घरफिचर्ससारांशप्लॅनेटरी सिव्हिलायझेशन : तेजोमय जिजीविषा यात्रा!

प्लॅनेटरी सिव्हिलायझेशन : तेजोमय जिजीविषा यात्रा!

Subscribe

‘प्लॅनेटरी सिव्हिलायझेशन’ म्हणजे काय तर साध्या भाषेत इतर ग्रहांवर राज्य करणारा मानवी समाज व त्याची व्यवस्था होय. ‘प्लॅनेटरी सिव्हिलायझेशन’मध्ये सांगण्यासारखे काय? तर साध्या भाषेत ही ‘ग्रहीय सभ्यता’ होय. म्हणजेच ‘वैश्विक समाजव्यवस्था’ तसेच एक दृष्टिकोनदेखील. मग वैश्विक कायदेकानून, नीती-चालीरीती, नवी मूल्ये आणि नैतिक-अनैतिक काय आणि ते ठरवायचे कुणी अशा उडणार्‍या संघर्ष ठिणग्यादेखील. असे असले तरी समस्या सोडविण्यासाठी ‘प्लॅनेटरी सिव्हिलायझेशन’ म्हणजे तहान लागण्याआधीच अंतरीक्षात विहीर खोदणे असे म्हटले तर ते ‘विश्वनवल’च ठरेल.

‘जिजीविषा’ ही मानवी वृत्ती म्हणजे केवळ जगण्याची तीव्र इच्छा नव्हे तर अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे बघत अखंड विजयी प्रवासदेखील आहे. यातूनच ‘प्लॅनेटरी सिव्हिलायझेशन’ संकल्पना आली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), ब्रेन टू कॉम्प्युटर इंटरफेस (बीसीआय) असे या प्रवासातील मैलाचे दगड आहेत हे वास्तव होय. मानवी अस्तित्वाच्या लढाईबरोबर ‘प्लॅनेटरी सिव्हिलायझेशन’कडे आपल्या सभ्यतेची वाटचाल सुरू आहे. खरंतर विश्वाच्या अथांग सागरातील हा प्रवास म्हणजे अचंबित व मर्यादांवर मात करीत नवीन क्षितिजे गाठण्याची कृतीश्रृंखलाच आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणत ‘न्यू वर्ल्ड ऑर्डर’ (एनडब्ल्यूओ) आणि ‘प्लॅनेटरी सिव्हिलायझेशन’ एकमेकांशी संलग्न आहे की कसे? हे प्रश्न उपस्थित करीत जगात वादंग माजतात हे सत्य आहे, मात्र लवकरच मानवी सभ्यता आणि रोबोट (यंत्रमानव) यांचे संकरीत ‘ह्यूमनॉइड रोबोट’ बनेल ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ‘नैसर्गिक बुद्धिमत्ता’ (एनआय) व ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या (एआय) जोरावर केवळ अवयव निर्मिती नव्हे तर अमरत्वदेखील लवकरच मानव मिळवेल. तसेच यंत्रात चेतनादेखील निर्माण करेल. मग अथांग अमर्याद अंधारामय अंतराळातील विविध परग्रहांवर मानवी यंत्रमानवांची वस्ती फोफावलेली दिसेल.

नेमकं काय?

‘प्लॅनेटरी सिव्हिलायझेशन’ म्हणजे काय तर साध्या भाषेत इतर ग्रहांवर राज्य करणारा मानवी समाज व त्याची व्यवस्था होय. ‘प्लॅनेटरी सिव्हिलायझेशन’मध्ये सांगण्यासारखे काय? तर साध्या भाषेत ही ‘ग्रहीय सभ्यता’ होय. म्हणजेच ‘वैश्विक समाजव्यवस्था’ तसेच एक दृष्टिकोन देखील. मग वैश्विक कायदेकानून, नीती-चालीरीती, नवी मूल्ये आणि नैतिक-अनैतिक काय आणि ते ठरवायचे कुणी अशा उडणार्‍या संघर्ष ठिणग्यादेखील. असे असले तरी समस्या सोडविण्यासाठी ‘प्लॅनेटरी सिव्हिलायझेशन’ म्हणजे तहान लागण्याआधीच अंतरीक्षात विहीर खोदणे असे म्हटले तर ते ‘विश्वनवल’च ठरेल.

- Advertisement -

हायब्रीड मनुष्य की यंत्र?

रोबोटशी लढत पृथ्वीवरून मानव नष्ट होण्याआधीच ‘हायब्रीड’ बनत मानवजात मंगळ ग्रह आणि आकाशगंगेतील इतर ग्रहांतर करण्यासाठी सज्ज होत आहे. एलन मस्कच्या अधिपत्याखालील अनेक कंपन्या यासाठी कार्यरत आहेत, मात्र या प्रवासात नेमका हायब्रीड मनुष्य असेल की हायब्रीड यंत्र असा प्रश्न निर्माण झाला आहे, मात्र ‘प्लॅनेटरी सिव्हिलायझेशन’ हे आजचे वास्तव रोजीरोटीत अडकलेल्या किती जणांना ठाऊक असणार?

मूळ कुठे?

‘प्लॅनेटरी सिव्हिलायझेशन’ या संकल्पनेचे मूळ दडले आहे ते मानवतेच्या भवितव्याबद्दलच्या चिंतामुक्त उपाय शोधण्यासाठी. लोकसंख्यावाढ, वातावरण बदल, अन्नधान्य तुटवडा, ढासळती नैतिक मूल्ये, वाढती गुन्हेगारी, दुसर्‍यावर नियंत्रण ठेवत त्याला गुलाम बनवत मर्दुमकी गाजवण्याची असुरी वृत्ती तसेच लोभ, हावरटपणा आणि गरजेपेक्षा जास्त जमवण्याचा हव्यास अशी लांबलचक यादी ही खरंतर मानवी उणिवा व अभिशापच.
‘इगो’च्या स्पर्धेत विवेक हरवला की स्वत:च बनविलेल्या अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब जपानने अनुभवला. सध्या अनियंत्रित आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे (एआय) क्यू स्टारसारखे स्वायत्त प्रोजेक्ट भयावह आहेत, पण सर्वच काही वाईट नाही हे! तर दुसरीकडे मानवी मर्यादा व उणिवांवर मात करीत ज्ञानाची व सत्यशोधाची नवीन विश्वक्षितिजे आपण गाठू ही सकारात्मकता आशावादी आहे.

- Advertisement -

ब्रेड-बटरच्या पलीकडे विचार करीत भविष्यवादी, शास्त्रज्ञ-विचारवंत आगामी संकटांची चाहूल घेत आहेत. केवळ हवेत अंदाज नव्हे तर माहितीचा खजाना गवसत आहेत. देव शोधण्यासाठी नव्हे तर देव बनण्यासाठीचा मेंदूचे कप्पे तंत्रज्ञान उघडत आहे. म्हणूनच ‘प्लॅनेटरी सिव्हिलायझेशन’चे वेगवेगळे टप्पे हे भविष्य भेदण्याचे प्रयत्न आहेत.
खरंतर ‘प्लॅनेटरी सिव्हिलायझेशन’ संकल्पनेचा कुणीएक जनक नाही. अमेरिकेविरुद्ध शीतयुद्धाच्या आधीपासूनच सोव्हियत रशियामध्ये अनेक दशके आधीच यावर काम सुरू होते. जसजसे गुप्त माहितीला पोलादी बंद दरवाजातून ‘बिंग फुटले’, तसतसे ‘प्लॅनेटरी सिव्हिलायझेशन’ हे विज्ञान कथा, तत्त्वज्ञान आणि जागतिक आव्हानांवरील चर्चा यासह विविध क्षेत्रांत प्रकटले. मग कुजबुजीचे रूपांतर हे कधी उदात्त ध्येयात तर कधी शैतानी चेहरा घेत, मेंदूला झिणझिण्या आणणार्‍या शास्त्रज्ञांच्या अचाट व अफाट प्रयोगांचे, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आरशात प्रतिबिंबित झाले.
वैज्ञानिक समुदायात ‘प्लॅनेटरी सिव्हिलायझेशन’ हे मानवतेचे दीर्घकालीन अस्तित्व आणि प्रगती याविषयी चर्चेत गुंतले. मग शास्त्रज्ञांच्या कहाण्या प्रसारमाध्यमांतून झळकल्या. पर्यावरणीय प्रश्न आणि अवकाश संशोधनावर पडणारा विषम प्रभावही जगाच्या रंगमंचावर दिसू लागला.

विज्ञान कथेतील चेहरा

‘प्लॅनेटरी सिव्हिलायझेशन’ ही जादूई करामती दाखवत कोई मिल गया असे भारतात एलियन्सची कथा सांगते. आयझॅक असिमोव्ह आणि आर्थर सी. क्लार्कसारख्या लेखकांच्या ‘प्लॅनेटरी सिव्हिलायझेशन’वरील अभ्यासपूर्ण परिश्रमांचा तसेच स्टार ट्रेकसारख्या मालिका व चित्रपटांचा जगभर प्रवास होतो, मात्र बेसिक सायन्सच माहीत नाही तिथे ‘प्लॅनेटरी सिव्हिलायझेशन’ची संस्कृती व संस्कारांवर समजणे म्हणजे नालंदा युनिव्हर्सिटी असलेल्या जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या, विविधतेने नटलेल्या, विद्वानांच्या देशात आज दिव्यच नाही का?
लेखक आणि चित्रपट निर्माते सतत विज्ञान कथा साहित्य आणि चित्रपटांतून ते मांडण्याचा खराखोटा प्रयोग करतात. मानवी सभ्यतेबरोबर परग्रहावर सभ्यता आणि यंत्रमानवांच्या संघर्ष कहाण्यांवर आधारित बॉक्स ऑफिस हिट मुव्हीजची लांबलचक अमेरिकन जंत्री भारतात मात्र आकुंचन पावलेली वाटते. शिक्षणातील दर्जा आणि दृष्टिकोन ही दोन्ही कारणे यामागे आहेत.
‘प्लॅनेटरी सिव्हिलायझेशन’चा वेध घेताना हे लक्षात घेणे आवश्यक आहे की संकल्पना प्रिस्क्रिप्टिव्हपेक्षा अधिक महत्त्वाकांक्षी आहे. कोणत्याही विशिष्ट व्यक्ती किंवा संस्थेने ग्रहीय सभ्यता साध्य करण्यासाठी तपशीलवार योजनाच पृथ्वीवर आजतरी ‘टिमवर्क’ करीत मानवाने तयारच केलेली नाही.

भविष्यवादी आणि दूरदर्शी चेहरा

‘प्लॅनेटरी सिव्हिलायझेशन’चे अनेक कंगोरे आहेत. यातील एक पैलू म्हणजे भविष्यवादी आणि दूरदर्शी होय. प्रसिद्ध खगोल व भौतिकशास्त्रज्ञ कार्ल सगन यांनी त्यांच्या पेले ब्लू डॉट या पुस्तकात मानवतेने परस्परसंबंध ओळखून जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एकत्र काम करण्याच्या गरजेवर भर दिला आहे, तर संशोधक आणि दूरदर्शी बकमिन्स्टर फुलर यांनी जागतिक सहकार्य आणि टिकाऊपणाच्या संकल्पनांचा शोध लावत प्रत्येकासाठी काम करू शकेल अशा जगाची कल्पना मांडली आहे, तीदेखील दर्शवते ते ‘प्लॅनेटरी सिव्हिलायझेशन’!

वैज्ञानिक आणि तात्त्विक चेहरा!

‘प्लॅनेटरी सिव्हिलायझेशन’चा विज्ञान व तत्त्वज्ञानासह अजून एक चेहरा दिसतो. तो ग्रहीय सभ्यतेबद्दलच्या चर्चा अधिक क्लिष्ट बनवतो. मानवी समाजाचे स्वरूप, नैतिकता आणि जागतिक सहकार्याविषयी विचार करायला लावतो.
‘प्लॅनेटरी सिव्हिलायझेशन’च्या माध्यमातून अंतरीक्षातील विविध नक्षत्रे व त्यातील तार्‍यांभोवती फिरणार्‍या खगोलीय वस्तुमानावर परिस्थितीशी जुळवून घेत नवीन क्षितिजे गाठणे हा दूरदर्शी काल्पनिक वाटला तरी वास्तव उद्देश होय. मानवजात या दिशेने पावले उचलत आहे हे आजचे स्वप्न नव्हे तर सत्य. अर्थात आपल्या रहाटगाडग्यासारख्या ‘रॅटरेस जिंदगी’ जगणार्‍यांना याची कल्पनादेखील अजब आणि असंभवच!

‘प्लॅनेटरी सिव्हिलायझेशन’चा वेध

वसुंधरेवरील आव्हानात्मक प्रश्न न सोडवताच दुसर्‍या ग्रहावर पळ काढणारी मानव सभ्यता आहे काय? की एकाच वेळी विश्वाच्या सर्व अडचणी आपण सोडवू शकतो हा कॉन्फिडन्स आता आपल्याला मिळाला आहे. ‘प्लॅनेटरी सिव्हिलायझेशन’ कुठल्या दिशेला म्होरक्यांबरोबर आपल्याला हाकून नेईल?
वसुंधरेवरील आव्हानात्मक प्रश्न न सोडवताच पळ काढत अंतराळात झेप घेत मानवी सभ्यता पळपुटी ठरेल का? दुसर्‍या ग्रहावर जाऊन छान वस्ती करेल ना? ‘दिव्याखाली अंधार’ म्हणावा की ‘अविवेकी वेडेपणा’? काळाच्या अथांग उदरात याचे उत्तर दडलेले आहे. ‘प्लॅनेटरी सिव्हिलायझेशन’ हा ‘नवलविश्वा’चा एक पैलू आहे.

(लेखक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -