घरफिचर्ससारांशबोलिये सुरीली बोलियाँ...

बोलिये सुरीली बोलियाँ…

Subscribe

हिंदी चित्रपट युगल गीतांमध्ये फार क्वचित ऐकायला येणार्‍या ‘सुलक्षणा पंडित आणि भूपेंद्रसिंह’ या दोन गायकांच्या आवाजातलं हे खेळकर गाणं. नेहमीप्रमाणे यातही गुलजारने आपल्या शब्दांची किमया श्रोत्यांना अनुभवास दिली आहे. ‘रात मे घोले चांद की मिसरी’ आणि ‘शाम की खुशबू हाथ न आए’ ह्या खास गुलजार टच घेऊन आलेल्या प्रतिमा. एरवी दु:खी आणि उदास भाव असलेली गाणी गाणार्‍या भूपेंद्र यांनी या गाण्यात हसरा-खोडकर-नटखट सूर अचूक पकडला आहे. त्यांना तेवढीच तोलामोलाची साथ सुलक्षणा पंडितने दिलीय.

-प्रवीण घोडेस्वार
निर्माते-दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांचा ‘गृहप्रवेश’ हा चित्रपट २८ जुलै १९७९ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटात संजीवकुमार, शर्मिला टागोर व सारिका प्रमुख भूमिकेत होते. बासूदांचा ‘विवाहित स्त्री-पुरुष संबंध’ या विषयावरच्या तीन चित्रपटांच्या मालिकेतला अनुभव (१९७१) आणि आविष्कार (१९७३) या चित्रपटांनंतरचा हा तिसरा चित्रपट. या चित्रपटाचे संगीतकार आहेत कनू रॉय. यामध्ये मचल कर जब भी आंखो से… (भूपेंद्रसिंह-सुलक्षणा पंडित), बोलिये सुरीली बोलियाँ… (भूपेंद्रसिंह-सुलक्षणा पंडित), लोगों के घर में रहता हू… (भूपेंद्रसिंह), आप अगर आप न होते… (सुलक्षणा पंडित), पहचान तो थी पहचाना नही…(चंद्राणी मुखर्जी), पी के याद आई पिया… (पंकज मित्रा), जिंदगी फूलोंकी नही… (भूपेंद्रसिंह) ही श्रवणीय गाणी होती. बासूदा कमी खर्चात चित्रपट बनवायचे. म्हणून ते त्यांच्या मित्र-मंडळींना आपल्या चित्रपटात वेगवेगळ्या जबाबदार्‍या देत असत. परिणामी त्यांचा चित्रपट कमी खर्चात बनायचा. गुलजार आणि कनू रॉय हेदेखील त्यांचे मित्र होते. ह्या तिघांनी ‘अनुभव’ आणि ‘आविष्कार’ हे दोन उत्तम चित्रपट दिले आहेत. गृहप्रवेशमधली गाणीदेखील रसिकांच्या पसंतीला उतरली होती. यातल्या दोन गाण्यांवर हा एक दृष्टिक्षेप:

जिंदगी फूलों की नही,
फूलों की तरह महकी रहे
जिंदगी…
जब कोई कही गुल खिलता है,
आवाज नही आती लेकीन
खुशबू की खबर आ जाती है,
खुशबू महकी रहे,
जिंदगी…
जब राह कहीं कोई मुडती है,
मंजिल का पता तो होता नही
इक राह पे राह मिल जाती है,
राहे मुडती रहे,
जिंदगी…

- Advertisement -

भाषा नि साहित्याची थोडीफार जाण असलेल्या कोणाही रसिक श्रोत्याला आकर्षित करून घेणारं हे गाणं आहे. आयुष्य फूल नाही तर फुलांसारखं फुललेलं असावं. किती विरोधाभास आहे ना या एका लहानशा ओळीत! हा विरोधाभास मात्र जगण्यातल्या वास्तवाशी नातं सांगणारा आहे. शब्दांच्या खोलात गेलो तर आपल्याला त्यांच्या अनेक अर्थछटा प्रतीत होतील. आपल्यापैकी किती जणांच्या आयुष्याची वाट फुलांसारखी नरम, मुलायम होती किंवा आहे? संघर्षाशिवाय जगण्याला अर्थ तो काय? पण माणूस संघर्षदेखील तेव्हाच करू शकतो जेव्हा त्याच्या मनात उठणार्‍या असंख्य भाव-भावनांना कोणीतरी समजून घेणारा आहे. त्याच्या सोबतीची कोणाला तरी आवश्यकता आहे. आयुष्याच्या काटेरी वाटेवरून प्रवास करीत असताना अशीही काही माणसं भेटत राहावीत ज्यांच्या सहवासाचा सुगंध हा प्रवास पुढे नेण्यासाठी प्रेरणा देणारा असावा. गुलजारने या गाण्यात वापरलेल्या ‘खुशबू की खबर’ आणि ‘मुडती राहे’ या प्रतिमा कोणा एका व्यक्तीकडे निर्देश करतात असं वाटतं.

या गाण्याच्या जन्माची कथाही मजेशीर आहे. बासूदांना आपल्या चित्रपटात विनोद अजिबात आवडायचा नाही. ते नेहमी पटकथेतले हलके-फुलके प्रसंग काढून टाकायचे. त्यांच्या मते चित्रपट हे गंभीर चिंतनाचं माध्यम होय. अशा दृष्टिकोनामुळे गुलजार यांच्या समवेतही त्यांचे मतभेद व्हायचे. ‘गृहप्रवेश’ची पटकथा गुलजार यांनीच लिहिलीय. चित्रपटाच्या सुरुवातीला येणार्‍या श्रेयनामावलीसोबत हे गाणं येतं. चित्रपटाच्या गंभीर आशयाला साजेसं असंच हे गाणं असावं, असं बासूदांचं मत होतं. हे सांगत असताना त्यांचा बंगाली भाषेतला संवाद गुलजारांना आठवला नि त्या संभाषणाचा हिंदीत अनुवाद करून हे गाणं साकारलं. गाण्याचे शब्द ऐकताच बासूदांना आवडले, मात्र गुलजार फारसे समाधानी नव्हते, पण बासूदा ठाम होते.

- Advertisement -

गाण्याचा मुखडा तयार झाला. या गाण्यासाठी कनूदांनी बनवलेली चाल सगळ्यांना पसंत पडली. एका सकाळी मुंबईच्या ताडदेव स्टुडिओमध्ये भूपेंद्रच्या आवाजात हे गाणं ध्वनीमुद्रित झालं. लोकांना हे गाणं आवडलं असलं तरी गुलजार यांना आजही हे गाणं आवडत नाही. त्यांच्या मते या गाण्याचा मुखडा म्हणजे केवळ शब्दांची कारागिरी, पण जाणकारांच्या मते हा मुखडाच गाण्याचा प्राण आहे. कमीत कमी वाद्यांच्या सहाय्याने संगीत देण्यात कनूदा माहीर होते. त्यांनी बासरी, गिटार, सतार या वाद्यांचा फार नजाकतीने उपयोग केलाय. भूपेंद्रकडून त्यांनी मुखड्याच्या ओळी दोनदा गाऊन घेतल्या. शब्दांना लहान लहान तुकड्यांमध्ये विभागून त्यामधल्या ठहरावातून निराशेचा माहोल निर्माण केलाय.
‘गृहप्रवेश’मधल्या दुसर्‍या एका गाण्याचा आस्वाद घेऊया…

बोलिये सुरीली बोलियाँ
खट्टी मीठी आंखो की रसीली बोलियाँ
रात में घोले चांद की मिसरी
दिन के गम नमकीन लगते है
नमकीन आंखो की नशीली बोलियाँ
बोलिये सुरिली बोलियाँ…
खट्टी मीठी आंखो की रसीली बोलियाँ…

गूंज रहे है डूबते साये, डूबते साये
शाम की खुशबू हाथ न आये
गुंजती आंखो की नशीली बोलियाँ
बोलिये सुरीली बोलियाँ
खट्टी मीठी आंखो की रसीली बोलियाँ…

हिंदी चित्रपट युगल गीतांमध्ये फार क्वचित ऐकायला येणार्‍या ‘सुलक्षणा पंडित आणि भूपेंद्रसिंह’ या दोन गायकांच्या आवाजातलं हे खेळकर गाणं. नेहमीप्रमाणे यातही गुलजारने आपल्या शब्दांची किमया श्रोत्यांना अनुभवास दिली आहे. ‘रात मे घोले चांद की मिसरी’ आणि ‘शाम की खुशबू हाथ न आए’ ह्या खास गुलजार टच घेऊन आलेल्या प्रतिमा. एरवी दु:खी आणि उदास भाव असलेली गाणी गाणार्‍या भूपेंद्र यांनी या गाण्यात हसरा-खोडकर-नटखट सूर अचूक पकडला आहे. त्यांना तेवढीच तोलामोलाची साथ सुलक्षणा पंडितने दिलीय. संगीतकार जतीन-ललित यांच्या भगिनी असलेल्या सुलक्षणा ह्या अभिनेत्री आणि गायिका, पण गुणवत्ता असूनही त्यांना पार्श्वगायनात म्हणावी तशी संधी मिळाली नाही याची खंत वाटते.

संगीतकार भावांनीसुद्धा त्यांच्याकडून फारशी चित्रपट गीते गाऊन घेतली नाहीत. या गाण्यात मात्र या दोन्ही पार्श्वगायकांनी गाण्याचा आशय समजून-उमजून त्यात कामालीचे राग भरले आहेत. संगीतकार कनू रॉय यांना याचं श्रेय द्यायला हवं. शब्द-स्वर-संगीत यांचा मनोहरी मिलाफ म्हणजे हे हलकं-फुलकं पण अर्थपूर्ण द्वंद्वगीत. त्यांनी वर उल्लेख केलेल्या तीनच चित्रपटांसाठी गुलजार समवेत काम केलं. आपल्या सई परांजपे यांच्या ‘स्पर्श’लादेखील रॉय यांचंच संगीत आहे. अभिनेताही असलेल्या कनू रॉय यांनी २० डिसेंबर १९८१ रोजी शेवटचा श्वास घेतला. मोजक्याच हिंदी चित्रपटांना संगीत दिलेल्या ‘कनू रॉय-गुलजार’ जोडीने एकत्रित केलेलं काम अल्प असलं तरी अविस्मरणीय आहे यात शंका नाही.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -