घरफिचर्ससारांशरक्तलिखित पत्र...

रक्तलिखित पत्र…

Subscribe

लम्पी हा आजार फक्त शेतकरी वर्ग आणि पशुपालकांच्या चिंतेचा विषय आहे, अशी समजूत सर्वसामान्य नागरिकांची होऊ शकते. परंतु नुकत्याच घडलेल्या एका घटनेवरून शेतकर्‍यांवर आलेल्या आपत्तीची तीव्रता सगळ्यांच्या नक्कीच लक्षात येईल. जालना येथील बदनापूर तालुक्यातील गावात एका शेतकर्‍याने ‘गावातील लम्पी वायरसच्या प्रादुर्भावामुळे संतप्त होऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना स्वत:च्या रक्ताने पत्र लिहिलं.’ निदान ही बातमी वाचून तरी फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील नागरिकांना पशुधन वाचवण्यासाठी काही तरी करायला हवे याची जाणीव होईल.

कोरोनाच्या काळात ज्या प्रकारे माणसाचे जीवन हैराण झाले होते, अगदी त्याच प्रमाणे सध्या पशूंमध्ये आढळणारा लम्पी या त्वचा रोगाने समस्त शेतकरी व पशुपालक त्रस्त झाले आहेत. राजस्थान व गुजरात प्रांतात तर ह्या रोगाने उच्छाद मांडला आहेच, शिवाय पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या सर्व राज्यांबरोबरच महाराष्ट्रातही लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे. परंतु संपूर्ण देशभर जेव्हा एखादी आपत्ती अकस्मात कोसळते तेव्हा त्याचा परिणाम देशव्यापी होत असतो.

खरंतर लम्पी हा आजार फक्त शेतकरी वर्ग आणि पशुपालकांच्या चिंतेचा विषय आहे, अशी समजूत सर्वसामान्य नागरिकांची होऊ शकते. परंतु नुकत्याच घडलेल्या एका घटनेवरून शेतकर्‍यांवर आलेल्या आपत्तीची तीव्रता सगळ्यांच्या नक्कीच लक्षात येईल. जालना येथील बदनापूर तालुक्यातील गावात एका शेतकर्‍याने ‘गावातील लम्पी वायरसच्या प्रादुर्भावामुळे संतप्त होऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिलं.’ निदान ही बातमी वाचून तरी फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील नागरिकांना पशुधन वाचवण्यासाठी काही तरी करायला हवे याची जाणीव होईल.

- Advertisement -

प्रथमतः समजून घ्यायला हवे की हा लम्पी वायरस म्हणजे नक्की काय आहे? लम्पी हा विषाणूद्वारा पसरणारा एक संसर्गजन्य आजार आहे. भारतात सगळ्यात पहिल्यांदा हा आजार २०१९ मध्ये पश्चिम बंगालमध्ये आढळला. हा आजार गाय व म्हैस या प्राण्यांमध्ये झालेला दिसून येत असून त्यातल्या त्यात गायींमध्ये हे प्रमाण जास्त असल्याचे आढळते. विषाणूंची लागण झाल्यावर साधारणत: आठ दिवसात प्रथम गाईला ताप येतो, शरीरावर गाठी दिसायला सुरवात झालेली असते, गाय चारा खायचे बंद करू लागते, हळूहळू गाईच्या गाठी वाढून त्याच्या जखमा होऊ लागतात, गाईच्या पायावर सूज येऊन ती लंगडत चालते.

हा विषाणूजन्य रोग असल्यामुळे सर्वसाधारणपणे अशा रोगावर कोणताही उपाय नसतो. फार तर प्रतिजैविके किंवा अ‍ॅलर्जीवर औषधे दिली जातात आणि जनावराच्या प्रतिकार शक्तीनुसार आजार बरा होतो किंवा त्याचा मृत्यू होतो. तरी ही काही घरगुती उपचार आहेत ज्यामुळे हा आजार बळावणार नाही आणि गाईची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होईल. जसे की- कडूलिंबाची पाने उकळून त्याचा कडू रस त्वचेवर शिंपडल्यामुळे खूप फायदा होतो, गुळवेल, तुळस ह्या पानांचा काढा गाईला पाजल्यास ताप उतरण्यास मदत होते, जखमेवर तुरटीच्या पाण्याचा शिडकाव करावा.

- Advertisement -

तसेच अशा अवस्थेत गाईची काय काळजी घ्यायला हवी?

