घरफिचर्ससारांश‘भाषासु मुख्या मधुरा’

‘भाषासु मुख्या मधुरा’

Subscribe

‘ओ गॉड, व्हॉट टु डू बाई, कळतच नाही मला. दिज डेज ना या मुली, कान्ट हेल्प इट इज बाई.’ हसू आलं ना हे वाचून, पण अहो, आजकाल फॅशन झाली आहे दोन-तीन भाषांमध्ये संवाद करण्याची. त्यामुळे समज, गैरसमजही होत असतात. काही लोकांना वाटते की ही काय उगाच शायनिंग मारते. काही लोकांना वाटते याला धड एका भाषेत बोलता येत नाही.

–अर्चना दीक्षित

मला माहीत आहे कोणत्याही एक भाषेत योग्य संवाद साधला गेला पाहिजे. भाषांची सरमिसळ होऊ नये. त्यासाठी लहानपणापासून घरात मातृभाषा पाल्याला शिकवली जावी. सगळं मान्य आहे, पण काय होते कधी कधी काही कारणांमुळे आपण दुसर्‍या प्रदेशात किंवा दुसर्‍या देशात स्थायिक होतो. त्यावेळी आजूबाजूला वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. त्या पाल्याच्या कानावर पडत असतात आणि मग अनेक वेळा इतर भाषा कानावर पडत राहिल्याने मुलेदेखील कधी कधी काही शब्द इतर भाषेतील बोलायला सुरुवात करतात.

- Advertisement -

शिवाय इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षक पालकांना खास बोलावून घरात संवाद इंग्रजीमधेच साधावा असा हट्ट धरतात. त्यामुळे काही पालक ज्यांना नीट इंग्रजी बोलता-वाचता येत नाही, ते गोंधळून जातात, पण आपण नीट शिकलो नाही आणि मुलांनी मात्र छान फाडफाड इंग्रजीमध्येच बोलावं असं त्यांना वाटतं आणि एका अर्थाने त्यांच्या दृष्टीने ते बरोबरदेखील आहे. कोणाला नाही वाटत आपण जे करू शकलो नाही ते ते मुलांनी करावं. यासाठी कोणतेही पालक धडपड करतील. त्यातल्या त्यात जवळपास असणारी चांगली शाळा शोधून आपल्या खिशाला परवडेल अशी शाळा शोधून तिथे पाल्याला दाखल करून समाधानी होतात.

काही जण आपलं स्टेटस जपलं जावं यासाठी आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेत असतात.

- Advertisement -

नाहीतर लोक काय म्हणतील असं त्यांना वाटत असतं. मग घरातही इंग्रजीतच संवाद सुरू होतो, पण त्यात कुठे नातलगांकडे गेले किंवा कोणी घरी आले की पाल्याची धांदळ उडते. कारण काही जण म्हणतात, काय रे किंवा काय ग इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातेस ना, मग बोल बरं इंग्रजीत. का नाही जमत बोलायला? आईबाबा तुझ्याशी इंग्रजी बोलत नाहीत का? आमची चित्रा अगदी फाडफाड इंग्रजी बोलते बरं का. तिच्या बरोबर आम्ही नेहमीच इंग्रजीमध्ये बोलतो.

तर काही जण याच्या विरोधात असतात. ते म्हणतात की, अरे देवा याला/हिला आपली मातृभाषा येत नाही का? असं कसं चालेल? आपली मातृभाषा आधी आलीच पाहिजे. इंग्रजी काय नंतरही शिकू शकतो. आपण शेवटी विचार तर आपल्या मातृभाषेतच करतो ना? आम्ही तर घरात फक्त आपल्या मातृभाषेतच बोलतो बरं का. शाळेतील शिक्षक काय, ते आपले काहीतरी बोलतच असतात, पण आपणच ठरवायचं आपल्या पाल्याला काय शिकवायचं ते.

ज्या कुटुंबात इंग्रजीचे ज्ञान असते, त्यांना खूप फरक पडत नाही, पण ज्या कुटुंबात इंग्रजीचे ज्ञान नसते, त्यांना कुठेतरी न्यूनगंड निर्माण होतो, तर काही जण मात्र या सर्व गोष्टींचा फारसा फरक पडू देत नाहीत.

या सर्व गोष्टींचा त्या निरागस पाल्यावर नकळत परिणाम होत असतो. त्यांना कोणत्या भाषेत संवाद साधावा याविषयी मनात संभ्रम निर्माण होतो. त्यात खरोखर पालक खमके असतील तर काही फरक पडणार नाही. त्यातूनदेखील काही शब्द इतर भाषेतील बोलले जातात. यात आजूबाजूला वेगवेगळ्या भाषा कानावर पडल्यामुळेही हे होऊ शकते, पण यावर हसणारेही अनेक असतात. हा वाक्यच्या वाक्य जर कोणी धडगुजरी बोलत असतील तर हसण्यापेक्षा त्यांना व्यवस्थित समजावून सांगितले तर चांगले आहे. एखाद् दुसरा शब्द इतर भाषेतील बोलला गेला तर टिंगल करायची काही गरज नसावी असं मला वाटतं. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काहीही करून संवाद साधला जावा. त्या त्या भाषेचा मान राखला जाईल याची काळजी घेतली जावी, असेही मला वाटते.

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -