घरफिचर्ससारांशदो नैना एक कहानी....

दो नैना एक कहानी….

Subscribe

हा तो काळ होता ज्यावेळी लता आणि आशा या दोन नावांचं हिंदी संगीतावर गारूड होतं. अशा स्थितीत आरतीच्या आवाजातला हळूवार प्रामाणिकपणा कमालीचा दुर्मीळच होता. परिणामी प्रेम, भक्ती आणि इतर अशा कुठल्याही गाण्यात आरती मुखर्जींच्या आवाजाने अपेक्षित परिणाम साध्य होणार होताच. १९७६ मध्ये तपस्या रिलिज झाला. त्यातलं दो पंछी दो तिनके कहो लेकर चले है कहा...हे गाणं आरतीसाठीच ऐकावं. आरती मुखर्जींची फक्त काही गाणी इथं सांगेन, त्यावरून ही गाणी आपल्या आवडत्या गाण्यांच्या यादीत नसली तर नवल...दो नैना एक कहानी (मासूम), कभी कुछ पल जीवन के, (रंगबिरंगी), मैं वही दर्पन वही, श्याम तेरी बन्सी पुकारे राधा नाम (गीत गाता चल)...आरती मुखर्जी हे नाव बंगाली संगीत क्षेत्रात खूप मोठं आहे. आरती मुखर्जी, सुलक्षणा पंडित, कंचन, हेमलता आणि सुमन कल्याणपूर या नावांना हिंदी गायनकलेत अजून संधी असायला हवी होती. त्यांची पुरेशी वैविध्यपूर्ण गाणी आलेलीच नाहीत. या फार मोठ्या स्वरगोडव्याला इथले कानसेन वंचित राहिलेत.

मुकेशसोबत ‘वादीयोंमें खो जाए हम तुम…’ म्हणणार्‍या आरती मुखर्जींचा स्वर खरंच घनगर्द वादीओंची सैर करून आणतो. हा स्वर कमालीचा अवखळ आणि गोड आहे. १९६५ मध्ये मुंबईत झालेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या महागायिका स्पर्धेत आरती देशातून पहिली आल्यानंतरही त्या काळात हिंदी पडद्यावर गायिका म्हणून संधी आणि नाव मिळवणं खूपच कठीण होतं. मुलींमध्ये आरती मुखर्जी पहिली आणि मुलांमध्ये महेंद्र कपूर विजयी ठरले. नौशाद, मदन मोहन, सी. रामचंद्रन, अनिल विश्वास असे दिग्गज संगीततज्ज्ञ परीक्षक होते. या कार्यक्रमाला हिंदी पडद्यावरचे झाडून सर्व संगीतकार, संगीततज्ज्ञ उपस्थित होते. यातले काही स्पर्धक बडे गुलाम अली खाँसाहेब, तर काही बेगम अख्तरांचे शिष्य होते. त्यात वयानं १४ वर्षांची आरती सर्वोत्कृष्ट गायक ठरली.

आरती मुखर्जी या नावाची पहिली ओळख झालेल्या या संगीत कार्यक्रमात केवळ आशा भोसलेंचं ‘इना मिना डिका’ हे ‘आशा’तलं धमाल गाणं ऐकायला मिळणार म्हणून आरती गेली होती, ती विजेती ठरली, मात्र या स्पर्धेतून पुढे आलेल्या स्पर्धक महेंद्र कपूरांसोबत तिचं एकही युगूलगीत नाही. दो नैना एक कहानी….‘मासूम’मधलं हे गाणं आशाचं असल्याचा समज होता, मात्र हे आरती मुखर्जीचं आहे. या गाण्यासाठी आरतीला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

- Advertisement -

यात सुुरुवातीला उल्लेख केलेलं वादिओंमे खो जाए हम तुम…हे गाणं आरंभ या विस्मृतीत गेलेल्या चित्रपटासाठी होतं. आरंभमध्ये मोठी स्टारकास्ट नसल्यानं कदाचित त्याची चर्चा झाली नाही, परंतु हे गाणं आजही हिंदी वाद्यवृंद, कराओकेत आवर्जून वाजवलं आणि गायलं जातं. ऋषीकेश मुखर्जींनी १९८१ मध्ये रंगीबिरंगी हा हलकाफुलका सिनेमा बनवला होता. यात आरडी बर्मनसाठी आरती मुखर्जींनी कभी कुछ पल जीवन के…गायलं होतं, जे परवीन बाबी आणि अमोल पालेकर यांच्यावर चित्रीत झालं होतं. हिंदी पडद्यावरील ‘जीवन किंवा जिंदगी’चा आशय सांगणार्‍या गाण्यात हे गाणं वरच्या रांगेत येईल. आरतीच्या आवाजाची ओळख हिंदी सिनेक्षेत्राला बंगाली संगीतकलेनं करून दिली. त्यामुळे बंगाली दिग्दर्शक, संगीतकारांनीही आरतीच्या गाण्याला पसंती दिली, मात्र असं असताना किशोरकुमार या मूळ बंगालमधल्या संगीत क्षेत्रातल्या मोठ्या नावासोबत हिंदी गाणं बंगालच्याच असलेल्या आरतीच्या वाट्याला पुरेसं आलं नाही.

सनदी अधिकार्‍यांच्या कुटुंबातील आरतीला संगीत वारसा घरातूनच मिळाला. संगीतकार ऋत्वीक घटक यांनी पहिली संधी दिली. त्याआधीपासूनच त्यांचं गाणं सुरू होतं. कोलकात्यात १९४५ मध्ये आरती मुखर्जी नावाच्या आवाजाचा जन्म झाला. कुठल्याही संगीत गायन स्पर्धेत आरतीनं गावं आणि पहिलं बक्षीस मिळवावं हे तिच्या अंगवळणी पडलं होतं. संगीतातील मोठी नावं सुचित्रा मित्र आणि धनंजय भट्टाचार्य यांनी एका कार्यक्रमात परीक्षक असताना आरतीचं गाणं ऐकलं आणि पहिली संधी बंगाली चित्रपटात पार्श्वगायनासाठी दिली. शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कथेवर चित्रपट साकारला जाणार होता, तर रवींद्र चटर्जी संगीतकार होते. आरतीनं त्याआधी सिनेमे पाहिले नव्हते. सत्यजीत रे यांचा पाथेर पांचाली हा त्यांनी पाहिलेला पहिला सिनेमा तर सिनेसंगीत ऐकायला ऑल इंडिया रेडिओवर ‘बिनाका गीतमाला’चं होतं.

- Advertisement -

अनिल विश्वासांनी अंगुलीमाल चित्रपटासाठी धीरे धीरे ढल रे चंदा…हे गायलेलं गाणं अभिनेत्री निम्मीवर चित्रीत झालं. निम्मी आणि आरतीच्या वयात महदअंतर असतानाही अनिल विश्वासांनी आरतीवर टाकलेला विश्वास तिने सार्थ केला. पंडित चिन्मलाई या बंगालमधील संगीतकार तज्ज्ञ गुरूंकडे आरतीनं गाणं शिकलं होतं. परवीन सुलताना, आरती आणि शिप्रा बसू या तिघीही त्यांच्यासमवेत संगीत शिकणं सुरू होतं. आरतीला बडे गुलाम अली खाँसाहेबांकडे गाणं शिकायचं होतं, पण काही कारणानं ते शक्य झालं नाही, मात्र उस्ताद साबिरुद्दीन खाँ यांच्याकडे संगीत शिक्षण सुरूच राहिलं. कोलकाता सोडायला घरातून नकार मिळाल्यानंतर तिथेच आरतीनं शास्त्रीय संगीताचे धडे सुशील बॅनर्जींकडून घेतले. खयाल, ठुमरी शिकल्यावर गझलेच्या वाटेला जावं, असं बॅनर्जींनी आरतीला शिकवलं होतं. शब्दांना स्वरांनी कसं सजवलं जावं याचे धडे बॅनर्जींनी तिला दिले. ‘याद पिया की आए…’ यातील ठहराव महत्त्वाचा आहे.

शास्त्रीय संगीतातील भाव सिनेसंगीतात कसे आणावे हे पुढे शिकता आलं. गीत गाता चलमधलं ‘श्याम तेरी बन्सी पुकारे राधा नाम…’ या मूळ बंगाली गाण्यातली हिंदीतली ओढ आणि आर्तता शास्त्रीय संगीताचा परिणाम असल्याचं आरतीनं सांगितलं. हिंदीत सिनेसंगीतात जसपाल सिंग यांच्यासोबत आरतीने अनेक गाणी गायली. रवींद्र जैनांच्या संगीतासोबत आरतीचं गाणं अधिक खुलून समोर आलं. ताराचंद बडजात्यांनी आरती मुखर्जीला गीत गाता चलसाठी बोलावणं धाडलं होतं, मात्र आरतीला इथं वेगळीच संधी मिळाली. ‘गुड’ नावाची बंगाली लेखक विमल मित्रा यांच्या कथेवर अमिताभ आणि नूतनला घेऊन ‘सौदागर’ बनवला जात होता. त्यात रफिसाहेबांसोबत गाण्याची मोठी संधी मिळाली. गाणं होतं ‘हुस्न है या कोई कयामत…’ संधी एका गाण्यापुरतीच होती, मात्र इथं थेट सामना लता आणि आशासोबत होता. सजना है मुझे सजना के लिए हे आशाचं, तर तेरा मेरा साथ रहे हे गाणं लताचं होतं, मात्र आरतीच्या गाण्यानंही या संधीचं सोनं केलं. आरतीला हिंदी चित्रपटात पुरेशी संधी मिळाली नाही, मात्र बंगाली चित्रपट आणि संगीत कलेतील यांचं नाव मोठंच नाही, तर संगीत शिकणार्‍यांसाठी मोलाचं आहे.

आरती मुखर्जींची हिंदीतील काही गाणी…
श्याम तेरी बन्सी पुकारे राधा नाम
दो पंछी दो तिनके कहो लेके चले है कहाँ
कभी कुछ पल जीवन के
दो नैना एक कहानी
यादों को भूल जाए
नैना नीर ना बहाओ
धीरे धीरे ढल रे चंदा
ये क्या हुआ मुझको
तुम्हारे बिना ओ सजना
आएगा आएगा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -