घरफिचर्ससारांशमहेंद्र सिंग इज किंग !चेन्नई एक्स्प्रेस सुसाट

महेंद्र सिंग इज किंग !चेन्नई एक्स्प्रेस सुसाट

Subscribe

यंदाच्या आयपीएलच्या १६ व्या स्पर्धेत ४ संघांनी पात्रता फेरीत प्रवेश केला. माजी विजेते चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स तसेच गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जायंटस हे २ नवे संघ! चेन्नईने गुजरातवर अखेरच्या चेंडूवर मात केली आणि मुंबईप्रमाणेच पाचव्यांदा जेतेपदाचा मान पटकावला. मुंबईने पात्रता फेरीत धडक मारली हीच खरंतर कमाल! रवींद्र जडेजाने षटकार, चौकार लगावत जेतेपदाची माळ महेंद्रसिंग धोनीच्या गळ्यात पडेल याची दक्षता घेतली. शुभमन गिलने ऑरेंज कॅपचा मान संपादताना ३ शतकांसह ८९० धावा तडकावताना ३३ षटकार, ८५ चौकारही लगावले. सर्वात मौल्यवान खेळाडूचा किताबही त्यालाच देण्यात आला. बहुगुणी गिल हे भारतीय क्रिकेटचं नवं आशास्थान!

–शरद कद्रेकर

आयपीएलच्या सोळाव्या स्पर्धेचं सूप वाजले अन् महेंद्रसिंग धोनीच्या संघाने रोमहर्षक सामन्यात गतवेळच्या विजेत्या गुजरात टायटन्सवर विजय संपादला तो अखेरच्या चेंडूवर! रवींद्र जडेजाने चौकार लगावत चेन्नई सुपर किंग्जचा विजय साकारला तेव्हा मंगळवारी रात्रीचा दीड वाजला होता, पण स्टेडियमवर व्हीसल पोडीचा निनाद ऐकू येत होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीगचं आयोजन सर्वप्रथम केलं २००८च्या मोसमात. महेंद्रसिंग धोनीच्या भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला (एकदा नव्हे तर दोनदा) हरवून जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर पहिली वहिली आयसीसी टी-२० वर्ल्ड कप रुबाबात जिंकली अन मग बीसीसीआयला साक्षात्कार झाला की टी-२० क्रिकेट आपल्याकडे रुजवायला हवं आणि आता या वृक्षाचा वटवृक्ष झालाय.

- Advertisement -

सोळावं वरीस धोक्याचं असं म्हटलं जात असलं तरी क्रिकेट जगतात आयपीएल एक नामांकित ब्रँड झाला असून आयसीसीत बीसीसीआय सुपरपॉवर (सर्वशक्तिमान ) झालीय त्याला कारणीभूत आहे आयपीएल! जगभरातील नामांकित क्रिकेटपटू या स्पर्धेत सहभागी होतात, करोडपती होतात. अफगाणिस्तानसारख्या क्रिकेटमधील छोट्या देशाची फिरकी जोडगोळी रशीद खान आणि महमद नबी आयपीएलमध्ये आपलं नाणं खणखणीतपणे वाजून दाखवतेय ही सारी आयपीएलची किमया असं असताना आपला वर्ल्ड कप विजेता कर्णधार अग्रभागी असायलाच हवा तो म्हणजे तमाम चेन्नईकरांचा लाडका थल्ला (लीडर) महेंद्रसिंग धोनी (एमएसडी ) (नुकतीच त्याच्या गुडघ्यावर मुंबईत शस्त्रक्रिया करण्यात आल्याचं वृत्त आलं आहे) त्याने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला पाचव्यांदा जेतेपद मिळवून दिलं आणि मुंबई इंडियन्सच्या ५ जेतेपदाशी बरोबरी साधली.

चेन्नई संघाचे पाठीराखे कमालीचे भारीच आहेत. युरोपियन फुटबॉल लीगप्रमाणेच आयपीएललादेखील जनमानसात स्थान लाभले आहे, पण इंग्लिश फुटबॉल शौकीनांप्रमाणे इथे फॅन बेस (पाठीराख्यांचा ग्रुप) मूळ धरू शकत नाही अर्थात चेन्नई सुपर किंग्ज याला अपवाद आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आयपीएलमध्ये खेळाडूंचा लिलाव पुकारते त्यामुळे खेळाडू एका विशिष्ट संघातच राहतील असं नाही. विराट कोहली मात्र नेहमीच रॉयल चॅलेंजर बंगलोरकडेच कायम राहिलाय हे अपवादात्मक उदाहरण! संघात वरचेवर बदल झाले तर आयपीएलमधील इंटरेस्ट कायम राहील अशीच बीसीसीआयची धारणा दिसतेय.

- Advertisement -

फुटबॉलच्या धर्तीवर आपल्याकडे अजूनही काही गोष्टी रुजलेल्या नाहीत. फक्त जर्सी आणि झेंडे यापूरतंच हे मर्यादित दिसतंय, पण पाठीराख्यांसाठी राखीव स्टॅन्ड्स, अवे (बाहेर) या बाबी लवकरच होतील, अशी आशा आहे. क्वालिफायर लढतीआधीच हे बाद पद्धतीच्या सामन्याची ठिकाणे निश्चित केली जातात. त्यामुळे बहुतांशी प्रेक्षकांना सामन्यासाठी मुकावे लागते, पण यातील चांगला भाग म्हणजे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना शेकहॅन्ड करतात आणि खिलाडूवृत्ती जोपासतात.

आयपीएलचा हेतू म्हणजे केवळ निखळ मनोरंजन करणं. चेपॉक स्टेडियमवर पिवळ्या रंगाच्या जर्सी परिधान केलेले पाठीराखे स्टॅन्डमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर पण असेच दृश्य नजरेस पडतं. चेन्नईहून बंगलोर प्रवास फार वेळखाऊ नाही अन् चिन्नास्वामी स्टेडियमवर कन्नड प्रेक्षकांपेक्षा चेन्नईचे पाठीराखे मोठ्या संख्येने दिसतात. त्यांचा आवाजही मोठा असतो. त्यामुळे बंगलोर टीमला आपण बाहेर सामना खेळतोय असं वाटतं.

यंदा अहमदाबादला अंतिम सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला. रविवारचा सामना मंगळवारपर्यंत खेळला गेला, पण चेन्नईचे पाठीराखे, (मुंबई, पुणे, चेन्नईतून आलेले) तर जिगरबाज पावसाची तमा न बाळगता आडोसा बघून त्यांनी आसरा घेतला अहमदाबाद रेल्वे स्टेशनचा. पहाटे उठून त्यांनी परत नरेंद्र मोदी स्टेडियमच्या दिशेने कूच केलं आणि खेळाचा मनसोक्त आनंद लुटला. ही सारी किमया घडवून आणली एकाने तो म्हणजे सर्वांना आवडणारा धोनी! आयपीएलच्या पहिल्यावहिल्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जने त्याला करारबद्ध केलं ते आजतागायत माही (धोनीचं टोपण नाव) त्यांच्या हृदयात जाऊन बसलाय.

त्याची एक अलग प्रतिमा चेन्नईकरांमध्ये निर्माण झालीय. तो भले झारखंडवाला (रांची) असो त्याला तामिळ बोलता न येऊ दे, थोडं पण मोजकंच तो त्यांच्या भाषेत तामिळमध्ये बोलू देत, पण आपल्या लाडक्या माहिवरील त्यांचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही! चाहत्यांच्या प्रेमामुळे भारावलेल्या धोनीने अजून एक वर्ष थांबून आपला निवृत्तीचा निर्णय घेणं टाळलंय. त्याची गुडघ्यावरील शस्त्रक्रिया तर नुकतीच पार पडली आहे. आगामी मोसमात २०२३-२४ तब्येत ठीक राहिल्यास धोनी नक्कीच मैदानात उतरेल. तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.

चेन्नई पाचवे जेतेपद पटकावत असताना हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्सला मात्र लागोपाठ दुसर्‍यांदा जेतेपद मिळवण्यात यश लाभले नाही. मोहित शर्माने अचूक, किफायतशीर गोलंदाजी केली, परंतु निर्णायक षटकातील अखेरच्या दोन चेंडूंवर रवींद्र जडेजाने त्याला १ षटकार आणि १ चौकार लगावून गुजरातचा विजयाचा घास हिरावून घेतला. त्यांच्या नौजवान शुभमन गिलने १७ सामन्यांत ३ शतकांसह ८९० धावा काढून ऑरेंज कॅपचा मान संपादला शिवाय सर्वात मौल्यवान खेळाडूचा किताबही पटकावला. सर्वाधिक ८५ चौकारही या उंचपुर्‍या पंजाब दा पुत्तर गिलने लगावले आणि आपला अमिट ठसा या स्पर्धेवर उमटवला.

विराट कोहली तसेच शुभमन गिल यांनी एकाच सामन्यात शतके झळकावली, पण विराटनेच आपल्या या तरुण सहकार्‍याचं कौतुक केलं. बॅकफूटवर जात शुभमन गिल मिडऑफ आणि कव्हर्समधून चेंडू सीमापार धाडतो ती त्याची फालंदाजी डोळ्यांचं पारणे फेडणारी असते. षटकार मारण्याची कलाही त्याला चांगलीच अवगत आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध शतकी खेळीत त्याने तब्बल १० षटकार खेचून वानखेडे स्टेडियमवरील मुंबई इंडियन्सच्या पाठीराख्यांची शाबासकी मिळवली. ती त्याची शतकी खेळी संस्मरणीय होती. आयपीएलचं जेतेपद पटकावण्याचे रॉयल चॅलेंजर बंगलोर तसेच विराट कोहलीचे स्वप्न यंदाही अधुरेच राहिले.

अजिंक्य रहाणे, वृद्धीमान सहा, मोहित शर्मा या बुजुर्ग खेळाडूंनी टी-२० क्रिकेटमध्ये आपण अजूनही खेळून संघाला उपयुक्त ठरू शकतो हे सिद्ध केलं. रहाणेसाठी कसोटी क्रिकेटचा दरवाजा पुन्हा एकदा उघडला गेला. ओव्हलवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची बॅट काय चमत्कार करते ते बघणं औत्सुक्याचं ठरेल. हार्दिक पंड्या यंदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, पण त्याने आपल्या नेतृत्वगुणांची झलक पुन्हा एकदा पेश केली. आयपीएलचा मोसम यंदा लांबला, संघ वाढले, सामन्यांची संख्याही वाढली, परंतु मे अखेरीस अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेऊन गुजरात क्रिकेट असोसिएशनने खेळपट्टी तसेच मैदानाच्या रक्षणाची खबरदारी घेणं अपेक्षित होतं. पाऊस आल्यावर मैदानातील पाण्याचा निचरा झटपट करण्यासाठी त्वरित पावलं उचलायला हवीत. जेणेकरून आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत पावसाचा व्यत्यय आला तरी प्रेक्षकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी.

–(लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -