घरफिचर्ससारांशमेनोपॉज केयर महिलांची गरज!

मेनोपॉज केयर महिलांची गरज!

Subscribe

मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्तीच्या संबंधित उद्भवणार्‍या विविध समस्यांमुळे गेल्या काही वर्षांत ४० ते ५० वयोगटातील महिलांचे नोकरी सोडण्याचे प्रमाण वाढल्याचे अमेरिकेतील मेयो क्लिनिकने केलेल्या संशोधनातून दिसून आले आहे. मेनोपॉज अवस्थेचा हा काळ जास्तीत जास्त १० वर्षांचा असल्याने महिलेचा जेव्हा मेनोपॉज सुरू होतो, तेव्हापासूनच तिच्या कार्यपद्धतीवर त्याचा परिणाम दिसायला लागतो. यामुळे दरवर्षी १५ हजार कोटी रुपयांच्या उत्पादनांचे नुकसान होते. जे कंपनीला परवडणारे नाही. पण तरीही या महिलांचा कामाप्रती असलेला प्रामाणिकपणा विचारात घेऊन अमेरिकाच नाही, तर ब्रिटनमधल्या कंपन्यांनीही अनुभवी आणि कार्यक्षम असलेल्या या ज्येष्ठ महिलांना मेनोपॉज काळात सांभाळून घेण्याचा निर्णय घेतला आहे, जो खरंच कौतुकास्पद आहे.

–कविता लाखे

कोविडनंतर संपूर्ण जगच बदललं असून सुदृढ आरोग्य किती महत्वाचं आहे याची जाणीव आता सर्वांनाच झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, जगभरातील अनेक कंपन्यांनी विशेषकरून महिला कर्मचार्‍यांना आकर्षित करण्यासाठी नवीन नियमही लागू केले आहेत. यात कर्मचार्‍यांच्या आजारपणाचा परिणाम कामावर होऊ नये याकरिता अनेक कंपन्या वेगवेगळ्या पॅकेजेसची ऑफर देत आहेत. या सेवेत आता प्रामुख्याने महिला कर्मचार्‍यांना फर्टीलिटी ट्रीटमे्ंटस, चाईल्ड केयर, एवढेच नाही, तर पॅरेंटल लिव बरोबरच आता मेनोपॉज केयरचीही ऑफर देणे कंपन्यांनी सुरू केलं आहे. विशेष म्हणजे ज्या कंपन्या महिलांना मेनोपॉज सेवा देत आहेत, त्यांचा बिझनेसही वाढत आहे. ही खरं तर नवीन सुरुवात असून मेनोपॉजमधून जाणार्‍या महिलांसाठी ही हॅपी सेकंड इनिंग ठरत आहे.

- Advertisement -

हे सगळं समजून घेण्यासाठी आधी आपल्याला मेनोपॉज म्हणजे काय हेच समजून घ्यावं लागेल. स्त्रीची वयाची पन्नाशी म्हणजेच मेनोपॉज. म्हणजेच रजोनिवृत्तीचा काळ. पण हा काळ जितका सोपा वाटतो तितका तो अजिबात तसा नाहीये. पाळी येणं ते पाळी जाणं यातला हा पिरियड प्रत्येक स्त्रीला आतून बाहेरून बदलून टाकतो. ज्याचे परिणाम तिच्या शरीराबरोबरच मनालाही भोगावे लागतात. पण विशेष म्हणजे तिच्या आजूबाजूला असणार्‍यांना पण त्याचा दणका बसतोच. वैद्यकीय भाषेत बोलायचं म्हंटलं तर या काळात तिच्या शरीरातील असंतुलित हार्मोन्स तिच्या सगळ्या वागण्या बोलण्याला कारणीभूत असतात.

बोलण्या वागण्या हसण्या खेळण्या किंचाळण्यावर उगाचाच खेकसण्यावर विसराळूपणावरही काय तर तिच्या बारीक सारीक गोष्टींवरही या वयात असंतुलित झालेल्या हार्मोन्सचा ताबा असतो. त्यामुळे आयुष्याचा हा टप्पा पार करताना तिला असंख्य बदलांचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे याच वयात तिने कुठे करिअरमधला उंच टप्पाही गाठलेला असतो. पण येथेच घात होतो. स्वत:च्या हुशारीवर या वयात मोठ्या पदावर पोहचलेली महिला मध्येच कर्मचार्‍यांवर विनाकारण बरसते, लहान सहान गोष्टींमध्ये चिडचिड करते. मध्येच एखाद्याचा पाणउतारा करते. ती नेहमी रागातच असते.

- Advertisement -

मध्येच एकांतात ढसाढसा विनाकारण रडते, फुल्ली सेंट्रल एसी ऑफिसमध्ये काम करताना बाकीचे कुडकुडत असताना तिला घाम फुटतो. कधी साडी, ब्लाऊज घामाने चिंब भिजतो. मिटींग सुरू असताना तिला सारखं सारखं लघुशंकेला जावं लागतं. यामुळे इतरजण तिच्यावर कुत्सितपणे हसतात. पण ती दुर्लक्ष करते. कारण हार्मोन्समुळे तिच्या डोक्याच्या केसापासून तिच्या पायाच्या नखापर्यंत तिच्या शरीरात अनेक बदल झालेले असतात. यामुळे तिच्याबरोबर काम कसं करायचं असा प्रश्न सहकार्‍यांना पडतो. ते रितसर ज्येष्ठांकडे जाऊन तिच्या वारंवार तक्रारी करतात. कारण आपल्याकडे स्त्रीच्या आयुष्यातला हा काळ समजून घेण्याची पद्धतच नाही. यामुळे स्त्रिया या विषयावर मोकळेपणाने बोलूही शकत नाहीत. आपल्याला नक्की काय होतंय हे बर्‍याच वेळा त्यांनाच कळत नाही.

यामुळे ही अवस्था समजून घेणार कोण, हा प्रश्न पडतो. घरातही तिच्या वागण्यातला फरक सगळ्यांना जाणवतो. पण त्याबद्दल तिच्याशी कोणीही बोलत नाही. यामुळे तिची आतल्या आत घुसमट होते. तिचं डोक फिरलंय असा शिक्का घरातले मारून मोकळे होतात. या सर्वांना कंटाळून ती मुक्त होण्याचा निर्णय घेते आणि एक दिवस रात्री घरी आल्यावर सांगते मी राजीनामा दिलाय. हे असंच सध्या अनेक कंपन्यांमध्ये काम करणार्‍या महिलांच्याबाबतीत घडत आहे. यामुळे गेल्या काही वर्षांत ४० ते ५० वर्षांच्या महिलांचे नोकरी सोडण्याचे प्रमाण वाढल्याचे अमेरिकेतील मेयो क्लिनिकने केलेल्या संशोधनात नमूद करण्यात आले आहे.

मेनोपॉज अवस्थेचा हा काळ जास्तीत जास्त १० वर्षांचा असल्याने महिलेचा जेव्हा मेनोपॉज सुरू होता तेव्हापासूनच तिच्या कार्यपद्धतीवर त्याचा परिणाम दिसायला लागतो. यामुळे दरवर्षी १५ हजार कोटी रुपयांच्या उत्पादनांचे नुकसान होते. जे कंपनीला परवडणारे नाही. पण तरीही या महिलांचा कामाप्रती असलेला प्रामाणिकपणा विचारात घेऊन अमेरिकाच नाही, तर ब्रिटनमधल्या कंपन्यांनीही अनुभवी आणि कार्यक्षम असलेल्या या ज्येष्ठ महिलांना मेनोपॉज काळात सांभाळून घेण्याचा निर्णय घेतला आहे, जो खरंच कौतुकास्पद आहे.

सगळ्यात आधी ब्रिटिश कंपनी पेपीने या महिलांना कार्यस्थळी मेनोपॉज सेवा देण्यास सुरुवात केली. एका अ‍ॅपच्या माध्यमातून तज्ज्ञ आणि थेरेपिस्ट या महिलांना मार्गदर्शन करतात. मन मोकळे करता येत असल्याने या महिलाही आता अधिक मन लावून काम करू लागल्या आहेत. ज्याचा रिझल्ट कंपनीच्या नफ्यातून दिसू लागला आहे. हळूहळू सगळेच देश याकडे वळतील यात शंका नाही, पण भारतात मुख्य म्हणजे महिलांशी संबंधित मेनोपॉज नावाचं काहीतरी असतं हेच किती जणांना ठाऊक आहे याचीच बोंब आहे. जसे आपण कपडे आणि खाण्यापिण्याबाबत पाश्चिमात्यांचे अनुकरण करतो तसे अशा काही चांगल्या बदलांचेही आज ना उद्या अनुकरण करू हे मात्र नक्की. तोपर्यंत महिलांनो स्वत:च स्वत:ला सांभाळा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -