घरफिचर्ससारांशमहाराजांना मानाचा मुजरा जिगरबाज ‘सुभेदार’....

महाराजांना मानाचा मुजरा जिगरबाज ‘सुभेदार’….

Subscribe

शिवाजी महाराजांची महती संपूर्ण जगभर पसरली आहे. बलदंड स्वराज्य उभं करण्यास शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी प्राणांची आहुती दिली. महाराजांच्या मावळ्यांनी गाजवलेला असाच एक पराक्रम म्हणजे कोंढाणा. या मोहिमेतला झुंजार गडी म्हणजे तान्हाजीराव मालुसरे. याच गोष्टीवर आधारित नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘सुभेदार’ या चित्रपटावर टाकलेला हा दृष्टीक्षेप ...

–आशिष निनगुरकर

दिग्पाल लांजेकरच्या शिवराज अष्टक या सिनेमालिकेतील पाचवा सिनेमा म्हणजे ‘सुभेदार’. सुभेदारची गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलोय. वाचत आलोय. त्यामुळे ही गोष्ट पडद्यावर साकार कशी होतेय, यात खरी कसरत होती. यात दिग्पाल लांजेकर बर्‍यापैकी यशस्वी झालेत. महाराजांचा लाडका मित्र आणि स्वराज्य निर्मितीसाठी प्राणांची बाजी लावायला मागे न हटणारा तानाजी. सरदार ते सुभेदार असा तानाजींचा प्रवास सिनेमात सुरुवातीला दिसतो. नंतर भर दरबारात घरातल्या मंगलकार्याची पर्वा न करता आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं असा विडा उचलणारे तानाजी मालुसरे. पुढे तानाजी उदयभानाला कसं संपवतात आणि कोंढाणा मावळे कसे मिळवतात, याची कहाणी ‘सुभेदार’मध्ये दिसून येते.

- Advertisement -

कथा, सादरीकरण, ऐतिहासिक संदर्भ, त्या काळातील भाषा, शस्त्रास्त्रे, वेशभूषेपासून अगदी अभिनयापर्यंत ‘सुभेदार’ हा अजय देवगणच्या ‘तानाजी’पेक्षा वरचढच आहे. काही अनावश्यक सीन्स आणि मावळ प्रांतातील भाषा यामुळे काही ठिकाणी पटकथा थोडी रेंगाळली आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करायला काहीच हरकत नाही. मध्यंतरापर्यंत चित्रपट हा तानाजी मालुसरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मैत्रीवर प्रकाश टाकतो, तर मध्यंतरानंतरचा भाग हा कोंढाण्याच्या मोहिमेवर बेतलेला आहे. अशी सरळसोट जरी कथा असली तरी छोट्या छोट्या गोष्टींसाठी केलेला अभ्यास, गीत तसेच संगीत आणि नृत्य यासाठी घेतलेली मेहनत ही पडद्यावर दिसून येते. एखादं गाणं आणि काही छोटे मोठे सीन्स यांना कात्री लावली असती तर चित्रपटाने आणखी उत्तम पकड घेतली असती.

आपल्या दूरदृष्टीने शिवछत्रपती काही मावळे आणि विश्वासू सहकार्‍यांना एका मोहिमेवर पाठवतात. ही मोहीम एखादा गडदुर्ग सर करण्याची नसते, तर स्वराज्यात दळणवळणासाठी अत्यावश्यक ठरतील अशा रस्ते बांधणीची असते. या घाट-रस्ते बांधणीसाठी स्वतः सुभेदार तानाजी मालुसरे, शेलारमामा, पिलाजी नीलकंठ, सैन्यातले काही सरदार, पंत आणि मावळे मोहिमेवर असतात. ‘हाती तलवार घेऊन लढायचं सोडून आपणं फावडं घेत रस्ते बांधतोय,’ असं काहीसं पिलाजी नीलकंठ उद्गारतात. यावर तानाजी म्हणतात, ‘तुम्हाला अजून शिवाजीराजे समजलेच नाहीत, उमगले नाहीत. ज्या राजानं हाती तलवारी दिल्या, त्यांनीच फावडंही दिलं आहे, ते स्वराज्याच्या प्रगतीपथाचे रस्ते बांधण्यासाठी.’ महाराजांच्या शिकवणीची साक्ष देणारा हा प्रसंग आणि यासारखे आणखी काही धडे टप्प्याटप्प्यानं लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरनं ‘सुभेदार’ या चित्रपटात गिरवले आहेत. यात केवळ प्रसिद्ध कोंढाण्याची लढाई नाही, तर शिवचरित्रात दडलेल्या शिकवणीबाबत दिग्पाल भाष्य करतो.

- Advertisement -

याबरोबरच दिग्पाल यांचा ‘सुभेदार’ पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे ‘फर्ंजद’, ‘फत्तेशिकस्त’पासून प्रत्येक चित्रपटात दिसणारी सुधारणा. कथा, दिग्दर्शन, स्पेशल इफेक्टपर्यंत सगळ्याच बाबतीत तुम्हाला प्रत्येक चित्रपटात उत्तम सुधारणा पहायला मिळते आणि हे ऐतिहासिक चित्रपट करणार्‍या फार कमी दिग्दर्शकांना जमतं. दिग्पाल यांचा ‘सुभेदार’मध्येही ‘शेर शिवराज’च्या तुलनेत बरेच बदल आणि सुधारणा पहायला मिळते. ‘सुभेदार’ची आणखी एक खासियत म्हणजे तानाजी मालुसरे यांच्याबरोबरच इतर पात्रांना दिलेला योग्य न्याय, यामुळे चित्रपट तुम्हाला अधिक भिडतो. पटकथेत थोडा मार खाल्ला असला तरी त्याची कसर दिग्पाल यांनी संवादांमध्ये भरून काढली आहे.

खासकरून मध्यंतरानंतरचे संवाद आणि शेवटाला तानाजी मालुसरे आणि उदयभान यांच्यातील लढाईदरम्यानचे काही संवाद मनात घर करतात. चित्रपटाचं संगीतही उठावदार झालं आहे. ‘मावळ जागं झालं रं’ हे गाणं तर हमखास गुणगुणतच तुम्ही बाहेर पडाल. सैफ अली खानने ‘तान्हाजी’मध्ये साकारलेला उदयभान आणि या चित्रपटात दिग्विजय रोहिदास यांनी साकारलेला उदयभान यात जमीन आस्मानाचा फरक आहे, अन् तो सर्वात जास्त अधोरेखित होतो मध्यंतरानंतर. उदयभान राठोड हा एक राजपुत सरदार होता हे आपल्या देहबोलीतून आणि संयत पण तितक्याच प्रभावशाली अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर ठसवण्यात दिग्विजय यशस्वी ठरले आहेत. ही या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू.

बाकी छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर, जिजाऊ यांच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी, शेलार मामा यांच्या भूमिकेत समीर धर्माधिकारी, सूर्याजी मालुसरे यांच्या भूमिकेत अभिजीत श्वेतचंद्र, सावित्रीबाई मालुसरे साकारणारी स्मिता शेवाळे अन् तानाजी मालुसरे साकारणारे अजय पुरकर या सगळ्यांची कामं चोख झाली आहेत. बाकी अस्ताद काळे, ऋषि सक्सेना, मृण्मयी देशपांडे, अलका कुबल अन् बहिर्जी नाईक साकारणारे खुद्द दिग्पाल लांजेकर यांचीही कामं उत्तमच झाली आहेत.शिवचरित्रातून काय शिकावं, याचा वेध घेण्याचा प्रयत्न या कलाकृतीत करण्यात आला आहे. हा चित्रपट महाराज आणि तानााजी मालुसरे यांची एकत्रित चरित्रकथा मांडतो. एकीकडे सुभेदारांची राष्ट्रनिष्ठा, शौर्य दिसतं, तर दुसरीकडं महाराजांना ‘रयतेचा राजा’, ‘गडपती’, ‘न्यायालंकारमंडित’ असं का संबोधलं जातं, हेही मांडलं जातं. चित्रपटाचा पूर्वार्ध वातावरण निर्मिती आणि इतिहासाची पानं पडद्यावर प्रतिबिंबित करण्यात खर्ची होतो.

सुरुवात थोडी खेचलेली वाटली तरी मध्यंतरानंतर चित्रपट चांगली पकड घेतो आणि शेवटची ४० मिनिटं अक्षरशः मंत्रमुग्ध करतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे यांच्यातील मैत्रीचं नातं अन् केवळ आपल्या राजासाठी जीवावर उदार होऊन लढणार्‍या त्या असंख्य शिलेदारांचं बलिदान पाहून आपण भावूक नक्कीच होतो. सूर्याजीनं (अभिजित श्वेतचंद्र) गडावरून उतरणारे दोरखंड कापून टाकणं वगैरे प्रसंग खुबीनं चित्रीत झाले आहेत. सुभेदार तांत्रिक अंगानं भक्कम झाला आहे. प्रतीक रेडिजचं कलादिग्दर्शन, सागर-विनय शिंदे यांचं संकलन आणि प्रियांका मयेकर या नवोदित महिला छायांकनकाराचं काम कौतुकास्पद आहे. प्रथमेश अवसरे आणि टीमनं केलेलं ड्रोन चित्रीकरण नयनरम्य आहे.

चित्रपटातली गाणी श्रवणीय आणि शाब्दीक बोध देणारी आहेत. काही प्रसंगी माहितीच्या भडीमारानं चित्रपट रटाळ भासू शकतो. कलाकृतीची संथ मांडणी अंतिम प्रभावाला मर्यादा आणते. हा चित्रपट काही ऐतिहासिक चित्रपटांमधील माईलस्टोन नव्हे, यातही बारीक सारीक चुका आढळणारच शेवटी ती एक कलाकृतीच आहे, परंतु इतिहासाची मोडतोड न करता, पुरेसं कलात्मक स्वातंत्र्य घेऊन व्यावसायिक गणिताच्या बाबतीत निर्मात्यांना तसेच वितरकांना निराश न करता अन् प्रेक्षकांना मनोरंजनाबरोबरच आणखी काहीतरी वेगळा अनुभव देणारा हा ‘सुभेदार’ प्रत्येकाने एकदा पहायलाच हवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -