Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश वास्तवभान देणार्‍या गावगोष्टी

वास्तवभान देणार्‍या गावगोष्टी

बदलत्या खेड्याचे नि सर्वसामान्य माणसांच्या विचार-कृती-वास्तवाचे चित्र अरविंद जगताप यांच्या या लेखनातून उमटलेले आहेत. या गोष्टी आकाराने छोट्या असल्या तरी त्या येथील सर्वसामान्य माणसांच्या जीवनजाणिवांचा पैस मांडणार्‍या आहेत. हा पैस वाचकांना अंतर्मुख करणारा आहे. या माणसांनीच हे जग तोलून धरलेले असल्याने या गोष्टी त्यांच्या आयुष्यातील डोंगराएवढे सत्य सांगणार्‍या आहेत. हे सत्य सर्वांनाच वास्तवाचे आत्मभान देणारे आहे.

Related Story

- Advertisement -

सामाजिक जाणिवांची चिंतनशील अभिव्यक्ती म्हणून अरविंद जगताप यांचे लेखन मूल्यवान आहे. त्यांचे समाजभान प्रगल्भ आणि वृत्ती संवेदनशील असल्याने कलेच्या विविध आकृतीबंधांना त्यांनी सामाजिकतेचा मूल्यात्म आशय देऊन स्व-आविष्कारशैली घडवलेली आहे. वैचारिकता हा या लेखनाचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. उपरोध-उपहासाच्या माध्यमातून त्यांनी मांडलेली सामाजिक विसंगती आस्वादकांना आत्मभान देणारी आहे. समाजस्वराचे टोकदार संवेदन कलात्मकपणे त्यांच्या लेखनातून प्रकट झालेले आहे. हे संवेदन अंतर्मुख करायला लावणारे आहे. आस्वादकांना वास्तवाचे भान देणारा त्यांचा कलाविष्कार कलात्मकदृष्ठ्या सकस आहे. सामाजिक प्रश्नांची मांडामांड करताना त्यांची अभिव्यक्ती सामाजिक मूल्यांचा आग्रह धरते. कोणतीही एकच एक विचारधारा त्यांच्या कलाविष्कारातून डोकावत नाही; तर जगणे उन्नत करणार्‍या व्यापक मानवी मूल्यांचे पडसाद तीमधून उमटतात.‘माणूस’ आणि ‘समूहा’चे अस्तित्त्वचिंतन म्हणून हा आविष्कार मौल्यवान आहे. वर्तमानाच्या अवकाशात समाजवर्तमानाचा त्यांनी घेतलेला वेध ‘माणूसपणा’चा अर्थ आणि अर्क सांगणारा आहे.

त्यांच्या चित्रपट संहिता,‘स्टॅच्यु ऑफ लिबर्टी’सारखे नाटक आणि ‘पत्रास कारण की…’ हा पुस्तकरूपी पत्रसंग्रह पाहिला की या लेखनाची महत्ता लक्षात येते. म्हणूनच नाटक, चित्रपट, मालिका, टी.व्ही. शोच्या संहिता आणि साहित्य अशा वैविध्यपूर्ण कलाविष्कारातील त्यांच्या लेखनाला निराळेपण प्राप्त झालेले आहे. कथा, पटकथा, संवाद आणि ललितगद्य अशा वेगवेगळ्या लेखनबंधातून त्यांनी आपला ठसा मराठी कलासंस्कृतीवर उमटवलेला आहे. अलिकडे त्यांचा ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी!’ हा तेहतीस गोष्टींचा संग्रह प्रसिध्द झालेला आहे. या गोष्टी आजच्या काळाचा आशय नि संदर्भ घेऊन आकारलेल्या आहेत. सगळ्याच गोष्टी दाद मागण्यासाठी सांगितल्या जात नसतात. काही गोष्टी आपल्या मनावर डोंगराएवढं ओझं वाटत असतात. कुणाला तरी सांगायला पाहिजे असं वाटतं. या सांगण्याच्या तीव्र निकडीतून या कथाप्रधान गोष्टींचे लेखन झाल्याचे अरविंद जगताप यांनी म्हटलेले आहे. कोणतेही लेखन सांगण्याच्या तीव्रतेतून झाले; तर ते श्रेष्ठतेच्या दिशेने वाटचाल करणारे असते. यादृष्टीनेही या लेखनाचे मोल लक्षात घेणे आवश्यक ठरते.

- Advertisement -

गोष्ट आणि कथा यांच्या सीमारेषा पुसट करत ललितलेखांचे स्वरूप त्यांना प्राप्त झालेले आहे. असे असले तरी हे लेख गोष्टीचा फॉर्म घेऊन वाचकांची अभिरूची घडवत त्यांच्यावर वैचारिक संस्कार करत असल्याने त्यांना ‘गोष्ट’ म्हणणेच उचित ठरेल. या काळाची नवी कोरी गोष्ट म्हणून या लेखनाचे मोल लक्षात घेणे आवश्यक आहे. आजच्या गावाचे र्‍हासशील अंतरंग अत्यंत मार्मिकपणे या संग्रहातून प्रकट झालेले आहे. सीमेवर अतिरेक्यांशी लढताना शहीद आणि डी-कास्ट झालेल्या, तिरंग्यात लपेटलेल्या सैनिकाला गावात अंत्यविधीसाठी जातीमुळे स्मशानभूमी मिळत नाही. यातून बेगडी देशप्रेमासमोर जात अस्मिताच प्रबळ असल्याचे सत्य पहिल्याच गोष्टीतून ठळक होते. लेकरांना मोठ्या कष्टाने शिकवून मोठे करणार्‍या सोनामावशीलाच मुलं शेवटी भीक मागायला लावतात हे विदारक वास्तवही ही गोष्ट मांडते. पर्यावरण रक्षणाची इव्हेंटवादी वृत्ती, झाडं लावण्याच्या उत्सवी मानसिकतेचा उथळपणा, धंदेवाईक हेतू ठेवून इंग्रजी शाळांचे फुटलेले पेव, त्यांचे अर्धशिक्षित संस्थाचालक आणि आपलं लेकरू इंग्रजी शाळेतच शिकलं पाहिजे ही लोकांची मनोधारणा, त्यातून शिक्षणाचा होणारा खेळखंडोबा; तसेच माणसाच्या मरणाची वाट पाहत आपला आर्थिक स्वार्थ साधण्याच्या संधीत असणार्‍या प्रवृत्तीचाही वेध ही गोष्ट घेते. ग्रामीण जगण्याच्या दु:खाचे भांडवल करून प्रस्थापित झालेले साहित्यिकच या दु:खाबद्दल किती असंवेदनशील असतात, याचेही दर्शन या गोष्टीतून घडते.

राजकारणाचा घसरलेला स्तर, गावाचे बिघडलेले सामाजिक पर्यावरण, भावनादुखीचे राजकारण, भ्रष्टाचाराने पोखरलेली संपूर्ण व्यवस्था, राजकारणातील साहेबी संस्कृती, राजकारणात संधी मिळूनही महिलांचे परंपराशील वर्तन आणि पुरुषी वर्चस्व, विकासाच्या नावाने होणारे गावाचे भकासीकरण, राजकारणात होणारा धर्म-पैशाचा अतिरेक अशा गावाला बिघडवणार्‍या अनेकविध घटितांची कारणमीमांसा ही गोष्ट करते. बदलत्या खेड्याचे नि सर्वसामान्य माणसांच्या विचार-कृती-वास्तवाचे चित्र अरविंद जगताप यांच्या या लेखनातून उमटलेले आहेत. या गोष्टी आकाराने छोट्या असल्या तरी त्या येथील सर्वसामान्य माणसांच्या जीवनजाणिवांचा पैस मांडणार्‍या आहेत. हा पैस वाचकांना अंतर्मुख करणारा आहे. या माणसांनीच हे जग तोलून धरलेले असल्याने या गोष्टी त्यांच्या आयुष्यातील डोंगराएवढे सत्य सांगणार्‍या आहेत. हे सत्य सर्वांनाच वास्तवाचे आत्मभान देणारे आहे. या गोष्टींचा आकार लहान आहे; पण त्यामधून जे जीवनतत्त्वज्ञान सांगितलेले आहे ते वैश्विक पातळीवर जाणारे आहे.

- Advertisement -

गावखेड्याच्या वास्तवाबरोबरच या गोष्टी प्रबोधनाच्या पातळीपर्यंत पोहचलेल्या आहेत. तेहतीस कथांचा हा मजबूत ऐवज वाचकांना सामाजिक भान देत जीवनमूल्यांचा संस्कार घडविणारा आहे. वाचकांचा वैचारिक परीघ व्यापक करत मानवी मूल्यांचा जागर घडविणारा आहे. म्हणून त्या महत्त्वाच्या ठरणार्‍या आहेत. गोष्ट सांगण्याच्या भारतीय परंपरेचे सत्त्व रिचवून या गोष्टी आकारलेल्या आहेत. सुबोध प्रमाणभाषेतील निवेदन, आवश्यक तेथे बोलीभाषेतील संवादाचा वापर आणि भरीव आशयाच्या माध्यमातून अरविंद जगताप यांनी या गोष्टी रचलेल्या आहेत. कुतूहलपूर्ण मांडणी आणि चिंतनगर्भ शेवटामुळे या गोष्टी कलात्मक उंची गाठणार्‍या आहेत. प्राचीन काळापासून गोष्टींनी भारतीय माणसांचे व्यक्तिमत्त्व घडवलेले आहे. शेकडो वर्षांपूर्वीच्या गोष्टी आजही समाजमनात जिवंत आहेत. त्याच परंपरेचे सत्त्व घेऊन नव्या आविष्कारशैलीसह अवतरलेल्या या गोष्टी अक्षर ठरणार्‍या आहेत.

केदार काळवणे

- Advertisement -