ललित भावचिंतन

कवी प्रशांत भरवीरकर यांच्या ‘दिसामाजी’ या ललित लेखांच्या संग्रहातले लेख म्हणजे भावलालित्य, स्मरणरंजन, असांकेतिक विचारचिंतन आणि जिव्हाळाप्रेमाचे अविष्कारक आहेत. भावकवी आणि संवेदनशील पण संयमी माणूस यांचे संमिलीत स्वभावदर्शन या ललितलेखांमधून घडते. ललितगद्य भावविण्याचे आणि कथनात्मकतेचेही कार्य करू शकते, हे या ललितलेखांमधून प्रकर्षाने जाणवते.

वाचकस्नेही हितगुज आणि आत्मपर अनुभूतींचे कथनरूप या ललितलेखांमध्ये विशेषकरून लक्षात येते. आठवणी, स्मरणनोंदी विशिष्ट विषयकेंद्री चिंतनशाळा, स्थलात्मभावकथन, अनुभवांचे उत्खनन, आत्मपरविश्लेषण, कल्पक व्यक्तिचित्रे आणि भावहळवे संज्ञाप्रवाह या ललितलेखांना बहुस्वरीयता-आत्मकेंद्री भावविव्हलता बहाल करतात. उद्धृते, भाष्ये, चमकदार कल्पित कविता-गाणी परिकल्पना यांचा उत्स्फूर्त आणि अनुभव-उचित वापरही येथे झाला आहे. गतकालीन घटना-प्रसंग-व्यक्ती -अनुभव यांच्या चिंतनाची, ग्रामजीवनाची, जुन्या दिवसांची ओढ असली तरी ‘आता’ ‘येथे’ वर्तमानात हा गतकाळ ओढून आणले जातात, त्याला समकाळाशी सहकंप करतात. भाविक श्रद्धाळू हळव्या माणसाला वर्तमानाच्या सान्निध्यात संजीवनी दिली जाते. गतकाळ आणि वर्तमान यांच्यातले भेदक अंतरही दर्शविले जाते. गतकाळातले अभाव-हिरमुसण्याचे क्षण प्रकट करताना वर्तमानातही कारुण्यभावाचेच अवतरण झाल्याचे दिसते.

सभोवतालचे प्राणी-पक्षी-भूरूपे-वस्तूरूपे नात्यातली माणसे, पाहिलेली अनुभवलेली माणसे, मिथके, कल्पिते अशा सर्वांकडेच येथील ‘मी’ आकर्षित झालेला दिसतो. जेव्हा क्षणांचे-गत घटनांचे किंवा प्रत्यक्षगत स्थितीचे चिंतन सुरू होते तेव्हा भावकाव्याचे भावविण्याचे सामर्थ्य निवेदकाच्या भाषेला मिळालेले दिसते. स्मरण-घटना यांचे वर्तमानचित्र उभे राहते तेव्हा भावनाट्यच अवतरते व्यक्तीसंबंधांचे भावनाट्य आणि भावकाव्य निर्मिण्यात भरवीरकरांच्या निवेदकाचा कथनपवित्राही आकर्षक आहे. प्रांजळपणे गतकाळ आणि वर्तमानही सांगताना लपवाछपवी करावी, न्यूनगंडाने संकोचून जावे असे निवेदकाला वाटत नाही. सांगितले पाहिजे किंवा चिंतनाच्या गुंत्यात विसर्जित होत राहावे, असेच निवेदकाचे वाटणे, बोलणे, सांगणे येथे आहे.

आपल्या कथनात, अनुभवांमध्ये, चिंतनात वाचकाला सामावून घ्यावे असेच कथनलालित्य येथे आहे. आत्मकेंद्रीत्व व किंवा गुढानुभवाचा संदिग्ध काळोख या ललितलेखांमध्ये नाही, लेखकाच्या भाववृत्तीतही नाही. संत ज्ञानेश्वर, तुकोबा, वारकरी कविता, सौमित्र, पाडगावकर, शांता शेळके, सुधीर मोघे ते दत्तू घ्या (मोठा देव कौसल्या मल्हारी काठी कांबळं घेऊन करी गं) भिका बटाट्या, येडा लक्ष्मण, लोहणेरकर बाबा ते भुतं- साळुंकी, चिमणी -कावळे, नदी, ओहोळ-डोह-गोदावरी, जोशा (पुरुषरूपातले स्त्रीरूप) चित्रपट- गाणी -मित्र – तुलू भाषेपलिकडे कोणतीच भाषा न कळणारी अम्मा. असा कितीतरी विशाल भावप्रदेश या कथनकारांत-लेखकात सामावलेला आहे.

अनुभवलेले-पाहिलेले-दिसलेले- ऐकलेले आणि वाचलेले अनुभवक्षण-कण लेखकाच्या कल्पकसंवेदनांमधून येथे शब्दरूप धारण करते. भावकल्लोळांऐवजी साक्षात्कारी क्षणांचा कथनध्यास हे या ललितलेखांचे मुख्य सूत्र आहे. अतर्क्य विलक्षण अनुभवांचा गोतावळा वर्तमान मानसचिंतनातून, मोजक्या शब्दबंधांमधून भावगम्य करण्याची ही भूमिका आहे. बालमनातले विचारतरंग, भयाचे व्यूह आणि भाबड्या श्रद्धांचे पुनर्जिवित अस्तित्वभान ‘दिसामाजी’मधील लेखांना अनोखेपण देतात. आत्मपरता असूनही या लेखांना संगतीपूर्ण बहूसंदर्भातही आली आहे. एकातून दुसरे संवादी आठवत जाणे, आठवणींचे ताणेबाणे विणत विषय, क्षण यांना बहुअर्थक बनवणे अशी लेखनप्रक्रिया येथे आहे.

या ललितलेखांनी सदर लेखनाचे वैशिष्ठ्यपूर्ण रूपही धारण केले आहे. वर्तमानपत्री वास्तवातले मानुषतेचे-कारूण्याचे आणि मूल्यगर्भतेचे अस्तित्वही नव्याने निर्माण केलेले दिसते. जरठ-भरड तांत्रिक नकोसे घटनापट सामान्यतः वर्तमानपत्रांमध्ये पिष्ठोक्तीचे वळण गिरवतात, या विचार-काहूराच्या जगात ललित सदरांमुळे मानवी कोवळीकतेचे-जिवंतपणाचे गार गालिचे हिरवे होऊ शकतात. भरवीरकरांच्या ललित सदर लेखनामुळे प्रत्येक दिवस उत्फुल्ल आणि भावपूर्ण बनतो. ‘दिसामाजी’ या शीर्षकातून नियमित ‘काहीबाही’ तांत्रिक, वज्रकठोर गद्य, कृत्रिम विषय परिपोष असे अर्थसंकेत संभवतात मात्र ‘दिसामाजी’ या येथील शीर्षकात ‘दर दिवस नित्य नूतन जागृतीचा’ असे संतवचन स्मरते. गतकाळ असो वा वर्तमान नित्यनूतन अभिव्यक्तीचे, भावचिंतनाचे, उभारीचे-सर्जनशीलतेचे स्तोत्र रचणारा आहे, ही धारणा येथे आहे. ही सर्जनशीलता मानव्याबद्दलचा ओतप्रोत जिव्हाळा असल्याशिवाय सौंदर्यरूप धारण करू शकत नाही.

येथील निवेदक गोष्टीवेल्हाळ आहे. माणसांची गोष्ट ही ललितसाहित्याची मूलभूत गोष्ट आहे. विविधांगी-विविधरूपी माणसांच्या अस्तित्वरुपांना स्पर्श करताना गोष्टी स्वतः स्वतःला रचून घेत असतात. हा निवेदक गोष्टींमधून स्वतःला रचतो आहे. चिंतनाला कथनाची दिशा मिळावी असा हा गोष्टीवेल्हाळपणा आहे. ‘माणूस गोष्टीवेल्हाळ कुठं होतो! जिथं त्याला रमायला आवडतं, ज्या विषयांवर त्याला बोलायला आवडतं तिथं आपण गोष्टीवेल्हाळ होतो, अशी अनेक माणसं असतात जी गोष्टीवेल्हाळ असतात काही सांगण्यासाठी रमले की रमलेच, शोलेमधल्या बसंतीसारखे…’ (पृष्ठ २४) हाच गोष्टीवेल्हाळपणा निवेदकामध्ये आहे. जे जाणवले त्यातले वेगळे-भावलेले-स्पर्शून बदलायला भाग पाडणारे काय आहे याचा शोध घेणारा गोष्टीवेल्हाळपणा येथे आहे.

पाऊसगाणी, कविता, निसर्गरुपे, प्राणी, साळुंकी-कावळा चिमणी, श्रावणी, साक्षात्कारी माणसे, अंतरंगात कंपने निर्माण करणारी निसर्गरूपे-भूरूपे-आप्तमित्र-गाणी-कविता- साहित्यातील पात्रे-बाबा कथेकरी, लोककथांचे नायक-गायक, कृष्ण रूपे जिव्हाळ्याची माणसे-स्थळे यांच्या बद्दलच्या गोष्टी-त्यांचे चिंतन कळणे-नकळणे असा सारा आशयाचा ऐवज तरलतेने भावकोमलभाषेतून येथे आपलासा करून घेतलेला आहे. वर्णने किंवा भौतिक तपशीलांना येथे वाव नाही आणि भावही नाही. शब्दचित्रांनाही तपशीलांमध्ये बंदिस्त केले जात नाही, भाष्ये येतात परंतु ती भावरम्यतेची उदा. ‘येडा लक्ष्मण’ गर्भश्रीमंत होता, पशुपक्ष्यांची भाषा शिकण्यापायी वेडा झाला. या अगदी लहानशा व्यक्तिचित्रांचा शेवट पहा, ‘लक्ष्मण फार काही मागत नसायचा तेव्हा आमचा बोळ होता, जे दिलं ते बोळात बसून खायचा.

तांब्याभर पाणी गटगट करीत प्यायचा आणि मोटारअड्ड्याच्या दिशेने निघून जायचा. येडा लक्ष्मण आज विस्मरणाच्या गर्तेत गेलाय खरा; पण त्याला आपली भाषा येत नव्हती म्हणजे इतर कोणा अज्ञाताची भाषा तो शिकला होता का हे गुपित त्याच्याबरोबरच गेलं’ (पृष्ठ १२९) ‘नीळवंती’ ही अत्यंत महाग आणि अप्राप्य पोथी आहे, पशूपक्ष्यांची भाषा शिकता येते. या संदर्भाचा सांधा ‘येडा लक्ष्मण’शी जोडला की त्याची शोकात्मिका कारूण्यगर्भता निर्माण करते. नीळवंती भाषा शिकल्याने मानवी भाषेला तो पारखा झाला आधी त्याला निदान ‘माहिती नै’ हेच मानवी भाषेतले शब्द येत होते. निळवंतीने मानवी भाषा त्याच्याबाबतीत निरर्थक-शब्दहीन बनली. निळवंतीचा हा परिणाम की लक्ष्मणच्या वेडाचा? पशुपक्ष्यांच्या संवादभाषेने मानवी भाषा संवाद- विसंवादी बनते का? इतर कुणा अज्ञाताची भाषा त्याला आली असेल का? वगैरे प्रश्न वाचकाच्या मनात संभवतात. ‘अज्ञाताची भाषा’ या लेखकाचा कल्पक संबोध होय. हेच सुचणे कल्पकतेचेच लक्षण आहे.

‘गोदाप्रवास’ आणि ‘गोदाचिंतन’ या लेखांमध्ये गोदेच्या सान्निध्यातले असे ‘चिंतन- दर्शन-आत्मसमावेशन आले आहे. गोदेच्या सान्निध्यात जे जाणवले ते अत्यंत प्रतीतीपूर्ण भाषेतून अभिव्यक्त झाले आहे. नदीचा प्रवाह, काठावरले लोक, मायलेकी, दुखणीखुपणी असा सारा आसमंत संज्ञाप्रवाह बनतो. स्वभावोक्ती अलंकाराचे आत्यंतिक सौंदर्यग्रहण, भावग्रहण या लेखांमध्ये केले गेले आहे. निवेदकाच्या भावपूर्ण नजरेने हे सारे भावप्रवास स्थळाला संजीवन देतात. या काळातले मानसप्रवाह विचार-कल्पना फारच संवेद्यतेने प्रकट झाल्या आहेत. ‘सायंप्रकाशात चंदेरी रंगात न्हालेली ही दक्षिणगंगा स्वतःचे मुख केशरी आकाशआरशात मनसोक्त न्याहाळत असते.’ (पृष्ठ ६२) किंवा ‘अशाच आठवणींचा पुंजका समोर येऊन बसलेलं असताना घरात गाजलेल्या मायलेकी आल्या. दोघेही एकमेकींची काळजी घेत होत्या. माझं जाऊ दे, तुझं सांग असा त्यांचा संवाद रंगात येत असतानाच गोदा जीवाचे कान करून ऐकत होती. (पृष्ठ ६४) अशा तर्‍हेने अनुभवांना दृकश्राव्य आणि मनोनित संवेदनांनी संजीवनी प्राप्त होते.

अत्तरदिवस (८ लेख) हळवे क्षण (१७ लेख) काळीजचेहरे (१३ लेख) व समृद्ध जाणीव (७ लेख) अशी या ललित लेखांची विभागणी केली आहे. ‘स्व’चे बालपण, ‘स्व’ला हळवे करणारे क्षण- प्रसंग- आठवणी, व्यक्तिचित्रे -श्रद्धास्थाने अशी शब्दचित्रे जाणिवा समृद्ध करणारी माणसे- घटना- प्रसंग आणि मानस परिणामशील नोंदी या ललितलेखांमध्ये आहेत. ‘स्व’ अध्यात्म चिंतन, सभोवतालाशी तालबद्ध होत संतुलन राखणे, साक्षात्कारी क्षण-माणसे यांनी भारावून जाणे, काव्यात्म चिंतनभाष्ये करणे यांची आशय-विषयानुरूप सुंदर आकृती, भावचित्रे रेखाटणे अशी या ललितलेखनाची वैशिष्ठ्य आहे. लेखकाच्या मानसविश्वात प्रवेश करीत वाचकही सौंदर्य-स्वाधीन वादी होत जातो, ही सौंदर्यास्वादात्मकता लेखनाची ओळख बनली आहे.

–ललित भावचिंतन