तर संक्रमित गाईला इतर गाईंपासून वेगळे ठेवण्याची व्यवस्था करावी, दुषित पाणी, चारा व लाळ यांच्या माध्यमातून देखील हा आजार पसरू शकतो तेव्हा आजारी गाईच्या चार्‍या-पाण्याची व्यवस्था वेगळी करायला हवी. सध्या लम्पीचा प्रादुर्भाव आहे म्हणूनच नाही तर इतर वेळीदेखील गाईंना वेगवेगळ्या कारणाने अनेक आजार होत असतात. दूषित खाण्या-पिण्यामुळे किंवा गोठ्यातील अस्वच्छतेमुळे, डास-माश्या यांचा उपद्रव झाल्यामुळे गाई वारंवार आजारी पडतात. तेव्हा सगळ्यात महत्वाचे म्हणजे गोठ्याची स्वच्छता महत्वाची आहे, बहुतेक पशुपालक गोठा स्वच्छ ठेवण्यासाठी पाण्याचा भरपूर वापर करतात, त्या ऐवजी गोमूत्राचा वापर करून गोठा स्वच्छ केल्यास कोणत्याही प्रकारच्या कीटकांचा त्रास होत नाही.

आपला देश हा शेती प्रधान देश मानला जातो. अंदाजे ३० कोटी पशूधन असलेल्या आपल्या देशातील सगळ्यात जास्त लोकसंख्या ही शेती, पशुपालन आणि डेयरी फार्म ह्या क्षेत्राशी जोडली गेली आहे. २०२१-२२ मध्ये भारतात २० कोटी ९० लाख टन दूधाच उत्पादन झाल होतं, तर डेयरी उद्योगाची उलाढाल ही १३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. कितीही नाही म्हटलं तरी भारतातील पंच्याहत्तर टक्के लोकांच्या घरची सकाळ ही दूध, चहा किंवा कॉफीनेच होते. याशिवाय कित्येक तान्हुली बाळे गाईच्या दुधावर अवलंबून असतात हे सर्वाना ज्ञात आहे. पण पाणी जोपर्यंत नाका-तोंडात जात नाही तोपर्यंत माणसाला हातपाय मारायची सवय नसते! म्हणजेच स्वत:पर्यंत कोणताही त्रास पोहचत नाही तोपर्यंत काही कृती करायची जाणीव कोणाला होत नाही. त्यात अजून एक मुद्दा कायम अस्वस्थ करतो तो म्हणजे कोणतीही घटना घडली की, त्याचे बाजारीकरण पटकन होते. घटनेचे पडसाद समाजावर जास्त परिणामकारक असतील, मग तर राजकीय चर्चा, वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोप ह्यामुळेच ती घटना जास्त वायरल होते. थोडक्यात म्हणजे आलेल्या आपत्तीवर तोडगा काढण्याकरिता कार्य करणारे अगदी हातावर मोजण्याइतके म्हणजेच १ ते २ टक्केच असतात.

कोरोनाच्या वेळची परिस्थिती पाहिली तर समस्त जगात मृत्यूने थैमान घातले होते आणि अशा परिस्थितीतही सगळीकडे लूट, फसवणूक आणि भ्रष्टाचार शिगेला पोचला होता. आतासुद्धा ह्या लम्पी रोगाच्या संकटाचा परिणाम जोवर घरोघर होत नाही तोवर जागरूकता येणे अवघड आहे. सर्व साधारणपणे लम्पी वायरसच्या सतत बातम्या ऐकून, वाचून बहुतांश लोकांची फार-फार तर कृती ही असेल की, ते चहा बंद करतील, दूध बंद करतील आणि म्हणतील, बघू, सगळं ठीक झाल्यावर पुन्हा दूध सुरू करू. याचाच अर्थ हा आहे की, ‘मी बरा आणि माझ विश्व बरं.

परंतु समस्त पशुधनाचे मिळणारे लाभ म्हणजेच दूध, दही, तूप, चीज, पनीर तसेच अन्य दुग्धजन्य पदार्थ जेव्हा अचानक बंद होतील तेव्हाच प्रत्येकाला त्याचे गांभीर्य कदाचित समजेल. पण अशी परिस्थिती का आली? इतकी रोगराई का पसरली? प्रदूषण का इतकं टोकाला गेलं? कोणतीच उत्तर आपल्याकडे नाहीत आणि अशा उद्भवणार्‍या परिस्थितीला कोण जबाबदार? हेही माहीत नाही. म्हणूनच ह्या गंभीर परिस्थितीबाबत सरकारचे लक्ष वेधून त्यावर तातडीने काही उपाय व्हावेत म्हणूनच रोषणगावातील शेतकर्‍याने स्वत:च्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असावे. यासाठी तातडीने सकारात्मक पावले उचलण्याची गरज आहे, लम्पी ह्या आजाराचा प्रादुर्भाव वाढणे हे लाखो कोट्यवधी लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणारे ठरू शकते. याचे गांभीर्य वेळीच ओळखणे आवश्यक आहे.

–सायली दिवाकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -