Eco friendly bappa Competition
घर फिचर्स सारांश जमिनीची शोकांतिका!

जमिनीची शोकांतिका!

Subscribe

भारतात फार मोठ्या प्रमाणावर शेतजमीन असली तरी ती पूर्ण शेत जमीन पूर्णपणे वापरा खाली येत नाही. त्यातील फार मोठी जमीन ही उत्पादन क्षमता असूनही लागवडीखाली येत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. उत्पादनक्षमता असणारी पूर्ण शेत जमीन लागवडीखाली आणणे हे शेती क्षेत्रासमोरील मोठे आव्हान आहे. उपलब्ध असलेली सर्व जमीन लागवडीखाली आणायची म्हटल्यावर आवश्यक असतो तो मजुरांचा ताफा. आज अनेक कारणांमुळे मजुरांची अडचण निर्माण होते, त्यांची उपलब्धता न झाल्यास शेतकर्‍याला व्यापारी दृष्टी डोळ्यासमोर ठेवून उत्पादन करता येत नाही.

–प्रा.डॉ. कृष्णा शहाणे

भारतात उदरनिर्वाहक स्वरूपाची शेती केली जाते किंवा या शेतीमध्ये व्यापारी शेतीचा अथवा व्यापारी तत्त्वाचा अभाव दिसून येतो असे खेदाने म्हणावे लागते. अनेक मोठे शेतकरी आपल्याकडे असलेल्या सर्व जमिनिपैकी किंवा अस्तित्वात असणार्‍या साधन संपत्तीचा पूर्णपणे वापर करून व्यापारी तत्त्वावर शेती करून मोठे उत्पादन घेतात. त्याचा त्यांना आर्थिक मोबदला मिळतो, पण ही प्रवृत्ती सर्व शेतकर्‍यांमध्ये दिसून येत नाही. अनेक शेतकरी विविध कारणांमुळे आपली बरीचशी शेतजमीन पडीत स्वरूपात ठेवतात. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी काही कालावधीसाठी शेतजमीन पडीत ठेवणे स्वागतार्ह आहे, पण या कारणाशिवाय अनेक प्रकारे शेतकरी आपली जमीन पडीत स्वरूपात ठेवतात किंवा कुटुंबाला वर्षाकाठी पुरेल इतकेच उत्पन्न ते काढण्याचा प्रयत्न करतात.

- Advertisement -

भारती शेतकरी म्हटल्यावर डोळ्यासमोर येते ते त्यांचे मोठे कुटुंब, मोठे घर, मोठा कारभार, घरात असणारी मोठी सदस्य संख्या, त्यामुळे अनेक शेतकरी फक्त कुटुंबाला वर्षासाठी पुरेल इतके अन्नधान्य तयार करण्यासाठी प्राधान्य देतात. पूर्वी भारतातील ग्रामीण भागात बारा बलुतेदार पद्धती अस्तित्वात होती, त्यामध्ये वस्तू व सेवांची देवाण-घेवाण करून गरजा पूर्ण करण्याची पद्धत प्रचलित होती. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त शेती उत्पादन शेतकरी शक्यतो करत नसे. काळानुरूप जसजसे सामाजिक बदल होत गेले तस तसा वस्तुविनिमयाचा अंत होत गेला. त्याप्रमाणे शेतकर्‍यांनी आपल्या उत्पादन क्षमतेत व्यापारी तत्वाचा अवलंब करणे अपेक्षित होते, परंतु त्या प्रमाणात ते घडले नाही. दिवसेंदिवस ज्या वेगाने बाजारपेठांचा विकास होणार होता त्या वेगाने तो झालेला नाही.

अगदी खेड्याच्या पातळीवर आजही बाजारपेठांच्या सोयी पोहचलेला नाहीत. तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या पातळीवर माल आणून विक्री करणे हे आजही शेतकर्‍याला कंटाळवाणे व त्रासदायक वाटते. बाजारपेठेत वस्तू आणताना वाहतुकीतील अनेक अडथळे आडवे येतात. त्यांच्यावर कशीबशी मात करून तो शेतमाल बाजारात येतो. त्यात बाजारपेठेत प्रचलित असणार्‍या चुकीच्या पद्धतीमुळे शेतकरी नाडला जातो म्हणून तो गरजेपेक्षा जास्त उत्पादन करण्याच्या फंदात पडत नाही. उपलब्ध असलेली सर्व जमीन लागवडीखाली आणायची म्हटल्यावर आवश्यक असतो तो मजुरांचा ताफा. आज अनेक कारणांमुळे मजुरांची अडचण निर्माण होते, त्यांची उपलब्धता न झाल्यास शेतकर्‍याला व्यापारी दृष्टी डोळ्यासमोर ठेवून उत्पादन करता येत नाही.

- Advertisement -

विविध पायाभूत सुविधांचा विकास ग्रामीण भागात आजही तुरळक अपवाद वगळता झालेला नाही. जसे प्रसिद्धी माध्यमांचा ग्रामीण भागात विकास, रस्ते, लोहमार्ग, संपर्क यंत्रणा इत्यादी पायाभूत सुविधांचा विकास ज्या वेगाने व्हायला हवा होता त्या वेगाने तो ग्रामीण भागात झालेला दिसून येत नाही. त्यामुळे त्याचा उत्पादकतेवर विपरीत परिणाम होतो. तसेच उत्पादित झालेल्या मालाला चांगला बाजारभाव मिळेलच याची खात्री आपण देऊ शकत नाही. तसेच शासनाकडून चांगला हमीभाव मिळण्यातही अडचणी येतात. त्यामुळे शेतकरी आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या गरजेपुरते शेती उत्पादन करून व्यापारी दृष्टिकोनाचा त्याग करतो असे दिसून येते. सीमांत शेतकरी किंवा लहान शेतकरी आज आपल्या पूर्ण क्षमतेचा वापर करून शेती उत्पादन घेताना दिसून येतात, पण त्याने अर्थव्यवस्थेत फारसा फरक पडत नाही. फार मोठी शेतजमीन असणार्‍या शेतकर्‍यांची संख्यादेखील भारतात चांगलीच आहे. त्यांचा सांपत्तिक दर्जादेखील खूपच चांगला आहे.

आधुनिक काळात इतर अनेक उद्योगांचा विकास मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. अनेक ठिकाणी औद्योगिक वसाहती स्थापन झाल्या. तेथे अनेक तरुणांना रोजगार प्राप्त झाला. शेतीपूरक उद्योग कुटीर उद्योग यांचादेखील चांगला विकास झाला. शहरी वातावरणाचे जसजसे ग्रामीण लोकांना आकर्षण वाटू लागले तस तसे शेती करण्याचे प्रमाण आणखी कमी झाले. त्यामुळे आजची शेती ही उदरनिर्वाह शेती होऊ लागली. आजच्या शेतीमध्ये व्यापारीकरणाचा अभाव दिसून येतो. व्यापारीकरणाचे तत्व भारतातील सर्व शेतकरी स्वीकारत नाहीत तोपर्यंत भारतीय शेतीचा विकास होत नाही. किंबहुना भारतातील सर्व शेतकर्‍यांनी व्यापारी तत्त्वावर शेती केली किंवा शेतीत व्यापारी तत्व स्वीकारले तर भारतातील कृषी उत्पादकता वेगाने वृद्धिंगत होईल या शंका नाही.

–(लेखक अर्थतज्ञ आहेत)

- Advertisment -