घरताज्या घडामोडी‘फ्रि हिट’वर ‘बेटिंग’!

‘फ्रि हिट’वर ‘बेटिंग’!

Subscribe

झटपट क्रिकेट आणि सट्टा यांचं समीकरण म्हणजे ‘बॅट आणि बॉल’ असं झालंय. काही काळापासून खेळ(व)ल्या जाणार्या इंडियन प्रिमीयर लीगने तर क्रिकेटमधील सट्टेबाजीची लख्तरंच वेशीवर टांगली आहेत, असं म्हटल्यास कुणी ‘नो बॉल’ देऊ नये. अत्यंत हुशारीने, नियोजनपूर्वक आणि प्रेक्षकांच्या बुद्धीला पटावं अशा पद्धतीने आजवर अनेकदा बुकींनी या आयपीएल सामन्यांच्या माध्यमातून सट्टेबाजीची इनिंग सुरू ठेवली आहे. मध्यंतरी ती उजेडातही आली. कारवाईही झाली.. पण, सट्टेबाजांची इनिंग थांबली नाही. एक खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरा मैदानात यावा, अशा पद्धतीने बुकींचेही अगणित खेळाडू ही इनिंग लावून धरत आहेत. मुख्य म्हणजे, या खेळाडूंना आता ‘शासकीय मान्यता प्राप्त’ म्हणण्याची वेळ आली आहे. त्याला कारणही तसंच आहे. पूर्वी चोरून लपून होणारे बेटिंग अलिकडे ऑनलाईन पद्धतीने खुलेआम मोबाईलवर खेळले जात असल्याने कारवाईची करायची कशी, हा मोठा प्रश्न आहे. त्यात अधिकृतपणे कितीतरी अॅप्लिकेशन्स तयार करण्यात आले आहेत, ज्यांना थेट बँकांशीही कनेक्ट करून घेण्यात आलंय, ज्यामुळे आता एखाद्या अड्ड्यावर, हॉटेलात, चार भिंतीआड होणारी आकडेमोड एकएका क्लिकवर होऊ लागली आहे. तीही अधिकृत! म्हणजेच ‘फ्रि हिट’वर सट्टेबाजीची फटकेबाजी आज कोट्यवधी लोक करतायत. यामुळेच की काय आयपीएल सुरू होताच सट्टेबाजांवर होणारी कारवाई यंदा फारच कमी झाल्याचे दिसते. काही शहरांमध्ये तर अद्याप सट्टेबाजांवर एकही कारवाई नाही, ही गोष्ट ‘थर्ड अंपायर’कडे दाद मागण्यासारखी ठरू शकते.

आपल्या भारत देशात म्हटलं जातं की, कायदे-नियम हे तोडण्यासाठीच बनले आहेत. त्याला कारणही तसंच आहे. उघड डोळ्यांनी दिसते मात्र काय-द्याचं ठरलं की ठरलं. त्यात पळवाटाही असंख्य. याचमुळे गुन्हेगारी क्षेत्र नेहमीच ताठ मानेने चर्चेत असल्याचं दिसून येतं. क्रिकेटमधील सट्टेबाजीचंही असंच काहीसं आहे. स्पर्धेच नियोजन सुरू होताच बेटिंगचीही गणितं ठरू लागतात. पोलिसांकडून कारवाई दाखवली जाते, मात्र त्याच्या शेकडो पटींनी वेगात जुगाराची चक्र बिनदिक्कतपणे फिरत असतात. अलिकडे तर खेळाडू, पंच आणि प्रशिक्षक, टीम मेंटोर यांनाही हे बुकीज आपल्या तालावर नाचवत असल्याचे बोलले जाते. यासाठी देशभरातच नव्हे तर देशाबाहेरही सट्टेबाजांचे जाळे विस्तारलेले आहे. परदेशातून येणारे भाव अगदी भारतातल्या कुठल्याही गल्लीबोळीतील सट्टेबाजापर्यंत पोहोचतात आणि त्यानुसार फोनवर किंवा प्रत्यक्षात सट्टा लावला जातो. त्यासाठी कमालीची गुप्तता पाळली जाते. अलिकडे मात्र ती काहीशी कमी झालीयं. त्याला वेगवेगळी कारणं आहेत, हा भाग वेगळा.

- Advertisement -

अलिकडे कायद्यातीलच पळवाटा विचारपूर्वक शोधून अधिकृतपणे जुगार खेळवला जात आहे. त्यासाठी मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर करत अधिकृतपणे वेगवेगळी अॅप्लिकेशन्स डाऊनलोड करून मनसोक्त सट्टेबाजीचा आनंद लुटला जातोय, हे दुर्दैव म्हणावं लागेल. काय तर म्हणे, प्रेडिक्शन आणि नशिबाच्या जोरावर केलेली आकडेबाजी जुगार ठरत नाही.मुळात या सगळ्या गोष्टींतून बक्कळ पैसा सरकारी तिजोरीत जातो, हे कारण महत्त्वाचं म्हणता येईल. खरं तर, बेटिंग करणार्यांवर पोलीस फसवणुकीसह सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळल्याबद्दलचा गुन्हा दाखल करतात, हा कायदा आहे. मात्र, अलिकडे त्याचा अगदी सोयीस्कर वापर केला जातोय. अनेक सट्टा प्रकारांना ‘अटी-शर्थीं’वर अधिकृत मान्यता देण्यात आल्याने कुठेतरी सट्टेबाजीला खतपाणीच घातलं जातंय, असं बोलणं चुकीचं ठरणार नाही. आज अनेकांना ‘ड्रीम’ दाखवून नानाविध अॅप्लिकेशन्स तयार केली गेली आहेत, ज्यांद्वारे कोट्यवधी भारतीय आज सट्टेबाजीचा आनंद लुटत आहेत.

आपण दिलेले प्रेडिक्शन खरे ठरताच थेट अकाऊंटला पैसे मिळत असल्याने खेळणार्यांना अगदी सुरक्षित वाटतं. पण, याचाच फटका मटक्यांप्रमाणे चार भिंतीआड सुरू असलेल्या बेटिंगला बसत असावा का, हाही प्रश्न पडतो. अशा धोकादायक ठिकाणी जायचे किंवा फोनवरून संवाद साधायचा, पैसे लावायचे आणि खेळायचं, पण पोलिसांनी धाड टाकली की जेलची हवा खायची.. ही रिस्क आता कमी लोकं घेताय असं दिसतयं. अलिकडे आपल्या तल्लख बुद्धीच्या जोरावर अन् नशिबाच्या भरवशावर अनेक जण अधिकृत सट्टा खेळण्यात दंग आहेत. परिणामी, पोलीस दादांनाही काहीशी उसंत मिळतेय. नाशिकसारख्या शहरात दरवर्षी बेटिंगचे प्रकार पोलिसी कारवायांमुळे उजेडात यायचे. आता मात्र, यावर्षी एकही ठिकाणी छापा नाही, की कुणावर कारवाई नाही… हे पाहून ‘समझदार को इशाराही काफी है’ असं म्हणता येईल.

- Advertisement -

एकूणच काय तर, नशिबाचा जुगार खेळणार्या आणि खेळवणार्यांना ‘सुरक्षित’ वातावरण आपल्या देशात अलिकडे उपलब्ध करून दिलं जातंय, ज्यामुळे कायद्याचा पळवाटांवरून चालता-चालता आकडेमोड करता येतेय, ही गोष्ट सरकारी तिजोरीला चांगलीच अनुकूल ठरतेय. बाकी पोलिसांच्या कारवाया तर यापूर्वीही सुरू होत्या आणि यापुढेही सुरूच राहतील.

‘खेळवणार्याचा खेळ’आयपीएलचा बिगूल वाजतात यावर्षी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली, दोन आंतरराष्ट्रीय संघाचे कर्णधार नाणेफेक करतात तेव्हा एक कर्णधार नाणेफेक जिंकतो, त्यावर दुसरा कर्णधार काय निर्णय घेणार असं विचारतो. तेव्हा विजयी कर्णधार त्याला उत्तर देतो की, ‘दादा भाई को पुँछ के बोलता’… आता क्रिकेटचे खरे रसिक असतील तर त्यांना या सगळ्या गोष्टींचा अर्थ सांगत बसायला नको. बुद्धिबळाच्या पटलावर राजापासून शिपायापर्यंत कुणाला कधी.. कसं.. आणि कुठे खेळवायचं हे खेळणार्याच्या हातात असतं, तो तसं विचारपूर्वक खेळवतोही… अगदी तसचं भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही घडतंय, हे बोलणं चुकीचं ठरणार नाही. हो, पण याला अपवादही आहेत. काही खेळाडू, प्रशिक्षक किंवा काही व्यक्ती आजही या गोष्टींना खतपाणी घालत नाहीत, मात्र त्यांना ‘सर्कल’बाहेर ठेऊन वेगळीच फिल्डिंग लावली जाते आणि सामने फिरवले जातात. या सर्व गोष्टी पाहणे आजकाल प्रेक्षकांनाही कमालीचे आवडते, हेही तितकेच खरे.

असा मांडला जातो डाव

ऑनलाईन सट्टेबाजीसाठी मोबाईलवर अॅप्लिकेशन डाऊनलोड करून आपल्याकडील पैसे लावून एक टीम बनवली जाते. एखाद्या खेळाडूला कर्णधार, उपकर्णधार वगैरे वगैरे बनवले जाते. त्यांच्यावर पैसे लावल्यानंतर मग ते प्रत्यक्ष सामन्यात कसे खेळले, यावर या बेटिंगवाल्यांचे नशीब ठरते. काही अॅप्लिकेशनमध्ये तर प्रत्येक षटका-षटकाला आकडेमोड चालते. या षटकात काय होणार, या बॉलवर काय होणार, अमूक एक खेळाडू किती खेळणार, कोणता संघ जिंकणार यावर पैसे लावता येतात. जिंकल्यास थेट दुपटीहून अधिक पैसे थेट बँक खात्यावर जमा होतात. काही ऑनलाईन बेटिंग अॅप तर संघ, खेळाडूंचे भाव प्रसिद्ध करतात, त्यानुसार सट्टेबाजाला मिनिटा-मिनिटाला पैसे लावता येतात, हा व्यवहारही ऑनलाईन बँकिंगद्वारेच होतो, अगदी कुठल्याही पोलिसी कारवाईची भीती न बाळगता.
रात्रीतून करोडपती..!

एखाद्याला सट्टेबाजीतला ‘स’ सुद्धा माहीत नसेल, तर त्यालाही वेड लावण्याची किमया आज काही जाहिराती करत आहेत. काही मोबाईल अॅप्लिकेशन्सद्वारे क्रिकेट सामन्यांवर प्रेडिक्शन करून पैसे लावले जातात. आपली टीम, आपला खेळाडू, आपला निकाल, आपले प्रेडिक्शन अशा अनेक गोष्टींतून पैशांचा व्यवहार चालतो. त्यातून मोठ्या प्रमाणावर बक्षिसांचा पाऊस पाडला जातो. पण, हे सगळ करताना त्याहूनही वेगळं विश्व जाहिरातींतून दाखवलं जातं. अमूक एखादी व्यक्ती जाहिरातीतून सांगते, ‘मी खूप गरीब होतो… या अॅपद्वारे पैसे लावले आणि रात्रीतून करोडपती झालो’.. बापरे… एवढं प्रेरणादायी वाक्य ऐकून करोडो भारतीयांची बोटं मोबाईलवर चुळबूळ करू लागतात. काहींना कुबेर देव पावतात, पण काहींच्या हाती काहीच लागत नसल्याने नशिबाचा हा खेळ शेवटी सट्टाच ठरतो.

बेटिंगचे किस्से..!

राज्यभरातले काही बेटिंगचे किस्से गमतीदार आहेत. आयपीएल सुरू होताच सट्टा लावणार्यांची चलबिचल सुरू होते. हळूच एखाद्या अड्ड्यावर जाऊन ‘आज काय भाव’, ‘कोणत्या टीमला किती’ असं विचारत खिशात हात घातला जातो. हे करताना खाकीच्या दंडुक्याची जाम भीती असते. त्यामुळे अनेक जण फक्त विश्वासावर पैसे आणि आपला कौल देऊन काढता पाय घेतात. पण अनेकदा असंही झालंय की मॅच संपेपर्यंत अड्ड्यावरील व्यक्ती पैशांचं गाठोड गुंडाळून फरार होतो. अलिकडेच एकाने कुठून तरी मोबाईल नंबर मिळवून काही व्यक्तींना फोन केले आणि ‘ही टीम जोरात आहे.. आज काही लावणार का’ अशी विचारणा केली. काहींनी नकार दिला, पण त्याहून अधिक व्यक्तींनी मोठ्या रकमेचे आमिष ऐकून तातडीने होकार देत शक्य तितके पैसे लागलीच ट्रान्सफर केले… आता हा भीडूही पैसे अकाऊंटला येताच फोन बंद करून गायब झाला आणि पैसे लावणारे सामना संपताच त्याला फोन करून करून हैराण झाले. यातून आपली मोठी फसवणूक झाल्याचे त्यांना लक्षात आले, पण सांगणार कुणाला..! काही शहरांमध्ये पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी अत्यंत महागड्या हॉटेल्समध्ये स्पेशल टेबलवर रुबाबदार पोशाखात बसून बेटिंग सुरू असते. एखाद्या करोडपतीच्या रुबाबात मद्य रिचवत बेटिंग करत बसलेल्या या बुकींना बेटिंगबद्दल विचारावंही कसं, असा प्रश्न सहजच पोलिसांना पडेल, असं चित्र असतं. आता बोला..!


 

Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -