सुरांची बरसात आपल्या लेखी शरदाचे टिपूर चांदणेच असते. कोणताही रसिक माणूस या चांदण्यात नखशिखांत न्हातो. भीमराव पांचाळे यांच्या ‘एक जखम सुगंधी’ या अल्बममधील गझला अशाच नितांत सुंदर आहेत. त्यांची ती लकेर कधी कधी आपसूकच आपल्या गळ्यातून येते. अलीकडे जेव्हा जे गाणे ऐकावे वाटते ते आपण केव्हाही ऐकू शकतो. माहिती आणि रंजनाचा रतीब चोवीस तास सुरू असतो. हे आज किती सोप्प झालं नाही? माणसाचे जीवन आता बदलतेय. जे हवे ते सहज मिळतेय. एक जखम सुगंधी ही गझल डोळे मिटून ऐकली तर अर्थाचे अनेक पदर ती आपल्या पुढ्यात ठेवून जाते. रात्रीच्या वेळी सर्व झोपेच्या अधिन झाल्यावर आपण एकट्याने जागून गझल ऐकणे कदाचित लोकांच्या दृष्टीने वेडेपणाच! पण हे शब्द नक्षत्रांच्या गावी घेऊन जातात. कसे असते हे गाव? असे कोणी विचारले तर त्याबाबत मात्र आपणास शब्दात सांगता येणार नाही. गुलाबाचा सुगंध कसा? गुलाबी? हे कसे सांगणार? काही अनुभव शब्दात मावत नाहीत. या अनुभवांना शब्दाच्या चिमटीत पकडता येत नाही. हा अनुभवाचा विषय. ज्याचा त्याला तो संवेद्य होतो. स्वसंवेद्या आत्मरुपा असा ! म्हणून संवेद्य झाल्याशिवाय तो कसा कळणार? यासाठीच माणसाला पंच ज्ञानेंद्रिये दिलीत. स्वयंभू, स्वायत्त! प्रत्येकाचा विषय वेगळा. कानाचा विषय नाकाला जमणार नाही आणि नाकाचा कानाला. पण तरीही शब्दांची, सुरांची जादू अजबच. शब्दांतून सर्व अनुभव सजग होतात. आपल्या पुढ्यात येतात. म्हणूनच साहित्याचा अनुभव हा पंचविध अनुभव. संगीत कानाला तृप्त करते, नाकाला गंध जाणवतो, त्वचेला स्पर्श, डोळ्याला रूप, रंग, जिभेला रस. हे सर्व पंचविध अनुभव शब्द देऊ शकतात. म्हणून शब्दांचे सामर्थ्य मोठे! ते धन असते याच अर्थाने. या शब्दाला जेव्हा सूर येऊन भेटतात तेव्हा त्या शब्दाला अमृताची गोडी येते. अनेक कवींचे शब्द त्यातील संगीताने सुवर्णाच्या तेजाने झळकले. संत ज्ञानदेवापासून, संत तुकाराम, एकनाथ, आपले शाहीर, आधुनिक काळातील ना.घ, मोघे, इलाही जमादार, सुरेश भट, महानोर, खानोलकर, ग्रेस, पाडगावकर, अशा अनेक कवींच्या शब्दांना संगिताचे कोंदण लाभले. त्या शब्द सुरांनी आपले जीवन सुगंधी झाले. जखमा सुगंधी करण्याची ताकद केवळ शब्द-सुरातच!

भीमराव पांचाळे यांचा आवाज अत्यंत मधुर आवाज. हा आवाज खरोखरच ग्रेसच्या कवितेसारखाच आपल्या मनाला मधुर डंख करतो. अशा कोणत्याही जखमा सुगंधी बनवतात. गाण्याचे हेच तर वैशिष्ठ्य असते. गाणे आपल्या वेदनेला ही सुगंधाची झालर लावते. दु:खाचेही गाणे होते. विरहाचे गाणे होते. चंदनाची चोळी माझी अंग अंग पोळी म्हणणारी ज्ञानदेवांची विरहिणी कोणते गाणे गात होती? किंवा भेटी लागी जीवा लागलीसे आस म्हणणार्‍या तुकोबांच्या मनाला कोणती आस लागली होती. ही ओढ, ही आस त्यांनी शब्दातूनच अभिव्यक्त केली. शब्दसुरांचे सामर्थ्य असे चटका लावून जाते ..
जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला, केलेत वार ज्याने तो मोगरा असावा! हे भीमराव पांचाळेंच्या आवाजातील इलाही जमादार यांची गझल, तिच्यातील एकतानता ऐकली की, आपल्याही काळजाची जखम उघडी होऊन वाहू लागते. असा कोणता मोगरा असतो, ज्याच्या वाराने आपण पुरते घायाळ होतो? हे नितांत सुंदर गाणे नेहमीच वास्तवाचे भान देते. ही गझल ऐकल्यावर चेहरा हरवलेली अन मुखवटे धारण करून वावरणारी माणसे दिसू लागतात. किती खोटे हसतात, बोलतात, पहातात माणसं?

- Advertisement -

वास्तवात आरशासारखी स्वच्छ पारदर्शी माणसे असतील का? क्वचितच असे माणसे भेटतात. काही इतिहासाच्या, भूतकाळाच्या पानात ती आपल्याला दिसतात. त्याचं दिसणं आणि असणं एकच असते. त्यांच्या दिसण्या असण्यात अद्वैत असते. अशी माणसे आरशाला भावतात. अशी कितीतरी माणसे इतिहासाच्या पानात सापडतात. कधी कधी ते पुस्तकातून भेटण्यास येतात. शब्दाशब्दातून ठिबकतात, अर्थवाही होतात. अशी माणसे आता दुर्मिळ होतायत. गौतम बुद्ध ते महात्मा गांधींपर्यंतची सत्वशील आणि सत्यशील माणसे आपण पाहिली नसली तरी, ती आपणांस भेटतातच ना. गौतम बुद्ध, आपले ज्ञानदेव, तुकोबा ही माणसे तर लौकिका पल्याडची. तुका आकाशाएवढा असे तुकोबांनी म्हटलेले आहेच ना? नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर असे संत नामदेवांनी ज्ञानदेवाबद्दल उद्गार काढले. आपल्या शुद्र, गळक्या झोळीत या तेजस्वी सूर्यांना ना कसे झेलता येणार?

आधुनिक काळातही अशी काही स्वच्छ, पारदर्शक माणसे होऊन गेली. ती कृतीशील होती. बोले तैसा चाले अशीच! लालबहादूर शास्त्री यांच्यावरचा आचार्य अत्रे यांनी लिहिलेला ‘जितुका महान तितुका लहान’ हा लेख वाचला आणि या माजी पंतप्रधानांची साधी रहाणी त्यांच्या विचारांशी किती सुसंगत होती हे ध्यानात आले. ही माणसे निसर्गाप्रमाणेच निखळ होती. निसर्ग कोणताच भेद करत नाही, तशीच ही माणसे सम्यक, संयत होती. माणूसपण जपणारी आणि जोपासणारी होती. हाच आदर्श त्यांनी आपल्यासमोर ठेवला. संत तुकोबा यांचे काव्य आणि त्यांचे जीवन किती एकजीव होते. त्यांच्यात कोणतेही द्वैत आढळत नाही. म्हणूनच ‘तुका म्हणे झरा । आहे मूळचाची खरा’ असे ते अत्यंत निष्ठेने आणि अभिमानाने म्हणू शकले. संत चोखोबांनी त्यांच्या आधीच सांगून ठेवले होते. उस डोंगा परी । रस नोहे डोंगा । काय भुललासी । वरलीया रंगा । किती द्रष्टा विचार मांडून गेले चोखोबा. असे शब्द कालातीत असतात. कोणत्याही काळाशी ते संवादी असतात. आजच्या काळात चोखोबा तुम्ही हवे होता. तुमच्या पाठी काय झाले हे पाहायचे असेल तर. ‘इलाही जमादार’ यांची ही गझल वाचली पाहिजे, ऐकली पाहिजे.
वाचलेली ऐकलेली माणसे गेली, कुठे ?
पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे?
रोज अत्याचार होतो, आरशावरती आता,
आरशाला भावलेली, माणसे गेली कुठे ?
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा !!
किती प्रश्नांची वर्तुळे या काव्याने निर्माण केली. म्हणूनच ही जखम न भरणारी आहे. पण अतीतात हरवलेल्या या जखमेत आरशाला भावलेल्या माणसांच्या कर्तृत्वाचा सुगंध लपलेला असतो. नाही तरी आपल्याही स्मृतिकोशात अनेक आठवणीची गंध कुपी असतेच, हरवलेल्या पानांची, हरवलेल्या गाण्यांची !

- Advertisement -

 -डॉ. अशोक लिंबेकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -