घरफिचर्ससारांशखान्देशचा कानबाई मातेचा उत्सव

खान्देशचा कानबाई मातेचा उत्सव

Subscribe

महाराष्ट्राला मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. राज्यातील प्रत्येक भागात त्या-त्या ठिकाणांनुसार वेगवेगळ्या प्रथा-परंपरा आणि वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात. राज्याचा महत्त्वाचा भाग असलेला खान्देश हा लोकोत्सव, लोकगीते आणि लोक देवतांसाठी प्रसिद्ध आहे. लोकोत्सव साजरा करताना स्वतःला, परिवाराला व समाजाला आनंद मिळावा, ही एकमेव अपेक्षा असते. श्रावण महिन्यात खान्देशात सण व्रत उत्सवांची रेलचेल असते. नागपंचमी, शीतला सप्तमी, वरदलक्ष्मी व्रत, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, कानबाईचे रोट या सणांमधून खान्देशच्या लोकसंस्कृतीचे जतन आणि वहन सातत्याने होत आहे. यातील एक महत्त्वाचा उत्सव म्हणजे कानबाई मातेचा उत्सव. आजपासून या लोकोत्सवाला सुरुवात होत आहे.

–दिलीप कोठावदे

कानबाई ही खान्देशाची ग्रामदैवत असून महाराष्ट्रात कानबाई मातेची मोजकीच मंदिरे आहेत. त्यात प्रामुख्याने चाळीसगांव तालुक्यातील उंबरखेडचे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. त्यापाठोपाठ वेल्हाने, बलसाण येथील कानबाई मंदिरे प्रसिद्ध आहेत. अलीकडच्या काळात बोरकुंड, प्रकाशा, लामकणी व चाळीसगांव येथेही कानबाई मातेची मंदिरे झालेली आहेत. मात्र कानबाई हे नेमक्या कोणत्या देवतेचं रूप, आहे हे स्पष्ट नाही. सुर्यपुत्री तापी नदीच्या खोर्‍यात खान्देशचं जनजीवन समृद्ध झालं आहे. इथे सूर्य उपासनेची प्राचीन परंपराही आहे. त्यातूनच कानबाई ही सूर्यपत्नी असल्याचे अनेक दंतकथांमधून दिसून येते. काही ठिकाणी ती शिवपत्नी पार्वती, कुठे कृष्णाची राधा तर काही ठिकाणी विठ्ठलाची रुक्मिणी असल्याचे मानले जाते. ही नवसाला पावणारी लोकदेवता असल्याने सर्वसामान्य, कष्टाने गांजलेली मने तिची मनोभावे आळवणी करतात. तिला नवस करतात, तिची उत्सुकतेने वाट पाहतात.

- Advertisement -

श्रावण सुरू होताच कानबाई मातेच्या उत्सवाची लगबग सुरू होते. खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात हा उत्सव प्रामुख्याने वाणी, सोनार, शिंपी, चौधरी, माळी या समाजात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. अलीकडच्या काळात खान्देशातील बहुतेक लोक पोटापाण्यासाठी नाशिकमध्ये स्थायिक झाले असल्याने नाशिकमध्येही हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होऊ लागला आहे. यापूर्वी खान्देश व्यतिरिक्त अन्यत्र कुठेही कानबाईचा उत्सव साजरा केला जात नव्हता. खान्देशच्या कृषी संकृतीशी जवळीक साधणारा हा उत्सव सर्वांना एकत्र आणून विरळ होत चाललेला जिव्हाळा घट्ट करणारा आणि आजतागायत टिकून राहिलेला ठेवा आहे. कोकणात जसे सर्व चाकरमाने गणपती उत्सवाला आपल्या गावाकडे परततात, अगदी त्याचप्रमाणे खान्देशात कानबाई उत्सव साजरा करण्यासाठी देश विदेशातील कुटुंबातील सदस्य आपल्या घराकडे न चुकता येतात.

खान्देशाची ग्रामदैवत असलेल्या कानबाईचा हा उत्सव श्रावण महिन्यातील नागपंचमीनंतर येणार्‍या पहिल्या रविवारपासून साजरा केला जातो. त्यासाठी तिथी वगैरे बघितली जात नाही. खान्देशवासीयांसाठी हा उत्सव महत्वपूर्ण असल्याने साधारण महिना-पंधरा दिवस आधीपासूनच याची तयारी सुरू होते. या उत्सवाच्या आधी दिवाळ सणाच्या आधी करतो तशी घराला रंगरंगोटी होते. घरातील सर्व कपडे,भांडी धुवून स्वच्छ केली जातात. कानबाई मातेच्या स्वागतासाठी हार, फुले, विविध प्रकारच्या फळांनी गाभार्‍याचा मंडप सजविला जातो. त्यावर आकर्षक रोषणाईही केली जाते. मंगल कलशावर नारळ ठेवून त्यावर नथ, डोळे लावून किंवा देवीचा मुखवटा बसवून त्याला कानबाई मातेचं रुप दिले जाते. १०७ प्रकारच्या वनस्पती आणि ७ नद्यांचं पाणी आणून कानबाई मातेची पूजा केली जाते. कानबाईचा हा उत्सव स्थान व परंपरा परत्वे दीड,तीन किंवा पाच दिवसांचा असतो. रविवारच्या पहिल्या दिवशी कानबाई मातेची विधिवत पूजा करून स्थापना केली जाते.

- Advertisement -

रविवारी सकाळी ‘रोट’ केले जातात. या उत्सवात रोटच्या प्रसादाला विशेष महत्त्व असून पुरण पोळीच्या स्वरूपात हे रोट केले जातात. केळीचे व कण्हेरीचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश ठेऊन कानबाई मातेची स्थापना केली जाते. काहींकडे हातापायाची कानबाई असते तर काहींकडे कानबाई- रानबाई अशा दोघी बहिणी दोन वेगवेगळ्या चौरंगावर बसवतात. तर काही ठिकाणी कानबाई आणि कण्हेरची स्थापना केली जाते. त्या कलशावरुनच गळ्यातले हार, मणी मंगळसूत्र चढवले जाते. वरुन शेवंतीची वेणी लावून ओढणी लावली जाते. मग आरती होते. कानबाई बसलेली असेल तोवर कानबाई जवळ लावलेला दिवा विझू दिला जात नाही. आरतीनंतर पुरणपोळ्या, पुरणाचे दिवे, भंडारा, वेणी, फणी, आरसा, बांगड्या, टिकली, पोळपाट लाटणे, तवा हे सगळं कणकेचच केलं जातं. कटाची आमटी, लाल भोपळ्याची(डांगराची) भाजी, पापड, भजे हे सर्व काशाच्या ताटात ठेऊन घरातील ज्येष्ठांच्या हातून देवीला ओवाळतात.

रोटांच्या निमित्ताने घरातील सदस्यांच्या संख्येप्रमाणे शेर दोन शेर गव्हाची निवड होते. त्यात पाळीव जनावरांचा हिस्सा, कानबाई, रानबाई, कन्हेर यांच्या नावाने पाच-पाच मूठ गहू वाढविला जातो. प्राणी, वनस्पतीही घरातील सदस्यच आहेत, हा यातला भाव. या पिठातून साधे रोट, मोठे रोट बनवले जातात. नागपंचमीनंतर येणार्‍या पहिल्याच शनिवारी साधे रोट व रविवारी मोठे रोट करतात. साध्या रोटाला पोळ्या, किल्लूची भाजी केली जाते. मोठ्या रोटाला पुरणपोळी, खीर, आमटी, उसळ असा बेत असतो. रोटचा हा प्रसाद ग्रहण करण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात. विशेष म्हणजे हा प्रसाद फक्त घरातील सदस्यच ग्रहण करू शकतात. इतर कोणालाही ते प्रसाद म्हणून देता येत नाही. पुरणाचे दिवे मोडुन त्यांचा बारीक चुरमा केला जातो. दही, दूध, तुप घालुन त्याचा चुरमा केला जातो. ह्या चुरम्याची चव अप्रतिम असते. मग हा चुरमा नि पुरणपोळ्या वगैरे देवीला आदल्या दिवशी दाखवलेला नैवेद्य हे सगळं काशाच्या एकाच ताटात देवीचा प्रसाद म्हणून फक्त घरातलेच लोक खातात. अगदी लग्न झालेल्या मुलीलासुद्धा हा प्रसाद खाण्याचा अधिकार नसतो.

दुसर्‍या व तिसर्‍या दिवशीही रोटांचंच जेवण असतं. रोट (म्हणजे सवा-सवा मूठ गहु घेऊन दळुन आणलेलं पीठ) संपेपर्यंत ते खावच लागतं. रोट संपेपर्यंत जेऊन हात धुतलेलं पाणी नि उष्ठ्या ताटातील पाणीसुद्धा खड्डा करुन त्यात ओततात. काहीही उष्ट गटारीत किंवा इकडे तिकडे पडू देत नाहीत. पौर्णिमेच्या आत रोट संपवावे लागतात. जर मधेच पौर्णिमा आली तर त्याआधीच उरलेलं पीठं खड्डा करुन पुरुन टाकतात. कानबाईमुळे घरातली, गावातली इडा पिडा टळते असा लोकांचा विश्वास असतो. कानबाईची पूजा व दर्शनासाठी कुटुंबाव्यतिरिक्त बाहेरील जे भाविक येतात त्यांच्यासाठी लाह्या-फुटाणे किंवा दूध-भात-पिठीसाखरेचा प्रसाद केला जातो. त्यादिवशी रात्रभर जागरण करून अहिराणी भाषेतील लोकगीते म्हणत त्यावर नृत्यही करतात. अलीकडे कानबाई मातेची गाणी म्हणणारे वाद्यवृंद पथकेही तयार झालेली असून त्यांना अकरा हजारांपासून एक्कावन्न हजारापर्यंत मानधन देऊन कानबाई मातेचा जागर केला जातो. यात प्रामुख्याने पुण्याचे सागर देशमुख, शिरपूरचे आबा चौधरी,जळगाव येथील गणेश व संजय अमृतकर यांच्यासह पारोळ्याच्या साधना वाणी व पाचोर्‍याच्या संगिता लाड यांचे वाद्यवृंद लोकप्रिय आहेत.

रात्री अनेकजण दर्शनाला येतात. काही जणांकडे फक्त रोट करण्याची प्रथा असते. मग ते संपूर्ण कुटुंब रोट परातीत घेऊन कानबाईच्या दर्शनाला येतात. या दिवशी कुणी कानबाईला काही नवस केलेला असेल तर तो फेडण्यासाठीही गर्दी होते. यात मुख्यत: नारळाच्या तोरणाचा नवस असतो. दुसर्‍या दिवशी सोमवारी सकाळी कानबाईची आरती करुन अंगणात चौरंग नेऊन ठेवतात. गल्लीतल्या सगळ्या कानबाया एकाच वेळेस निघतात. कानबाईची सवाद्य विसर्जन मिरवणूक काढतात. विसर्जन मिरवणूक ही लक्ष वेधणारी असते. भक्तीत तल्लीन झालेले भाविक वाजत-गाजत-नाचत, गाणी म्हणत,फुगड्या खेळत विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. विशेष म्हणजे ज्या रस्त्याने ही मिरवणूक जाते त्या रस्त्यावर ठिकठिकाणी महिला कानबाई मातेचे स्वागत व पूजन करतात. यावेळी मिरवणुकीपुढे पाण्याचा सडा घातला जातो. कानबाई मातेचा कलश घेतलेल्या सुवासिनीच्या पायावरही पाणी घालून तिला हळदीकुंकू लावले जाते.

कानबाईला नि त्या स्त्रीला नमस्कार करण्यासाठी ही झुंबड उडते. कानबाईपुढे मुले, मुली फुगड्या खेळतात. वाजत गाजत जाताना समोरुन दुसरी कानबाई आली तर दोन्ही कानबायांची भेट घडवली जाते. नदीवर पोहोचल्यावर पुन्हा एकदा आरती होऊन कानबाईच्या नारळाव्यतिरिक्त सगळ्या पूजा सामुग्रीचे विसर्जन होते. नदीतलीच वाळु घेऊन त्यावर कलश नि आपापले कानबाईचे नारळ तसेच डोक्यावर घेऊन पुन्हा वाद्यांच्या गजरात घरी परततात. यावेळी सोबत आणलेली नदी काठाची माती कस्तुरी म्हणून घरात टाकतात.असा कानबाईचा उत्सव संपन्न होतो. कानबाईच्या उत्सव काळात श्रावणाच्या रूपाने सृष्टीच्या अंगावरचा शालू हिरव्या-पिवळ्या रंगात नटायला सुरुवात झालेली असते.

विविधरंगी फुलांच्या रंगांची बुट्टी त्या शालूचे सौंदर्य खुलवत असते. शेतातली पिकं डोलायला लागतात. पिकांचे ते डोलणं म्हणजे समृद्धीचे प्रतीक. या प्रतीकांची कानबाईच्या गाण्यात जागोजागी मुक्त पेरणी केलेली असते. या पेरणीला अहिराणी भाषेचा गोडवा अधिकच खुलवतो,अन त्याचवेळी आलेल्या कानबाईचे रुप, तिचा साज-शृंगार तिची ओढ तिला द्यावा लागणारा निरोप या सार्‍यांचं भावपूर्ण वर्णन अहिराणी गीतातून व्यक्त होतं, म्हणूनच कानबाईच्या गीतांना एकप्रकारची लोकगीतांची लय आहे. त्यामुळे या गाण्यांच्या तालावर नाचताना सहजपणे ठेका धरता येतो. कानबाईची ही गाणी आणि तिचा उत्सव हा खान्देशचा अजोड सांस्कृतिक ठेवा आहे.

विज्ञान युगात माणूस माणसापासून दूर जात असल्याची ओरड होत असताना कानबाई उत्सवाच्यानिमित्ताने तो पुन्हा एकमेकांच्या जवळ येतो, परस्परातील नात्यांची वृद्धी होते, कानबाईच्या या सणामागील हा उद्देश सुफल व्हावा. कारण मोठ्या कुटुंबाची शकले होऊन छोटी छोटी घरं होत असताना, अशा वातावरणात या सणांमुळे आजी-आजोबा व नातवंडे, काका-काकू, सासू-सून लेकीबाळी एकत्र यावी आणि त्यांच्या चेहर्‍यावर उमटणारी अलौकिक आनंदाची लकेर जीवनाच्या समृद्ध सार्थकतेचं प्रतिक ठरावी. म्हणून, हा वारसा जपायला हवा व पुढच्या पिढीकडे तो आस्थेने द्यायला हवा.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -