घरफिचर्ससारांशकलिंगड पुराण

कलिंगड पुराण

Subscribe

लेखाचे शीर्षक वाचून तुम्हाला असे वाटले असेल लेखनासाठी आज मी असा हलका फुलका विषय का बरं निवडलाय, तर सोप्प आहे, अहो वातावरणात उष्णता किती वाढलीय. मग मनात विचार आला लेखनासाठी असा विषय निवडावा जो लिहिताना माझ्या लेखणीला आणि वाचताना तुमच्या डोळ्यांना व मनाला गारवा देईल.

–कस्तुरी देवरुखकर

फाल्गुन पौर्णिमेनंतर हवेतला उष्मा अतिशय वाढतो. अंगाची लाहीलाही व्हायला सुरुवात होते अन् घामाच्या धारा वाहू लागतात, पण म्हणतात ना निसर्गाने मानवाला प्रत्येक ऋतूतील आव्हानांना सामोरे जाण्याकरिता काही ना काही सोय करून ठेवलेली असते. याचा प्रत्यय उन्हाळ्यात सहज उपलब्ध होणारी फळे पाहिल्यावर होतो. असेच एक फळ तापलेल्या जीवाला शांत करून थंडगार पाण्याचे शिंपण करते ते म्हणजेच प्रत्यक्ष माणिक पाचूचा संगम वाटावे असे रत्नाइतकेच मौल्यवान फळ कलिंगड.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात मी बाजारातून कलिंगड खरेदी करून आणला, परंतु चवीला अजिबात गोड नव्हता. ही तक्रार करायला जेव्हा त्या फळ विक्रेत्याकडे गेले तेव्हा तो म्हणाला, अहो ताई, मी काय आता कलिंगडच्या आत शिरलोय व्हय. त्याचे हे शब्द ऐकल्यावर मला हसूच आले. क्षणभर मनात विचार आला, खरंच असे झाले तर. म्हणजे असे पाहा हिरव्यागार कलिंगडच्या आतील गारेगार लालसर, मऊशार भिंतीत वास्तव्य करायला मिळाल्यावर कशाला हवीय ती थंड हवेच्या ठिकाणाची महागडी ट्रीप.

समजा घराबाहेर सूर्य मोठ्या निष्ठेने ऋतू नियम पाळत आग ओकतोय. मी उन्हाने तापलेल्या रस्त्यावर गलितगात्र होऊन चालतेय. जीव अतिशय कासावीस झालाय अशातच मला जर कोणी पर्याय देऊन विचारले की, कल्पना कर आता या क्षणी तुला बंगल्यात राहायला आवडेल की कलिंगडाच्या आत? तर अर्थातच माझे उत्तर असेल “कलिंगड”. असो, ही एक कल्पना केली मी. असे अनेक विचार उन्हाळ्यातील गरमी असह्य झाली की आपसुकच मनाचा ताबा घेतात.

- Advertisement -

मला आठवतंय माझ्या माहेरी उन्हाळा सुरू झाल्यावर माझे वडील दर आठवड्याला कलिंगड आणायचे. मग काय शेजार्‍यांची चंगळ. अर्धे कलिंगड शेजारी वाटण्यातच संपायचे. बालपणी मला समज येईपर्यंत मी बालहट्ट करीत आईला बडबडायचे, अग काय हे, सर्व वाटूनच संपव आता. त्यावर आई हसून म्हणायची, तुझ्या वाटणीचे काढून ठेवलेय बाजूला. चिंता नको करूस.

गरमीच्या सुट्टीत मावशीकडे राहायला गेल्यावर मी आणि माझी मावस बहीण रोज बाहेर फिरायला जायचो. घरी परतताना मात्र कलिंगड विक्रेत्याकडून कलिंगडचे सरबत अथवा लालबुंद, रसाळ, मीठ अन् चाट मसाला लावलेल्या त्रिकोणी, चौकोनी आकारात रितसर कापून ठेवलेल्या कलिंगडाच्या फोडी त्यावर यथेच्छ ताव मारल्याशिवाय घराकडे पाय वळायचे नाहीत. कारण हे असे फळ आहे जे खाल्ल्याने तहान, भूक लगेच क्षमते व तुम्हाला ताजेतवाने झाल्यासारखे वाटते. कोकणात एसटीने गावी जाताना प्रत्येक थांब्यावर एसटीत खाद्यपदार्थ फळ विक्रेते विकायला यायचे. त्यात काळी जांभळी, आंबट गोड, रसाळ करवंदे, जांभूळ, उसाचा रस, काकडी, लिंबू सरबत आणि कलिंगडाचे काप यांचा समावेश असायचा. नुसतं पाहूनच डोळे सुखावायचे. तोंडाला पाणी न सुटेल तरच नवल.

बालपणातला एक खेळ म्हणजे कोडं घालणे. त्यात अनेक वेळा गंमत म्हणून बालिश प्रश्न विचारला जायचा. अगं मला सांग, आपल्या शिवाजी महाराजांनी सर्व गड जिंकले, पण एक राहिला तो कुठला? आम्ही लहान मुले त्या वयात समज तोकडी, एकमेकांच्या तोंडाकडे पाहत म्हणायचो, उत्तर नाही येत. त्यावर प्रश्न विचारणारी मैत्रीण चेहर्‍यावर खेळ जिंकल्याचा आव आणत म्हणायची, ’कलिंगड’. मग मी आणि इतर मैत्रिणी स्वतःच्याच फजितीवर मोठ्याने हसायचो. गोकुळात श्रीकृष्ण गोपाळांसमवेत लपून छपून मडक्यातले लोणी चोरून खायचे हे तर सर्वश्रुत आहे. ते गोपाळ तर आम्ही आधुनिक गोपिका. आम्ही चक्क कलिंगड चोरून खायचो.

तर झाले असे की एकदा मी मैत्रिणीच्या गावी गेले होते. तिथे शेजारच्या काकांनी फळांची बाग तयार केली होती. काका स्वाभावाने तापट. बागेत लहान मुलांना प्रवेश करण्यास मनाई होती. आम्ही सर्व सख्या दुपारी काका झोपी गेल्यावर हळूच लपत छपत बागेत शिरलो व वेलीवरचे मध्यम आकाराचे कलिंगड सोबत आणलेल्या पोत्यात भरून पलायन केले. तिथून बाहेर आल्यावर दूरवर वडाच्या पारावर बसून कलिंगडाचा आस्वाद घेतला. पोटपूजा झाल्यावर कलिंगडाची टोपी करून डोक्यावर थंडगार टोप मिरवत गावात भटकलो. काकांना हा सर्व प्रकार कळल्यानंतर दुसर्‍या दिवशी आम्हाला कडू शब्दांचे कारले खावे लागले. अहो का काय विचारताय, आमच्याकडे कुठे होता बाळकृष्ण.

एक दिवस काय झाले, आई बाबा घरी नव्हते. आईने स्वयंपाक करून ठेवला होता. तरीही उकाड्याने जीव हैराण झाल्याने जेवण करण्याची इच्छा नव्हती. इतक्यात माझी नजर टोपलीत ठेवलेल्या लहानशा गोल गरगरीत कलिंगडावर गेली. आईने तर बजावले होते,आम्ही परत आल्यावर कलिंगडाचे काप करू. उन्हातून आल्यावर तेवढाच गारवा मिळेल. आता काय करावं हा प्रश्न मला पडला. तेव्हा एक युक्ती सुचली. हिरव्या आवरणाचे समान आकाराचे अर्धगोलाकार दोन भाग केले व आतला लालसर गर चमच्याने अलगद काढून भांड्यात गोळा केला.

त्यानंतर ते अर्धगोलाकार दोन तुकडे पुन्हा एकमेकांवर रचून टोपलीत ठेवून दिले. त्या रसरशीत गराचा समाचार घेतल्यानंतर मी निमूटपणे झोपी गेले. तासाभराने आईबाबा घरी आले, तर आईने मला जागे करीत विचारले, काय ग, स्वयंपाकाची भांडी जशीच्या तशी आहेत. तू जेवली नाहीस? तब्येत बरी आहे ना? मला काय बोलावे ते सुचेना. मी गप्पच. त्यावर कहर म्हणजे आई म्हणाली, चल कलिंगड खा, बरं वाटेल. आता आली का पंचाईत. मी डोक्यावरून चादर ओढून घेतली. बाबा कलिंगड कापायला गेले तर फळ हातात

घेतल्याबरोबर त्याची दोन शकलं आजूबाजूला उडाली. आईबाबा चकीत झाले. हा काय चमत्कार! बाजारातून आणले तेव्हा अखंड होते. अशी विचित्र चोरी कोणी केली? आई घसा खाकरत म्हणाली, अहो आता बाहेर जाताना कलिंगड तुमच्या बँकेच्या लॉकरमध्येच ठेवत जाऊ. घरातच चोर फिरताहेत. असे म्हटल्यावर बाबा ख्या ख्या हसायला लागले. माझी काही चादरीतून डोकं वर काढायची हिंमत झाली नाही.

तर असे काही गमतीदार किस्से आहेत. मला कलिंगड खूप आवडते. माझ्या वडिलांच्या आजारपणात तर हेच कलिंगड संजीवनी बनले होते. निसर्गदत्त ईश्वरी अंश असतात निसर्ग निर्मितीमधील या छोट्या छोट्या गोष्टीत. त्यामुळे पुन्हा पुन्हा हाच विचार मनात डोकावतो की निसर्गाने मानवाला किंबहुना सर्वच प्राणीमात्रांना भरभरून दिलंय. त्याचा मनमुराद आनंद तर घ्याच, परंतु निसर्ग संवर्धनासाठी आपले काही ना काही योगदान जरूर द्या.
उन्हातान्हाच्या गारेगार शुभेच्छा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -